July 27, 2024
An overview of social depiction in Konkan novels
Home » कोकणच्या कादंबऱ्यातील सामाजिक चित्रण : एक अवलोकन
विशेष संपादकीय

कोकणच्या कादंबऱ्यातील सामाजिक चित्रण : एक अवलोकन

कोकणची भूमी ही नवरत्नांची खान म्हणण्यापेक्षा अगणित रत्नांची खाण आहे. साहित्य प्रांतातही कोकणातील लेखकांनी आपले स्वतंत्र व्यक्तीत्व जपले आहे. साहित्यातून कोकणचा प्रदेश, इथली माणसे, स्वभावाचे नमुने, घडणाऱ्या कथा आणि त्यातून उमटलेल्या व्यथा,वेदना याचं यथार्थ चित्रण आपल्या कथा कादंबऱ्यांतून इथल्या लेखकांनी केले आहे. या सगळ्या कादंबऱ्यातून आलेली सामाजिक चिंतनशीलता महत्वाची आहे.

अनुभाभिव्यक्तीची निर्भिडता ज्यांच्याकडे आहे, असे सामाजिक चित्रण करणारे लेखक र. वा. दिघे, हमीद दलवाई, श्रीपाद काळे, श्री ना पेंडसे, मधु मंगेश कर्णिक, माधव कोंडविलकर, जयवंत दळवी, चि. त्र्यं. खानोलकर ,अभिजित हेगशेटे, प्रवीण बांदेकर होत. इतरांच्या कादंबरीतून तुरळक प्रमाणात या सामाजिकतेचे वर्णन येते.

“पडघवली”मध्ये अंबी वहिनी म्हणते ,”मुसलमानांसाठी कोनाड्यात एक तांब्या पाण्यासाठी ठेवण्यात यायचा. त्यात पाणी ओतले जायचे.” मध्यमवर्गीय कुटुंबांव्यतिरिक्त भंडारी, कोळी, महार, चांभार यांच्या जीवनचित्रणाचा अभाव या कादंबरीत आहे.

श्री. ना. पेंडसे यांच्या “एल्गार”मध्ये ब्राह्मणाचा मुलगा रघू आणि अब्दूलमिया तेल्याचा मुलगा कादर यांच्या मैत्रीची कथा आहे. हिंदूंच्या सोवळ्याओवळ्या चालीरीती, रोटीबेटी व्यवहारातील संकुचितपणा यात व्यक्त झाला आहे. हिंदू – मुस्लिमांच्या सलोख्याच्या संबंधाचे चित्रण प्रारंभी कादंबरीत येते, पाकिस्तानच्या निर्मितीनंतर हिरवे झेंडे फडकू लागतात. दंगली उसळतात, हिंदू – मुसलमानांच्या एकतेचे प्रतिक दादूमियाचा पीर त्यालाही उखडू टाकण्यात येते. हिंदू-मुसलमानांची घरे जाळतात. ज्या रघूने नाना शिंत्रेसारख्या मुसलमानाशी संबंध ठेवला म्हणून त्याला मारले. त्याने कादरच्या माणसांना आश्रय देणे शक्य वाटत नाही असे चंद्रकांत बांदिवडेकर यांना वाटते आणि कादरचे घरही विझविणे शक्य नाही, त्यामुळे कादंबरीचा शेवट हा भाबडा वाटतो.

“हद्दपार” मध्ये राजेमास्तरची व्यक्तीरेखा आली आहे. भव्यता व जग स्वतंत्र करण्याची वृती प्रतिभा त्याच्याजवळ होती. पित्याचे मत न मानन्यापर्यंत बंडखोरीवृत्ती त्याच्याकडे होती. होळीच्या वेळी असभ्य बोलणे बंद करायला लावणारा राजेमास्तर, ब्राम्हण-अब्राह्मण संघर्षाच्या वेळी काहीही बोलत नाही. या ठिकाणी श्री. ना. पैडसे यांनी संघर्ष टाळला आहे. मिनल तेंडुलकर सारखा सामाजिक अन्यायाशी लढणारा मनुष्य निधडया छातीचा पुढे येतो परंतु त्याचे व्यक्तिचित्र कादंबरीत केंद्रवर्ती नाही.

‘”गारंबीचा बापू”‘मध्ये पेंडसे निसर्ग वर्णनामध्ये रमलेले आहेत. गो. नि. दांडेकरांचा पिंडही तसाच आहे. गारंबीतील माणसे परंपरागत, रूढीप्रिय आहेत. त्यांना पापाची जाणीव नाही. लबाडीपणाचा, ढोंगीपणाचा क्लेष नाही. पेंडसे या कादंबरीतही आव्हान टाळताना दिसतात. शोध घेणे हा त्यांचा पिड नाही. गुरव आणि ब्राह्मण संघर्षाच्यावेळी बापू आपल्या सरपंच पदाची इच्छा सोडून देतो. अण्णा खोताच्या संबंधातून आपण झालो आहोत याचा त्याला परिचय नसणे म्हणजे भावनिक वादळे टाळणे होय.

‘सारे प्रवासी घडीचे ‘मध्ये जयवंत दळवी यांनी आजगावजवळील शिरोडा अरवलीच्या प्रदेशातील सामाजिकता रेखाटली आहे. परंतु समूहचित्रे रेखाटणे हा कादंबरीचा केंद्रवर्ती भाग आहे. स्मरणात राहिलेले गाव रेखाटण्याचा त्याचा प्रयत्न आहे. काही प्रभागात या कादंबरीत सामाजिक विषमतेचे चित्रण येते. प्रतिगामी विचारांचा पावटे मास्तर शाळेत येतो आणि जातीभेदाला प्रारंभ होतो. वर्गातील महार मुलांना, चांभार मुलांना तो बाजूला बसवितो. यांनी शिकण्यापेक्षा गुरे-ढोरे ओढावित असे त्याला वाटते आणि जी उर्वरित शिकताहेत ती त्याच्या कारकिर्दीत गळून जातील. वर्गातल्या मुलांना जानवे घालायला लावणे, प्रसंगी मारणे या कृत्यामुळे तो लेखकाचा विरोधक बनतो. लेखकाचे वडील केशा चांभाराला निवडणुकीत निवडून आणतात. या विषयीच्या प्रयोजनाबद्दल तो म्हणतो.,”आमचे आबा मुळीच पुरोगामी विचाराचे नव्हते, ते धमांचे व्यवस्थित पालन करणारे होते. सनातनी होते. केशा चांभाराला त्यांनी हाताशी धरले आणि निवडून आणले. ते जिद्दी खाष्ट होते. एरवी केशा चांभाराची सावली जरी अंगावर पडली तरी ते आंघोळ केल्याशिवाय घरात येत नसत.”जातीभेदाचे वास्तववादी चित्रण दळवी करतात, होळीच्या वेळी ही जातीयता विसरली जाई. कादंबरीतील हे वर्णन अनुषंगाने आहे.

हमीद दलवाई यांनी ‘इंधन या कादंबरीत हिंदू-मुस्लिम-बौद्ध यांच्या जातीय संधर्षाचे चित्रण केले आहे. ग्रामीण कादंबरीच्या इतिहासात या कादंबरीस महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याबरोबरच मराठी कादंबरीला नवे परिमाण या कादंबरीने दिले आहे. कोकणचे खर्या अर्थाने सामाजिक जीवन प्रतिबिंबित करणारी ही कादंबरी आहे.

कुळकायद्यामुळे आपल्या जमिनी गेल्यामुळे मुसलमान खोत दुखावलेले आहेत. इसाकच्या
शेतात कुळवाडी गुरे घालतात. त्यावरून संघर्षास प्रारंभ होतो. तसा हा संघर्ष पूर्वीपासूनचा आहे. या संघर्षासाठी ‘इंधन’मधून छोट्या-मोठ्या घटनाही पुरतात, कुळवाडी खोतांना पाकिस्तानात पळवून लावण्याची भाषा करतात. या संघर्षाचा साक्षीदार कादंबरीचा नायक आहे. जो समन्वयवादी, समतावादी, कोणत्या पक्षाचा नसणारा समाजवादी, मुसलमान असूनही नमाज न पढ़णारा, इतरांच्या दृष्टीने काफिर असणारा, पुरोगामी, विचारांचा आहे.पंधरा वर्षानंतर गावात आल्यावर गावातील संघर्ष मिटविण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु त्याला यश येत नाही. इसाक नायकाचा भाऊ पोलिसात तक्रार करतो. खटला उभा राहतो. कुळवाडी माफी मागतात. परंतु ते सुडाने पेटलेले असतात. नव्याने शिक्षित झालेला बौद्ध समाज मुसलमानांना जुमानत नाही. बौद्ध-कुणबी- मुसलमान यांच्यातील संघषनि गावगाडा मोडकळीस येतो. शिमग्याच्या सणात मशिदीपुढे ढोल वाजतो. पालखीच्या मिरवणुकीवर मुसलमान आक्रमण करतात. स्त्रियांची अबू लुटतात. वातावरण कलुषित होते. नायक आशावादी आहे. गावचे व्यवहार सुरळीत होतील. सरकारला सद्भाव निर्माण करायचा असेल. समन्वय साधला जाईल, जिनांनी पाकिस्तानची नाळ भारताशी जोडायला हवी होती, असे सर्वांना वाटते. इंधन हे सूड भावनेचे प्रतिक आहे.

“अजून उजडायचं आहे” ही माधव कोंडविलकर यांची १९८१ साली प्रकाशीत झालेली कादंबरी. या कादंबरीत चिपळूणजवळील दहा कि. मी. वर असलेल्या पातेपिलवली खेड्यातील ग्रामीण आणि दलित जीवनाचे चित्रण येते. कादंबरीत देवजी पालशेतकर या चर्मकार समाजातील सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन रेखाटले आहे. देवजीच्या कुटुंबाबरोबरच संबंध खेड्याचे रंगरूप उभे करण्यात कोंडविलकर यशस्वी झाले आहेत.

एका चाकोरीबध्द पध्दतीतून जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील अंधारातील कवडसे पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हजारो वर्ष अंधाराची संगत असलेला आणि काळोख पिऊन तर्र झालेला समाज प्रवाहात असूनही समाजात नसल्यासारखा आहे. तो बिनचेहऱ्याचा आहे. त्याचे जगणं, मरणं याच्याशी समाजाला काही घेणे-देणे नाही. अतिशय तुटपुंज्या वस्तुंच्या घरात दारिद्रयाचा काळोख सतत पसरलेला आहे.

आर्थिक सुबत्ता, शिक्षण, मानसन्मान, प्रतिष्ठा या प्रकाश किरणांचा लवलेशही नसताना देवजीसारखी माणसं आहे ते स्वीकारून घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे राबत राहतात. परंतु त्यांच्या माथी येते ती उपेक्षा. दैन्य, दारिद्रय, उपासमार. देवजीसारख्या माणसाच्या जीवनात प्रकाश का येऊ शकत नाही? याचा शोध घेण्याचा प्रयत्न कादंबरीत लेखक करताना दिसतो. देवजीच्या नित्य नियमातील जगण्याचा मार्ग परंपरागत चर्मकार व्यवसायाचा आहे. तो ज्या खेड्यामध्ये राहतो ते खेडे परंपरागत आहे. पडपणीवर जे मिळेल त्याच्यावरच त्याचे भागते. गावातील फाटक्या वाहणा दुरूस्त करून देण्याचे काम. भाजवणीच्या दिवसांमध्ये त्याच्याकडे येते. येथ पासून कादंबरीच्या जीवनचित्रणाला प्रारंभ होतो.

आपल्या स्वतःच्या गावातून दुसऱ्या गावात जाऊन तो उपरा ठरतो. देवजी हा सहसा कोणासही न दुखविणारा, सहन करत जगणारा आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्या इतपत धीर त्याच्याकडे नाही. त्यामुळे गावातील लोक लवकर चपला शिवण्याचे काम झाले नाही तर त्याला शिव्या घालतात. त्याची कोंडी करण्याचा. प्रयत्न करतात. गावातील कोणत्याही व्यक्तीस दुखवून आपल्याला गावात राहता येणार नाही याची जाणीव त्याला आहे. गावातील नाऱ्या, गोप्या, सखाराम ही पुढारी माणसं त्याला धमक्या देतात. त्यामुळे त्याच्या मनात सतत भिती राहते. त्याला लागणारे चामडे वेळेवरं मिळत नाही. त्यामुळे त्याची घुसमट होते. त्याने केलेल्या कामाचे योग्य पैसेही त्याला मिळत नाहीत. देवजी हा असहाय्य आहे. त्याच्याकडे स्वतःची शेती नाही,अशिक्षित आहे. मुलगा काशीनाथ ऑणि बायको देवकी यांच्या पोटापाण्याची व्यवस्था तो करू शकत नाही. आपल्या मुलांनी शाळा सोडून आपल्या धंद्यात मदत करावी असे त्याला वाटते.आपले दारिद्रय बदलवू पाहणाऱ्या देवजीची हळूहळू शोकांतिका होताना दिसते.

धर्मांतरानंतर बौध्द धर्माचा स्वीकार महारांनी केला. गावातील सगळी जूनी कामे टाकून दिली. गावानेही त्यांच्याशी असलेला संबंध तोडून टाकला. चर्मकार समाज हा अजूनही जुन्या महारांच्याप्रमाणे जगतो आहे असे लेखकाला वाटते. देवजी हा सुध्दा बैलाचे चामडे स्वतः काढतो. ते काढण्यासाठी त्याला कोणीही महार मिळत नाही. म्हणून तो आपल्याच जाती बांधवांकडून वाळीत टाकला जातो. कादंबरीचे निवेदन प्रभावी आहे घटना प्रसंगाला वास्तववादीपणे नेमकेपणाने अनुभवास भिडण्याची ताकद असल्यामुळे व्यक्तीरेखाटणे सकस पातळीवर अवतरली आहेत.

कादंबरी ही स्वाभाविकपणे उलगडत जाते. तिच्यात आवेशीपणा, आक्रस्ताळेपणाऐवजी या व्यक्तरेखा जिवंतपणे येतात. पाण्यासारख्या प्रवाही होत जातात. देवजीच्या जीवनाची पध्दती, त्याचा धंदा, त्याचे घर, कुटुंब एकजीव एकसंघ कादंबरीत येते, परिस्थितीने खंगून गेलेला देवजी उभा करण्यात कोंडविलकर यशस्वी झाले आहेत. त्याचा मुलगा काशिनाथ शिक्षण घेतो हे गावाला पहावत नाही. त्यास पाण्याला शिवला म्हणून मारण्यात येते. गावाच्या विरूध्द ‌जायला नको म्हणून देवजी त्यालाच मारतो. दारिद्रयात पिंजून निघाल्यामुळे परिस्थितीशी संघर्ष करत करत तो निराशावादी बनला आहे.आपल्याला पोटापुरते अन्न नाही, जमीन नाही याची खंत त्याला आहे. त्याला आपला धंदा करताना अनेक अडचणी येतात. दारोदार भीक मागण्याची पाळी येते.

पिलूअण्णा जोशींच्या घरी तो जातो. तू बुध्द झालास का? असे हिणवतो. महार तुमच्यापेक्षा सुधारले. तुम्ही तसेच राहिले म्हणतो, देवजी परंपरावादी आहे. ज्यानं त्यानं आपला धर्म पाळावा या विचारांचा आहे. जोशी त्याच्या विचारात आपले विचार मांडतो, ‘”हां! हे मला पटलं. ज्यानं त्यानं आपला धर्म कधी सोडू नये. प्रत्येकानं आपल्या पायरीनं वागावं. अरे एवढ्‌या जाती वाटलेल्या कशाला? आता महारांनी आपला धर्म सोडला. गावकीची कामं टाकली. पण त्याचं चांगलं कुठं झालंय! किती महार श्रीमंत झालेत. किती महार शिकून मोठे झालेत? तूच सांग बरं ?’ ब्राम्हणांचे कुळवाडी ऐकत नाहीत याची त्याला खंत आहे. मोरारजींनं जमिनी घशात घातल्या. झालं, आता आमच्या हातात काय राहिलंय ? स्वातंत्र्य आले परंतु राजकीय नेत्यांनी बहुजन समाजाला न्याय दिला का?” पिलूअण्णा भुकेल्या देवजीपुढे भाषण ठोकत राहतो.

देवजीने नेन्यांच्या काकूस हाक दिली. तिही त्यास कुत्सितपणे टोमणे मारू लागते. म्हणते, “एवढा मोठा आंबेडकर कित्ती कित्ती म्हणे शिकला. अगदी तिकडे इंग्लंड-अमेरिकेत जाऊन आला. अगदी मोठा कायदेपंडीत झाला. भारताची राज्यघटनासुध्दा त्यानं लिहिली. पण शेवटी………..! त्याला कोणी ब्राह्मण म्हणणार नाही. आज हे लोक सवलती मागताहेत उद्या बायका मागितल्याशिवाय राहणार नाहीत. आता ते तिकडे कुठेसे विद्यापिठाला नाव बदलून मागताहेत उद्या हे लोक चिपळूणच्या दातार कॉलेजला पण म्हणतील आंबेडकरांचे नाव द्या., पण ते काय त्यांच्या बापसाचं आहे?”काकू भडभडून बोलते.

जाता जाता म्हणते तुमच्यापेक्षा त्यांची जात खालची आहे. परंतु त्याच वाडीतील शांताक्का ही त्याला समजून घेते. त्याच्याशी माणूसकीने वागते. शेवटपर्यंत त्याला मदत करताना दिसते.. देवजीला आपल्या नातेवाईकांकडूनही कोणतीही मदत मिळत नाही. त्याचा सख्खा भाऊ त्याच्याशी बोलत नाही. वारंवार त्याच्याशी भांडतो. त्याचा जावई त्याला सतत हिणवून बोलतो. सगळ्या गावाकडून अवहेलना होत असताना आपल्या जावयाने आपली”मानहानी करावी. यामुळे तो सतत मनातल्या मनात धुसफुसत राहतो. कोणताही नाद किंवा व्यसने नसलेल्या देवजीचा देवावरचा विश्वास उडत जातो, महारासोबत दारू पितो. आपल्या मनातील मळमळ ओकून टाकतो. वेळेवर चप्पल न शिवल्यामुळे त्याची हत्यारे पळविण्यात येतात. पुढे तो शेतावर मिळेल ते काम करू लागतो.

त्याच्या दारिद्रयाबद्दल लेखक म्हणतो,” गेले अनेक दिवस त्याच्या घरात भात शिजला नव्हता. गव्हा जोंधळ्याची किंवा नाचणीची तव्यावर भाकरी पडली नव्हती. करलं कुटून काढलेल्या कोंड्याच्या भाकऱ्या, टावल्या अळूची भाजी आणि पेजेच्या पाण्यावर सगळी जगत होती. चार-पाच दिवस त्याला अन्नच नसते. सगळ्या घरात अवकळा आली होती. बरातील सगळी भांडी त्याने एक एक करून मोडली होती. सावकारांनी आतापर्यंत त्याला फसविलेले असते. अशा परिस्थितीत त्याचा जावई त्याच्याकडून पाहुणचाराची अपेक्षा धरेत असतो. दुकानदार त्याला उधार देत नसतात. संपूर्ण कादंबरीत त्याची बायको देवकी त्याला आधार देत राहते. गरीबीस कंटाळून देवजी गण्या पडवळाच्या बैलाची कातडी स्वतःच काढतो. त्याचा भाऊ हे कृत्य सगळ्या भावकीत करतो.”

लोकशाही व्यवस्था आली पण कोकणची जातीव्यवस्था काही बदलली नाही. लेखकाला कादंबरीतून हेच सुचवायचे आहे. देवजीच्या जातीचेच लोक त्याचे शोषण करू लागतात. देवजीच्या न्यायासाठी पातेपिलवली गावात पंचमंडळी बसतात. महालकरी लोक देवजीने आपला धर्म जात बुडविली म्हणून त्यास दंड भरण्याचा आग्रह करतात. पैसे घेतल्याशिवाय ते जाणार नसतात. रात्रीचा अंधार वाढत असतो. आपल्या नवऱ्यावरील प्रसंगाच्या निमित्ताने त्याची बायको निर्भिडपणे आपली बाजू मांडते. सध्या जात असलेल्या परिस्थितीचे सत्यकथन करते. शेवटी काहीच पर्याय राहिला नसल्यांमुळे आपल्या नवऱ्यास असे करावे लागले अशी समर्थपण ती बाजू मांडते.

पुढे कसे जगावे हा प्रश्न ती पंचांनाच विचारून निरुत्तर करते. कादंबरीतील जीवनानुभव आणि शिर्षक यांची सांगड योग्यप्रकारे लेखकाने घातली आहे. उत्तरोत्तर वाचकांच्या मनाची पकड घेत जाणारी अधिकाधिक अंतर्मुख करणारी ही कादंबरी बोलीभाषेतील निवेदनामुळे कसेदारपणे अवतरली आहे. ही कादंबरी म्हणजे कोकणच्या कादंबरीतील दलित काळोखाचा कवडसा आहे.

“चाणी”या कादंबरीतून रंगाने गोऱ्या असणाऱ्या व निंदेचा विषय झालेल्या उपेक्षित स्रीचे जीवन खानोलकरांनी रेखाटले आहे.

“भाकरी आणि फूल” ही मधु मंगेश कर्णिक यांची कादंबरी सामाजिक चित्रण करते. करूळच्या हाकेवर असलेल्या महारवाड्याशी लेखकाचे सलोख्याचे संबंध आहेत. लहानपणीचा बालमित्र करण्या महार, वाडा बांधून देणारा अर्जुन महार आठवणीत आहेत. इतर समाजामध्ये लेखक लहानपणापासून वावरत होता. महारवाडा त्याने अंगाखांद्यावर घेतला होता. पंचवीस वर्षानंतर करण्या महार त्याला भेटतो, त्याचे दारिद्रय संपलेले नसते. लेखकाकडून तो जुने कपडे मागुन घेतो. सचिवालयात काम करत असताना स्वातंत्र्यानंतर काय मिळविले? या प्रश्नाने तो आस्वस्थ होतो.
स्वातंत्र्यानंतरच्या पंचवीस वर्षाचे चलतचित्र “भाकरी आणि फूल” मध्ये येते. भाकरी म्हणजे समृध्दी आणिफुल म्हणजे संस्कृतीचे प्रतिक. कादंबरी लेखनाने लेखकाच्या मरगळ दूर झाली आहे. अस्वस्थता नाहीशी झाली. ही कादंबरी म्हणजे अस्पृश्य कुटुंबाच्या स्थित्यंतराचा आलेख आहे.गंगाधर पानतावने यांनी या कादंबरीतील सामाजिक चित्रणाबाबत समाधान व्यक्त केले आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी झपाटलेला देशाविरुद्ध,धर्माविरूद्ध बंडाची भाषा बोलणारा गोपाळ यात आहे.तीन पिढ्यांचे चित्रण ही कादंबरी प्रभावीपणे करते.

त्याच्या विद्रोही मनाचा आविष्कार असलेली आनंद ही व्यक्तिरेखा जबरदस्त आहे.कादंबरीत परंपरा न झुगारू शकणारा गोपाळचा बाप आहे.जीवनाविषयी अपेक्षा बाळगणारा पांडुरंग आहे. पुर्वापार आपले कर्म न सोडावे असं सांगणारा आंबू खोत हा शिवनाकास मंदिरात जाण्यास प्रतिबंध करतो. भ्रष्टाचार केला तर बघुन घेईल अशी धमकी देतो.त्याच्या सनातनीवृत्तीचे दर्शन त्यात घडते.
दलितांचे बळ वाढवण्यासाठी दलितांच्या धर्मांतर झाले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. डाॅ आंबेडकरांनंतर दलित समाजात फुट पडली. पुढची पिढी अधिक स्वार्थी बनली. त्यामुळे दलितांचा विकास झाला नाही. शिवनाक कदम च्या कुटुंबातील २५ वर्षाचा आलेख यात येतो. महार समाजाची जीवनपध्दती, बोलीभाषा यात आहे.

अभिजित हेगशेट्ये यांच्या “टकराव” या कादंबरीत रत्नागिरी जवळील फणसोप, टाकळा, भाट्येखाडी, या परिसरातील हिंदू मुस्लिम संघर्षाचे चित्रण येते. आंतरजातीय विवाहामुळे हा संघर्ष पेटतो. सामाजिक संघर्षास कारणीभूत होणारी कारणे लेखक अचुक पकडतो. कादंबरीतील वातावरणनिर्मिती प्रत्ययकारी आहे. धर्मपंथाच्या विषप्रयोगाने मने कलुषित होतात. देश धुसमुसतो. या देशाच्या ज्वालांवर पोळ्या भाजणाच्या शक्ती मजेत असतात. सामान्य माणसांची मात्र यात होळी होते. हिंदु -मुस्लिम दंग्यात कोणत्या शक्ती कार्यरत आहेत याचा शोध ही कादंबरी घेते. यातील वास्तवता कादंबरीस बहुआयामी परिमाणता देते.

सदुभाऊ पाटणकर यांची मुलगी स्नेहा आणि शौकत यांच्या प्रेमसंबंधामुळे पुढे विवाहामुळे धर्म चे रक्षण करू पाहणारे भिंत उभी करतात. दबावाचे राजकारण सुरू होते. हा संघर्ष कमी करू पाहणारे अनिसचे प्रा. अविनाश असहाय्य ठरतात. बाबरी मशिद पाडणारे मूलतत्ववादी हिंदू आणि जिहादी मुस्लिम आपापल्या परिने ठिणग्या टाकत राहतात. प्रतिगामी विचारांचे प्रा.केतकर वर्गात प्रचार करीत असतात. हिंदुत्वावर व्याख्याने देत असतात. हिंसक वातावरणाची पार्श्वभूमी तयार करत असतात.

अब्बाजानसारखी माणसे बदल स्वीकारणारी असली तरी ते सामाजिक रेट्यापुढे असहाय्य ठरतात. हिंदुत्ववादी संघटनांकडून भाडोत्री गुंड पाठवितात. राहत्या ठिकाणी ते हिंदू मुलीवर अत्याचार करतात. सदूभाऊ पाटणकरांना गावाने वाळीत टाकलेले असते मुलीला हजर करावे म्हणून जाकादेवीची घंटा घरली जाते. शेवटी स्नेहा जान्या भगताची कोंडाळी फोडून आपल्या परखड विचारांनी रूढी परंपरा तोडू टाकते. या कादंबरीत हा घडणार संघर्ष केवळ याच कारणासाठी नाही तर मुस्लिम समाजातील लोक परदेशात जाऊन नोकऱ्या करू लागले. अरबस्थानांतील लोक त्यांच्याकडे गुलाम म्हणून पाहू लागले. त्यांना भारत हाच आपला देश आहे असे वाटले. आर्थिक सुबत्ता आली. खोताकडील त्यांची गुलामगिरी बंद झाली, मुस्लिम युवक सभापती होऊन राजकीय सत्ता हातात घेतो हे खोतांना आणि ब्राह्मणांना सहनं होत नाही. त्यांचा राग काढण्यासाठी सदूभाऊ पाटण‌करांसारख्या आदर्शवत शिक्षकाला त्यांनी लक्ष केले. कादंबरीतील दाहक वास्तव मांडताना ती कलात्मकतेचा बाज राखते. चित्रदर्शी शैलीमुळे संघर्षांची धार लक्षात येते. बहुजनांचे जीवन, उच्चवर्णीयांचे दबाव तंत्र, धार्मिक गुलामगिरी, अंधश्रध्दा, व्यवसाय या चित्रणामुळे कोकणच्या सामाजिक चित्रिकरणात या कादंबरीने महत्वपूर्ण योगदान दिलें आहे.

कोकणच्या कादंबरीकारांनी कोकणचे सामाजिक जीवन पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक लेखकाचा पिड स्वतंत्र आहे. सर्व जातीस्तरातील लेखकांनी आपल्या आपल्या नजरेतून कोकणच्या समाज व्यवस्थेकडे पाहिले आहे. जाती व्यवस्थेचा अनेक पैलूतून विचार करून भारतीय समाजमन जातीय व वर्गीय दृष्टीकोनातून मांडता झाला आहे. यात आपण तुलना करू शकत नाही. ज्याची त्याची शैली स्वतंत्र आहे.जात वास्तव काहींनी स्वीकारले आहे. तर काहींनी बंडखोरी केलेली आहे तर काहींनी केवळ वेदना मांडली आहे. प्रत्येकाचा काळ वेगळा आहे. तरीही मूलगामी विचार मांडण्यात आकलनात हे लेखक कमी पडतात का हा प्रश्न राहतोच.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

प्रेमाचा अंकुर फुटण्यासाठीच झाका दान

वांझेने दाविले गऱ्हवार लक्षण

प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading