मोठेपणाच्या धावपळीत बालपण कधी मागे सरले. नागरिकरणात गावपण हरवलं. आज आयुष्याच्या मध्यात या सर्व गोष्टी विचार करायला भाग पाडतात. ‘जिथे हरवले..तिथेच शोधायला हवे.. सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा शिरायलाच हवे..वनराईतला रानमेव्याची चव नव्याने चाखायला हवी..!’
प्रशांत सातपुते,
माहिती जनसंपर्क अधिकारी
94034 64101
रानमेवा..नेर्ली..
रत्नागिरीहून घाट चढून आंब्यात आलो. नेहमीप्रमाणे आंबेश्वर टपरी वजा हाॕटेलजवळ चहासाठी थांबलो. चहाची लज्जत घेतानाच हातामध्ये जर्मनी झाकणावर गुलाबी रंगाची वाटोळ्या आकाराची छोटी फळे घेवून एक बाई समोर आलेली.’नेर्ली घ्या की..रानची..’ असे ती आर्जवू लागली. ते फळ माझ्यासाठी नवे होते. मी भोकरं, तोरणं, अळू, पिवळ्या निंबोण्या असली फळं बालपणी खाल्लेली. तिने सांगितलेले पैसे देत ते दोन्ही वाटे विकत घेतले आणि जयसिंगपूरला परतलो.
जिज्ञासूवृत्तीने ‘नेरल्या’च्या माहितीचा शोध सुरु झाला. फेब्रुवारी-मार्च सुरु झाला की निसर्गाच्या पोटातून रानमेव्याच्या जन्मोत्सवाला सुरुवात होते. प्रथम प्रसवते ती आमराई..घसाने लगडलेल्या कच्च्या कैऱ्यांच्या आठवणीनेदेखील तोंडाच्या द्रोणात लाळेचा पाझर सुरु होतो. करवंदांच्या हिरव्या-पोपट्या जाळीवर पांढरी फुले मंद फुलाने करवंदाच्या आगमनाची चाहूल देतात. अशा एकापाठोपाठ एक येणाऱ्या रानमेव्यांचा प्रवास सुरु होतो.
होळीनंतर आठ-दहा दिवसातच गुलाबी-चंदेरी गोंडस ‘नेर्ली’ रानावनातील देवराईत बाळसं धरत असतात. झाडावर पिकलेली नेर्ली रंगाने गुलाबी असतात. तोडल्यानंतर काही तासानंतर ती चंदेरी बनतात. हिरव्या पानांवरही चंदेरी-शुभ्र कणांचे अस्तित्त्व प्रकर्षाने जाणवते. यावरुनच इंग्रजीत याला Silver Berry असे नाव पडलेले असावे. शास्त्रीय नाव Eleagnus Conferta असे आहे. डोंगराळ भागात काही ठिकाणी याला डोमलं, अंगुळ असेही म्हणतात.
आंबट-गोड चव असणाऱ्या या रानमेव्यात भरपूर नैसर्गिक तत्त्वे असतात. विशेषतः ‘क’ जीवनसत्त्व..! पित्तशामक म्हणून कोकण भागात याची प्रामुख्याने ओळख आहे. जेवढी सुंदर ही फळे दिसतात त्याहून अधिक कलाकुसर तिच्या बियांवर दिसते. सौ ने हे लक्षात आणून दिले. कलाकाराने जाणीवपूर्वक त्यावर आपले कोरीवकाम करावे अगदी तसे निसर्गाने त्यावर कोरलेले आहे. या कोरीव नक्षीकामात सुबकपणे आठ रेषांच्या कडा हाताला जाणवतात. कानात लोंबणारे एखादे डूल भासवे, अशी ही नजाकत आहे. कदाचित डोंगराळ भागात पूर्वकाळी या बियांचा आभूषणासाठी निश्चितपणे वापर होत असावा.
फेब्रुवारी-मार्च सुरु झाला की वाढत्या उन्हाच्या नावावर सकाळची शाळा सुरु व्हायची. वार्षिक परीक्षा अन् उन्हं दोन्ही एकदम तोंडं वर काढायचीत. अभ्यासाच्या नावावर सतत झोपायला व्हायचे.
अशातच होळी जवळ यायला लागायची..ती थंडीच्या शेवटाची जाणीव करुन द्यायला! शेणकुटासाठी गल्लीत बोंबलत फिरायचो अन् होळीनंतरही धुलवडीत.. जाम मजा यायची..
गल्लीत पिपाणी वाजवत गारेगारवाला यायचा. ‘बोरं खाणार त्याला पोरं हुणार..’ अशी एखादी आरोळी दुपारची झोपमोड करायची. करवंदं, चिंचा, बोरं, बंबई मिठ्ठा अशी पर्वणी लोखंड-पत्रा-प्लास्टिक-बाटल्यांवर मिळायचित. तर कधी डोंगरात हुंदडताना झाडावरील कैऱ्या, चिंचा, विलायती चिंचा, जाळीवरची करवंदं, भोकरं असा रानमेवा दिमतीला लोटलेला असायचा.
मोठेपणाच्या धावपळीत बालपण कधी मागे सरले. नागरिकरणात गावपण हरवलं. आज आयुष्याच्या मध्यात या सर्व गोष्टी विचार करायला भाग पाडतात. ‘जिथे हरवले..तिथेच शोधायला हवे.. सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा शिरायलाच हवे..वनराईतला रानमेव्याची चव नव्याने चाखायला हवी..!’
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.