कोल्हापूर – ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा – वारणानगरच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 7 व 8 डिसेंबर रोजी शाखेच्या वतीने विभागीय साहित्य संमेलन विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्र ,वारणा विद्यापीठ, वारणानगर येथे होत आहे. यामध्ये हा पुरस्कार नलगे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती मसापचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्याध्यक्ष ग्रंथमित्र डॉ. के. जी. जाधव यांनी दिली.
विभागीय साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन, कथा-कथन, ग्रंथ पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. साहित्य अकादमीचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहे. या निमित्ताने सन 2022-23 या वर्षात प्रकाशित साहित्यकृती या सन्मान करण्यात येणार आहे.
देण्यात येणारे पुरस्कार असे…
स्व. तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कार गुहागर येथील बाळासाहेब लबडे यांच्या ‘काळमेकर लाईव्ह’ देण्यात येणार आहे. स्वर्गीय सावित्रीअक्का कोरे काव्य पुरस्कार सोलापूरच्या शिवाजी शिंदे यांच्या ‘अंतस्थ हुंकार’ या काव्य संग्रहास तर स्व.शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कार सांगलीच्या महादेव माने यांच्या ‘वसप’ या कथा संग्रहास देण्यात येणार आहे.
इतर साहित्य प्रकारात स्व. विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार कोल्हापूर येथील चंद्रकांत पोतदार यांच्या ‘परिघाच्या रेषेवर’ या साहित्यकृतीस तर स्व.मामासाहेब गुळवणी बालसाहित्य पुरस्कार पुणे येथील शिवाजी चाळक यांच्या ‘अंगत पंगत’ या साहित्यकृतीस देण्यात येणार आहे.
यावेळी मसाप वारणाचे पदाधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, चंद्रकांत निकाडे, पी. एस. पाटील, पी. आंबी, पी. बी. बंडगर, शिवाजी बोरचाटे, प्रा.डॉ. गिरी, प्रा. सुरेश आडके, अभिजीत कुंभार हे उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.