नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स , सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय द्वारा संयुक्तपणे आयोजित ‘कला कुंभ- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या सौजन्याने येत्या बुधवारी (26, जानेवारी 2022) नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्राची वारली कला दिमाखात प्रदर्शित केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील वीस वारली कलाकारांनी 26 ते 30 डिसेंबर 2021 दरम्यान चंदीगड येथील चितकारा विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत 6 फूट बाय 45 फूट आकाराच्या पाच भव्य कॅनव्हासवर समृद्ध आदिवासी संस्कृती रेखाटताना कलात्मक कौशल्य दाखवले आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांच्यासोबत देशभरातून आणखी 230 कलाकार सहभागी झाले होते. कार्यशाळेत सहभागी झालेला राजेश वांगड हा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गंजड गावातील एक प्रसिद्ध वारली कलाकार आहे. “स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आतापर्यंतच्या आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंचे चित्रण करण्यासाठी पाच कॅनव्हासचा वापर करण्यात आला आहे.” असे त्यांनी सांगितले. पत्र सूचना कार्यालयाशी बोलताना, त्यांनी प्रत्येक कॅनव्हासच्या संकल्पनेची माहिती दिली, ज्यावर वीस कलाकारांनी त्यांची ओळख आणि देशभक्ती जिवंत करण्यासाठी एकत्र काम केले
पहिल्या कॅनव्हासचा विषय ब्रिटिश काळात आदिवासींना करावा लागलेला ‘संघर्ष आणि स्थलांतर ’ हा होता. वांगड यांनी नमूद केले की, आदिवासींनीच प्रथम विदेशी घुसखोरांविरुद्ध लढा दिला होता, त्यांच्या वन जमिनी हिसकावून घेण्यात आल्या होत्या तसेच त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय केला गेला. आदिवासी सैनिकांनी इंग्रजांशी लढताना वापरलेले धनुष्य बाण, दगड सारखी पारंपरिक शस्त्रे या कॅनव्हासमध्ये दाखवण्यात आली आहेत.
दुसऱ्या कॅनव्हासमध्ये स्वतंत्र भारतातील आदिवासी जीवन आणि इतर बाबी जिवंत केल्या आहेत. या कॅनव्हासमध्ये वारली कलाकारांनी इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या समाजात आणि राहणीमानात झालेले बदल रेखाटले आहेत. त्यांच्या कल्याणासाठीच्या सरकारी योजना, त्यांच्या परंपरा, समारंभ आणि बोलीभाषा या कॅनव्हासमध्ये प्रतीकात्मकपणे मांडण्यात आल्या आहेत.
सर्कल ऑफ लाइफ’ नावाच्या तिसऱ्या कॅनव्हासमध्ये आदिवासींच्या धार्मिक श्रद्धा, देवता, निसर्गाची पूजा, प्राणी, पारंपारिक नृत्य इत्यादीं गोष्टींवर भर देण्यात आला आहे. “आमच्या संस्कृतीत वाघाला खूप महत्त्व आहे”असे वांगड सांगतात. या कॅनव्हासमध्ये मांजरींच्या प्रजाती केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भावना दाखवण्यात आल्या आहेत.
चौथ्या कॅनव्हासमध्ये आदिवासी विवाह सोहळ्यांची संकल्पना आहे. “वारली कुटुंबांमध्ये लग्न समारंभाच्या वेळी संपूर्ण कुटुंब, लहान मुलांपासून ते प्रौढ स्त्री-पुरुषांपर्यंत, घराच्या बाहेरच्या भिंती एकत्र रंगवतात”, असे वांगड सांगतात. या चित्रांच्या विषयात निसर्ग, झाडे आणि प्राणी यांचा समावेश असतो. त्यात देव-देवतांच्या सभोवताली ‘लग्नचौक’ आणि ‘देवचौक’ नावाच्या पारंपारिक आकृतिबंधांचा समावेश आहे. पाचवा कॅनव्हास त्यांची पारंपरिक शेती आणि कापणीच्या पद्धतींवर केंद्रित आहे.
गटातील चार महिला कलाकारांपैकी एक असलेल्या चंदना चंद्रकांत रावते सांगतात, “कला कुंभमधील आमच्या कामांमधून आमच्या परंपरा आणि देशाला स्वातंत्र्यमिळवून देण्यासाठी आमच्या नायकांनी केलेला संघर्ष दाखवला आहे”. “कला कुंभ कार्यशाळेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग बनण्याची आणि आपल्या आदरणीय स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी भाग्यवान समजते “, असे त्यांनी सांगितले. रावते यांनी असेही नमूद केले की “ स्त्रियांनी वारली कलेची परंपरा जोपासली आहे, मात्र आता या व्यवसायात पुरुषांचे वर्चस्व आहे. या क्षेत्रातील भूतकाळातील वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी मला अधिकाधिक महिलांना या कलेचे प्रशिक्षण द्यायचे आहे.”
अनेक पुरस्कार मिळवलेले ज्येष्ठ वारली कलाकार या उत्सवात पारंपरिक कलेचे दर्शन घडविण्यासाठी सामील झाले आहेत.त्यापैकी अनेकजण आदिवासी वारली कलाप्रकार लोकप्रिय करण्याचे श्रेय ज्यांच्याकडे जाते, त्या दिवंगत पद्मश्री सोमा माशे यांचे ,कुटुंबीय आणि विद्यार्थी आहेत. पालघरच्या डहाणू तालुका आणि विक्रमगड तालुक्यातील सहभागी कलाकारांमध्ये देवू धोदडे, बाळू धुमाडा, शांताराम गोरखाना, विजय म्हसे, अनिल वनगड, प्रवीण म्हसे, किशोर म्हसे, गणपत दुमाडा, रुपेश गोरखाना, विशाल वनगड, संदेश राजाड,अमित ढोंबरे,मनोज बाडांगे, नितीन बलसी, वैष्णवी गिंभळ, सुनीता बराफ आणि अनिता दळवी यांचा समावेश आहे. या उपक्रमातून आपल्या कलेला वैभवाची नवी उंची गाठताना पाहून कलाकारांमधे उत्साह संचारला आहे.
‘कला कुंभ’ या अनोख्या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या भव्य आणि नेत्रदीपक चित्रपट्ट्या आता प्रजासत्ताक दिन 2022च्या सोहळ्यासाठी राजपथावर स्थापित करण्यात आल्या आहेत. विविध प्रांतांतून आलेल्या स्थानिक कलाकारांनी रंगवलेले चित्रफलक, राजपथाच्या दोन्ही बाजूंना शोभून दिसत आहेत आणि विलोभनीय उत्साही दृश्य पहायला मिळत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव श्री गोविंद मोहन यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले की, या कलाकारांचे विविध कलाप्रकारही एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेने एकाच व्यासपीठावर एकत्र आणलेल्या चित्रफलकांमधून दिसून येत आहेत. प्रजासत्ताक दिनानंतर, हे चित्रफलक देशाच्या विविध भागात नेले जातील आणि आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून तेथे प्रदर्शित केले जातील. कला कुंभ – आझादी का अमृत महोत्सव हा देशातील विविधतेच्या एकतेचे मूलाधार आणि आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास प्रतिबिंबित करतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.