एखादा माणूस माझा राजकारणाशी काही संबंध नाही; असं म्हणतो तेही एक राजकारण असतं. मात्र आपल्याकडे या सगळ्याचा या प्रकारे विचार करण्याची क्षमता असणारा वर्ग साहित्यात तयार झाला नाही. हे किती दुर्दैव आहे ! राजकारण म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं किंवा ज्या मार्गाने सत्तेवर आपण जातो तेवढ्यापुरतं मर्यादित नसतं. तुम्ही जन्म घेतल्यापासून अखेर देह सरणावर ठेवला जातो, या सगळ्या प्रक्रियेतही राजकारण हा भाग गुंफलेला असतो.
अजय कांडर
९४०४३९५१५५
‘अक्षरदान’ दिवाळी अंकाचे संपादक मोतीराम पोळ हे दरवर्षी एक अभिनव विषय घेऊन दिवाळी अंक प्रसिद्ध करत असतात. २०२५ या वर्षीच्या दिवाळी अंकाचा विषयही वेगळा आहे. ‘हरलेली राजकीय निवडणूक !’ अर्थात अशा विषयाच्या दिवाळी अंकात कविताही राजकीय संदर्भातून हव्यात, अशी त्यांनी कल्पना मांडली आणि त्याचे संपादन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. मी मागील ३५ वर्ष पत्रकार म्हणून पूर्णवेळ नोकरी करत असल्यामुळे साहजिकच या विषयावरील कवितेचे संपादन करणे मलाही महत्त्वाचे वाटले. त्यामुळे संपादक पोळ यांना मी होकार दिला खरा परंतु जेव्हा प्रत्यक्ष अनेक कवींशी संपर्क साधून त्यांना राजकीय कविता पाठविण्याच आवाहन केले तेव्हा मात्र काही अनपेक्षित अनुभवांना सामोरे जावे लागले. तरी कवितेची आणि त्यातही राजकीय भवतालाची समज असणाऱ्या काही कवींनी आपल्या राजकीय कविता दिल्या, त्याबद्दल मी या कवींचे मनापासून आभार मानतो !
राजकीय कविता पाठविण्यासाठी सुमारे ३० ते ३५ मराठी कवी-कवयित्रींशी मी संपर्क साधला, तेव्हा आलेला अनुभव पुढील प्रमाणे होता. ‘आम्ही कविता लिहिताना राजकारणाचा विचारच करत नाही’, ‘आम्ही आजवर एकही राजकीय कविता लिहिलेली नाही’,’ नको रे बाबा राजकीय कविता…,’ ‘आम्ही शासकीय नोकरीमध्ये आहोत; निवृत्त झाल्यावर लिहून देतो.” ! हे सर्व उद्गगार ज्या कवींशी संपर्क करून राजकीय कविता पाठविण्याचे आवाहन केले त्या कवींचे होते. या सगळ्यावरून (अपवाद वगळता) मराठी कवी स्वतःच्याच मानसिकतेचे किती गुलाम आहेत आणि भवताला बद्दलचं कसलंच त्यांना भान नाही; हे स्पष्ट होतं.
एखादा माणूस माझा राजकारणाशी काही संबंध नाही; असं म्हणतो तेही एक राजकारण असतं. मात्र आपल्याकडे या सगळ्याचा या प्रकारे विचार करण्याची क्षमता असणारा वर्ग साहित्यात तयार झाला नाही. हे किती दुर्दैव आहे ! राजकारण म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं किंवा ज्या मार्गाने सत्तेवर आपण जातो तेवढ्यापुरतं मर्यादित नसतं. तुम्ही जन्म घेतल्यापासून अखेर देह सरणावर ठेवला जातो, या सगळ्या प्रक्रियेतही राजकारण हा भाग गुंफलेला असतो. आपण जो शब्द तोंडातून उच्चारतो त्यातला प्रत्येक शब्द हा आपल्या जगण्याच्या राजकारणाचा एक भाग असतो. माणसं नाकासमोर चालतात आणि आजूबाजूचं वाईट काही बघू नये, वाईट काही बोलू नये आणि वाईट काही ऐकू नये अशी गांधीजींच्या तीन माकडांच्या गोष्टी सारखी स्वतःची भूमिका घेतात. आणि वर म्हणतात, आम्हाला कुणाच्या भानगडीत पडायचं नाही. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ सरळ आहे; आमच्या जगण्याचं राजकारण हे कोणताही धोका पत्करण्याचे नाही. असं म्हणणं ते ही एक राजकारणच असतं. हा अशा लोकांनी विचारच केलेला नसतो.
अर्थात समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये अशाच प्रकारची नासमजाची भावना आहे. एक वेळ हे समजून घेता येते परंतु कवी सारखा कलावंत हा सुद्धा राजकारण या शब्दापासून अनभिज्ञ राहतो; तेव्हा मात्र त्याच्या एकूणच वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. कवीचच नाही तर लेखन करणारा प्रत्येक माणूस किंवा कला क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला आपण कलेच्या क्षेत्रात जी गोष्ट करू पाहतो, तो एक राजकीय हस्तक्षेप असतो. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. मात्र इथपर्यंतची समज बहुसंख्य कला वर्गामध्ये अजूनही वाढलेली दिसत नाही. याची कारणं काय आहेत… असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेक गोष्टी लक्षात येतात. पहिलं कारण म्हणजे तुम्ही लेखक, कलावंत म्हणून सजगच नसता. सजग असणं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आपल्यात भान जागृत करणं. हे भान स्व प्रतिमेतून बाहेर पडतो तेव्हा जागृत होत असतं. दुसरी गोष्ट समाजाबद्दलची एक कमालीची आस्था कवीच्या मनात हवी. ती नसली की समाजात ज्या-ज्या गोष्टींचं ध्रुवीकरण होतं; त्याबद्दलची संवेदनशीलता कवीच्या मनातली संपून जाते.
शेवटी आजूबाजूच्या बऱ्या वाईट घटनांबद्दल आपल्याला काही वाटत नसेल तर आपल्यातील त्या संदर्भातील संवेदनशीलता संपून गेलेली असेल. शेवटी तुम्हाला त्याबद्दलचा उद्गगार आपल्या कवितेतून काढावा, असं वाटणारच नाही. मग असे कवी आपल्या-आपल्या जातीतून, आपल्या धर्मातून, आपल्या भवतालातून जे पांढरपेशी संस्कार झालेले आहेत; त्या संस्काराच्या पद्धतीनेच समाजाचा अन्वयार्थ लावत एका चौकटीतच विचार करतात. त्यांना कविता लिहिणे म्हणजे व्यवस्थेतील हस्तक्षेप असतो; हेच माहीत नसतं. म्हणून मानसिक गुलामगिरी ही कुठल्याही गुलामगिरीपेक्षा सर्वाधिक धोक्याची असते. ती माणसाच्या समृद्ध जगण्याच्या किंवा व्यक्तिमत्व विकासाच्या आड येणारी असते. असे असूनही मराठी कवितेची परंपरा समृद्ध आहे.
अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, राजा ढाले ते अगदी यशवंत मनोहर, अरुण काळे, लोकनाथ यशवंत, शाहीर संभाजी भगत, डॉ. श्रीधर पवार, प्रज्ञा दया पवार पर्यंत (यात अजून काही नावांचाही समावेश करता येईल) अनेक कवींनी व्यवस्थेत हस्तक्षेप करणाऱ्या कविता लिहिल्या. ही त्यांची राजकीय भूमिका होती. अशी काही नावे सांगता येतात. पण ही समज मात्र मराठी कवितेत सार्वत्रिक झाली नाही. म्हणूनच आजचे कवी राजकारणाशी आमचा संबंध काय? असे बालिश प्रश्न उपस्थित करताना दिसतात.
आजचं सोशल मीडियाचं जे जग आहे ते बालिशच आहे. सोशल मीडिया म्हणजे चव्हाटा. चर्चा करा आणि विसरून जा. अशा मंचावर उभे राहिलेले आजचे कवी आणि त्यांची कविता विसरून जाण्यासारखीच असते. हे तर अनुभव आपण वारंवार घेत आहोत. मात्र या सगळ्या पलीकडे जाऊन, निखळ माणूस म्हणून उभा राहू पाहणारा कवीच राजकीय हस्तक्षेप करणारी कविता यापुढे लिहिणार आहे. आपल्या देशात सध्या हुकूमशाही मार्गाने सत्ताधारी पक्षाने व्यवस्था बदलण्याचा जो एक प्रयत्न सतत चालू केला आहे; ते सगळे भयावह आहे. याबद्दल सार्वजनिक नाराजी असली तरी या व्यवस्थेला मिळालेला दुसरा एक मोठा वर्ग आहे.
विशेष म्हणजे साहित्य, कला क्षेत्रातील अनेक लोक त्यामध्ये आहेत. अनेक वर्ष सत्तेत राहिलेले लोक लोकशाही नेस्तनाबूत करून, आपल्याला हवी तीच गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी मात्र त्यांच्या प्रत्येकाच्या राजकारणाला सुरुंग लावण्याची वेळ आलेली असते. आजच्या या अंधायुग कालखंडात साहित्य कलेच्या माध्यमातून असा सुरुंग लावला जावा, अशी भावना मात्र वाढीस गेलेली दिसत नाही. जोपर्यंत अशी भावना वाढीस लागणार नाही तोपर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत अशी लोकशाही पायदळी तुडविणारी राजकीय व्यवस्था राहील. ती आपल्या देशातून संपून जायला हवी असे वाटणार नाही. पण ही आपलीही जबाबदारी असते, ही भावना कवी लेखकांमध्ये वाढीस का लागत नाही ? याचं कारण सांस्कृतिक सत्तेचे लाभार्थी होण्याचे स्वप्न अनेक साहित्यिक बाळगत असतात. प्रत्यक्षात एका-दुसऱ्या व्यक्तीला हा लाभ होत असतोही. बाकीचे मात्र काठावरचे बघे होत शेवटपर्यंत राहतात. याची जाणीवच अशा ‘बघे’ असणाऱ्या साहित्यिकांना शेवटपर्यंत होत नसते.
सत्तेवर येणारी राजकीय व्यवस्था नेहमी अपेक्षांच्या ओझाखाली दबलेली असते. त्या व्यवस्थेला विरोधी व्यवस्थेला आणि आपल्या आतल्या गृहक्लेशाला सतत सामोरे जावे लागते. या तारेवरच्या कसरतीत पुन्हा निवडून येण्यासाठी स्वच्छ कारभारच करावा लागतो. पण आज ही तारेवरची कसरतच कापून टाकून, आपल्या विरोधातील सर्वांना संपवून टाकण्याचा सपाटा लावलेला हा काळ आहे. यामुळे पुढील सगळा काळ अराजकाचा आहे; याची जाणीवच बहुसंख्य मराठी लेखक-कवीना नाही. या व्यवस्थेने आपल्या वर टीका होऊ नये; अशी खबरदारी वेळोवेळी घेतली. आपल्या संदर्भातलं विश्लेषण झालं तर आपण अडचणीत येऊ शकतो, हे या व्यवस्थेला चांगलंच माहित आहे. त्यासाठी मनी-मसल- पॉवरची उपयोजना केली गेली. तरीही जी माध्यम, जे विचारवंत या सत्ताधारी व्यवस्थेविरोधात बोलतील, त्यांच्या विरोधात व्यवस्थित कट रचला जात आहे. त्यांना नामोहरण केले जात आहे. एवढेच नाही तर हिंसक जमावाला त्यासाठी तयार केले गेले आहे. त्या जमावालाच प्रोत्साहन देऊन आपल्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या लोकांना थेट स्मशानाचा रस्ता दाखवला जात आहे. यातून आज सामाजिक तणाव निर्माण झालाच आहे. शिवाय भीतीचं वातावरण सतत डोक्यावर असल्यामुळे माणसाचा मेंदूच बधिर होऊन, जनताच अस्थिरपणे वावरताना दिसत आहे. खरंतर अशा भितीदायक वातावरणाची झळ सर्वात जास्त सांस्कृतिक कला क्षेत्राला बसत असते. कारण सत्तेचा मार्ग हा सांस्कृतिक कलाक्षेत्रातून,भाषा क्षेत्रातून जात असतो. कलाक्षेत्र म्हणजे विद्रोहाचे क्षेत्र असतं. इथे विद्रोहाची पेटणारी ठिणगी समाजाच्या वेगवेगळ्या स्वातंत्र्याची ज्वाला पेटवत असते. या स्वातंत्र्याच्या ज्वालांमधून नवनिर्माणाचा जोश अंगात संचारतो.
समतेची, एकीची भाषा फक्त बोलली जात नाही, तर प्रत्यक्ष त्याची कृतीही केली जाते. त्यातून आक्रोश असंतोषाची एक मालिकाच उभी राहते. तेव्हाच प्रत्येक संवेदनशील माणूस अशा सत्तेविरोधात जागरूक होतो. नेमकं हेच हुकूमशाहीच्या दिशेने जाणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेला नको असतं. मात्र आजच्या अशा हुकूमशाही राजकीय व्यवस्थेला बहुसंख्य साहित्यिक शरण गेलेले दिसतात. घमेंडी राजकीय व्यवस्थेप्रमाणेच अशा साहित्यिकांनाही नवं, भार देणारं काही नको आहे. त्यांना सनातनी परंपरा महत्त्वाची वाटते. परंपरेला प्रश्न विचारणारे साहित्यिक स्वतंत्र प्रगतशील नवी परंपरा निर्माण करत असतात. नवा विचार देऊन, नवीन जीवन पद्धत निर्माण करत असतात. मात्र बहुसंख्य साहित्यिकांना आता प्रश्नच पडत नसल्यामुळे नव्या जगण्याच्या शैलीपासून ते दूर राहू पाहतात म्हणूनच त्यांना राजकीय कविता लिहिणे हा धोका वाटतो आहे.
परंपरावादी साहित्यिक असोत किंवा समाजातील परंपरावादी विविध घटक, ते विचाराने कट्टर असतात. हेकेखोर असतात. त्यांच्या मेंदूत जी गोष्ट परंपरेतून घट्ट बसलेली असते; ती बदलायची तयारी त्यांची नसते. आपण म्हणू ती पूर्व दिशा, हा त्यांचा विचार ते प्रबळ करून सतत बोलत असतात किंवा लिहीत असतात. असे परंपरावादी साहित्यिक सर्वाधिक संधीसाधू असतात. त्यांच्या हातात परंपरेचा झेंडा सतत असतो. कुठेही अडचण निर्माण झाली आणि गोत्यात येणार असं त्यांना वाटायला लागलं की ते परंपरेचे तत्व सांगून स्वतःची सुटका करून घेण्यात तरबेज असतात.
परंपरावादी माणस खोटं बोलण्याची परंपरा चालू ठेवत असतात. खोटं बोला पण रेटून बोला तशी मानसिक स्थिती त्यांची असते. शेवटी याच परंपरावादी लोकांच्या विरोधात सुधारणावादी लोकांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. आंदोलनाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून सुधारणावादी लोक समाजात बदल घडवून आणत असतात. अशा प्रकारचे झालेले बदल हे कायमस्वरूपी असतात. कारण सुधारणावादी लोकांचे अंतिमत: हेच ध्येय असते की समाज दुभंगता कामा नये. कारण दुभंगलेला समाज अधिक प्रगती करू शकत नाही. व्यक्तिगत समृद्धी भक्ती विचाराची असो, आर्थिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो की आर्थिक असो, ही सर्व देशाला एका उंचीवर घेऊन जाणारी असते. यामुळे दीर्घकाळ लाभ समाजातील सर्वांनाच मिळत असतात. परंतु या लाभाचे पहिले लाभार्थी मात्र परंपरावादी होतात. म्हणजे ते लाभ मिळविण्याची वृत्ती त्यांची असते.
साहित्यात असे लोक असतील तर ते कोणताही धोका पत्करून राजकीय विरोधकाला सामोरे जात नाहीत. मात्र अशा लाभाचे लाभार्थी होण्यास ते उत्सुक असतात. सहाजिकच अशाच वृत्तीच्या कवींना राजकीय कविता लिहिणे म्हणजे महापापच वाटत राहतं. अलीकडल्या काळात पुरोगामी हा शब्द शिवी झाला आहे. या शब्दाची कुचेष्टा केली जाते. पुरोगामी म्हणून चेहरा समोर आणणारे पण आतून सनातनी कर्मठ विचारांचे लोक, अशा काळात आपल्या चेहऱ्यावरचा पुरोगामी बुरखा फाडून सनातन्यांच्या गोठ्यात शिरलेले दिसतात. मुळात ते डावे कधीच नव्हते. डाव्यांच्या समूहात शिरून त्याने संधीसाधूपणा केला होता. २०१४ नंतरच्या कालखंडात सनातनवाद्यांचा वरचष्मा दिसू लागल्यानंतर, हे मूळचे उजवे असलेले आणि पुरोगामी म्हणून मिरवत राहिलेले अनेक जण आता मात्र खुलेपणे आम्ही तिकडचेच होतो; अशा अविर्भावात साहित्य कलाक्षेत्रात उजळ माथ्याने फिरताना दिसतात.
मध्यंतरी आम्ही एक ‘कविवर्य नारायण सुर्वे’ यांच्या स्मरणार्थ एक कवी संमेलन घेतले. त्या संमेलनाचा अध्यक्ष सुर्वेंच्या कवितेचा चाहता असणारा एखादा कलावंत करावा, असा निर्णय घेतला. आमच्या काही मित्रांनी एका कलावंताच नाव या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुचवलं. कारण काय म्हणे तर हा कलावंत सुर्वे यांच्या कवितेचं उत्तम वाचन करतो. अर्थात सुर्वेंच्या कवितेचे वाचन करणारा हा पुरोगामीच असणार, हे ओघाने आलेच. नारायण सुर्वे कवी म्हणून कायमच शोषित समाजाचा प्रतिनिधित्व केलं. शिवाय ते स्वतःला डावेच समजत होते. एवढंच काय तर आयुष्यभर त्यांनी फक्त १३४ कविता लिहिल्या. मात्र या सगळ्या कविता वाचल्यावर प्रत्येक कवितेची एक स्वतंत्र कथा निर्मिती होईल, एवढं कामगार वर्गात दुःख त्यांनी आपल्या कवितेत मांडलं.
‘मास्तर तुमचंच नाव लिवा…’ अशा त्यांच्या एखाद्या कवितेवर एखाद्या चित्रपटाची निर्मिती होऊ शकते. सुर्वेंनी जेवढ्या कविता लिहिल्या, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्या कवितेची समीक्षा झाली. एवढ्या महान कवीची आठवण म्हणून हे संमेलन शेवटी त्या कलावंताच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले गेले. संमेलन यशस्वी ही झाले. मात्र त्यानंतर अचानक कळलं की या कलावंताने’ संस्कार भारती’चे संस्कार घेऊन वर्षानुवर्ष आपली कला वाटचाल चालू ठेवली आहे. त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपला कितीही जवळचा मित्र असू दे, त्याचा प्रत्येक शब्द ‘ उजवा की डावा’ हे तपासून घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल या काळात कोणतीही खात्री देता येत नाही हे मात्र खर ! हे एवढं मुद्दामहून विस्तारानं उदाहरण देऊन सांगण्याचे कारण एवढेच की सुधारणावादी लोकांच्या संगतीत राहूनही मूळचा परंपरावादी फार बदलेल असं वाटत नाही. त्यामुळेच अगदीच कट्टर असणारे सनातनी लोक, पुरोगाम्यांच्या कळपात शिरलेल्या, वरवर पुरोगामी नी आतून परंपरावादी असणाऱ्या लोकांच्या सोबत राहुन नवसर्जनाचे श्रेय स्वतःकडे घ्यायला मागेपुढे बघत नाहीत.
नवसर्जनाचा कुठलाही विचार हा डाव्या विचारांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. मात्र आधुनिक प्रगतीला विरोध करायचा आणि आजवरच्या झालेल्या सगळ्या आधुनिक प्रगतीचेही श्रेय आपल्याकडे घ्यायचे. मागील ७५ वर्षात काहीच देशाची प्रगती झाली नाही असं सांगून सतत पंडित नेहरूंना टीकेचे धनी बनवित, या देशाची सगळी आधुनिक प्रगती आपल्यामुळेच झाली; अशी सांगणारी ही आजची राजकीय व्यवस्था. यांच्या काळात काय झालं..
तर विद्यापीठांमध्ये भविष्य अभ्यासक्रमाला मान्यता दिली गेली. खोटा लिहिलेल्या इतिहासाचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश केला गेला. डॉक्टर ऐवजी फक्त गोमूत्र प्या, शेण अंगाला फासून दिवसभर रहा म्हणजे तुमचे सर्व आजार बरे होतील, असा प्रचार केला गेला. एका बाजूला स्वदेशी वस्तू वापरा म्हणायचं आणि दुसरीकडे आपण मात्र प्रत्येक वस्तू काही लाखो रुपयांची इम्पोर्टेड वस्तू वापरायची. आपला मुखियाच असा असेल तर इतरांची काय कथा! अर्थात हे लोक एवढ्यावरच थांबत नाहीत. तर धर्म-धर्म असा नामघोष करत आधुनिक प्रगतीला विरोध करतात.
दुसरीकडे सतीप्रथा विरोध, बालविवाह बंदी, केशवपन बंदी, स्त्रीशिक्षण अधिकार, अस्पृश्यता निर्मूलन, अस्पृश्यांना मताधिकारासह विशेष संधी म्हणून आरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान बदल, चंद्र-मंगळावर स्वारी, आहार, आचार, विचार पोशाखातील बदल, लग्न-कुटुंब संस्था, लैंगिक अधिकार अशा गोष्टींसाठी कुणी व काय प्रकारचे लढे लढले, कायदे करायला लावले, याचा इतिहास उपलब्ध असतानाही याचे सारे श्रेयही स्वतःकडे घेतात; ही हद्द झालीय. आता साहित्यामधेही अशा सनातनवादी राजकीय व्यवस्थेचे भक्त निर्माण झाले असून, त्यांनी अशा राजकीय मातब्बर लोकांच्या पायावर डोकंच ठेवलं नाही, तर आपला मेंदूही त्यांच्या ताब्यात दिलेला दिसतो आहे.
तुकारामांपासून ते आजच्या गौरी लंकेश पर्यंत सर्वांच्या लेखनाचा विचार केला तर त्यांनी दुभंगलेल्या समाजालाच आपल्या लेखनातून आधार देण्याचा प्रयत्न केला.आजवरचा कला-साहित्य-संस्कृतीचा प्रवास या प्रकारे नवतेचा पुरस्कर्ता ठरला आहे. विचारसरणी पक्की आणि ती मानवतावादी दृष्टिकोन विस्तारणारी असली की माणूस माणसासाठीच आपल्या कलेचा उपयोग करत असतो. म्हणूनच कला कलेसाठी नाही तर कला जीवनासाठी आणि विवेकासाठीच असते. या अर्थाने कोणतीही कला खऱ्या अर्थाने डावीच असते. मराठीतील प्रायोगिक रंगभूमी असो किंवा तेंडुलकर, एलकुंचवार, आळेकर, गज्वी असे नाटककार असोत, दलित साहित्य असो किंवा भारतीय पातळीवरील पाश सारखा कवी असो या सगळ्यांनी समाजाचा विवेक जागृत ठेवण्यासाठीच लेखन केलं. हा त्यांचा राजकीय हस्तक्षेप होता. म्हणूनच पाश सारख्या कवीची हत्या झाली.
तुकारामांना इथल्याच परंपरावादी सनातनी पुरस्कर्त्यांनी सदेह वैकुंठात पाठविलं. सत्याचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येक लेखकाला- कवीला अडचणींना सामोरे जावे लागतेच. अशी समृद्ध परंपरा आपल्या भूमीत असताना कवी मात्र या लोकांचा वारसा सांगण्यापेक्षा, सत्ताधारी व्यवस्थेला शरण गेलेल्या कलाकारांचा वारसा सांगून धन्यता मानत आहेत. त्यामुळेच त्यांना राजकीय कविता लिहिणे हे खुळेपणाचे लक्षण वाटू लागले आहे.
दशावतार कलेमध्ये संकासुर नावाचं एक पात्र असतं. ते देवतांच्या व्यवस्थेत हस्तक्षेप करते. वेद पळवून नेण्यापर्यंत, देवांना अडवून ठेवण्यापर्यंत हे पात्र बहुजनांचे प्रतिनिधित्व करतं. ही फार महत्त्वाची घटना आहे. देव म्हणजे अभिजन आणि संकासुर म्हणजे बहुजन. मोदी – शहांच्या काळात साहित्यसह सर्व कला प्रांतात संकासुरचा आवाज मोठा होणे ही सार्वत्रिक गरज बनली आहे. आपल्या इतिहासाकडून आपण काही शिकलो नाही तर आपल्या कवितेचाही आवाज मोठा होणार नाही !
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘अक्षरदान’ दिवाळी अंक २०२५ च्या कविता विभागासाठी ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन, एकनाथ पाटील, प्रतिभा पवार खैरनार, कविता मोरवणकर, सुनिल उबाळे, संजय तांबे, संचिता चव्हाण, विजय सुभद्रा अर्जुन सावंत, महावीर कांबळे, सफरअली इसफ, निशिगंधा गावकर, उदय जाधव, राजीव जोशी, पांडुरंग गावकर, रमेश ठोंबरे यांनी राजकीय कवितेसाठी प्रतिसाद दिला. त्यांनी आपला विवेक जागृत ठेवला, याबद्दल त्यांचे कौतुक वाटतेच. परंतु स्वतंत्र आवाज व्यक्त करणाऱ्या प्रत्येक कलावंताला आजच्या दडपशाहीला सामोरे जावे लागत असतानाच्या काळात त्यांनी प्रत्यक्षातल्या राजकारणावर टीका करणारी कविता लिहिली आणि ती प्रसिद्धीलाही दिली हे मराठी कविता पुढे जाण्याचं सुचिन्ह आहे !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
