December 3, 2024
Agriculture Advice and Guideline for summer by Krushisamrpan
Home » कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी..
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी..

🌳 कृषिसमर्पण 🌳

👨🏻‍🌾 कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी.. 👨🏻‍🌾

🌰 कांदा 🌰

रब्बी कांदा पिकावर थ्रीप्स (फुलकिडे/टाक्या) आणि तपकिरी व जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी कार्बोसल्फान (२५ इसी) १.५ मि.लि. अधिक ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने, प्रोफेनोफॉस (५० इसी) १.५ मि.लि. अधिक हेक्‍साकोनॅझोल (५ इसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी. फवारणीचे चांगले परिणाम साधण्यासाठी फवारणी द्रावणामध्ये स्टीकरचा वापर करावा.

🥒 वेलवर्गीय भाजीपाला 🥒

कारली, दुधी भोपळा, दोडका व पडवळ या पिकांच्या वेलींना मंडप किंवा ताटी पद्धतीने आधार दिला असता त्यांची चांगली वाढ होते. नवीन फुटीला सतत चांगला वाव राहतो, फळधारणा चांगली होते. मंडपावर वेली सात महिने चांगल्या राहतात. उत्पादनात वाढ मिळते. मंडप पद्धतीमुळे फळे जमिनीपासून ५ ते ६ फूट उंचीवर वाढतात, त्यामुळे पाने आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ते सडत नाहीत. कीड आणि रोगांचे प्रमाण कमी राहते. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखे मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, कीडनाशकांची फवारणी योग्य पद्धतीने करता येते. पिकांमध्ये ट्रॅक्‍टरच्या किंवा बैलांच्या साह्याने आंतरमशागत करून उत्पादन खर्च कमी करता येतो. वेल मंडपावर पोचेपर्यंत दीड ते दोन महिने कालावधी जातो, त्यामुळे या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.

🍅 टोमॅटो 🍅

टोमॅटो रोपांची पुनर्लागवड पॉलिमल्चिंग अंथरून केल्यास तणनियंत्रण, ओलावा व्यवस्थापन होऊन एकूण उत्पादनात वाढ होते. टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपर वापरल्याने, पिकातील तणांचे प्रभावी नियंत्रण होऊन आंतरमशागतीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात बचत होते. पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊन कमी पाण्याची उपलब्धता असताना देखील टोमॅटोचे यशस्वीपणे उत्पादन घेता येते. पाण्यात विरघळणारी खते वाफ होऊन उडून जात नसल्याने खतांची बचत होते. तापमानातील तीव्र चढउतार यांपासून मुळे सुरक्षित राहतात. मातीचे तापमान नियंत्रित राहिल्याने, अन्नद्रव्यांचे शोषण योग्यरीतीने होते. तापमान नियंत्रित राहिल्याने जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ चांगली होते. टोमॅटोच्या खालील पानांचा, फळांचा मातीशी संपर्क न आल्याने फळांची प्रत सुधारते. तसेच रोग व किडींचा प्रादुर्भावदेखील मर्यादित राहतो. यासाठी जमिनीवर अपेक्षित अंतरावर गादीवाफे तयार करून, त्यावर प्रथम ठिबक सिंचनाच्या लॅटरल अंथरून घ्याव्यात. त्यावर प्लास्टिकचे आच्छादन पसरून, दोन रोपांतील अपेक्षित अंतरावर छिद्रे पडून घ्यावीत. या छिद्रामध्ये टोमॅटो रोपांची पुनर्लागवड करावी. आता प्लास्टिक आच्छादन कागद पसरणारी यंत्रेदेखील उपलब्ध झाली आहेत. पॉलिमल्चिंगसाठी वरील बाजूस चंदेरी व खालील बाजूस काळा रंग असलेला किंवा दोन्ही बाजूंस काळा रंग असलेला कागद वापरणे फायदेशीर ठरते. साधारणतः एका बंडलमध्ये ४०० मीटर लांबीचा कागद असतो. पाच फूट अंतरावर गादी वाफे काढल्यास अंदाजे एकरी सहा बंडल लागतात.

🐮 पशुपालन 🐮

खूर विभागलेल्या जनावरांमध्ये (गाय,म्हैस,शेळी-मेंढी) सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकूतची साथ येते. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो. रोगाची लक्षणे म्हणजे जनावराचे खाणे-पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्‍यता असते. जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात. जनावरास मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते. या रोगाची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये. रोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा. रोगी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे. रोगी जनावरे बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी. जनावरांचे दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत म्हणजे त्यांचे निर्जंतुकीकरण होईल, रोगप्रसार टळेल. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्‍यतो होत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण सप्टेंबर आणि मार्च महिन्यामध्ये करावे.

🐔 कुक्कुटपालन 🐔

उन्हाळ्यात कुक्कुटपालनगृह थंड व कडक थंडीत उबदार कसे राहील याचा प्राधान्याने विचार करावा. कोंबड्यांना घाम येत नाही. त्यांना आपल्या अंगातील उष्णता कमी करणे फार कठीण जाते उन्हाळ्यात ३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान गेल्यास कोंबड्या अस्वस्थ होऊन धापा टाकतात. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी खाणे बंद करून जास्त पाणी पितात, त्यामुळे अशावेळी घरात जास्तीत जास्त हवा खेळती असावी, म्हणून घराचे छप्पर उंच असावे व दोन्ही बाजूंना जाळ्या असाव्यात. छपरास वरील बाजूने पांढरा चुना लावल्यास सूर्य प्रकाश प्रवर्तित होऊन आतील तापमान वाढत नाही. घराला दोन्ही बाजूने किमान ६ ते १० फुट जाळी असल्यास योग्य वायुवीजन होण्यास मदत होते. दुपाखी छप्परास मध्य भागी सांध्याला फट ठेवलेली असल्यास उष्ण झालेली हवा व वायू हलके असल्यामुळे छप्परातून निघून जातात, योग्य वायुवीजनमुळे घरात नेहमी शुद्ध व ताजी हवा राहते. कोंबडीच्या घरात लिटर व विष्ठेतून अमोनिया वायू सारखा बाहेर पडतो. तसेच कोंबड्यांच्या उच्छ्वासातून कार्बन डाय ऑक्साइड वायू सतत बाहेर टाकला जातो. हे वायू घरातील वातावरणात घुटमळत राहिल्यास त्याचा पक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कोंबडीच्या विष्ठेतून व घरात सांडलेल्या पाण्यातून बाष्पीभवनातून वाफ निर्माण होते. पाणी साचल्यामुळे खालील लिटरमध्ये अनेक जंतू निर्माण होतात. घरात कोंबड्यांना हिंडून फिरून मोकळेपणाने राहण्यासाठी, खाण्यासाठी, दिसण्यासाठी उजेडाचे योग्य प्रमाणात नियोजन असावे, त्यामुळे अंडी उत्पादनास व वजन वाढीस चालना मिळते.

🐐 शेळीपालन 🐐

उन्हाळ्यात शेळ्या कमी खाद्य खातात म्हणून त्यांच्या खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. खाद्यात प्रथिनांचे प्रमाण १६ ते १८ टक्के ठेवावे. हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे. शेळ्यांना खाद्यात क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे, यीस्ट (किण्व) द्यावे. खाद्याची पाचकता व इतर घटकांचा समतोल राखावा. जीवनसत्त्व ‘सी’ व ‘अ’ दिल्यास उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मरतुकीस आळा बसतो. शेळ्यांच्या खाद्यात व्हिनेगार, लिनसीड मिल व गव्हाचा चोथा, युरिया मोलासेस, मिनरल ब्लॉक यांचा समावेश करावा. तसेच तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढवावी.

|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||

(सौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading