December 5, 2024
The Farm of Dhamma Farming in the Buddhist Era Indrajeet Bhalerao article
Home » धम्माचे शेत : बौद्धकालीन शेती
संशोधन आणि तंत्रज्ञान

धम्माचे शेत : बौद्धकालीन शेती

प्रत्यक्ष तथागत गौतम बुद्ध व त्यांचे वडील शुद्धोधन हे राजे असले तरी ते शेतकरीच होते. सिद्धार्थ गौतममाचे शेतीशी, भूमीशी एक अतूट नाते होते. म्हणूनच आ. ह. साळुंखे यांनी त्यांना सर्वोत्तम भूमिपुत्र असे म्हटलेले आहे. शुद्धोधनाच्या शेतीची अनेक वर्णने आपणाला बुद्ध चरित्रात पाहावयास मिळतात. मज्झिमनिकाय मधील महासच्चक सूत्राचे विवेचन करताना अठ्ठकथेने शुद्धोधनाच्या शेतीचे पुष्कळ वर्णन केलेले आहे.

इंद्रजीत भालेराव

॥ धम्माचे शेत : बौद्धकालीन शेती ॥

महाभारतकाळानंतर येतो तो बौद्धकाळ. आता आपण बौद्धकालीन शेतीचा विचार करणार आहोत. इसवीसनाच्या आधीची सहा शतकं आणि नंतरची एकदोन शतकं हा प्राचीन भारताचा काळ बौद्ध आणि जैन मतांनी व्यापलेला होता. हे दोन्ही धर्म वैदिक वर्णव्यवस्था नाकारणारे आणि समतेला प्राधान्य देणारे होते. खऱ्या लोकशाहीला पोषक असा तो काळ होता. त्यामुळेच या काळात शेती विकसित झाली. हा विकास आधीच्या तुलनेत दहापट होता. त्यामुळे याकाळात सामान्य माणूस सुखी व समृद्ध झाला. शेतीत वेगवेगळ्या प्रकारची हिंसा होते म्हणून सुरुवातीलाच जैनांनी शेती सोडून आपला मोहरा व्यापाराकडे वळवला. त्यामुळे जैनधर्म शहरात स्थिरावला. ग्रामीण भागात त्याचे अस्तित्व कमी झाले. बौद्ध धर्म मात्र शहरांबरोबरच गावातही वाढत गेला. प्रारंभिक बौद्ध ग्रंथात अनेक प्रकारच्या धान्याचे उल्लेख आढळतात. बौद्ध धर्माच्या दिघ्घनिकाय ग्रंथात महाविजीत नावाच्या ज्या राजाची कथा आलेली आहे तो राजा प्रजेला बी बियाणे व जनावरे पुरवून मदत करणारा आहे. त्यामुळे बौद्ध धर्म ग्रामीण भागात रुजला.

राजकीय दृष्ट्या हा काळ बौद्ध पूर्वकालीन चंद्रगुप्त मौर्यांपासून सम्राट अशोकापर्यंत व्यापलेला आहे. बौद्ध काळातला गावगाडा हा अर्थातच शेतीप्रधान गावगाडा होता. आताच्या परिभाषेत ज्यांना आपण अलुतेदार, बलुतेदार म्हणतो त्या सर्व व्यावसायिकांचे उल्लेख बौद्धवाङ्मयात सापडतात. तेव्हाच्या गावप्रमुखाला ग्रामणी असे म्हणत असत. आज ज्याला आपण पाटील म्हणतो तोच हा ग्रामणी. बौद्ध काळात त्यांची संख्या ८० हजार असल्याची नोंद सापडते. म्हणजे गावांची संख्याही तितकीच असावी, असा अंदाज आपणाला करता येतो.

बौद्धकाळातच लोखंडाच्या खाणींचा शोध लागला. त्या काळापासून लोखंडाच्या भट्ट्या चालवणाऱ्या असुर, अगरिया या आसाम बिहारमधल्या जमाती अजूनही हेच काम करताना दिसतात. प्रामुख्याने हाच प्रदेश बौद्ध धर्म प्रभावाचा होता. याकाळात मुबलक प्रमाणात लोखंड उपलब्ध झाल्यामुळे शेतीच्या अवजारांना ते उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे अवजारांची संख्या वाढली. सुतारांनी आणि लोहारांनी नवनव्या अवजारांचा शोध याच काळात लावला. याच काळात विकसित झालेली शेती संस्कृती पुढं हजारो वर्ष टिकून राहिली. अर्थातच त्या काळात शेतीच्या उत्पन्नात दहापट वाढ झाली, असे जे आधी लिहिले आहे त्याचे कारण लोखंडाच्या खाणींचा आणि नव्या अवजारांचा शोध हेच आहे.

याच काळात शेती सिंचनाच्या योजनांनाही सुरुवात झाली. चंद्रगुप्त मौर्याच्या प्रांतीय प्रशासक पुष्यगुप्त याने जुनागढच्या जवळ सुदर्शन नावाचा तलाव बांधला. पुढे अशोक मौर्याच्या काळात त्याचा प्रतिनिधी यवनराज तुषास्फ याने या तलावाला सांडवे बांधले. बौद्धांच्या अनेक जातककथांमधून सिंचनाचे संदर्भ आलेले आहेत. याचा अर्थ बौद्ध काळात बऱ्यापैकी सिंचन व्यवस्था होती. जमिनी ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न राजवटींकडून झालेला दिसतो.

उत्तरवैदिक काळात यज्ञातून होणारी प्रचंड पशुहत्या बौद्ध धर्माच्या प्रयत्नातूनच या काळात बंद झाली. त्यामुळे शेतीसाठी लागणारे पशुधनही मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. राज्याच्या वतीने पशुधनाची देखभाल करण्यासाठी गोअध्यक्षाची नेमणूक करण्यात आली. अशोकाने आपल्या राज्यात पशुचिकित्सालय देखील विकसित केलेले होते. अशोकाने आपल्या राज्यात रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी सावली उपलब्ध करून दिली होती. त्याने आपल्या राज्यातल्या शिवारातून आंब्याच्या बागा, ज्याला आपण अमराया म्हणतो, त्याही विकसित केलेल्या होत्या. लोकोपयोगी कामात त्याला पुष्कळच रस होता. तो नेहमीच गाईंच्या गोठ्यात किंवा अशा आमरायामधून फिरताना दिसे. यावरून शेती आणि पशुपालन हा त्याच्या आस्थेचा विषय होता असे आपल्या लक्षात येईल. भारतभर असलेल्या बौद्ध स्तुपांभोवती देखील त्याने बागा लावलेल्या होत्या.

प्रत्यक्ष तथागत गौतम बुद्ध व त्यांचे वडील शुद्धोधन हे राजे असले तरी ते शेतकरीच होते. सिद्धार्थ गौतममाचे शेतीशी, भूमीशी एक अतूट नाते होते. म्हणूनच आ. ह. साळुंखे यांनी त्यांना सर्वोत्तम भूमिपुत्र असे म्हटलेले आहे. शुद्धोधनाच्या शेतीची अनेक वर्णने आपणाला बुद्ध चरित्रात पाहावयास मिळतात. मज्झिमनिकाय मधील महासच्चक सूत्राचे विवेचन करताना अठ्ठकथेने शुद्धोधनाच्या शेतीचे पुष्कळ वर्णन केलेले आहे. जातकअठ्ठकथेतील निदानकथेत शुद्धोधनाच्या शेतीचे फार सुंदर वर्णन आलेले आहे. आ. ह. साळुंखे यांनी केलेला त्याचा अनुवाद मी त्यांच्याच भाषेत इथे देत आहे,

“शुद्धोधन शेती करीत असल्यामुळे परंपरेनुसार ते दरवर्षी हलोत्सव साजरा करीत असत. स्वतः नांगर चालवून जमीन नांगरण्याचा सोहळा साजरा करणे हे या उत्सवाचे स्वरूप होते. त्या दिवशी राजाची सगळी नगरी देवांचे महाल सजवावेत तशी सजवण्यात आली होती. सगळे नोकर चाकर वगैरे नवीन वस्त्रे परिधान करून गंधमाला वगैरेंनी अलंकृत होऊन राजवाड्यावर आले होते. राजाच्या शेतावर हजार नांगर जुंपलेले होते. त्यापैकी ७९९ नांगर अमात्यांनी जुंपलेले होते आणि एक नांगर राजाकडे होता. इतर नांगर अन्य शेतकऱ्यांनी धरलेले होते. राजाच्या मुख्य नांगराला रत्ने आणि सोने जडविलेले होते. बैलांची शिंगे कासरे आणि चाबूक यांनाही सोने जडविलेले होते. राजा मोठ्या परिवारासह पुत्राला घेऊन शेतावर आला. शेतावर दाट सावली असलेले जांभळाचे झाड होते. राजाने त्या झाडाखाली शेय्या, छत, कणात वगैरेंची व्यवस्था करून मुलाला दाईकडे सोपवले. त्यानंतर तो अलंकार वगैरे धारण करून अमात्यांबरोबर नांगर जुंपलेल्या ठिकाणी आला. राजाने सोन्याचा नांगर पकडला. अमात्यांनी चांदीचे नांगर पकडले. आणि शेतकऱ्यांनी इतर नांगर पकडले. ते जमिनीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत नांगर चालवू लागले. राजा देखील या टोकाकडून त्या टोकाकडे आणि त्या टोकाकडून या टोकाकडे नांगरासह जा ये करू लागला. त्या ठिकाणी राजाचे मोठे वैभव होते. राजाचे ते वैभव पाहण्यासाठी म्हणून बोधिसत्वाच्या दाई कनाती मधून बाहेर पडल्या. बोधिसत्वांनी इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यांना कोणी दिसले नाही. मग ते चटकन उठले आणि आसन घालून पानापानाद्वारे त्यांनी तिथे पहिले ध्यान केले.”

असे प्रसंग चित्रित करणारी शिल्पे आपणाला श्रीलंकेतील केलियाना महाविहारात, सांची येथील स्तुपावर आणि अजिंठा येथील सोळाव्या क्रमांकातील गुहेत पाहायला मिळतात.

बौद्ध काळातील अशोक आणि मौर्याच्या राजवटीत शेतीचे महत्व आधीपेक्षा वाढलेले दिसते. कौटील्याचे अर्थशास्त्र, जातककथा आणि मॅगॅस्थेनिस या परदेशी प्रवाशाचे प्रवासवर्णन इत्यादी वाङ्मयातून याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. या काळातल्या शेतकरी वर्गाची संख्या मोठी होती. ते आपल्या कामात मग्न असत. कारण काळ तसा शांततेचा होता. आणि जेव्हा केव्हा युद्ध होत तेव्हा शेतकऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. त्याचे काम त्याला करू दिले जात असे. त्याच्या कामात कुणी अडथळा आणित नसे. सर्व जमीन राजाच्या मालकीची होती आणि कसण्यासाठी ती प्रजेला दिली जात असे. प्रजा उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग राजाला देत असे. हा भूमीकर तसा सुसह्य आणि योग्यच होता. काही गावांना यापेक्षाही करात सवलत दिली जात असे. अशा विशेष गावांना उत्पन्नाचा केवळ एक अष्टमांस वाटा द्यावा लागे. इतिहासात इतका कमी कर शेतकऱ्यावर कधीच नव्हता. अगदी शिवाजीच्या काळात देखील ४० टक्के वाटा द्यावा लागत असे. बौद्ध काळात तो २५ ते १२ टक्के असा सरासरी पडतो.

सैन्यात भरती होण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह केला जात नसे. परंतु एखाद्या गावातून स्वयंस्फूर्तीने जास्त सैनिक तयार झाले तर त्या गावांना करात अधिकची सूट मिळे. त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे सैन्यात भरती होत असत. लोक स्वखुशीने सैन्यात येत आणि राहिलेले कर कमी झाल्यामुळे आनंदाने शेतात राबत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असे. म्हणूनच त्याकाळी शेती उत्पन्नासाठी शेतात बळजबरीने गुलामांना राबवावे लागत नसे. या काळात गुलामगिरी जवळजवळ नसल्यात जमा होती. पुढे म्हणजे खूप पुढे मुस्लिम राजवटींच्या सरंजामशाहीच्या काळात ती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आली.

याच काळात मोठ्या प्रमाणात नवीन गावांची वसाहत झाली. पुष्कळ गावे नव्याने वसवल्या गेली आणि प्रत्येक गाव आपापल्या परीने स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्या गरजा आपल्याच गावात पूर्ण कशा होतील याची दक्षता घेण्यात आली.

जमिनीची मालकी राजाची होती, असा जरी उल्लेख वर आला असला तरी काही संशोधकांना असे वाटते की संपूर्ण जमीन एकट्या राजाच्या मालकीची नसावी. जमिनीची मालकी राजा, राज्य, जमीनदार, समूह आणि शेतकरी अशा पाच प्रकारची असावी असे त्यांना वाटते. राजाच्या वैयक्तिक मालकीची जमीन पुष्कळ असे. त्या जमिनीचे उत्पन्न राजाच्या वैयक्तिक मालकीचे असे. ते राजकोषात जमा होत असे. आपल्या वैयक्तिक मालकीची जमीन राजा कुणाला दान किंवा भेट देऊ शकत असे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मालमत्ता खरेदी विक्रीच्या प्रकरणात शेतीच्या खरेदी, विक्रीचाही समावेश आहे. याचा अर्थ शेतीची खरेदी, विक्री करता येत असावी.

या कालखंडात सैन्याला व राजकीय अधिकाऱ्यांना नगदी पगार राजकोषातून दिला जात असे. त्यासाठी मक्ते किंवा जहागिऱ्या अशा प्रजेला लुटणाऱ्या व्यवस्था नव्हत्या. त्यामुळे प्रजा निश्चिंत होती. शेतकरी त्यामुळे सुखी आणि आनंदी होता. नंतरच्या सरंजामी काळात या प्रथा बंद होऊन शेतकरी लुटला गेला. ते इथे होत नसे. शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करण्याविषयी रोमिला थापर यांनी लिहिले आहे,

“मौर्यकाळात जमीन महसूल गोळा करणाऱ्यांसारखे राज्याचे अधिकारी लागवडीखालील जमिनीवरची कर आकारणी स्वतः करीत, हे स्पष्ट आहे. गावाच्या सर्व जमिनी एकत्र विचारात घेऊन त्यावर ती आकारणी आधारलेली नसे. तर ती गावातील प्रत्येक शेतकरी व गावकरी यांच्याविषयीचा तपशीलवार विचार केला जाई. आकारणी प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे जमिनीच्या मगदूराप्रमाणे खेड्यातील सर्व जमिनींची उत्तम, मध्यम व हलकी अशी तीन प्रकारांमध्ये होणारी विभागणी. यानंतर या खेड्याच्या खालीलपैकी एका गटात समावेश होई. करमुक्त असलेली खेडी (परिहारक), सैनिक पुरवणारी खेडी (आयुधिय) धान्य, जनावरे, सोने या रूपाने कर देणारी खेडी (हिरण्य) किंवा कच्च्या मालाच्या रूपाने कर देणारी खेडी (विष्टि) आणि कराऐवजी दुग्धोत्पादन करणारी खेडी. कोणतीही आकारणी करण्यापूर्वी स्थानिक वैशिष्ट्य विचारात घेत असत, हे यावरून बरेचसे स्पष्ट होते.”

रोमिला थापर यांनी ही माहिती कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या आधारे दिलेली आहे. मॅगॅस्थेनीस या परदेशी प्रवाशाने या काळातले आपले जे प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे, त्यात त्याने असे म्हटले आहे की, या काळात इथे एकही दुष्काळ पडला नाही. पण ते खरे वाटत नाही. मग मॅगॅस्थेनीसने खोटे लिहिले आहे काय ? तर तसेही नाही. जोपर्यंत तो इथे होता तोपर्यंत कदाचित दुष्काळ पडला नसावा. त्याने तो पाहिलेला नसावा.

या काळात शेतात बैलाचा उपयोग शेतात नांगर ओढण्यासाठी होत होता. त्यामुळे गोपालनाला महत्त्व होतेच. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात त्यासाठी एक स्वतंत्र अध्याय लिहिला आहे. त्यात त्याने गोपालनाचा सविस्तर तपशील दिला आहे. गाईंचा सांभाळ कसा करावा, दूध कधी ? किती ? काढावं व वासराला किती सोडावं याचाही तपशील दिलेला आहे. गाई वासराचे शोषण करून दूध काढले तर त्यासाठी कौटिल्याने कडक शिक्षा सांगितलेली आहे. अशा लोकांची बोटं तोडावीत, असे कौटिल्य म्हणतो. पाळीव प्राण्यात सर्वात महत्त्वाची समजली जात असे ती गाय. पण ती पवित्र असल्याचा व गोमांस भक्षणाच्या निषेधाचा उल्लेख मात्र कुठेही नाही. वासरू, बैल, दुभती गाय यांची हत्या करू नये असा नियम मात्र होता. शेतीसाठी त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊनच हा नियम केलेला असावा. गाईवरचा करभार हा दुग्धोत्पादनाच्या रूपात द्यावा लागे. पशुहत्येच्या संदर्भात रोमिला थापर यांनी दिलेली माहिती अशी…

“जनावरांना दयाळूपणे व काळजीपूर्वक वागवावे अशी विनंती अशोकाने वारंवार आपल्या आज्ञालेखनातून केलेली आहे. एके ठिकाणी तो असे सांगतो की आपल्या स्वतःच्या राज्यात त्याचप्रमाणे आजूबाजूच्या राज्यात आणि इतर देशातही जनावरांसाठी वैद्यकीय उपाययोजनेच्या तरतुदी केलेल्या आहेत. माणसे आणि जनावरे यांना पाणी मिळावे आणि वृक्षांच्या छायेत विसावा घेता यावा म्हणून मुख्य राजमार्गावर झाडे लावली आहेत आणि विहिरीही खोदल्या आहेत. पुढच्या एका अज्ञालेखात तो प्रजेला असे सांगतो की, जनावरांच्या हत्त्येपासून प्रजेने दूर राहावे. राजवाड्यातील स्वयंपाक घरात नित्य मारल्या जाणाऱ्या वस्तूंच्या संख्येत त्याने कपात करून ते प्रमाण दोन मोर व एक हरीण इथपर्यंत आणून ठेवले. व या प्राण्यांची हत्याही अधिक काळ चालू राहिली नाही. नंतर तीही बंद करण्यात आली. हीच कल्पना मनात धरून यापूर्वीच्या राजांची शिकारीसारखी एक आवडती करमणूक त्याने बंद केली. जनावराविषयी वाटणारी रास्त कळकळ व बेसुमार हत्येमुळे देशातील पशुसंपत्तीचा धोका निर्माण होईल ही भीती, या दोन्हीमुळे या धोरणाला प्रेरणा मिळाली, यात शंका नाही. यज्ञात जनावरांचा बळी देणे ही अतिशय घातक रूढी होती. कारण देवाच्या आराधनेसाठी बळी म्हणून कळपातील सर्वोत्कृष्ट पशुचीच निवड केली जाई. त्यामुळे सुदृढ आणि धष्टपुष्ट जनावरे बळी पडत.

कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कृषिमंत्री स्वतंत्र असला पाहिजे यावर जोर दिलेला आहे. त्याला त्याने ‘सीताध्यक्ष’ असे नाव दिलेले आहे. शेतीसाठी सीता हा शब्द तेव्हापर्यंत प्रचलित होता असा याचा अर्थ होतो. कौटिल्याने चंद्रगुप्त मौर्याला ही सूचना केलेली होती. शेतीसाठी इंच इंच जमिनीचा वापर करून घेतला पाहिजे यावर कौटिल्याचा कटाक्ष होता. शेती पडीक ठेवण्याऐवजी हिस्सेदारीने का होईना ती कसायला दिली पाहिजे, असं तो लिहितो. कौटिल्याने शेतीचा फार सूक्ष्म विचार केलेला होता. शेतीमातीची प्रत, बी बियाणाची प्रत, लागवडीचे प्रकार, नंतर पिकाची घ्यावयाची काळजी या सगळ्यांचा कौटिल्याने साकल्याने विचार करून या प्रत्येक विषयावर स्वतंत्र अध्याय आपल्या अर्थशास्त्रात लिहिलेले आहेत.

या काळातलं मुख्य खाद्यान्न भात हेच होतं. पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकवला जात असे. संस्कृत आणि पालीमध्ये भाताला किंवा तांदळाला ‘साली’ म्हणजे साळी असा शब्द होता. जो आजही मराठवाड्यात प्रचलित आहे. साळीची पेरणी करण्याऐवजी साळीची रोपं तयार करून ती दुसऱ्या शेतात लावण्याची पद्धत याच काळात विकसित झाली. त्यामुळे उत्पन्नात खूपच वाढ होऊ लागली. त्याबरोबरच शेतकरी कडधान्य, तृणधान्य, बार्ली, कापूस आणि उसाचीही शेती करत असल्याचा उल्लेख पाली ग्रंथात सापडतो.

पिकांचे होणारे अतिरिक्त उत्पन्न हे व्यापारासाठी पूरक ठरले. त्यामुळे त्या काळात व्यापाराला मोठी चालना मिळाली. त्यासाठीच मोठी शहरं निर्माण झाली. सिंधू संस्कृतीनंतर पुन्हा एकदा बौद्धकाळात शहरांच्या वसाहती निर्माण झाल्या. तिथं शेती उपयोगी वस्तू निर्माण केल्या जाऊ लागल्या. त्यात प्रामुख्याने लोखंडाचे फाळ, विळे, पास, तासण्या प्रथमच या काळात निर्माण झाल्या. शेतीत क्रांती करणारी अनेक अवजारं निर्माण करणारे कारखाने तयार झाले. त्यातून व्यापारीपेठा निर्माण झाल्या. ही शहरे शेतीच्या समृद्धीवर पुष्कळ काळ टिकून राहिली.

चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापर्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने भरभराटीचा हा काळ अचानक संपुष्टात का आला ? त्याची काही कारणं आहेत. बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर सम्राट अशोकाने यज्ञ आणि बळीच्या प्रथा बंद केल्या. ब्राह्मणांनी सगळ्यांशीच आदराने वागायला पाहीजे असे सांगितले. त्यासाठी आदेश काढले तेही संस्कृत ऐवजी प्राकृत भाषांमध्ये. स्त्रियांवर लादलेल्या अनावश्यक कर्मकांडांची निंदा केली. खेड्यापाड्यांचा कारभार पाहण्यासाठी राजुकांच्या स्वतंत्र पदांची निर्मिती केली. व्यवहार आणि दंडसमानतेची संहिता निर्माण केली. त्यामुळे ब्राह्मणवर्गाचे विशेष अधिकार संपुष्टात आले. म्हणूनच ब्राह्मणवर्ग अशोकावर प्रचंड खवळलेला होता. त्यातूनच त्यांनी मौर्य साम्राज्याच्या पडझडीसाठी कारस्थाने रचली. अशोकाच्या निधनानंतर या कारस्थानांना यश आले. राज्याच्या खजिन्यातून बौद्ध भिक्खूंना दिलेल्या भरमसाठ दानधर्मामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झाली होती. सोन्याचे पुतळे वितळवून उभे केलेले पैसेही या आर्थिक आणीबाणीला तोंड द्यायला अपुरे पडले. मंत्री, अमात्यांच्या आपापसातल्या वैमनस्यामुळे हे मौर्यांचे साम्राज्य शेवटी लयाला गेले. शेतीची आणि एकूणच समाज जीवनाची उतरती कळा सुरू झाली.

संदर्भ

१. महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर । इतिहास । प्राचीन कालखंड (खंड-१) सं – अरुणचंद्र पाठक, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई (२००२)
२. कौटीलीय अर्थशास्त्र : सटीप मराठी भाषांतर – प्रा. र. प. कंगले, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई (१९८२)
३. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास – रोमिला थापर, अनु. डॉ. शेरावती शिरगावकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (१९८०)
४. आर्यांच्या शोधात – मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, पुणे (२०१८)
५. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध – डॉ आ. ह. साळुंखे, लोकायत प्रकाशन, सातारा (२००७)
६. कोणे एकेकाळी सिंधू संस्कृती – म. के. ढवळीकर, राजहंस प्रकाशन, पुणे (२०१०)
७. भारतीय इतिहासाचा अभ्यास – डी. डी. कोसंबी, अनु. दि. का. गर्दे, डायमंड पब्लिकेशन (२००६)
८. सार्थवाह (प्राचीन भारताची दळणवळण पद्धती) मोतीचंद्र, अनु. मा. कृ. पारधी, साहित्य अकादमी, दिल्ली (२०१०)
९. भारताचा प्राचीन इतिहास – आर एस शर्मा, मराठी अनुवाद – सरिता आठवले, मधुश्री पब्लिकेशन, पुणे (२०२४)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading