विजयात सातत्य असेल तर जीवनात मोठे यश गाठता येते. आत्मज्ञानप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडथळ्यावर सातत्याने विजय हे मिळवावे लागतात. साधनेत नेहमीच मन लागते असे नाही. कधीकधी साधनेत मन रमते. कधी मन रमतच नाही. पण उत्तम साधनेसाठी आनंदी मन असणे महत्त्वाचे असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
नातरी आदरिलें । अव्यंग सिद्धी गेले ।
तरी तेंही जिंतिलें । मिरवू नेणे ।। ६४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – अथवा आरंभिलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धीस गेलें, तर तो ही आपण एक मोठा विजय मिळविला असे मिरवावयाचे तो जाणत नाही.
विजय साजरा करायची, विजय मिरवायची सवय अनेकांना असते. एखाद्या गोष्टीत विजय मिळाला म्हणून तो मिरवून साजरा करायचा नसतो. विजयाचे असे प्रदर्शन कधीकधी आपल्या अंगलट येऊ शकते. कारण विजय केंव्हा होतो ? या घटनेत एखाद्याचा पराभव होतो तेंव्हाच एकाच विजय होतो. पराभूत झालेल्या व्यक्तीची मानसिकता तुमच्या वागण्यामुळे दुषित होऊ शकते. याचा विचार करायला हवा. पराभूत झालेल्या व्यक्तीच्या मनात बदला घेण्याची भावना उत्पन्न होऊ नये. याचा काळजी घ्यायला हवी. खेळात खिळाडू वृत्ती महत्त्वाची असते. जय-पराजय हे होत असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे समजून कार्यरत राहायला हवे.
युद्धातही पूर्वीच्या काळी नियम होते. पराभूत झालेल्या राजाचाही मान राखला जात होता. त्याला योग्य ती वागणूक दिली जात असे. आजही युद्ध कैद्यांचाही योग्य तो मान राखला जातो. अन्यथा अशा वाईट वर्तणुकीचा गंभीर परिणाम होऊ शकतो. विजयी व पराभूत या दोघांनीही मानसिकता विचारता घ्यायला हवी. खेळात खिळाडू वृत्ती असते तसे जीवनाच्या खेळातही खिळाडू वृत्ती हवी. जीवनाच्या विविध टप्प्यावर चढ-उतार हे येत असतात. कधी अचानक भरभराट होते तर कधी अपयशाने खचून जायला होते. आज यश मिळाले म्हणून ते मिरवण्यापेक्षा हे यश कायम कसे राखता येईल यावर अधिक लक्ष केंद्रीत करायला हवे. जीवनात सदैव यशस्वी होण्यासाठी हा नियम हा पाळायलाच हवा.
विजयात सातत्य असेल तर जीवनात मोठे यश गाठता येते. आत्मज्ञानप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडथळ्यावर सातत्याने विजय हे मिळवावे लागतात. साधनेत नेहमीच मन लागते असे नाही. कधीकधी साधनेत मन रमते. कधी मन रमतच नाही. पण उत्तम साधनेसाठी आनंदी मन असणे महत्त्वाचे असते. जीवनात येणारे जय पराजयाचा यावर परिणाम होत असतो. यासाठीच मनाचा समतोल हा महत्त्वाचा असतो. विजयाने हरळून जायचे नसते किंवा पराभवाने खचून जायचे नसते. दोन्ही स्थितीत मनाचा समतोल राखून ध्येय गाठायचे असते. विजयातील सातत्य कायम ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहायचे असते. झालेल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न व मिळालेल्या विजयाचा आढावा घेऊन कार्यरत राहायचे असते. यासाठी विजय हा मिरवायचा नसतो, तर तो कायम करा राखता येईल याचा अभ्यास करायचा असतो. साधनेतील विकार केव्हाही डोके वर काढू शकतात यासाठी या विकारावर सातत्याने करा विजय मिळवायचा याचाच विचार करायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.