January 14, 2025
the-world-and-life-outside-of-work-satappa-kamble
Home » चाकोरी बाहेरचं जग नि जीवन !
मुक्त संवाद

चाकोरी बाहेरचं जग नि जीवन !

‘वेगळ्या वाटेवर… !’ हे साताप्पा कांबळे यांच्या जीवन व कार्याचा प्रवास शब्दबद्ध करणारं छोटेखानी चरित्र होय. २१ छोट्या तुकड्यात सुभाष धुमे यांनी ते साकारलं आहे. ते साताप्पा कांबळे यांच्या कार्याचे साक्षीदार असल्याने त्यांनी ते आत्मीयतेने लिहिले आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

चाकोरी सोडून जगणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. असं जगायला मोठी हिम्मत लागते नि स्वतः च्या अंतःकरणात न आटणारा झरा सतत वाहत रहाणे ही त्या कार्य सातत्याची पूर्वअट असते. समाज अनेक समस्या आणि प्रश्नांचा गलबला असतो. कितीही समाज कार्यकर्ते जन्मले तरी प्रश्नांपेक्षा कार्यकत्यांची संख्या नि बळ अपुरं ठरतं. विशेषतः भारतासारख्या गरीब अधिसंख्य असलेल्या देशात अनाथ, निराधार, अंध, अपंग, मतिमंद, बहुविकलांग, बालमजूर, बालगुन्हेगार, वेश्या, कुष्ठरोगी, परित्यक्त भगिनी यांनी भरलेलं वंचितांचं विश्व अफाट सागरासारखं पसरलेलं आहे. वंचित प्रश्नांचा सागर प्राशन करून आटवणारा अगस्त्य ऋषी अद्याप जन्माला न आल्याने वंचितांचे प्रश्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वाटचालीनंतरही जसेच्या तसेच आहेत. कारण स्पष्ट आहे. साधने व समस्या यांचं विषम प्रमाण.

आपल्याकडे वंचितांच्या संगोपन, संरक्षण, शिक्षण, पुनर्वसन कार्यास समाजसेवा क्षेत्रात प्राधान्य मिळालेले नाही. हे कार्य करणाऱ्या संस्थांना शासन अनुदान देते हे खरं आहे. पण ते प्रत्यक्ष खर्चाच्या मानाने तुटपुंजे असते. कल्याणकारी शासन (वेल्फेअर स्टेट) म्हणवून घेणारे सरकार मग ते केंद्राचे असो वा राज्याचे; युरोपच्या तुलनेने ते काठावर बसलेलेच दिसेल. मग ज्या स्वयंसेवी संस्था असतात, त्या लोकवर्गणी, लोकाश्रय इत्यादीतून तूट भरून तगत रहातात.

गडहिंग्लज जि. कोल्हापूर गाव तसं तालुक्याचं इथे समाजकार्य परंपरा आहे. तिथे साताप्पा कांबळे यांनी सन १९८५ नंतरच्या काळात ‘चैतन्य शिक्षण व संशोधन केंद्र, गडहिंग्लज’ या संस्थेची स्थापना केली. आपल्या या संस्थेमार्फत त्यांनी ‘चैतन्य अपंगमति विकास विद्यालय (निवासी) शाळा सुरू केली. ती प्रथम विनाअनुदानित होती. कालौघात ती अनुदानित झाली. गेल्या चार दशकांच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर सुमारे ५०० मतिमंद बालके समाजाच्या मध्य प्रवाहात आली, ती ढोर मेहनत नि अपार कष्ट यातून. हे लिहिणं सोपं पण करणं अवघड हे वेगळं सांगायची गरज नाही.

‘वेगळ्या वाटेवर… !’ हे साताप्पा कांबळे यांच्या जीवन व कार्याचा प्रवास शब्दबद्ध करणारं छोटेखानी चरित्र होय. २१ छोट्या तुकड्यात सुभाष धुमे यांनी ते साकारलं आहे. ते साताप्पा कांबळे यांच्या कार्याचे साक्षीदार असल्याने त्यांनी ते आत्मीयतेने लिहिले आहे. साताप्पा कांबळे हे कागल-कापशी- मूरगूड परिसरातील कुरुकली या छोट्या गावातले. आई-वडील मोलमजुरी, शेती-भाती करत जीवन कंठत. मुलानं शिकावं आणि कुटुंबाला हातभार लावावा म्हणून विद्यमंदिर कुरूकली येथे पाचवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जवळच्या सोनगे गावच्या शाळेत मुलाला घातलं. इथं चांगले गुरूजी लाभले. सत्शील साताप्पाला प्रोत्साहन देत शिकवलं. पुढे तो मूरगूड विद्यालय, मुरगूड येथे शिकला. निपाणीत देवचंद महाविद्यालयातून तो पदवीधर झाला. या काळात शेतकरी आंदोलनात तो सहभागी झाला. त्याचा पिंड बदलला. समाज जाणिवेने तो संवेदनशील बनला. समाज हिताच्या कार्यात वाहून घेण्याचं त्यानं इथच ठरवलं. पुढे साताप्पा कांबळे शिवाजी विद्यापीठातून एम. ए. झाले.

साताप्पा कांबळे यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर पोटाची खळगी तर भरायची पण ती अभिनव मार्ग चोखाळून. म्हणून ते कोल्हापूर येथील चेतना विकास मंदिरात शिक्षक झाले. इथे त्यांना आपल्या जीवनाचा सूर सापडला. त्यांनी मतिमंदांच्या शिक्षण व पुनर्वसन कार्यात स्वतःस समर्पित करायचं ठरवून गडहिंग्लज सारख्या छोट्या गावात ‘चैतन्य मतिमंद निवासी शाळा’ सुरू करून मोठं साहसाचं कार्य केलं. ‘घेतला वसा टाकू नये’ न्यायाने गेली चार दशके ते या क्षेत्रात अपराजित योद्धे म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबाची साथ नि समाजाचं पाठबळ, शासन अनुदान असा विविध आधार घेत ते प्रतिबद्धपणे कार्यरत आहेत.

पुस्तकाचे नाव – वेगळ्या वाटेवर…
लेखक – सुभाष धुमे
प्रकाशक – व्हिजन प्रकाशन, गडहिंग्लज
किंमत – १०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading