June 19, 2024
Home » चिमुटभर कुंकू…
मुक्त संवाद

चिमुटभर कुंकू…

यंदापासून सगळ्या बायकांना हळदीकुंकू नव्हे तर तिळगूळ समारंभाला बोलवा. छान आनंदात साजरे करा. कुणाच्या तरी चेहर्‍यावर आनंद बघून बघा तुम्हाला किती छान वाटते ते.

सौ सुनेत्रा विजय जोशी

आता संक्रांतीच्या हळदीकुंकवाचे दिवस सुरू झाले. बायका नवीन काळ्या साड्यांवर दागदागिने घालून जिकडेतिकडे मिरवत आहेत. कुणी काय लुटले कुणी काय यावर टोमणेवजा चर्चा करत आहेत. हळदीकुंकू हा सवाष्णीचा सण हे समीकरण कधी आणि कुठून आले तेच कळत नाही. कारण कुंकू तर अगदी पाळण्यात असल्यापासून आपण लावतो. तेव्हा ती तीट असते इतकेच.

मंगळसुत्र आपण लग्न झाल्यावर घालतो हे खरे. सौभाग्यवती म्हणजे सौभाग्य.. व.. ती असे असेल का? ती आणि तीचा नवरा म्हणजे भाग्य का? मनात विचारचक्र सुरू झाले. पुर्वी बायका घरातच राहायच्या त्यामुळे हे प्रश्न त्यांना पडले नसतील का? पडले असतीलच पण उघड बोलण्याचे स्वातंत्र्य मात्र त्यांना नव्हते म्हणण्यापेक्षा हिंमत नव्हती. कारण पोटापाण्यासाठी त्या कुणावर तरी अवलंबून होत्या.

तिळगूळ समारंभ असे म्हणा

आता स्त्रिया शिकल्या. बाहेर वावरताहेत. तेव्हा हे सगळे सुचलेले उघडपणे बोलण्याचे धाडस करू शकतात. खरे तर हा तिळगूळ समारंभ असतो. यात सवाष्ण किंवा विधवा असा प्रश्न नाहीच. आणि अजून एक प्रश्न मनात आला. पती निधनानंतरही ती लग्न झालेलीच असते ना.. असो. पण हळदीकुंकू न म्हणता आमच्याकडे आज तिळगूळ समारंभाला या असे म्हणायला काय हरकत आहे? अगदी पुरुष मित्रमंडळी पण येऊ देत ना. आणि हळदीकुंकू सगळ्याच बायकांना लावायला काय हरकत आहे. नाहीतरी बाकी घालून दिलेले पुर्वापार नियम सगळे कोणी पाळतात का? मग या वेळेस बरे हे सुचते? पुरुषांना बायको गेल्यावर कुठे जायचे नाही असा कुठला नियम वाचलेला मला तरी आठवत नाही. तसाच तो बायकांनाही नाही. आपण बायकाच असे फरक करतो आणि पुन्हा आपणच ओरड करतो. कोणतीही सुरवात आधी स्वतःपासून करावी. मी ती केलेली आहे अगदी वर्षानुवर्षांपासून… आता नव्हे. त्यामुळे हक्काने सांगू शकते.

स्त्रियांच्या या अशा अनिष्ट प्रथा आपण स्त्रियाच खूप कर्मठपणे पाळतो. मात्र त्यातून बाहेर स्वतःपासून पडण्याचा विचार न करता नुसती ओरड करत राहतो. नोकरी करणाऱ्या स्त्रिया वाईट नजरांपासून वाचण्यासाठी मंगळसुत्र घालतात ना? शास्त्रात सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही पाळता का? नाही ना… मग इथेच कुंकू लावताना नियम कशाला? आणि हे कुणी पुरुष सांगत नाही तर आपण महिलाच महिलांना असे वागवतो.

यंदापासून सगळ्या बायकांना हळदीकुंकू नव्हे तर तिळगूळ समारंभाला बोलवा. छान आनंदात साजरे करा. कुणाच्या तरी चेहर्‍यावर आनंद बघून बघा तुम्हाला किती छान वाटते ते.

कुणी आधी जावे हे कुणाच्याच हातात नसते. तेव्हा…. उगाच मनात बागुलबुवा ठेवू नका. मोकळं कपाळ छान चिमुटभर कुंकवाने भरा.. नाहीतरी आता मोकळ कपाळ असतेच कुठे? चिमुटभर कुंकू कुणीच लावत नाहीत. सगळ्यांच्या कपाळी टिकल्याच असतात.तर मग… . मैत्रीणींनो तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला.

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406