March 29, 2024
Malvani Boli of Marathi article by Balkrishna Lalit
Home » मराठीची एक प्रगत बोली – मालवणी
विशेष संपादकीय

मराठीची एक प्रगत बोली – मालवणी

मराठीची एक प्रगत बोली – मालवणी

एक काळ असा होता की, ‘या बोलीतून संभाषण केले तर गावंढळपणाचे वाटायचे’, पण पुढे-पुढे अनेक मान्यवर लेखकांनी आपल्या साहित्यकृतीतून या बोलीचा वापर सुरु केला .बोली समृध्द असते, तेव्हा भाषा अधिक समृध्द बनते.

प्रा. डाॕ. बाळकृष्ण लळीत

मराठी विभाग,
चां. ता. बोरा महाविद्यालय,
शिरूर. जि. पुणे

‘बोलणाऱ्यानं बोलत रवाचा आणि ऐकणाऱ्यानं ऐकत रवाचा’ अशी मालवणी बोली भाषा
आहे ‘. पूर्वी कुडाळी ‘ म्हणूनही ओळखली जात असे. बोलण्यातील गोडवा, लय आणि ठसका यामुळे तिला अनोखे नाद- माधुर्य प्राप्त झाले. मराठी माणसाला समजायला ती कठीण जात नाही. तालुक्यानुसार थोडे- फार बदल जाणवतात तेवढेच! उदा. कुठे-खंयसर, खिसर- खुयसर-
इथे-हयसर, हैंसर, हुयसर तसेच जातंय, जातंस, जातलय असे काही शब्दभेद जाणवतात. या बोलीत बंगाली तसेच गोमंतकीय कोकणी बोलीतील अनेक शब्द आढळतात. या संदर्भात बरेच संशोधन झाले आहे.

‘मालवण बंदरात बसून जो मुंबईला गेला तो मालवणी!’ आणि ‘तो जी बोलतो ती बोली म्हणजे मालवणी.’ आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ती बोलली जाते. ‘मालवणी भोजन’,’ मालवणी खाजा,’ ‘ मालवणी मसाला’, ‘मालवणी गजाली’, ‘मालवणी पध्दतीची हॉटेले’, ‘मालवणी नाटक ‘-असे शब्दप्रयोग हळूहळू रुढ झाले व रुळलेही.

एक काळ असा होता की, ‘या बोलीतून संभाषण केले तर गावंढळपणाचे वाटायचे’, पण पुढे-पुढे अनेक मान्यवर लेखकांनी आपल्या साहित्यकृतीतून या बोलीचा वापर सुरु केला .बोली समृध्द असते, तेव्हा भाषा अधिक समृध्द बनते. थोर अभ्यासिका दुर्गा भागवत यांनी म्हटले आहे की, ‘शिष्टभाषा व बोली भाषांचे अभिसरण साहित्यिक वातावरणाला पोषक आहे मारक नाही.’
लेखकांना उद्देशून त्या म्हणतात- “तुम्हाला जर लोकांची बोलीभाषा आत्मसात करण्याचे कसब
असेल, अभिव्यक्तीची नवी घडण, ताजेपणा हवा असेल, संवादसूत्र साधायचे असेल तर बोलभाषेच्या आत्मसातीकरणामुळेच ते शक्य आहे.”

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मालवणी बोलीतील साहित्य कविता, नाटक, कादंबरी, कथा,
एकांकिका आता मराठी साहित्यात सन्मानले जात आहे. विंदा करंदीकर , जयवंत दळवी, मधु मंगेश
कर्णिक, चिं.त्र्य. खानोलकर, चंद्रकांत खोत, मंगेश पाडगावकर, प्र.ल. मयेकर, गंगाराम गवाणकर,प्र.श्री. नेरुरकर,डॉ.वसंत सावंत, महेश केळूसकर,दादा मडकईकर इ. नी मालवणी बोलीचा लेखनासाठी आधार घेतला.

मधु मंगेश कर्णिक म्हणतात, “मराठी भाषेची एक सागर किनाऱ्यावरची लेक, मालवणी ही आपल्या सौंदर्यानिशी, वैशिष्टयांनिशी मराठी मायमाऊलीच्या दरबारात उभी आहे. लिहू लागली आहे. मोकळेपणाने, निर्भिडपणाने आपले गुज व्यक्त करु लागली आहे. पण बोली म्हणूनही ती मराठी साहित्यात चविष्टपणे वावरु लागलेली आहे. ही घटना अत्यंत स्वागतार्ह म्हटली पाहिजे”.

मालवणी माणूस सहज बोलत असला तरी तो समोरच्या व्यक्तीची फिरकी घेऊ शकतो. सहज रस्त्याने जाताना कुणाच्या घरातून मासे भाजल्याचा वास आला तर तो म्हणेल की, ‘कोणी रे मेल्यान समुद्राक आग घातली?’ या त्याच्या बोलण्यातील संदर्भ समोरच्या व्यक्तीच्या लगेच लक्षात येत नाही. संदर्भ ध्यानी आल्यावर मात्र कौतुक वाटते. पुढील एका लोकगीतात आलेल्या पाहुण्यांना आगळा-वेगळा पाहुणचार आहे.

इल्यात पाहुण्यांनु बसा बसा
बसल्यात तर डाळी आसा जेयतल्यात तर पेज आसा
खातल्यात तर पान आसा
रवतल्यात तर सांज झाली
जातल्यात तर सकळ आसा
पिपळा बुडसून वाट आसा

या बोलीचा उत्कृष्ट नमुना ऐकायचा असेल तर दशावतार नाटकाच्या प्रारंभी आडदशावतारातील नाईकजी-भट – संकासुराचे संवाद प्रत्यक्ष ऐकले पाहिजेत. या मुलखात ‘डिसेंबर ते मे’ दरम्यान ही दशावतारी नाटके कुठे ना कुठे पहायला मिळतात.
रा. ब. वासुदेवराव बांबर्डेकर, आ. रा. देसाई, सरस्वतीबाई रेगे, विद्यादेवी प्रभू, महेश केळुस्कर इत्यादी अभ्यासकांनी या बोलीचा भाषिक अभ्यास केला आहे.

मालवणी बोलीचे काही नमुने

(जुन्या काळात ज्या बोलीला ‘कुडाळी ‘ म्हणत त्या कुड़ाळी भाषेचा नमुना.)
“नवशी वर्साच्या सुमारास देवसरमो नावाचों आदगोड बामण भागिरथीच्या नदीवरसून परवास करीत- करीत दक्षिण कोकणात इलो, आणि आताच्या देवगडकडच्या हिंदळया गावात आपल्या परवारासकट रखलों, हिंदळयाजवळ कुणकेश्वर म्हादेवाचा सयम थळ आसा तेची शेवाचाकरी तेना केली, तेच्या करपेन त्या बिरामनाचो येलइस्तार वाढलो.

त्या वेळाच्या कदमांच्या राज्यान तेचे झील, नात मोठ्या अदिकारार चडले. पयल्यान ते कदम ( कदंब) राजाचे मांडलिक व्होते म्हणान त्यांचा आडनाव सांगितले मंत पडला. तेच्या वंशात माइदेव हुनुन एक मोठो पराक्रमी पुरुस जालो. त्याना लडायो मारुन आपल्या परजेक आबादी आबाद केली व परजेक सूख लाभला. तेच्या पराकर्माचा वर्नान, तेच्या वंसातलो नागदेव यांना केलि आसा. काळकादेवीक पांचशी वरशाच्याच्या सुमाराक एक गाव दान दिला, त्याच्या तामरपट्यात खुब वर्णान केला आसा. माइन्देवान् याधव राजाचा मांडलिकपाण झुगारुन कुडाळदेस आनि आयलो पयलो मुलुक हेचो तो सवता महाराजा बनलो.”

संदर्भ:- (कुडाळी – मराठी -भाषा ,रा.ब.वासुदेव अनंत प्रभू बांबर्डेकर, मसाप वर्ष ४ अंक ४ जानेवारी १९३२, पृ.३१८)

वेंगुर्ला परिसरात बोलली जाणारी बोली-

“कसा काय पावण्यान? केवा जाताल्यात ? मालवणाक जाताना वाटेवरच गावात याक मोटा झाडा आसा. तां बगून चला. मीठवाबचे तुमी, पुन्हा येताहास ? हो वड सवायशी वसपूर्यी अगदी न्हान होतो .तेचो आता इसतार तरी बगा? हेनी ७५ पावला लाम आनि ६५ पावला रुन जागो आडायल्यान .तेची खांदी, पाळंबी, पानसुधा कोन तोडनो नाय. —-या मोटा मूळ दिसता तां पयल्या वडाचा, मागसून तेच्या खांदगाक पाळांबे फुटान हे पाचपंचवीस न्हान वड झाले. —हेच्या बुडी हजारपेक्षा जासती माणसा जेवूक बसतीत . मोठ्यो सबा या वडाबुडी होतत, लोक गाड्यो सोडतत, धाकटी पाळंब्याक धरुन झोके घेतत, तुमी-येदो वड-खय बगल्याहास ?”

उंडग्याचो फेरफटको’ या सदर लेखनातील मालवणीचा नमुना-

“राम राम गाववाल्यानू, आयका आता उंडण्याची वानी. म्हणजेच कोकणच्या गडग्याची कानी. तुमका कोकणी मानसाक गडगो म्हणजे काय नि बडगो म्हणजे काय ? या सांगण्याची गरज आसां ? आजचो जमानो असो आसा की बोलाची सोय
उरली हा नाय.

घो बडवडे नी बायल खाय वडे, अगो अगो पोगी पी एकदाची हळद नि हो बेगीना गोरी.
जावंदे ..! तर काय म्हणा होतय हा तुमका गडग्याचा सांगत होतय!

(संदर्भ सा.’कोकण वैभव १९/८/१९९७)

मालवणीतील काही शब्द-

आवस-आई, बापूस-बाप चेडू-मुलगी, झील-मुलगा, उज्जू-विबिनदूक, आयदान- भांडे ,उपला-पेरले, गजाल-गोष्ट, घोव-नवरा, चराकलो-घाबरलो, फाल्या-उदया, निवार-उनं, मनावय-गडी, मळाब-आकाश,लखनी-झोप, वळेसार-गजरा, होकाल- नवरी,वासा- शिळे, खैसर-कुठे, आडाळो-विळी, न्हय-नदी, तरवा भाताची रोपे, जलम-जन्म, खाजा-गोडी शेव, कुरलली-खेकडा, तुका-तुला, माका-मला. केदवा केव्हा, तारू-होडी, म्हावरा-मासे, इलो-आला, व्हवये-ओव्या, तोर-कोवळी कैरी, तवससा-काकडी, गोरववा-गुरे, सांबारा-आमटी, मिया- मी, तिया तू. मुय-मुंगी, म्हॉव- मध, वय-कुंपण, ओखात-औषध, केदी-केवढी, वागंड-सोबत, वालको-पंचा, लटो- कांबळी,होंडका-खळगा, होवूर-पूर. इ..,

‘मालवणी ‘ही मुळात मौखिक स्वरूपाची असली ; तरी गेल्या ६०-७० वर्षात याबोलीतून लिखित स्वरूपाचे साहित्य निर्माण झाले. वि.कृ.नेरुरकर, गंगाधर कदम, कॕ.मा.कृ.शिंदे, आबासाहेब आचरेकर, शंकर शिंदे यांच्या पासून अलिकडे दा.र.दळवी, ना.सी. परब, सूर्यकांत तारी, महेश केळूसकर, अविनाश वापट, दादा मडकईकर ,नामदेव गवळी, इ.नी मालवणी कविता लिहिल्या. सुमारे ४५ नाटके लिहिली गेली. एकांकिका, एकपात्री कार्यक्रम यांची निर्मिती झाली .
चंद्रकांत खोत, मधु मंगेश कर्णिक, जयवंत दळवी, प्र.श्री. नेरुरकर, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, वसंत सावंत, शंकर शिंदे, अरविंद म्हापणकर, दि.मो.दुधगांवकर , प्रविण बांदेकर, भा.ना. गोठोस्कर, नंदा पारकर, रमेश पवार, प्र. ल. मयेकर, मनोहर कदम, उर्मिला पवार ,उषा परब यांनी मराठी साहित्यात मालवणी बोलीला स्थान दिले. मुंबईत प्रसिध्द झाले. १९६०-६५ च्या आसपास डॉ. दि.ग. नाईक, गुं. फ. आजगांवकर यांनी ‘कोकण मराठी डायलेक्टरिसर्च इन्ट्युटुट’ ही संस्था स्थापन करून कुडाळी- मालवणी बोलीविषयी बरेच संशोधन (म्हणी व लोककथा संकलित केले. प्रसिद्ध केले.आ.रा. देसाई यांनी मालवणीचे व्याकरण सिद्ध केले. मा.अ.ब.वालावलकर यांनी श्रीमद्भगवतगीतेचे कुडाळीतून समश्लोकी भाषांतर प्रसिध्द केले. डॉ. सरस्वतीबाई रेगे ,डॉ. बाळकृष्ण लळीत, डॉ.अशोक भाईडकर, डॉ.महेश केळुसकर, डॉ. तुलशी बेहरे, प्रा.नामदेव गवळी यांनी विद्यापीठ संशोधनासाठी मालवणी भाषा, साहित्य, लोककला, लोकसाहित्य यांचा अभ्यास केला.

१९९३ नंतर मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राने आजपर्यंत सहा मालवणी बोली साहित्य संमेलन आयोजित केली.. मालवणी म्हणी व शब्दकोश सिद झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृत्तपत्रांनी, नियतकालिकांनी मालवणी लेखानाला सातत्याने प्रसिद्धी दिली व सर्वात महत्वाचे म्हणजे येथील पत्रकार बंधूनी या बोलीच्या विविध उपक्रमांकडे सकारात्मक भूमिका घेतली. अलिकडच्या काळात याबोलीला वाङ्मयीन दर्जा प्राप्त होत आहे.

अशा या मालवणीबोलीत अतिशय संपन्न लोकবাमय आहे.त्यात लोकगीत. लोककथा, म्हणी , उखाणी, फातकुली हे प्रकार प्रामुख्याने आढळतात. लोककलेत दशावतार , चित्रकथी, लळित, पांगुळ यातही मालवणीतील मौखिक वाङ्मय आहे. मालवणी मुलखाचा धार्मिक, सांस्कृतिक दस्तावेज म्हणावी अशी देवालयात घातली जाणारी गा-हाणी हा येथील मौखिक परंपरेचा एक अपूर्व प्रकार आहे, अशी मौखिक गा-हाणी मराठीच्या इतर बोलीत क्वचितच आढळतात.

या मालवणी बोलीतील लोकगीतांचे स्वरूप पहाण्यापूर्वी मालवणी बोलीतील लोकसाहित्याच्या अभ्यासकांच्या कार्याचा परिचय करून घेऊया,

मालवणी लोकसाहित्याचे अभ्यासक –

मराठी लोकसाहित्याच्या संकलनाला, अभ्यासाला १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात चालना मिळाली. मात्र मालवणी लोकसाहित्याचा अभ्यास हा प्रामुख्याने वैयक्तिक पातळीवर झाला. तसेच मुंबईत १९६० साली स्थापन झालेल्या’ कोकण मराठी डायलेक्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’ ने संस्थात्मक पातळीवर कुडाळी-मालवणीतील लोकसाहित्याचे ,शब्दांचे संकलन केले. उपलब्ध संदर्भानुसार विष्णू सदाशिव सोहनी यांचा ‘भंडारी लोकांच्या लग्नातील गाणी’ हा लेख महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या जुलै १९३२ सालच्या अंकात प्रसिध्द झाला. या अंकात ‘करो धैवन् असता त्येचो मान हे मालवणीतील गीत प्रसिध्द झाले.

याच दरम्यान रा.ब. वासुदेव अनंत प्रभू-बांबर्डेकर, बाळकृष्ण रामचंद्र प्रभू (म्हणी व लोककथा संकलन), विद्याधर वामन भिडे, आ.रा.देसाई (म्हणी व मालवणी शब्द संकलन), डॉ.दि. ग.नाईक, गुं.फ. आजगांवकर, प्र.श्री. नेरुरकर, गंगाधर महांबरे इ.नी मालवणी बोलीतील लोकसाहित्य संकलन व संशोधन केले.

प्रसिध्द कवी व गीतकार गंगाधर महांबरे यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावरुन मालवणी लोकगीते या विषयावर १९५१ साली भाषण केले. या विषयीचे १८ जुन १९५० चे टिपण उपलब्ध आहे. वरील सर्व मंडळींनी जे मालवणी लोकसाहित्य संकलन, संशोधन व प्रसार या संदर्भात जे कार्य केले हे केवळ प्रशंसनीय व अभिमानास्पद आहे. थोडक्यात सांगायचे तर अलिकडे दूरदर्शनवरही मालवणी बोलीतील मालिका, व्यक्तीरेखा मोठ्या प्रमाणात आढळतात. अशी ही सिधुदुर्ग जिल्ह्यापुरती असलेली बोली आता महाराष्ट्रातही कौतुकाचा विषय ठरली आहे.

Related posts

शक्तीचा वापर योग्य कार्यासाठी हवा

Neettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय ?

वासुदेव काटे यांचे द्राक्ष बागांसदर्भात मार्गदर्शन

Leave a Comment