सत्तेची स्पर्धा सर्व जगभरात पाहायला मिळत आहे. यातून विकासापेक्षा विध्वंसच अधिक होत आहे. कारण दररोज युद्धांच्या प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अत्याचार, भ्रष्टाचाराच्या घटनांनी पोखरलेल्या या जगात आता सुख सर्वात महाग होणार आहे. यासाठीच अशा सुखाच्या अवस्थेचे ज्ञान भावीकाळात अधिक गरजेचे वाटणार आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
दिसो परतत्व डोळां । पाहो सुखाचा सोहळा ।
रिघो महाबोधसुकाळा । माजी विश्व ।। 1161 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो. सुखाचा उत्सव उदयास येवो व सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेने प्रवेश करो.
12 व्या शतकापासून ज्ञानेश्वरी परंपरा मराठी नगरीत ब्रह्मज्ञानाचा सुकाळ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जग ब्रह्मज्ञानी करणे हे या परंपरेचे उद्दिष्ट आहे. विश्वात ब्रह्मज्ञानाचा सुकाळ पाहायला मिळो यासाठी त्या ज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य ही परंपरा करत आहे. संपूर्ण जग आनंदाने भरलेले पाहायला मिळो असा विश्वास ज्ञानेश्वर माऊलीस आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आता या सुखाची नितांत गरज वाटणार आहे. पण ती समजून घ्यायलाही आता लोकांना वेळ नाही. इतके व्यस्त झालेले लोक पाहायला मिळत आहेत. पण सुख मात्र त्यांना हवे आहे.
सत्तेची स्पर्धा सर्वच जगभरात पाहायला मिळत आहे. उत्पादन अधिक मिळवण्यासाठी रसायनांचा मारा केला जात आहे. ही रसायने आपणालच खात आहेत. आपले आरोग्य बिघडवत आहेत. याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. केवळ स्वतःच्या सुखासाठी उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. हे फक्त शेतीबाबतील नव्हे तर सर्वच क्षेत्रात हे पाहायला मिळत आहे. उद्योगधंद्यांनी प्रदुषणाची उच्चतम पातळी गाठली आहे. यातून विकासापेक्षा विध्वंसच अधिक होत आहे. कारण दररोज युद्धांच्या प्रसंगांचा सामना जगभर करावा लागत आहे. अत्याचार, भ्रष्टाचाराच्या घटनांनी पोखरलेल्या या जगात आता सुख सर्वात महाग होणार आहे. यासाठीच अशा सुखाच्या अवस्थेचे ज्ञान भावीकाळात अधिक गरजेचे वाटणार आहे. हे तितकेच खरे आहे.
सुखाचे ज्ञान म्हणजे काय ? दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होणे म्हणजे सुखी होणे नव्हे. इतरांसोबत स्वतः सुखी होणे महत्त्वाचे आहे. हे सुख कशाने मिळते जे स्वतःला व इतरांनाही सुखी करते. हे जाणून घेण्याची गरज आहे. मी कोण आहे याची स्वतः ओळख करून घेणे आणि इतरांनाही त्या बद्दलची अनुभुती देणे म्हणजे आत्मज्ञानी करणे. आत्मज्ञानाने स्वतः सुखी होणे व इतरांनाही सुखी करणे हे उद्दिट्ट ज्ञानेश्वरी परंपरेचे आहे.
परंपरेचा विचार करता ही ज्ञानदानाची परंपरा आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे. यामुळे महाराष्ट्रात सुखाचे दिवस पाहायला मिळत आहेत. भारतामध्ये असणाऱ्या या पारंपारिक आत्मज्ञानाच्या चळवळीमुळेच भारत आज सुखात नांदतो आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींना केवळ महाराष्ट्र किंवा भारत सुखी पाहायचा नाही तर संपूर्ण विश्व या ज्ञानाच्या सुखात डुंबलेले पाहायचे आहे. सर्व जग या ब्रह्मज्ञानात न्हाऊन निघाल्याचे पाहायचे आहे. कारण हेच खरे मानवी जीवनाचे सत्य आहे. मानव जन्माचे सार्थक या ज्ञानात आहे. यासाठी स्वःची ओळख करून घेऊन या स्वधर्माचे पालन करत मानव जन्म सार्थकी लावयला हवा. यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे. यातच स्वतःचे व जगाचे सुख सामावलेले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.