April 24, 2024
rajendra ghorpade article on True satisfaction
Home » खरे समाधान कशात ? हे ओळखायला हवे…
विश्वाचे आर्त

खरे समाधान कशात ? हे ओळखायला हवे…

चांगल्या गोष्टींचा मोह करायला हवा. लोभ करायला हवा. अशाने चांगले विचार आपोआपच मनात उत्पन्न होतील. आपोआपच सत्कर्म घडेल. चांगल्या विचारांची सवय मनाला लावायला हवी. दुष्ट विचार करून स्वतःला व साहजिकच आसपासच्या सर्वांना त्रस्त करण्याऐवजी चांगल्या विचाराने इतरांची मने जिंकायला हवीत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते.

राजेंद् कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवयाजोगा होय तो पुरुष ।।१०८६।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – हे भाग्यवान अर्जुना, ती शांति जेंव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते, तेंव्हा तो पुरूष ब्रह्म होण्याला योग्य होतो.

देशात शांती नांदली, तर विकासाला निश्चितच प्रोत्साहन मिळते. घरात शांती असेल, तर घरातील वातावरण प्रसन्न राहते. समाधानामुळे प्रगती होते. घरात भरभराट होते. यासाठी मन समाधानी असायला हवे. समाधानानेच शांती येते. लोभ, क्रोध, माया, मोह आदींमुळे शांती लोप पावते. शांतीचा विनाश होतो. यासाठी यावर नियंत्रण ठेवायला हवे, पण ते जमत नाही. सध्याच्या चंगळवादी युगात तर हे आता अशक्यच वाटत आहे. प्रत्येक जण लोभी होताना दिसत आहे. स्पर्धेमुळे एकमेकाचे उणेदुणे काढण्यातच समाधान मानले जात आहे. अशानेच शांती लोप पावत आहे. एकमेकामध्ये दुरावा वाढत आहे. यासाठी विचारसरणीच बदलायला हवी. माणसांना बदलता येत नाही. यासाठी आपणच आपल्या प्रगतीसाठी आपल्या विचारात बदल करायला हवा.

चांगल्या गोष्टींचा मोह करायला हवा. लोभ करायला हवा. अशाने चांगले विचार आपोआपच मनात उत्पन्न होतील. आपोआपच सत्कर्म घडेल. चांगल्या विचारांची सवय मनाला लावायला हवी. दुष्ट विचार करून स्वतःला व साहजिकच आसपासच्या सर्वांना त्रस्त करण्याऐवजी चांगल्या विचाराने इतरांची मने जिंकायला हवीत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाच्या आवडी-निवडीही वेगळ्या असतात. काळ-वेळेनुसार आवडही बदलते. घरातच पाहिले तर आईला दोडका तर वडिलांना वांगे, भावाला कारले तर बायकोला मेथी आवडते. स्वतःची आवड याहून वेगळी असते. आवड-निवड सारख्या असणाऱ्या व्यक्तींची मने जुळतात असे म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे घडत नाही.

हे क्षणिक असते. प्रत्येकाची विचार करण्याचीही पद्धतही वेगळी असते. मोहाने आवड निर्माण होते. वासनेमुळे त्याला प्रोत्साहन मिळते. वासनेने एकत्र आलेली मने भोगासाठी एकत्र असतात. भोगानंतर पुन्हा दुरावा येतो. यासाठी वासनेवर नियंत्रण ठेवायला हवे. सद्विचारांनीच दुष्ट विचारावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी सद्विचारांची सवय मनाला लावायला हवी. यातूनच मनाला प्रसन्न ठेवता येते. समाधानी मनाने शरीरात शांती नांदते. शरीरात तसा बदल घडतो. आत्मज्ञानप्राप्तीसाठी हा बदल आवश्यक आहे. ठराविक स्थिती प्राप्त झाल्यानंतरच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते.

म्हणजेच मन समाधानी राहायला हवे. मनाला तशी सवय लावली, तर ते शक्य आहे. मनात नित्य भक्तीचा विचार नांदेल अशी स्थिती उत्पन्न करायला हवी. आपल्या आसपासच्या परिस्थितीचाही आपल्या मनावर परिणाम होतो. मन चंगळवादात, मोहात अडकतेच. पूर्वी मनोरंजनाची साधने नव्हती. पण आतातर डोक्यात नुसतेच मनोरंजन करण्याची वृत्ती बळावली आहे. जो तो मोबाईलमध्ये डोके खूपसुन स्वतःचे समाधान होई तोपर्यंत त्यात गुंततो. हे करताना त्याला कंटाळाही येत नाही. इतका तो त्यामध्ये गुंतलेला असतो. मनाचे समाधान त्याने होत नाही. उलट मन चिडचिडे होते. तरीही त्याचे व्यसन आपणाला लागते. याकडे आता दुर्लक्ष करून चालणारे नाही. यासाठी मन त्यातून काढून मनात साधनेचे विचार कसे उत्पन्न होतील याकडे लक्ष द्यायला हवे. शांती ही समाधानात आहे लक्षात घेऊन खरे समाधान कशात आहे हे ओळखायला हवे. ते समजले तरच आत्मज्ञानाचा लाभ आपणास होईल.

Related posts

शिलाहार शिल्पकलेचा नमुना असणारे कोपेश्वर मंदिर…(व्हिडिओ)

सेवेतून थकलेल्या मनाला मिळतो खरा आनंद

दुष्काळी परिस्थितीत पाऊस पाडणे शक्य, पण…

Leave a Comment