शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी शासनाच्या विविध विभागांच्या कार्यालयाला सर्वसामान्यांना चकरा माराव्या लागत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरु झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाने हे चित्र पालटले. ‘शासन आपल्या दारी लाभार्थ्यांसाठी उपक्रम लय भारी !’ असे उद्गार लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांकडून निघू लागले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथील अशोक रामचंद्र साळुंखे या लाभार्थ्यांने याबाबत व्यक्त केलेले मत…
प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
सातारा जिल्ह्यातील पाटण येथील कोयना प्रकल्पातील विस्थापीत श्री. साळुंखे यांनी आपल्या कातळ असणाऱ्या 54 एकर पड जमिनीपैकी 19 एकर क्षेत्र टप्प्या टप्प्याने लागवडीखाली आणले आहे. या क्षेत्रात आंबा, काजू, ड्रॕगनफ्रूट, भात, नाचणी आणि विविध प्रकारचा भाजीपाला याची शेती केली आहे. या शेतीला पुरक उद्योगाची जोड देण्यासाठी एक एकरामध्ये सामुहिक शेततळे घेतले आहे. याची लांबी 52 X रुंदी 52 मिटर आणि 11 मिटर खोल शेततळ्यामध्ये दीड ते दोन कोटी लिटर पाणी केवळ पडणाऱ्या पावसाच्या जीवावर साठवले आहे. या शेततळयामध्ये मत्स्यपालन करुन रुपचंद या मास्याचे साडेतीन टन उत्पादन घेतले आहे.
शेळीपालन उद्योगामध्ये जमनापुरी बिटल, उस्मानाबादी या प्रकारच्या पालनातून सद्या चांगल्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. दोन हजार पेटी आंबा तर एक टन काजू उत्पादन मिळत आहे. शिवाय 40 हजार पक्षांची क्षमता असणारे कुक्कुटपालनही केले आहे. त्याशिवाय गायरान कोंबड्या याचे वेगळे उत्पादन घेत आहे. गांडूळखत प्रकल्पातून 35 टन खत निर्मितीमधून चांगले उत्पन्न मिळत आहे. या सर्व शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांमधून विळ्यापासून ट्रॅक्टरपर्यंतचा लाभ त्यांना मिळाला आहे. यात प्रामुख्याने पॉवर ट्रिलरसाठी 13 हजार 800, ट्रॅक्टरसाठी 1 लाख 90 हजार शिवाय रोटा व्हेटर, शेततळ्यासाठी 3 लाख 40 हजार, 2 ग्रास कटर – 18 हजार, ठिबक सिंचनसाठी 90 हजार आणि पॅक हाऊससाठी 1 लाख 50 हजार रुपये चा लाभ त्यांना मिळाला आहे.
25 मे रोजी रत्नागिरी येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. साळुंखे यांना पॉवर ट्रिलर देण्यात आला. याचा फायदा त्यांना सध्याच्या या शेतीसाठी होत आहे. श्री. साळुंखे यांनी गायी-म्हशी पालन देखील केले आहे. या सर्व व्यवसायासाठी स्वतंत्र 3 कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. शिवाय पत्नी अनुपमा, मुलगा पराग आणि तुषार यांचेही परिश्रम मिळत आहेत.
सध्या या शेती आणि शेतीपूरक व्यवसायामधून शिवार कृषी पर्यटन केंद्र ते विकसीत करीत आहेत. या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून 10 कुटुंबाना कायमस्वरुपी रोजगार मिळणार असल्याची भावना श्री. साळुंखे यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना सर्वच विभागांनी विशेषत: कृषी, मत्स्यपालन आणि कृषी विद्यापीठ यांनी माझ्या शिवारावर येत मला मार्गदर्शनही केले, शिवाय तात्काळ लाभ दिली. महावितरण सारख्या कंपनीतून देखील दूरध्वनीवरुन विचारणा होते. तसेच मार्गदर्शनही मिळत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. फक्त ते सर्व लाभ घेणारे लाभार्थी हवेत. 90 टक्के शेती आणि 10 टक्के हा या शिवार कृषी पर्यटनाचा पाया असणार आहे.
वर्षभरात हे पर्यटन केंद्र पूर्ण होईल. पर्यटकांना गांडूळ खत निर्मिती, सेंद्रीय भाजीपाला लागवड, मत्स्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन याचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळेल. अन्य शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी हे शिवार पर्यटन केंद्र भविष्यात मार्गदर्शन, प्रशिक्षण केंद्र असेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवताना शासनाचे विशेषत: शासन आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.
पूर्ण कातळावर साळुंखे यांनी 19 एकर क्षेत्र अक्षरश: फुलवले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि होतकरु युवकांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यासाठी त्यांना मिळालेला लाभ म्हणजेच ‘शासन आपल्या दारी उपक्रम लाभार्थ्यांसाठी लय भारी !’