सुबाभूळ, आफ्रिकन ट्युलिप झाडे आता लावण्याची गरज नाही, वाऱ्यामुळे त्याच्या बिया सर्वत्र पसरून त्याची झाडे वाढू लागली आहेत. या झाडांची वाढ वेळीच रोखण्याची गरज आहे. सामाजीक वनीकरण विभागामार्फत आजही गुलमोहोरासारख्या वृक्षांच्या रोपांची निर्मिती करून लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. याउलट अनेक वृक्ष दुर्मिळ होत चालले आहेत, त्यांची रोपे मात्र बनवून उपलब्ध होत नाहीत. शिवण, बेहडा, बिबा असे अनेक औषधी वनस्पती लावण्याची गरज असतानाही ती लावण्याचा प्रयत्न होत नाही.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
जागतिक तापमान वाढ आणि त्याचे दुष्परिणाम हा सध्या नेहमी चर्चेत येणारा विषय आहे. या वर्षीच्या पावसाने तर जागतिक तापमान वाढीमुळे होणाऱ्या परिणामांचे स्पष्ट संकेत दिले आहेत. इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज या संस्थेने युनोला अहवाल दिला आणि त्यामध्ये पर्यावरण बदलांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचे इशारे दिले आहेत. अनेक राष्ट्रांनी हा विषय कृतीपेक्षा, चिंतेचा बनवला आहे. या प्रश्नावर कृती करण्यासाठी समित्या गठीत केल्या आहेत. भारतातील काही राज्यांनीही पर्यावरणविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी समित्या गठीत केल्या आहेत. समित्यांच्या अहवालांची प्रतिक्षा आहे. अशा समित्यांचे अहवाल येणार आणि त्यानंतर कृती होणार. या अहवालांची वाट पाहायला, निसर्ग मात्र तयार नाही. त्यांने मागील काही वर्षांपासून आपले वर्तन बदलले आहे. अचानक येणारा पाऊस, अरबी समुद्रासारख्या सुरक्षीत भागात वारंवार येणारी वादळे, अनियमीत पावसाने निर्माण होणाऱ्या दुष्काळाची आणि पूराची परिस्थिती, या सर्व गोष्टी आयपीसीसीच्या अहवालानुसार आहेत. यापेक्षा गंभीर समस्या उद्भवणार असा अंदाज आहे. या वर्षी चीनमध्ये आलेला दुष्काळ, पाकिस्तानमधील पूर, पुणे, बंगळुर, नाशिकसारख्या सुरक्षित शहरात साठून राहिलेले पाणी याचीच साक्ष देतात.
या सर्व गोष्टी आठवण्याचे कारण शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी कोल्हापूर परिसरात झालेले वादळ. दुपारी पावणेचारची वेळ. अचानक ढग दाटून आले. वेगाने वारे आले. या वाऱ्याचा वेग किती होता, हे नेमके अजून समजलेले नाही. मात्र वाऱ्याचा वेग प्रचंड होता. वारा आल्यानंतर त्यांने चक्रवाताचे रूप धारण केले. हे वादळ केवळ सात मिनिटांसाठी आले. सात मिनिटात त्यांने होत्याचे नव्हते केले. त्यातही झाडांचे अतोनात नुकसान केले. या झाडांचे निरीक्षण केले असता काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. हा चक्रवात सैन्य दलाचा परिसर, कृषी महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ असलेल्या केवळ पाच किलोमीटरच्या परिघात आढळून आला. या परिसरातील ४२५ एकरातील पाहणीत पाचशेच्यावर झाडांचे नुकसान झालेले आढळून आले. या झाडांचे निरीक्षण केले असता, काही झाडांचे केवळ बुंधे राहिले आहेत. सर्व बाजूच्या फांद्या मोडून गेल्या आहेत. पन्नासेक झाडे उन्मळून पडली आहेत. या झाडांचे निरीक्षण केले असता, पडलेली बहुतांश झाडे ही ग्लिरिसिडीयाची होती. त्यानंतर आफ्रिकन ट्युलिपची किंवा पॅथोडियाची असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतरचा क्रमांक, रेन ट्रीचा. त्यानंतर काही झाडे निलगिरीची होती. यातील केवळ चार झाडे देशी वाणांची असल्याचे दिसून आले. यातील एक सागाचे, एक कडुलिंबाचे, एक शिरीष आणि एक बाभळीचे आहे. जी झाडे उन्मळून पडलेली होती किंवा ज्यांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत, त्या झाडांमध्ये बहुतांश झाडे ही विदेशी वाणाची आहेत.
रेन ट्री, ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, ऑस्ट्रेलियन ॲकेशिया, सोनमोहोर, निलमोहोर या झाडांचे मोठे नुकसान झालेले दिसून आले. देशी वाणांच्या लहानमोठ्या झाडातील चिंच, आवळा, जांभूळ, आंबा, फणस इत्यादी झाडांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. फळबागातील नारळ, चिक्कूच्या झाडांचेही नुकसान झाले नाही. त्यांच्या फांद्या तुटल्या नाहीत किंवा उन्मळून पडलेल्या नाहीत. जून्या सागाच्या दोन-तीन झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत. बाभूळ आणि कडुलिंबाचे केवळ एक झाड उन्मळून पडलेले दिसून आले. विशेष म्हणजे अंगावर पक्ष्यांसाठी खोबण्या घेऊन राहणाऱ्या शिरीषच्या झाडाच्याही फांद्यांचे नुकसान झालेले आढळून आले नाही. काजू हा विदेशी वाण, मात्र इथल्या मातीशी नाळ जोडून बसलेला. काजूंच्या झाडांचेही नुकसान झालेले नाही.
या सर्व घटनाक्रमामध्ये दोन गोष्टी अधोरेखीत होतात. जागतिक तापमान वाढीचे आता दृश्य दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यापूर्वी एवढ्या कमी वेळाचे आणि एवढे विनाशकारी वादळ कधीच अनुभवले नाही. या वादळाने केवळ सात मिनिटात अनेक वर्षे उंच शेंडे घेऊन मिरवणारे निलगिरीसारखे वृक्ष भूईसपाट केले आहेत. अशा प्रकारचे वादळ येणे आणि एवढे मोठे नुकसान होणे हा जागतिक तापमानवाढीचाच परिणाम आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या वादळात ज्या झाडांचे नुकसान झाले, त्यातील नव्व्याण्णव टक्के वृक्ष हे विदेशी आहेत. पर्यावरण तज्ज्ञ अनेक वर्षांपासून विदेशी झाडांची लागवड करणे थांबवले पाहिजे, असा आग्रह धरत आहेत. मात्र विदेशी वृक्षांची लागवड मात्र थांबत नाही.
गुलमोहोर, सोनमोहोर आणि आफ्रिकन ट्युलिपची झाडे केवळ फुलल्यानंतर चांगली दिसतात म्हणून लावतात. रेन ट्री, ग्लिरिसिडीया भरभर वाढतात म्हणून लावतात. सुबाभूळ, आफ्रिकन ट्युलिप झाडे आता लावण्याची गरज नाही, वाऱ्यामुळे त्याच्या बिया सर्वत्र पसरून त्याची झाडे वाढू लागली आहेत. या झाडांची वाढ वेळीच रोखण्याची गरज आहे. सामाजीक वनीकरण विभागामार्फत आजही गुलमोहोरासारख्या वृक्षांच्या रोपांची निर्मिती करून लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. याउलट अनेक वृक्ष दुर्मिळ होत चालले आहेत, त्यांची रोपे मात्र बनवून उपलब्ध होत नाहीत. शिवण, बेहडा, बिबा असे अनेक औषधी वनस्पती लावण्याची गरज असतानाही ती लावण्याचा प्रयत्न होत नाही. कडूलिंबाची झाडे लावली जातात आणि त्यांचे गुण माहीत असणारे अनेक लोक त्याच्या फांद्यांचा विध्वंस करतात. अनेक कडुलिंबाच्या झाडांना वाढू देण्याचे सौजन्य दाखवले जात नाही. हिवरासारख्या झाडावर पक्षी आवडीने घरटे बांधतात. मात्र हिवराला, बाभळीला आणि बोरीला त्यांच्या काट्यामुळे जगू दिले जात नाही. निसर्गानेही आता स्थानीक वाणांची लागवड करा असे सांगितले आहे. वाढलेले विदेशी वृक्ष तोडण्याची गरज नाही, पण नव्याने झाडे लावताना स्थानीक वृक्षच लावायला हवेत. वेळीच कृती करायला हवी, अजून वेळ गेली नाही!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.