October 14, 2024
Ab Kee Bar magic in India article by Sukrut Khandekar
Home » Privacy Policy » अब की बार…देशावर जादू
सत्ता संघर्ष

अब की बार…देशावर जादू

अब की बार चारसौ पार, अब की बार मोदी सरकार, या घोषणांनी सर्व देशातील जनता मंत्रमुग्ध झाली असून २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी या दोन शब्दांचीच जादू सर्वत्र चाललेली दिसते आहे. भाजपच्या विरोधात २६ राजकीय पक्ष एकत्र येऊन इंडिया नावाच्या बॅनरखाली निवडणुकीच्या मैदानात उतरले असले तरी मोदी हेच सर्वमान्य व सर्वात लोकप्रिय नेता आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले तर आपले भविष्य काय, या विचाराने विरोधी पक्षांना पछाडले आहे.

‘अब की बार’ या घोषणेबरोबरच मोदी की गॅरेंटी या घोषणेने भाजपने प्रचारात मुसंडी मारली आहे. आकर्षक घोषणा करून जनतेला आपल्याकडे खेचून घेणे हे भाजपच्या प्रचाराचे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेले आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषणेने मतदारांवर जादू केली होती. सन २०१९ च्या निवडणुकीत मोदी हैं तो मुमकीन है या घोषणेने भाजपच्या खासदारांची संख्या तीनशेच्या पुढे नेली होती. आता २०२४ मध्ये अब की बार ४०० पार या घोषणेने विरोधी पक्षांच्या प्रचारावर भाजपने जबरदस्त मात केली आहे.

सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आणि दुसरीकडे काँग्रेसप्रणीत यूपीएची दहा वर्षांची कारकीर्द कशी भ्रष्टाचाराने बरबटलेली होती हे मतदारांच्या मनावर बिंबवले. सन २०१३ मध्ये मीडियातून देशपातळीवर चाललेला भ्रष्टाचार, वाढलेली बेरोजगारी व राष्ट्रीय सुरक्षेकडे झालेले दुर्लक्ष यावरून काँग्रेसवर भडीमार चालू होता. काँग्रेसला मीडिया आणि भाजप यांनी चालवलेल्या धारदार टीकेला उत्तर देता आले नाही किंवा यूपीए सरकारवर झालेल्या आरोपाबद्दल बचावही करता आला नाही. त्यातच नरेंद्र मोदी यांच्या फोटोंच्या फलकांवर अच्छे दिन आनेवाले है, अशी घोषणा झळकू लागली त्याचा जबर फटका काँग्रेसला बसला. ५४३ जागा असलेल्या लोकसभेत भाजपचे २८२ खासदार निवडून आल्याने ऐतिहासिक जनादेशच भाजपला प्राप्त झाला.

सन २०१९ मध्ये भाजपला कसे रोखायचे असा गहन प्रश्न काँग्रेससह विरोधी पक्षांना भेडसावू लागला होता. भारत व फ्रान्स दरम्यान राफेल लढाऊ विमान खरेदीत भ्रष्टाचार झाला असा आरोप काँग्रेसने केला. या व्यवहारात झालेल्या सौदेबाजीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर खरेदी व्यवहारात पारंपरिक पद्धत डावलण्यात आली असे काँग्रेस सांगू लागली. देश का चौकीदार चौर है, असा राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करून देशात व विदेशात मोठे काहूर निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधानांनी आपल्या भांडवलदारी मित्रांना अशा करारांतून लाभ मिळवून दिला, असे राहुल गांधी सांगत होते. चौकीदार चोर है, या आरोपानंतर सारा भारतीय जनता पक्ष पंतप्रधानांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. मोदींच्या लक्षावधी समर्थकांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे मैं भी चौकीदार… असे शब्द जोडून पक्षाने एक वेगळेच शक्तीचे प्रदर्शन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराची सुरुवात केली तेव्हा, भाजपच्या मैं भी चौकीदार या मोहिमेने देश ढवळून निघाला होता. राहुल गांधींनी थेट मोदींवर चौकीदार चोर है असा आरोप केल्यानंतर मोदी शांत बसतील अशी अपेक्षाही करणे चुकीचे होते. देशातील चौकीदारांना – सुरक्षा रक्षकांना – वाॅचमेन समुदायाला काँग्रेस पक्षाने तुच्छ लेखले, त्यांचा अवमान केला असा प्रचार भाजपने सुरू केला व चौकीदार चोर है या आरोपाचे काँग्रेसवरच बूमरँग झाले.

सन २०१९ च्या निवडणुकीत प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच मोदी हैं तो मुमकीन है, अशी घोषणा भाजपने दिली होती. त्या घोषणेचा मतदारांवर जबदरस्त प्रभाव पडला. त्याच वेळी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून, भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, त्या घटनेचा मोठा लाभ निवडणुकीत भाजपला झाला. एकीकडे विकास आणि दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईक या दोन मुद्द्यांनी भाजपच्या खासदारांच्या संख्येने त्रिशतक पूर्ण केले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे ३०३ खासदार लोकसभेत निवडून आले.

आपल्या आक्रमक व प्रभावी प्रचारातून विरोधकांवर हल्लाबोल करायचे ही तर भाजपची कला आहे. २०२४ ची निवडणूक जाहीर होण्याअगोदरपासूनच विरोधी पक्षांतील घराणेशाहीवर मोदींनी आणि भाजपच्या नेत्यांनी जाहीर सभांतून आणि कार्यक्रमातून हल्ला चढवायला सुरुवात केली. काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांत नेत्यांचे नातेवाईक व सगेसोयरे यांनाच नेहमी कसे सत्तेच्या परिघात ठेवले जाते, हे मतदारांच्या मनात ठसविण्यात भाजपला यश मिळाले आहे. मोदींनी केलेल्या घराणेशाहीवरील टीकेला बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

मोदींना परिवार का नाही, हे त्यांनी सांगावे अशी त्यांनी जाहीरपणे विचारणा केली. त्यावर मोदी गप्प बसतील कसे? माझा परिवार भारत देशातील १४० कोटी जनता आहे, अशा शब्दांत मोदींनी लालूजींवर तोफ डागली. एवढेच नव्हे तर भाजपने मोदी का परिवार असे अभियान सुरू करून विरोधकांची हवाच काढून घेतली. मोदी का परिवार, या देशव्यापी मोहिमेने भाजपने विरोधी पक्षाला गारद केले.

सन २०२४ च्या निवडणुकीत मोदी की गॅरेंटी या मोदींच्या घोषणेने विरोधी पक्ष कमालीचा अस्वस्थ आहे. मोदी की गॅरेंटीला कसे उत्तर द्यावे या मुद्द्यावरून विरोधी पक्ष अजूनही चाचपडत आहेत. मोदी की गॅरेंटी म्हणजे दिलेला शब्द पूर्ण करण्याची गॅरेंटी असे मोदी प्रत्येक प्रचार सभेत ठासून सांगत आहेत. मोदी की गॅरेंटी हा निवडणुकीतील प्रचाराचा केंद्रबिंदू बनला आहे.

मोदींच्या कारकिर्दीतच अयोध्येतील राम मंदिर उभे राहिले व पाचशे वर्षांचे भारतीय जनतेचे स्वप्न पूर्ण झाले. जम्मू-काश्मीरला सात दशके विशेषाधिकार देणारे ३७० कलम मोदी यांनीच हटवले व सरहद्दीवरील राज्याला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. गेली चार दशके संसदेत केवळ वादविवादात अडकलेले महिला आरक्षण विधेयक मोदींच्या काळातच मंजूर झाले व संसदेत व विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. तिहेरी तलाख कायदा रद्द करून मुस्लीम महिलांना फार मोठा दिलासा देण्याचे काम याच सरकारने करून दाखवले. नवी दिल्लीत भव्य व आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असणारे नवीन संसद भवनही मोदी यांनीच उभारून दाखवले. पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती व छत्तीसगडला पहिले आदिवासी मुख्यमंत्री मिळाले, तेही मोदींच्या कारकिर्दीत. महाराष्ट्र किंवा बिहारमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार असूनही मित्रपक्षाला म्हणजेच एकनाथ शिंदे व नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्याचे औदार्य दाखवले तेही मोदींनीच. म्हणूनच मोदी है तो मुमकीन है…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभर होत असलेल्या प्रचार सभांना लक्षावधींचा जनसागर लोटतो आहे. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सभा किंवा रोड शो यांना विक्रमी गर्दी दिसून आली. देशाचे आश्वासक नेतृत्व म्हणून सर्वसामान्य जनतेचा मोदींवर विश्वास वाढला आहे. नरेंद्र मोदी हे एकच नाव देशभर लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भाजपचा गेल्या दहा वर्षांत लक्षणीय विस्तार झाला तो केवळ नरेंद्र मोदी या एकमेव नेतृत्वामुळेच. भारतीय जनता पक्षाच्या चोवीस वर्षांच्या इतिहासात एवढे भरीव यश मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय होण्याच्या अगोदर कधीच मिळाले नव्हते.

राम जन्मभूमी आंदोलनापासून भाजपचा देशात विशेषत: उत्तर भारतात आलेख उंचावू लागला. पण २०१४ मध्ये लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळविण्याची करामत मोदी यांनीच करून दाखवली. २०१९ मध्ये तीनशेपेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याची जादू मोदींमुळेच शक्य झाली. आता सन २०२४ मध्ये भाजपचे ३७० खासदार व एनडीएचे मिळून ४०० खासदार निवडून आणण्याचा संकल्प भाजपने जाहीर केला आहे. अब की बार ४०० पार हाच नारा सर्वत्र ऐकायला मिळतो आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading