September 17, 2024
Forts in Dnyneshwari article by Lata Mule Padekar
Home » श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन
विशेष संपादकीय

श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन

संदीप तापकीर हा मावळा दुर्ग पर्यटन करता करता आपल्या बांधवांना दर दिवाळीला दुर्गांच्या देशातून ही वैचारिक मेजवानी देत आहे. ट्रेकिंगवरील असा दिवाळी अंक काढावा हा विचारच मुळी तापकीर यांचे दुर्गप्रेम आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीचे झपाटलेपण अधोरेखित करणारे आहे; त्यांच्यातील इतिहास प्रेमीचे मनोज्ञ दर्शन घडवणारा आहे. यंदाच्या दिपावली अंकातही त्यांनी असेच वेगळेपण जपले आहे. या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन हा डॉ. लता मुळे पाडेकर (मोबाईल – ८३०८८१९८०८ ) यांचा लेख…

Durganchya Deshatun Dipawali ank by sandeep tapkir
Durganchya Deshatun Dipawali ank by sandeep tapkir

तुला कोणता छंद आहे ? असा प्रश्न विचारला की – कोणी सांगेल वाचन तर कोणी सांगेल खेळ; कोणी सांगेल बागकाम तर कोणी सांगेल टिव्ही बघण्यातच जातो वेळ !
मलाही वाचन, बागकाम, आकाशवाणी ऐकत ऐकत स्वयंपाक करणे असे छंद आहेतच; पण वेळ मिळाला की पटकन बॅग भरून ‘भटकंती’ला निघायला फार आवडतं. मग ती भटकंती कधी जवळच्या डोंगरावर तर कधी जंगलसफारी असते. कधी नदीकिनारी तर कधी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका असतो. कधी परदेशगमन तर कधी निसर्ग पर्यटन ! पण महाराष्ट्राच्या वैभवाची साक्ष असणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीत भटकणे यासारखा दुसरा आनंद नाही.

संत रामदास स्वामी यांनी सांगितले आहेच की –
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार |
शास्त्रग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ||

‘दुर्ग भ्रमण’ हा असाच एक साहसी छंद ! यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने आरोग्य उत्तम राहते. स्वावलंबन, सहकार्य, निर्णय क्षमता, समयसूचकता यासारखे गुण वाढीस लागतात. याचवेळी गडसफाई, वृक्षारोपण, भूजलपातळी वाढविण्यासाठी चर खोदणे, प्राणी पक्ष्यांसाठी दाणा- पाणी इत्यादी पर्यावरणपूरक उपक्रम राबविले तर निसर्गवैभवात भर टाकल्याचे समाधान पदरी पडते.
आपले गड, किल्ले हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याचे मुख्य आधारस्तंभ होते. किंबहुना ‘जितके जास्त किल्ले तितकी स्वराज्याची श्रीमंती’ असे समीकरण होते. प्रत्येक किल्ल्यावर राजांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंग घडलेले आहेत. अर्थात त्यासाठी त्यांनी गडकोटांची अगदी लेकरासारखी काळजी घेतल्याचा इतिहास आपणा सर्वांना विदित आहे. तद्नंतर स्वराज्य निमाले. पारतंत्र्य आले. काही किल्ल्यांची दुरावस्था झाली तर काहींना अवकळा प्राप्त झाली. अगदी स्वातंत्र्योत्तर काळातही पर्यटकांच्या बेफिकीरीने (अपवाद वगळता) गडकोटांवर कचऱ्याचे ढीग साचू लागले. परंतु अनेक दुर्गप्रेमींनी किल्ले संवर्धनासाठी मोहीम राबविण्यात पुढाकार घेतला आहे. त्यात तरुणाईचा सहभाग लक्षणीय आहे. शासनानेही काही ठिकाणी उत्तम कामगिरी बजावली आहे.

मंडळी, आपण हे दुर्गवैभव टिकवले पाहिजे ना… नव्हे ती आपली जबाबदारीच आहे. स्वच्छता, डागडुजी, वृक्षलागवड केलीच पाहिजे. तेथील इतिहास समजून घेतला तर जगण्याची उमेद वाढते, बळ मिळते, उर्जा प्राप्त होते. दुर्ग रचना समजून घेताना आपण स्तिमित होतो. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी केलेली उपाययोजना पाहून नकळत आत्मभान जागृत होते. आणि मला वाटतं की ही काळाची गरज आहे. अहो, अगदी आपल्या ऋषीमुनींनी आणि साधूसंतांनी देखील विविध ग्रंथांमधून हा दुर्ग इतिहास जागवत प्रबोधन केले आहे. त्यापैकी या लेखामध्ये ‘श्री ज्ञानेश्वरी’ या ग्रंथातील ‘दुर्ग’ वर्णन कोठे आणि कोणत्या अर्थाने आले आहे ते आपण जाणून घेऊ या….

“ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी ||”

संत ज्ञानदेवांना समकालीन असणारे भक्तशिरोमणी संत नामदेवांनी ‘श्री ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाचा केलेला हा गौरव पाहून आपण ज्ञानेश्वरीतील एकेक ओवी जेव्हा वाचत जातो; तेव्हा या ग्रंथातील विषय वैविध्य लक्षात येतं. त्याचबरोबर अगदी तेराव्या शतकातील श्री ज्ञानेश्वर माउलींचं निसर्ग निरीक्षणही उकलत जातं. ज्या काळात तंत्रज्ञानाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना प्रत्येक गोष्ट त्यांनी इतकी अचूक टिपली आहे की वाचताना आपण अचंबित होत जातो.

“श्री गीता” या संस्कृत भाषेतील ग्रंथामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश हा माउलींनी समजून घेऊन समाजातील समस्तांसाठी प्राकृतातून ओवीबद्ध रूपात सादर केला आहे. एकूण अठरा अध्यायात सुमारे ९०३३ इतक्या ओव्या उद्धृत केलेल्या आहेत. यामध्ये अध्यात्म, विज्ञान, भूगोल, गुरूमहती, प्रयत्नशीलता, नैतिकता, भाषाभिमान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, योगशास्त्र, संख्याशास्त्र, पर्यावरण असे कितीतरी विषय आलेले आहेत, पैकी येथे आपणांस माउलींनी वेळोवेळी केलेल्या तीर्थयात्रांमुळे अनेकदा ‘दुर्ग’ या शब्दाचा उल्लेख करून विषय समजावून दिलेले आहेत.

त्यापैकी काही ओव्यांचे मी अवलोकन करून शकले आणि त्या आपणासमोर सादर करण्याचे धारिष्ट्य करत आहे. आपण त्यानिमित्ताने आपल्या संतांचा वारसा किती समृद्ध आहे याकडेही लक्ष वेधायला हवे. आणि आपापली ग्रंथसंपदा पुन्हा पुन्हा जपायला आणि जोपासायला हवी, असे प्रांजळपणे नमूद करते.

कौरव पांडवांतील युद्ध जणू अटळच असल्याने रणभूमीवर दोन्ही बाजूकडील सेना सज्ज होती. रणशिंग फुंकले मात्र आणि भाऊ-भाऊ, गुरू-शिष्य, चुलते-पुतणे, सासरे-जावई असे सारे आप्तेष्टच एकमेकांसमोर उभे ठाकले. आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण ज्याचे सारथ्य करत होता तो वीर धनुर्धर पार्थ पार गोंधळला, बावरला, आणि युद्धभूमीवर नि:शस्त्र जाहला. त्यांच्या मनात विषाद दाटून आला.

पहिल्या अध्यायाचे नावही ‘अर्जुन विषादयोग’ असेच आहे. यामध्ये प्रत्यक्ष पांडवांच्या सैन्याची रचना कशी होती हे सांगताना पुढील ओवीमध्ये ‘दुर्ग’ या शब्दाचा उल्लेख आला आहे.

गिरीदुर्ग जैसे चालते |
तैसे विविध व्यूह सभंवते |
हे रचिले आथि बुद्धिमंते |
द्रुपदकुमरे || १- ९४ ||

हुशार अशा द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने सैन्याचे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचले आहेत; जसे काही चालते डोंगरी किल्लेच !

तर कौरवांचे सेनापती खुद्द भीष्माचार्य यांनीदेखील आपल्या सैनिकांची रचना कशी केली ते वर्णन या ओवी मध्ये आले आहे.

आता याचे नि बळे गवसले |
हे दुर्ग जैसे पन्नासिले |
येणे पाडे थेकुले |
लोकत्रय || १-११६ ||

आपल्या सामर्थ्याने यांनी या सैन्याची अशी काही रचना केली आहे की; जसे काही किल्लेच बांधले आहेत. यांच्यापुढे त्रिभुवनही क:पदार्थ आहे.

कर्मयोग या तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात की….

हे देहदुर्गीचे धोंड |
इंद्रियग्रामींचे कोंड |
यांचे व्यामोहादिक बंड |
जगावरी || ३-२४२ ||

हे (काम क्रोध) देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत. हे इंद्रियरुपी गावाचे गावकूस आहे. यांचे अविवेकादिकांच्या रूपाने जगावर (मोठे) जणू बंड केले आहे….

काम आणि क्रोध यांनी अशी अनेक दुष्कृत्ये केली आहेत आणि मानवी मनातील शांतता गमावली आहे. याबद्दल पुढील ओवी समजावून घेऊ या….

इही संतोषवन खांडिले |
धैर्य दुर्ग पाडिले |
आनंदरोप सांडिले |
उपडुनिया || ३-२५३ ||

जणू काही संतोष वन तोडून टाकले. धैर्य रुपी किल्ले पाडले व आनंदरुपी लहान रोपटेही उपटून टाकले.

आत्मसंयमयोग या सहाव्या अध्यायात – जे लोक तप करून सामर्थ्य प्राप्त करतात, त्याविषयी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की,

अथवा निलागे निसरडा |
तपोदुर्गाचा आडकडा |
झोंबती तपिये चाडा |
जयाचिया || ६-४७६ ||

तपी /तपस्वी /योगी ही मंडळु स्वरूप प्राप्तीच्या इच्छेने तपरुपी तुटलेल्या निराधार /निसरड्या कड्यावर किंवा किल्ल्यावर सुद्धा चढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात की हे अर्जुना तू मनाने तरी ‘योगी’ हो.

विश्वरूपदर्शनयोग या अकराव्या अध्यायात जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णाचे ‘विश्वरूप दर्शन’ घडले; त्यामध्ये अनेक विविध रूपे पहायला मिळाली. त्यापैकी या ओवीत वर्णन केल्याप्रमाणे

की ये मृत्यूसीच मुखे जाहली |
हो का जे भयाची दुर्गे पन्नासिली |
की महाकुंडे उघडली |
प्रळयानळाची || ११-२०० ||

जणू मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली दिसली; अथवा जणू काही भयाचे किल्लेच रचलेले आहेत. अथवा प्रलयाग्नीची महाकुंडेच उघडलेली आहेत.

बाराव्या अध्यायातील ‘भक्तियोग’ या विषद करताना माउलींनी योगाचे महत्त्व पटवून दिले आहे.

ऐसेनी जे समबुद्धी |
गिळावया सोहम सिद्धी |
अंगविताती निरवनिधी |
योगदुर्गे || १२-५७ ||

अशा प्रकारे सर्वत्र समत्वभाव अथवा समबुद्धीने जे वागतात; ते ‘मी ब्रह्म’ अशी भावना प्राप्त करून घेण्याकरिता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. म्हणजेच योगाचा सूक्ष्मतम अभ्यास करतात आणि योग मार्गातील अत्युच्च पातळी प्राप्त करतात.

प्रकृती पुरुष विवेक योग’ या तेराव्या अध्यायामध्ये माऊली दृष्टांत (उदाहरण) देतात की….

आता मोडून ठेली दुर्गे |
का वळीत धरले खगे |
तेथे उपेक्षुनी जो रिगे |
तो नागवला की || १३-५८३ ||

समजा जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत; व अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी म्हणजेच ऐन सायंकाळी जर एखादा प्रवासी तेथे प्रवास करत आला व त्याने पुढे जाण्याऐवजी तिथे असणाऱ्या किल्ल्यातच तात्पुरता आश्रय घेतला तरी तो नागवला जाईल का? म्हणजेच त्याला काही त्रास होईल का तर नक्कीच नाही उलट त्याची तिथे उत्तम सोय होईल, निवारा मिळेल. यावरूनच आपल्या लक्षात येते की ‘किल्ला’ ही सर्वसामान्य लोकांसाठी देखील एक संरक्षण देणारी जागा आहे, आणि आज देखील हे उदाहरण तंतोतंत लागू पडते.

पुरुषोत्तम योग’ स्पष्ट करताना श्री ज्ञानेश्वर माऊली पंधराव्या अध्यायामध्ये हे उदाहरण देतात की…

गंधर्वदुर्ग कायी पाडावे |
काय शशविषाण मोडावे |
होआवे मग तोडावे |
खपुष्प की || १५-२१५ ||

ते असं म्हणतात की हा ‘संसाररूपी वृक्ष’ काढून टाकण्यासाठी/ तोडण्यासाठी उत्तम पुरुषाला अजिबातच कष्ट पडत नाहीत. जसं बागुलबुवाला खरंच ते देशोधडीला लावावं लागतं का? नाही ना… तसंच गंधर्वदुर्ग म्हणजेच ढगांचे किल्ले. नवल वाटतं की माऊलींचे निरीक्षण किती विलक्षण आहे! तर ढगांच्या विविध आकारांमुळे बनलेले जणू ढगांचे किल्ले खरच पाडले पाहिजेत का? सशाचे शिंग शशविषाण म्हणजे सशाचे शिंग की (जे मुळी नसतच) ते आपण मोडलं पाहिजे का? की आकाशाचे फूल आपण तोडलं पाहिजे? यापैकी काहीही करणे आवश्यक नाही कारण या सर्व गोष्टी आभासीच असतात. तसाच हा संसाररूपी वृक्ष आहे. तो आभासी आहे. फसवा आहे. त्यापासून सर्वांनी सावधान रहायला हवे.

श्रद्धा निरूपण योग’ या सतराव्या अध्यायाच्या प्रारंभीच

त्रिगुण त्रिपुरी वेढला |
जीवत्व दुर्ग आडिला |
तो आत्मा शंभूने सोडविला |
तुझिया स्मृती || १७.२ ||

या ओवीतून श्री ज्ञानेश्वर माऊली गणरायाला आपले सद्गुरु म्हणून वंदन करतात. आणि पुढेही प्रमाण देतात की; प्रत्यक्ष शिवशंभूने (शंकराने) सुद्धा या गणरायाचेच स्मरण करून सत्व, रज व तम या त्रिगुणांनी युक्त असलेल्या आपल्या जीव भावरुपी किल्ल्यात अडकलेल्या आत्म्याची सुटका करून घेतली होती.
थोडक्यात, आपली आराध्य देवता ‘श्री गणेश’ यांप्रती आपण सर्वांनीच सदैव कृतज्ञ राहायला हवं. असा अप्रत्यक्ष संदेशच आपल्याला या ओवीतून प्राप्त होतो. ‌

या आणि अशा कितीतरी ओव्यांमधून श्री ज्ञानदेवांनी ‘दुर्ग’ या विषयाकडे तुम्हा आम्हा सामान्य जणांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे मला विश्वास वाटतो की आपण प्रत्यक्ष ‘श्री ज्ञानेश्वरी’ या ग्रंथातील या आणि यासारख्या अनेक ओव्यांचा नक्की धांडोळा घ्याल आणि साहित्यविश्वात मोलाची भर टाकाल. म्हणूनच दुर्गांचा हा इतिहास हा केवळ इतिहास न राहता वर्तमान व्हायला हवा. आपल्या गडकोटांची आपणच काळजी घ्यायला हवी. हे आपलं वैभव आपणच जपायला हवं! हे दुर्ग म्हणजेच गडकोट आपला अभिमान आहेत! हा स्वाभिमान टिकवायला हवाच ना !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांची घोषणा

योग्य दिशा व बदल घडवणाऱ्या अर्थसंकल्पाची अपेक्षा !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading