April 23, 2024
Purity of mind should be removed from adulteration of disorders
Home » विकारांची भेसळ हटवून हवी मनाची शुद्धता
विश्वाचे आर्त

विकारांची भेसळ हटवून हवी मनाची शुद्धता

मनाच्या विकासासाठी मनाची शुद्धता ही गरजेची आहे. मनात उत्पन्न झालेली ही तणकटे दूर करणे गरजेचे आहे. ही तणकटे ही आपोआप उगवत असतात. त्याची पेरणी कोणी करत नाही. पेरणीसाठी आवश्यक बिजामध्ये त्याची भेसळ असू शकते. पेरणी करताना ही अशी भेसळ ही दूर करावी लागते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

मनशुद्धीच्यां मार्गी । जै विजयी व्हावें वेगी ।
तै कर्म सबळालागी । आळसु न कीजै ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – मनाची शुद्धता होण्याच्या मार्गांत आपण लवकरच विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याच्या कामी आळस करू नये.

पावसाळा सुरु झाला की सर्वत्र हिरवेगार गवत, तण दिसते. पण हे तण, गवत कोणी पेरलेले नसते. ते आपोआप उगवते. कोणत्याही बीजास पोषक वातावरण मिळाल्यास त्याची वाढ लगेच होते. गवताचे, तणाचे बीज हे जमिनीत सुप्तावस्थेत असते. त्याला योग्य वातावरण मिळाल्यावर लगेचच ते उगवते. जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या इतर पिकांची मात्र पेरणी ही करावी लागते. त्याची योग्य ती निगा ही राखावी लागते. तरच त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.

हे सांगण्याचा उद्देश इतकाच की, मनामध्ये वाईट विचार हे आपोआप उत्पन्न होतात. त्यांची येरझार ही सातत्याने होत असते. गवत किंवा तणाप्रमाणे ते आपल्या मनात सुप्तावस्थेत असावेत. त्यांना योग्य पोषक वातावरण मिळाले की ते लगेच उगवतात. मनात उगवलेले हे तणकट मात्र वेळीच काढून टाकावे लागते किंवा त्यावर नियंत्रण हे मिळवावे लागते. अन्यथा त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. या तणावरच विविध प्रकारचे कीटक, डास हे वाढतात. यातूनच मग रोगराई वाढते. यासाठी या तणांचा बंदोबस्त करून स्वच्छता ठेवणे हे गरजेचे असते. मनाची स्वच्छता ही यासाठीच गरजेची आहे. मनात आलेले वाईट विचार ताबडतोब नष्ट करण्याची किंवा काढून टाकण्याची गरज आहे. अन्यथा यातूनच अनेक अन्य वाईट कृत्ये ही हातून घडू शकतात.

मनाच्या विकासासाठी मनाची शुद्धता ही गरजेची आहे. मनात उत्पन्न झालेली ही तणकटे दूर करणे गरजेचे आहे. ही तणकटे ही आपोआप उगवत असतात. त्याची पेरणी कोणी करत नाही. पेरणीसाठी आवश्यक बिजामध्ये त्याची भेसळ असू शकते. पेरणी करताना ही अशी भेसळ ही दूर करावी लागते. अनावश्यक बीजे काढून टाकावी लागतात. मुख्यपिकावर लक्ष केंद्रित करून ही सर्व उपाययोजना करावी लागते. म्हणजेच मनाच्या विकासासाठी योग्य विचारांची पेरणी करतानाही ही अशी काळजी घ्यावी लागते. यामध्ये तणकटांची किंवा अनावश्यक विचारांची भेसळ नसल्याची खात्री करून घ्यावी लागते.

मनाची शुद्धता म्हणजे मनातील काम, क्रोध, लोभ, विषय, वासना इत्यादी विकाराची तणकटे काढणे आवश्यक आहे. शुद्ध विचारांच्या बियाण्यात या अनावश्यक विचारांची झालेली भेसळ दूर करायला हवी. जे पेराल तेच उगवणार. शुद्ध विचारांची बीजे पेरली तर शुद्ध विचारांचीच पिके, फळे उत्पन्नास येणार. यासाठी आवश्यक असणारे हे भेसळ नष्ट करण्याचे काम त्वरीत अन् वेळेवर करायला हवे. मनात आपोआप उगवणारे हे तणकटही मुख्य पिकास मारक होऊ नये यासाठी नष्ट करायला हवे. तरच आत्मज्ञानाचे उत्पादन हाती पडेल.

Related posts

महिलांचे हक्काचे व्यासपीठ वडगणेतील चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय

प्रवासायन…

रूपरम्य शरद

Leave a Comment