हजारो पारायणे केली पण रामाची सीता कोण होती ? हे सांगता येत नसेल तर त्या पारायणाला काय अर्थ. पहिल्याच पारायणाने बोध होणार नाही हे ही तितकेच खरे आहे. पण नित्य मन लावून ते आत्मसात करून पारायण केले तर हळूहळू त्या पारायणातून आपोआपच बोध होऊ लागतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
साचचि बोलाचें नव्हे हे शास्त्र । पै संसारु जिणतें हे शस्त्र ।
आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इये ।। ५७६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – खरोखरच गीता हे (नुसतें) शब्द पांडित्याचे शास्त्र नाहीं तर ही गीता संसार जिंकणारें शस्त्र आहे ( फार काय सांगावे ! ) या गीतेची ही अक्षरें आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत.
मंत्रांचे, श्लोकांचे पठण अनेक मंदिरात नित्य नियमाने होत असते. हे श्लोक, मंत्र अनेकांना तोंड पाठ असतात. मंदिराच्या वातावरणात गेल्यानंतर सुरु असलेल्या पठणातून आपल्याही तोंडातून हे श्लोक आपोआपच पुटपुटले जातात. भले ते आपणाला पाठ असोत वा नसोत. पण त्या पठणाचा आपल्यालाही बोध होतो. श्लोक पाठ असणे त्याचे पाठांतर असणे म्हणजे श्लोक आपणास आत्मसात झाले असे म्हणता येत नाही. कारण या श्लोकांचा अर्थ जोपर्यंत आपल्या मनाला भावत नाही, समजत नाही, पटत नाही, त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत ते श्लोक कधीही आपलेसे होत नाहीत. त्या श्लोकांचा आपणास बोध होण्यासाठी या श्लोकांचा अर्थ आपण प्रथम समजून घ्यायला हवा. ते श्लोक काय आहे हे जेव्हा आपणास समजेल तेंव्हाच त्याची अनुभुती येईल. असे झाले तरच खऱ्या अर्थाने त्या श्लोकांचे पठण योग्यप्रकारे झाले असे म्हणता येईल.
नुसते वेदपाठ असून काय उपयोग ? त्याचा अर्थबोध आपणाला होत नसेल तर ती व्यर्थ बडबड ठरू शकते. यासाठी मंदिरात आपण का जावे ? तेथून काय घ्यावे ? तेथे गेल्याने आपणास कोणता लाभ होतो ? आपली मानसिक स्थिती बदलते का ? यावर चिंतन मनन आपण प्रथम करायला हवे. तरच मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे समाधान आपणास मिळेल. देवाला नुसता नमस्कार करून किंवा त्याच्या पायावर डोके ठेवून देव आपणास भेटत नाही. तो भेटण्यासाठी, तो प्रसन्न होण्यासाठी आपण काय करायला हवे याचा विचार आपण प्रथम करायला हवा. परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणारे कधीकधी प्रत्यक्ष कामात अपयशी ठरलेले पाहायला मिळतात. कारण घोकंमपट्टी, पाठांतर करून मिळवलेल्या गुणांनी तो विषय आत्मसात झाला असे म्हणता येत नाही. यासाठी त्या विषयाचे आकलन करायला आपण शिकले पाहीजे. तो विषय समजून घेऊन तो आत्मसात केला तरच त्या विषयाचा प्रत्यक्ष जीवनात, कामात त्याचा लाभ होईल.
हजारो पारायणे केली पण रामाची सीता कोण होती ? हे सांगता येत नसेल तर त्या पारायणाला काय अर्थ. पहिल्याच पारायणाने बोध होणार नाही हे ही तितकेच खरे आहे. पण नित्य मन लावून ते आत्मसात करून पारायण केले तर हळूहळू त्या पारायणातून आपोआपच बोध होऊ लागतो. एकतरी ओवी अनुभवावी हे यासाठीच म्हटले जाते. पारायण करून वाचन केल्याचे समाधान मिळते. त्या वातावरणात मिळणारा आनंद आपल्या मनाला निश्चितच उर्जा देतो. पण एका ओवीचा अर्थबोध जेव्हा आपल्या मनाला होतो तेव्हा त्यातून होणारा आनंद हा हजारो पटीत असतो. यासाठी नुसती बडबड करून उपयोगाची नाही तर मन लावून पारायण करायला हवे. एकातरी ओवीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पारायण करताना अवधान असेल तर निश्चितच ओव्यांची अनुभुती येते. यातून मिळणारे समाधान, स्फुर्ती निश्चितच प्रेरणादायी असते.
गीतेतील, ज्ञानेश्वरीतील अक्षरातून आत्मज्ञान नित्य ओसंडून वाहात आहे. आत्मज्ञानाचा अखंड वाहणारा हा स्वयंभु झरा आहे. हा स्त्रोत आटणारा नाही. या स्त्रोताचा लाभ, त्याचे सेवन करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. झऱ्याच्या उगमापाशी जाऊन तेथे असणाऱ्या गोड पाण्याचा आस्वाद घ्यायला हवा. झऱ्याच्या उगमाजवळचे पाणी शुद्ध, गोड अन् शीतल असते. त्याच्या सेवनातून मनाला तृप्ती मिळते. मनाला प्रोत्साहित करणारी, समाधान देणारी ही उर्जा टिपूण आपण आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने पारायण सार्थकी लागेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.