म्हवटीत ही कल्पनांचे अपेक्षित रंग भरले आहेत. म्हवटी ला सजवले आहे. भाषेचा प्रभावी उपयोग केला आहे. मात्र या कादंबरीच्या आशयाला वास्तवाचा आणि विवेकाचा भक्कम आधार आहे आणि ते या कादंबरीचे सामर्थ्य होय. वेगळेपण होय.
डॉ. माधव पुटवाड,
मराठी विभाग,संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती.
मराठीतील साहित्याचे सध्याचे स्वरूप लक्षात घेता म्हवटी या कादंबरीस ग्रामीण कादंबरी म्हणता येईल. या कादंबरीत वहिवाट अर्थात शेतातल्या रस्त्यासाठीचा संघर्ष चित्रित केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्मघाती अंतर्गत संघर्षाचे सत्य नोंदवले आहे. माणसांच्या प्रेरणा प्रवृत्तीचा शोध घेतला आहे.
म्हवटीच कथानकात समर किसन मोरे हा कादंबरीचा नायक आहे. तो राहणारा संतगावचा (तालुका वडगाव). वंशपरंपरेने शेतकरी व पेशाने सरकारी नोकरदार. नायकाचे वडील किसन मोरे परिस्थितीने गरीब आहेत. स्वभावाने साधे सरळ आहेत. त्यांना गाव गाड्यातल्या जीवन पद्धतीचे भलेभुरे रूप माहित आहे. ज्या गावात आपल्याला राहायचे आहे. त्या गावातल्या मुजोर लोकांशी आणि जमीनदाराची कलागत करणे आपणास परवडणार नाही याचे त्यांना भान आहे. वारकरी संप्रदायाच्या दैवताच्या विठ्ठलावर आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर त्यांचा विश्वास आहे. सामाजिक जीवनात समूहभाव जपला पाहिजे. हा त्यांचा आग्रह आहे.
वत्सलाबाई ही नायकाची आई. वत्सलाबाईचा स्वभाव भांडखोर नाही, नी ती अहंकारीही नाही पण ती स्वाभिमानी आहे. तिला गुलामगिरी मान्य नाही. प्रसंगी मारामारी करायची तिची तयारी आहे. समरचां भाऊ दिनकर अलिप्त स्वभावाचा आणि आत्ममग्न वृत्तीचा आहे. आपणास नोकरी नाही म्हणून मानसन्मान नाही ही त्याची भावना आहे.रागिनी ही समर मोरे यांची पत्नी ती सुशिक्षित आहे. तिला शेती व्यवसायातल फारस काही कळत नाही ती गावातल्या माणसांच्या अंतर्गत संघर्षाला कंटाळलेली आहे. पण ती पलायनवादी नाही. वाट्याला आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आहे. जिद्दी आहे. नायकाला तिचा भक्कम आधार आहे.
किसन मोरे याची परिस्थिती गरिबीची. त्याच्या शेतीत कुटुंब पोहोचता येईल एवढं उत्पन्न होत नाही. कारण जमीन कमी आहे. त्याच्याकडे उत्पन्नाचे इतर कोणतेही माध्यम नाही. ते मजूर म्हणून गावातल्या जमीनदाराच्या जमिनीत काम करत होते. पण काळ मागे पडतो परिस्थिती बदलते. किसन मोरे यांचा मुलगा सरकारी नोकरीला लागतो. विठ्ठल तात्या हे त्याच गावातले जमीनदार. श्रीमंत माणूस. कधीकाळी किसन मोरे त्यांच्या शेतात रोजगारी म्हणून राबलेले असतात. विठ्ठल तात्याचे वैभवाचे दिवस मागे पडतात. ते त्यांची तीन एकर जमीन विकायला काढतात. एक प्रामाणिक व कष्टाळू माणूस म्हणून ते त्यांची म्हवटी या नावाने ओळखली जाणारी तीन एकर जमीन जाणीवपूर्वक किसन मोरे यांना विकतात. किसन मोरे त्यांची मुले ती जमीन विकत घेतात. म्हवटी च्या विक्री व्यवहारात त्याच गावातल्या पुदाले अप्पांनी मध्यस्ताची भूमिका पार पाडलेली असते.
सन 2007 मध्ये किसन मोरे यांच्या मुलांनी ती तीन एकर जमीन दोन लाख 80 हजार रुपये एकर याप्रमाणे खरेदी केलेली असते. म्हवटी वर गावातल्या अनेकांची नजर असते. कारण ती जमीन अत्यंत कसदार आहे. गावातल्या अनेकांनी जास्तीची किंमत द्यायची तयारी दाखवलेली असते. मात्र विठ्ठल तात्या मोहाला बळी पडत नाहीत. ते किसन मोरे यांना दिलेला शब्द फिरवत नाहीत. हा माणूस आपल्या शेतात प्रामाणिकपणे राबला आहे. त्याचे आपल्यावर उपकार आहेत. ही त्यांची भावना असते. जमिनीचे सर्व पैसे पोहोचण्याच्या अगोदर ते जमिनीचा कागद करून देतात. किसन मोरे हे एकेकाळी गावातल्या जमीनदाराच्या शेतात मजूर म्हणून राबत होते. त्या माणसांच्या मुलांनी गावातल्या जमीनदाराची जमीन विकत घेणे त्या गावातल्या जमीनदारांना पचत नाही.
समर मोरे याच्या भावकीतल्या लोकांनाही समरचे भले होणे पाहवत नाही. ते ही मस्तर करू लागतात. किसन मोरे त्यांच्या कुटुंबाशी वैरभाव जपतात. सखा अण्णा त्याच गावातला जमीनदार. त्यांनी म्हवटी कडे जाणारा रस्ता सखा अण्णाने चाळीस वर्षांपूर्वीच मुजवलेला असतो. पिढीजात वाट बंद केलेली असते. सखा अण्णाने त्याच्या शेतातून एका बाजूने रस्ता दिलेला असतो मात्र कागदोपत्री त्याची नोंद नसते. त्या रस्त्याने विठ्ठल तात्याची व इतर शेतकऱ्यांची जा ये सुरू असते. सखा अण्णांनी विठ्ठल तात्याला विरोध केलेला नसतो. कारण ते ही मोठे जमीनदार असतात.मात्र समर मोरे, यांनी विठ्ठल तात्याची जमीन विकत घेण सखा अण्णा देसाई व त्यांचा मुलगा दिगंबर यांना पचत नाही. त्यांनी पिढीजात वाट बंद केलेली असते. आता ते नव्या वाटेबद्दल इथ वाटच नाही. अशी भाषा बोलू लागतात. समर मोरे यांची आणि त्या बाजूला ज्यांची शेती असते त्या गोरगरीब शेतकऱ्यांची पंचायत होते.पण दिगंबर देसाई यांच्यापुढे कोणाच काही चालत नाही.
गावातल्या रमेश थोरवत आणि अरुण थोरवत या जमीनदार भावांचाही दिगंबर देसाई यांनाच पाठिंबा असतो. सखा अण्णांच्या घराची व थोरवतांच्या घराची गावात दांडगाही असते. त्यांच्याकडे पैशाच्या आणि माणसांचे बळ असते. काठी कुराडी घेऊन मारामारीला तयार असणारी ही माणसं, इतरांची कोंडी करतात. म्हवटी कडे जाणारा रस्ता बंद करतात. केवळ पाऊलवाट ठेवली जाते. त्या पाऊलवाटेनेच शेतातल्या माणसांना शेतमाल डोक्यावरून आणावा लागतो. ती पाऊलवाट कमालीची अरुंद आणि अडचणीची असते. समर मोरे आणि त्या बाजूला ज्यांची शेती असते ते सर्वशेतकरी एकत्र येऊन दिगंबर देसाई यांना वाट देण्याबाबत खूप विनंती करतात. पण त्याचा काहीही फायदा होत नाही.
समर मोरे यांना म्हवटी खरेदीसाठीचे पैसे जमवण्यासाठी खूप धावपळ करावी लागलेली असते. बँक मॅनेजरने खूप मनस्ताप दिलेला असतो तो कमालीचा बेजार झालेका असतो पण आपण एकदाची जमीन खरेदी केली आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली याचा त्यांना आनंद असतो. परंतु दिगंबर देसाई आणि थोरवताची मुलं आणि गावातील कुटील माणसं तो आनंद त्यांना मिळू देत नाहीत.मग तिकडे जाणारा रस्ता बंद करून त्यांची कोंडी केली जाते. आणि मग सुरू होतो वहिवाटीच्या शेतीच्या रस्त्यासाठीचा संघर्ष. या कादंबरीचा नायक समर किसन मोरे शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून ग्रामपंचायतीकडे अर्ज करतो. तंटामुक्ती अध्यक्षाकडे अशी विनंती करतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही. ज्यांना ज्यांना त्यांच्या शेतीकडे जाण्यासाठी रस्ता नसतो. ती माणसं एकत्र येतात व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये तहसीलदाराकडे अर्ज करतात.एडवोकेट विकास जाधव यांचे वकील असतात. तहसीलदार समरच्या बाजूने निकाल देतात. पण प्रत्यक्षात रस्ता मिळत नाही.
दिगंबर देसाई आणि थोरवताच्या मुलांची दादागिरी कमी होत नाही. ते हात-घाई वर येतात. समरला मारहाण करतात. समर कायदेशीर लढा देत राहतो. हा लढा उच्च न्यायालयापर्यंत जातो.उच्च न्यायालयाचा निकालही समरच्या बाजूने असतो. मात्र तरीही दिगंबर देसाई नी थोरवताच्या मुलांची मग्रूरी कमी होत नाही. ते माणुसकी जपत नाहीत. आणि कायद्याला भीत नाहीत त्यांची मग्रूरी वाढत जाते समर लोक-लढा उभा करतो. जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढतो. मात्र परिस्थिती जैसे थे. शेवटी तो गावातल्या काही शेतकऱ्यासह, थेट मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्र्यांना भेटतो. त्यांच्याकडेच महसूल खात असत सगळी वस्तुस्थिती उपमुख्यमंत्र्याच्या लक्षात आणून देतो. मग कार्यवाहीचे चक्र फिरत. वडगावच्या तहसीलदाराची बदली होते नव्या तहसीलदार अस्मिता जामदार या तहसीलदारपदी रुजू होतात. त्या संतगावातील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवतात. म्हवटी कडे आणि त्या भागातील शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देतात. दिगंबर देसाई, व थोरवताच्या पोरांना यापुढे दांडगावा चालणार नाही याची जाणीव करून देतात.
हे आहे म्हवटी या कादंबरीचे महत्त्व आणि वेगळेपण. या कादंबरीत या कादंबरीचा नायक समर किसन मोरे यांनी म्हवटी खरेदी करण्यासाठी केलेली यातायात आणि म्हवटी कडे जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून केलेला संघर्ष हे या कादंबरीचे मूळ कथानक त्या कथानकाची लेखकाने केलेली मांडणी आणि नोंदवलेले तपशील थक्क करणारे आहेत. कथानकाच्या अनुषंगाने लेखकाने माणसांच्या प्रेरणा, प्रवृत्तीचा घेतलेला शोध महत्त्वाचा आहे. लोकशाही व्यवस्थेची अधोरेखित केलेली स्थिती वस्तुस्थितीला धरून आहे. चिंताजनक आहे.
दुसरे म्हणजे वहीत शेतीसाठीच्या रस्त्याचा प्रश्न केवळ या कादंबरीतील संतगावातील शेतकऱ्यांचा नाही तर तो महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा आहे. ही कादंबरी बहुसंख्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी आहे त्या प्रश्नांची चिंताजनक स्वरूप अधोरेखित करणारी आहे. हे जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवे. सामान्यतः खेड्याकडे आणि खेड्यातल्या माणसांकडे पाहण्याचे दृष्टिकोन असे दिसतात. खेड्याचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो सुंदर असतो. पर्यावरण स्वच्छ आणि अल्हाददायक असतं. खेड्यातली माणसं अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू असतात. हे समूहभाव जपत जगत असतात.
दुसरा दृष्टिकोन त्यांच्या पूर्णविरोधी असतो. खेड्यात सोयींचा अभाव असतो. खेड्यात अस्वच्छता असते. खेड्यातली माणस अडाणी, अंधश्रद्धाळू, आणि तेवढीच क्रूर असतात.जाती-जातीत विभागलेली आणि छोट्या छोट्या कारणासाठी आपापसात भांडणारी असतात.वस्तूतहा ग्रामीण भाग शहरापासून दूर असल्याने खेड्यात आधुनिक सोयी आणि पर्यावरण या संदर्भातले वेगळेपण जाणवते. सांस्कृतिक स्थिती गतीचा भौगोलिक पर्यावरणाचा आणि मिळणाऱ्या संधीचा थोडाफार परिणाम वगळता खेड्यातला माणूस शहरातल्या माणसासारखाच असतो. किंबहुना प्रेरणा प्रवृत्तीच्या संदर्भात पृथ्वीच्या पाठीवरली सगळी माणसे सारखीच होती आणि आहेत. अर्थात या सत्याचे भान रवी राजमाने यांना आहे. हे भान या कादंबरीतून अधोरेखित झालेली आहे. या कादंबरीतील वकील विकास जाधव, तहसीलदार अस्मिता जामदार, जमीनदार पुदाले आप्पा, विठ्ठल तात्या, किसन मोरे, उपमुख्यमंत्री ही माणसे अपवादात्मक होत अशी माणसे सगळ्या क्षेत्रात नि चोहिकडे असतात. भूतकाळात होती. भविष्यात असणार आहेत. मात्र बाकी बहुसंख्य माणसे स्वतःचा स्वार्थ जपत सोयी सोयीने जगत असतात. या कादंबरीतल्या माणसासारखी मग ती खेड्यातली असो की शहरातली असोत ती शेजारची असोत की दुरची असोत ती शत्रू असोत की मित्र असो ती कोणत्याही जाती धर्माची असली तरी त्यांचा व्यवसाय कोणताही असला तरी फार काही फरक पडत नाही.
शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांना अपेक्षित ते सहाय्य करत नाही. ही शेतकऱ्यांची ओरड आहे. ही ओरड बऱ्यापैकी असून ही वस्तुस्थिती मराठीतल्या अनेक लेखक कवींनी नोंदवलेली. आहे मात्र शेतकऱ्यांच्या अपप्रवृत्तीवर फारस लिहिल गेल नाही. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले लेखक कवी प्रत्यक्ष सत्यातून आणि आत्मपरीक्षणातून दूर राहिले. ऐकू माहितीच्या आधारावर लिहिणाऱ्यांनी शेतकऱ्याचे उद्दातीकरण केले किंवा विकृतीकरण केले शेतकऱ्यांना करुनेचा विषय बनवले किंवा विनोदाचा विषय बनवले. शेतकरी मुळात माणूस असतो. हे नीट समजून घेतले नाही आणि त्यांच माणूसपण असण मांडल गेल नाही. या कादंबरीत ग्रामीण माणसाचे मूळ माणूस असण आल आहे. रवी राजमाने यांनी म्हवटीत शेतकऱ्यांच्या परस्परातील संघर्षाचे वास्तव नोंदवलेले आहे. शेतकरी इतर माणसासारखीच माणस आहेत तेही काम, क्रोध, मद, मोह, मस्तर या सह जगत असतात एकमेकांना सहाय्य करतात असे अडचणी ती आणत असतात. कुटील डावपेच खेळत असतात. हे निसंदीग्धपणे अधोरेखित केलेले आहे. लेखकाने या कादंबरीत शासन आणि प्रशासन यांच्यातल्या अभद्र यूतीचे आणि त्यात सामील असणाऱ्या समाजाचे रूप स्वरूप चित्रेत केले आहे. निवडणुकांचे वास्तव टिपले आहे. लोकशाही व्यवस्थेच्या मर्यादा कडे लक्ष वेधले आहे. प्रसारमाध्यमांचे उथळ-पण नोंदवलेले आहे. अर्थात लेखक ग्रह आणि पूर्वग्रह टाळून म्हवटीत समकालीन ग्रामीण समाजाचे प्रश्न मांडतात. ग्रामीण समाजाचा जीवन संघर्ष आणि त्यांचा जीवन व्यवहार अधोरेखित करतात त्यांच्या अपप्रवृत्तीवर प्रकाश टाकतात. वहीत शेतीत जाण्यासाठीच्या रस्त्यासाठीची शेतकऱ्याचां संघर्ष करता उभा करतात.
कादंबरी म्हणजे प्रत्यक्ष वास्तवाची जशास तशी मांडणी नसते. तर ती एक स्वतंत्र नवनिर्मिती असते. कादंबरीचे कथानक रचताना कलावंत त्या कथेत कल्पनेने अनेक रंग भरत असतो. त्याचे निर्मितीचे कौशल्य पणाला लावून तो त्याच्या निर्मितीला कलात्मक रूप देत असतो. अश्याचे मूळ सत्य जपत कलाकृतीला सजवत असतो. सजावटीच्या साह्याने सत्य अधिक ठसठशीत करत असतो. त्याला जे सांगायचे आहे ते सांगणे तो अधिक प्रभावीपणे वाचकापर्यंत पोहोचवत असतो. कथा अधिक वाचनीय करत असतो म्हवटीत ही कल्पनांचे अपेक्षित रंग भरले आहेत. म्हवटी ला सजवले आहे. भाषेचा प्रभावी उपयोग केला आहे. मात्र या कादंबरीच्या आशयाला वास्तवाचा आणि विवेकाचा भक्कम आधार आहे आणि ते या कादंबरीचे सामर्थ्य होय. वेगळेपण होय.
पुस्तकाचे नाव – म्हवटी
लेखक – रवी राजमाने
प्रकाशक – दर्या प्रकाशन पुणे
पृष्ठ : 243, मूल्य : 300/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.