May 30, 2024
Rushikesh Palande Pravin Bandekar Book Publication
Home » ‘सातमायकथा’ नी ‘अरतें ना परतें’ चा आगळा वेगळा प्रकाशन सोहळा
काय चाललयं अवतीभवती

‘सातमायकथा’ नी ‘अरतें ना परतें’ चा आगळा वेगळा प्रकाशन सोहळा

‘सातमायकथा’ नी ‘अरतें ना परतें’ चा आगळा वेगळा प्रकाशन सोहळा

मराठीतील नव्या दमाचे प्रथितयश लेखक हृषीकेश पाळंदे लिखित ‘सातमायकथा’ ही कादंबरी तसेच जेष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर लिखित ‘अरतें ना परतें’ हा कथासंग्रह या दोन पुस्तकांचे प्रकाशन २८ एप्रिल रोजी सकाळी चिपळूण तालुक्यातील ‘श्रमिक सहयोग’ संस्थेच्या कोळकेवाडी या गावातील प्रयोगभूमीमध्ये पार पडले. या प्रकाशनासाठी हृषीकेश पाळंदे, प्रवीण बांदेकर यांच्यासह राजीव नाईक, डॉ. श्रुती तांबे, गणेश विसपुते, डॉ. नितीन रिंढे हे नामांकित साहित्यिक तसेच पुरातत्व संशोधक सायली पालांडे दातार हे मान्यवर उपस्थित होते. या सर्वानी दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने यथोचित मांडणी केली. या सर्वाना प्रयोगभूमीतील बाललेखक संदीप निकम याचे ‘संदीपच्या गोष्टी’ तसेच श्रमिक सहयोगच्या शिक्षणविषयक कार्याची मांडणी करणारे ‘मोर मित्रांची शाळा’ ही पुस्तके मुलांच्या हस्ते भेट देण्यात आली. युवा चित्रकार श्रीनिवास बाळकृष्ण, अभ्यासक उत्पल व. ब. यांची यावेळेची उपस्थिती लक्षणीय होती. श्रीनिवासने तर बसल्या बसल्या उपस्थितांपैकी अनेकांची रेखाचित्रे रेखाटून त्यांच्या त्यांच्या हवाली केली.

‘सातमायकथा’चे प्रकाशन देवराईमध्ये व्हावे अशी हृषीकेशची इच्छा होती. मात्र ४०-४२ पर्यन्त पारा चढलेल्या तीव्र उन्हामध्ये ते शक्य झाले नाही. म्हणून मल्हार, महेंद्र इंदुलकर आणि सुनीता गांधी यांनी चालविलेल्या ‘अरण्य वाट’ या निरव्हाळ गावातील होम-स्टे मध्ये या पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन आदल्या दिवशी म्हणजे २७ एप्रिल रोजी संध्याकाळी करण्यात आले.

Rushikesh Palande Pravin Bandekar Book Publication
Rushikesh Palande Pravin Bandekar Book Publication

पुरातत्व संशोधक सायली पालांडे दातार यांनी घेतलेली हृषीकेशची मुलाखत आणि त्यानंतर रात्री उशीर पर्यन्त रंगलेली मोकळी चर्चा हे या वेळचे वैशिष्ट्य होते. भारतातील खेडोपाड्यात दीर्घकाळ चालत आलेल्या देवविषयक संकल्पना, त्याभोवती गुंफलेले समाजजीवन इथून सुरू झालेली चर्चा पुरुषसत्ताक समाजाच्या उदयापूर्वी असलेली स्त्री-प्रधान समाजव्यवस्था इथपर्यन्त चालली. या व्यवस्थेला स्त्री-सत्ताक असे म्हणण्याऐवजी स्त्री-प्रधान इतकेच नव्हे, स्त्री-हृदयी म्हणणे कसे आवश्यक आहे, पुरुष-सत्ता ही अनियंत्रित सत्ता, अनंत उपभोग, अविरत हिंसा या भोवती कशी रुजत गेली अशा अंगाने ही चर्चा विस्तारत गेली. ऋषिकेशच्या लेखनाची पार्श्वभूमी आणि सायली पालांडे दातार यांचे अभ्यासपूर्ण विवेचन या चर्चेला अधिक खोलात घेऊन गेले. ही चर्चा खरे तर अधिक तपशीलाने होणे आवश्यक आहे. या चर्चेसाठी ‘सातमायकथा’ने एक मोठा कॅनव्हास खुला केला आहे. जो पुढील काळात अनेकांच्या मनावर पसरलेली वाळवी मोकळी करू शकेल.‘पपायरस’ ही काही युवा हौशी साहित्यदर्दीनी चालविलेली प्रकाशन संस्था आहे. पुस्तकाच्या मांडणीपासून वितरण प्रक्रियेत नव्या रीतीने ती काम करीत आहे. साहित्य क्षेत्रातील जे जे नवे नवे ते ते टिपण्याची त्यांची धडपड आहे. या छोटेखानी प्रकाशन सोहळ्यात ळयात ती जाणवली. पपायरसचे निर्माते भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, धनश्री खंडकर हे तिघे संचालक तसेच त्यांचे सहकारी कार्यक्रमाच्या आयोजनासह, मान्यवरांच्या व्यवस्थेपर्यन्त सर्व कामे तळमळीने करीत होते.

आपल्या पुस्तकांच प्रकाशन म्हणजे एक अत्यंत परिश्रम पूर्वक केलेली खास निर्मिती आहे याची खोलवरची जाण त्यांच्या या आयोजनातून दिसून येत होती. पपायरसने प्रकाशित केलेली ही अनुक्रमे १३ व १४ वी पुस्तकं आहेत. या दोन्ही पुस्तकांचे लेखन तर वैशिष्ट्यपूर्ण आहेच, शिवाय मांडणी, रेखांकन, श्रीनिवास बाळकृष्ण आणि गणेश विसपुते यांनी रेखाटलेली मुखपृष्ठ हे सारेच लक्षणीय आहे.

राजन इंदुलकर

Related posts

माजोरी…

पडिले दूर देशी…

गणपतराव पाटील यांचे काम देशाला दिशादर्शक: डॉ. लॉरी वॉकर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406