July 27, 2024
Summer Vaction Memory Mirra Tashi article
Home » आठवणी साठवलेली उन्हाळ्याची सुट्टी
मुक्त संवाद

आठवणी साठवलेली उन्हाळ्याची सुट्टी

पाहता पाहता उन्हाळा संपत आला. लहानपणी हा काळ खूप हुरहुर लावणारा होता. ‘आता भेट पुढच्या वर्षी’ असं म्हणत आत्ये-मामे भावंडांचा निरोप घेण्याचा हा काळ.

खरंच आपले लहानपणीचे उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस हे खूप अविस्मरणीय असतात. आपण अगदी खोलवर रुजवून ठेवतो हे दिवस. कितीही वर्षे सरली तरी त्या रुजलेल्या,अंकुरलेल्या बिया आपल्या लोभस पोपटी पातीनं डुलत असतात. हे अंकुर कधीच कोमेजत नाहीत. निबर होत नाहीत. तेवढेच राहतात.. अगदी कोवळे.. अगदी हवेहवेसे.. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजोळी आणि आत्याच्या घरी अगदी न चुकता जायचे. आजोळ घर शेतात होते. हिरवा गार पाचू सारखा वाऱ्यावर डुलणाऱा मळा. निवळशंख पाण्याची विहीर. गळ्यातल्या घंटांचा मंजुळ नाद करत सकाळी रानात जाणारी आणि तिन्हीसांजेला परतणारी गुरे. दिवसभर त्यांची वाट पहात गोठ्यात थांबलेली छोटी वासरे. असं फार रम्य वातावरण होतं.

आजी, आजोबा, मामा, मामी मावशी आणि आम्ही मुलं असं मिळून पंचवीस माणूस घरात होतं. शेतात त्या वेळी वीज नव्हती. त्यामुळे पंखा, विजेचे दिवे, मिक्सर अशी विजेवर चालणारी उपकरणे नव्हती, स्वयंपाकासाठी गॅस नव्हता. टीव्ही नव्हता. तरीही आमची सुट्टी अतिशय आनंदात जायची. चुलीवर स्वयंपाकाचं मुख्य काम आज्जी करायची. मामी आई मावशी तिला मदत करायच्या. आज्जी खूप सुगरण होती. तिच्या हाताला चव होती. उपलब्ध साहित्यातून सगळे पदार्थ अतिशय चविष्ट करे. तिच्या हातचा पदार्थ कधीच बिघडत नसे. भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर, भट्टीवर भाजलेले शेंगदाणे, मेतकूट घालून लावलेले पोहे ती करायची. ते इतके अफलातून असत की त्याची अगदी चटकच लागायची. अजून अजून खावेसे वाटत.

दिवसभराच्या कामासाठी आमच्याकडे मुक्ता असे. धुणं-भांडी, केरवारे, भाजी निवडणे, दळण करणे अशी भरपूर कामं ती दिवसभर करत असे. एवढी माणसे जमल्यामुळे कामही खूप पडे. पण ती कधीही तक्रार करत नसे. तिला भांडी जास्त पडू नयेत म्हणून दिवसा ताज्या पत्रावळी वर जेवत असू. आजोबा आम्हाला पत्रावळी लावायला शिकवत. आमच्या शेतात तीनचार पळसाची झाडे होती. आजोबा सकाळी पिशवी घेऊन पळसाची पाने तोडून आणत. स्वच्छ पुसून त्याच्या पत्रावळी लावायला शिकवत. त्यांना द्रोण सुद्धा लावता येई. द्रोण लावणं खूप अवघड काम. आजोबा ते स्वतःकडे घेत. प्रत्येकाने स्वतःची एक पत्रावळ रोज लावली पाहिजे असा त्यांचा दंडक होता.

रात्री एका ताटात दोघं असं जेवत असू.. फार गंमत येई. सुट्टीतली अजून एक आठवण म्हणजे एके वर्षी मामी मामे भावंडांना घेऊन चार दिवसांसाठी त्यांच्या माहेरी गेली. मी आणि माझी मावस बहीण अनिता दुपारी त्यांच्या खोलीत झोपलो होतो. तिला त्यांच्या कपाटात काचेची बरणी दिसली. त्यात काय असावं या उत्सुकतेने तिने उघडली. बरणीत सुंदर मुरलेला काळपट चॉकलेटी रंगाचा मोरावळा होता. त्यातला एक आवळा खाल्ला अतिशय चवदार तुरट गोड आवळा खाल्ल्यावर तिला अजून एक खावासा वाटला. मलाही एक आवळा देत तिने दुसरा आवळा खाल्ला.

मग परत एक.. मग परत एक.. असं करत करत बरणीनं तळच गाठला. मग कोणाची तरी चाहूल लागली आणि घाईघाईने बरणीचे झाकण लावून कपाटात ठेवून दिली. दोन-चार दिवसांनी मामी आल्या. त्यांच्या लगेच लक्षात नाही आलं. पण दोन दिवसांनी त्यांना पित्त झाल्यामुळे मोरावळा खाण्यासाठी त्यांनी कपाटातून बरणी काढली. पाहतात तर काय बरणीच्या तळाशी चार पाच आवळे हिरमुसले होऊन पडले होते. भरलेल्या बरणीचं काय झालं असावं याची त्यांना कल्पना आली. पण नणंदेच्या मुलांना काय बोलणार? म्हणून त्या गप्प बसल्या. आई रागवायला लागली तर उलट त्या म्हणाल्या ‘मुलंच ती.. खाणारच रागवू नका त्यांना.’ आज विचार करताना लक्षात येतंय की कष्टानं केलेला.. वर्षभरासाठी साठवलेला आवळा आम्ही काही क्षणातच संपवून टाकलेला होता.. पण मामींनी प्रेमानं समजून घेवून प्रसंग साजरा केला..

शेतात रहायला जायच्या आधी आजोबा आजी सोलापुरात छान, भव्य दगडी कमान असलेल्या वाड्यात रहात होते. त्यावेळी माझ्या बरोबरच्या चुलत मावशी, मावस, मामे बहिणी यांच्या बरोबर तुळशीच्या कट्ट्यावर खेळलेली भातुकली आणि इतर खेळ आजही मला आठवतात.. लहानपणीची उन्हाळ्याच्या सुट्टीतली अजून एक आठवण अगदी ठळकपणानं माझ्या लक्षात राहिली आहे. वाड्यात राहत असताना चुलत आजोबांच्या घरी एक भाडेकरू रहात होते. त्या काकूंनी गच्चीवर पापड घातले होते. दुपारच्या वेळी त्यातला एक अर्धवट ओला पापड आम्ही खाल्ला..चविष्ट लागला.. अजून एक म्हणत प्रत्येकानं एक एक करत सगळे पापड खाऊन टाकले. त्या काकू संध्याकाळी गच्चीवर वर पापड आणण्यासाठी आल्यावर त्यांच्या हाती एकही पापड लागला नाही..नुसता प्लॅस्टिक कागद होता.. मग आम्हाला मोठ्या माणसांची खूप बोलणी खावी लागली..

अशा कितीतरी आठवणी साठवलेली उन्हाळ्याची सुट्टी.. उन्हाळा असून उन्हाचा त्रास नव्हता.. अनेक गैरसोयी असूनही त्या जाणवत नव्हत्या.. समोर येईल ते भरपूर खायचं.. दिवसभर नुसतं हुंदडायचं.. रात्री अंगणात अंथरूण टाकून उशिरापर्यंत गप्पा मारायच्या.. कधी प्रभात, भागवत टाॅकीजला एखादा सिनेमा पहायचा. किल्ल्यातल्या बागेत फिरायला जायचे. भेळ खायची. बागेजवळच्या वसंत पैलवान रसवंती गृहात रस प्यायचा.. एवढ्या गोष्टींनी आभाळभर आनंद मिळायचा.. सुट्टी कधी संपायची ते कळायचेच नाही.. छोट्या छोट्या गोष्टीत आभाळभर आनंद मिळायचे ते दिवस आता नाहीत याची खंत वाटते..पण त्या साठवलेल्या, जपलेल्या सुखाच्या अक्षय आठवणी आज माझ्याकडे आहे ही केवढी मोठी ठेव!! ती मी तशीच जपून ठेवणार आहे.. अगदी हळुवारपणे!!

मीरा उत्पात-ताशी, 9403554167


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

महाराष्ट्रातील चाणक्य

फुलासारखं जपणं…

रंग होळीचे…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading