- कोकणच्या आजच्या लेखक कवींची लेखन भूमिका मराठी साहित्यात महत्वाची
- एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष प्रा. रणधीर शिंदे यांचे प्रतिपादन
- औरंगाबाद, पुणे, सातारा, वाई, कोल्हापूर, चिपळूण,रत्नागिरी, गोवा आदी भागातील साहित्यिकांचा सहभाग
कणकवली – मालवण एकेकाळी कोल्हापूर संस्थानाचा भाग होता आणि शाहू महाराजांचा वारसा या भूमीला आहे. त्यामुळे मालवण येथे समाज संवाद साहित्य संमेलन आयोजित करणे हा सामाजिक साहित्यिक औचित्याचाचं भाग आहे. कोकणच्या आजच्या लेखक कवींची लेखन भूमिका मराठी साहित्यात महत्वाची ठरत असून यात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संस्थाही समाज साहित्य प्रतिष्ठानला जोडून घेत साहित्य विषयक भरीव काम करत आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान ही महाराष्ट्राची साहित्य चळवळ व्हावी असे आग्रही प्रतिपादन मराठीतील साक्षेपी समीक्षा प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांनी केले.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय समाज संवाद संमेलन मालवण बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. औरंगाबाद, पुणे, सातारा, वाई, कोल्हापूर, चिपळूण, गोवा या भागातून मोठ्या प्रमाणात साहित्य रसिक उपस्थित असलेल्या या संमेलनात बोलताना प्रा. शिंदे यांनी समाज संवाद साहित्य संमेलन ही चळवळ व्हावी आणि साहित्य व्यवहारातील सर्व घटकांना या चळवळीने जोडून घ्यावे असेही सांगितले.
शाहीर शाहिद खेरटकर यांच्या पोवाड्याने उद्घाटन झालेल्या या संमेलनाला संमेलनाचे प्रमुख पाहुणे समीक्षक प्रा.दत्ता घोलप, बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष डॉ. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, समीक्षक प्रा. जिजा शिंदे, प्रा.संजीवनी पाटील, कवी डॉ.अनिल धाकू कांबळी, प्रा. नमिता पाटील, कवी प्राचार्य गोविंद काजरेकर, कवयित्री तथा पुण्याच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ, कवी अंकुश कदम, संस्था पदाधिकारी प्रा.मनीषा पाटील, डॉ. दर्शना कोलते, प्रमिता तांबे, नीलम यादव, प्रियदर्शनी पारकर, ऍड. मेघना सावंत, ऍड. प्राजक्ता शिंदे, विलास कोळपे, प्रकाशक अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी कवी अनिल धाकू कांबळी यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर प्रा. संजीवनी पाटील संपादित :सिंधुदुर्गची नवी कविता’ आणि प्रा. जिजा शिंदे संपादित ‘सारेच पुरुष नसतात बदनाम: चर्चा आणि चिकित्सा’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन अनुक्रमे प्रा.रणधीर शिंदे आणि प्रा. दत्ता घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा.घोलप म्हणाले, साहित्याचा विचार समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो. सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत लेखक पोचवत असतो त्यामुळे गंभीरपणे साहित्य आणि संमेलनाचा विचार सर्वांनीच करायला हवा. हा विचार समाज साहित्य प्रतिष्ठान आणि सेवांगण करत असल्यामुळेच आम्ही या संमेलनाला उपस्थित राहिलो.
प्रा.संजीवनी पाटील म्हणाल्या, सिंधुदुर्गची नवी कविता बदलणाऱ्या सामाजिकतेला कवेत घेत अनेक आयामांना सामावून घेणारी ही कविता निश्चितच आशादायी आहे. त्यासोबतच या कवितेचे भविष्यही तितकेच उज्ज्वल आहे. त्यामुळे तिचे संपादन करताना आनंद मिळाला.
प्रा.जिजा शिंदे म्हणाले, सारेच पुरुष नसतात बदनाम मधील कविता रूढी परंपरेला छेद देणारी , वर्तमानाला कवेत घेत आजच्या पुरुषाबद्दल मांडलेली सच्ची अभिव्यक्ती ठरली आहे. सगळयाच पुरुषांना एकाच तराजूत तोलणं योग्य ठरणार नाही याकडेही सूचन ही कविता करत असल्यामुळे या कवितेवरील समीक्षा ग्रंथाचे संपादन करताना मलाही नव्याने अनेक गोष्टी शिकता आल्या.
यावेळी डॉ.अनिल धाकू कांबळे, मधुकर मातोंडकर आदींनीही विचार व्यक्त केले. यावेळी दुसऱ्या सत्रात ‘साने गुरुजी समजून घेताना’ या विषयावर ऍड. देवदत्त परुळेकर यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. प्रमिता तांबे यांनी सूत्रसंचालन केले.
कवी संमेलनात आजचे वास्तव
संमेलनाच्या शेवटच्या सत्रात कवयित्री अंजली ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री डॉ.दर्शना कोलते यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आलेले कविसंमेलन चांगलेच रंगले. प्रा.मनीषा पाटील, प्रियदर्शनी पारकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कविसंमेलनात बहुसंख्य कवींनी आजचे समाज वास्तव आपल्या कवितांमधून मांडले. यात कवी सफरअली इसफ, मनीषा शिरटावले, योगिता राजकर, रमेश सावंत, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, अंकुश कदम, नीलम यादव, प्रमिता तांबे, ऋतुजा सावंत, भोसले, प्रज्ञा मातोंडकर आदींसह अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.