दीड-दोन वर्षापूर्वी याच खेळाच्या आवडीतून वडणगेला सुसज्ज क्रीडांगण असावे, असे प्रत्येक खेळाडूंना वाटत होते. यातून मग काही मंडळींनी पुढाकार घेत सुसज्ज क्रीडांगण तयार करण्याचा मनात ध्यास घेतला. आणि सध्याचे सुसज्ज मैदान तयार झाले.
सर्जेराव नावले, वडणगे. ८३८००९४६४२
वडणगे गावाला जसा ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्राचा वारसा आहे. तसाच श्रमदानाचाही इतिहास आहे. गावातील्या जुन्या पिढीने सुरू केलेला श्रमदानाचा वारसा आजच्या तिसऱ्या पिढीने तितक्याच नेटाने जपला आहे. तमाम वडणगेकरांचे स्वप्न ठरलेले सुसज्ज शिवपार्वती क्रीडांगण खेळासाठी तयार झाले आहे. त्याचे लोकार्पण रविवारी (ता. १७ डिसेंबर) झाले. श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून सुमारे ३० ते ४० लाख खर्चून तयार झालेल्या या मैदानामुळे वडणगेचा श्रमदानाचा आदर्श वारसा पुन्हा अधोरिखित होत आहे.
पूर्वीपासून वडणगेत श्रमदानाची आणि लोकवर्गणीची परंपरा गावच्या जेष्ठ मंडळींनी सुरू केली. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न बघता स्वतः गावकरी श्रमदान करायचे, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे अर्थिक मदत करायचे आणि गावात विकासकामे करायची, अशी परंपरा वडणगेच्या त्याकाळातील बुजूर्ग मंडळींनी सुरू केली.
त्याकाळी आजच्या सारखे डांबरी रस्ते नव्हते. पावसाळ्यात वडणगेच्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये प्रचंड चिखल असायचा, कच्चे रस्ते होते. पावसाळा संपला, की दसऱ्यावेळी साखरेच्या आधी गावच्या प्रत्येक गल्लीतील रस्त्यांचे मुरूमीकरण केले जायचे, प्रत्येक गल्लीतील घरटी एक माणूस खोरं, टिकाव, पाटी, पार आदी साहित्य घेवून सज्ज व्हायचा. गल्लीतील ट्रक्टर-ट्रॉली असणारे आपली वाहने द्यायचे, सध्या क्रीडा मंडळाच्या मागे आरोग्य केंद्राच्या जागेत त्याकाळी सुतार तळी, इंदिरा नगरजवळ चांभार तळी, धनगर माळ, देवणे माळ आदी मुरूम असलेल्या खडकाळ जमिनीतून प्रत्येकजण श्रमदान करत मुरूम खोदायचे, ट्रॉल्या भरायचे आणि प्रत्येक गल्लीत मुरमाचे पक्के रस्ते केले यायचे. कोणीतरी दिलेल्या वर्गणीतून रोडरोलर भाड्याने आणून गल्लीत टाकलेला मुरूस सपाट केला यायचा आणि दोन-तीन दिवसात प्रत्येक गल्लीत रस्ता तयार व्हायचा. आज प्रत्येक डांबरी रस्ते असले तरी त्या रस्त्याखाली पूर्वीच्या रस्त्याला प्रत्येक गल्लीतील राबलेल्या लोकांचा श्रमदानाचा आणि त्यांच्या घामाचा इतिहास आहे. प्रत्येक वडणगेकराने समजून घ्यायला हवे.
गल्लीतील रस्ते श्रमदानातून करण्याबरोबरच वडणगेच्या प्राथमिक कुमार विद्या मंदिर आणि कन्या विद्या मंदीर या शाळेंचे मैदानही त्याकाळातील जुन्या लोकांनी श्रमदानातून तयार केले आहे. हे करत असताना प्रत्येकजण गल्लीसाठी, गावासाठी राबत होता. निस्वार्थी भावनेने त्याकाळातील लोक राबत होते. गावकऱ्यांना मुलभूत सुविधा मिळाव्यात हीच प्रामाणिक भावना त्याकाळातील जेष्ठ, जाणत्या लोकांची होती. हे झाले गल्लीतील रस्त्यांबाबत, पण वडणगेच्या वैभवात भर घालणारा शिवपार्वती तलावालाही श्रमदानाचा खूप मोठा इतिहास आहे. ३२ एकरात असलेल्या तलावात त्याकाळीही केंदाळ वाढलेले असायचे, तलावाचे पाणी पूर्वी पिण्यासाठीही वापरले जायचे. शिवपार्वती तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी जुनी मंडळी जागरूक असायची. तलावातील केंदाळ काढण्यासाठी प्रत्येक गल्लीत दिवस पाळक करून रोज एक असे प्रत्येक गल्लीतील लोक तलावातील केंदाळ बाहेर काढायचे. आजच्या सारखा तलाव तसा त्याकाळी फार प्रदुषित नव्हता. प्रत्येक गल्लीतील लोक आठवडाभर श्रमदान करून तलावातील केंदाळ काढले जायचे. दिवस पाळक करण्यासाठी प्रत्येकजण त्यात प्रामाणिकपणे सहभागी व्हायचा आणि गावचा तलाव स्वच्छ करण्यासाठी राबायचा. तलावाच्या स्वच्छतेतही त्याकाळच्या वडणगेकरांचा श्रमदानाचा इतिहास दडला आहे, हे ही आजच्या तरूण पिढीला माहित असणे गरजेचे आहे.
श्रमाबरोबरच स्वतःकडे असणाऱ्या अर्थिक कुवतीप्रमाणे फुल ना, फुलाची पाकळी म्हणून वडणगेतील दानशूर लोक गावच्या विकासासाठी अशावेळी सढळ हाताने पैशाची मदत करायचे. यात कोण स्वतःकडील ट्रॅक्टर द्यायचे, कोण रोख पैसे तर कोण डिझेल तर कोण राबणाऱ्यांना चहा, नाष्टा, जेवणाची सोय करायचे.
वडणगेच्या जय किसान क्रीडा मंडळाच्या वास्तुलाही श्रमदानाचा, दानशूरपणाचा इतिहास आहे.
जयकिसान क्रीडा मंडळ (कबड्डी, कुस्ती), समर्थ सेवा क्रिक्रेट क्लब (क्रिक्रेट), समर्थ सेवा हॉलीबॉल संघ यांचा एकेकाळी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर आपला दबदबा होता. त्याकाळी जय किसान क्रीडा मंडळात जिल्हा, राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जायच्या, होणाऱ्या स्पर्धेसाठी बक्षीसे असो अथवा खेळाडूंच्या जेवणखाण्याची व्यवस्था असो, वडणगेतील प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करायचा.
वडणगे ग्रामपंचायतीच्या समोर मैदानात समर्थ सेवा हॉलीबॉल संघ हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करायचा, या स्पर्धेलाही वडणगेतील दानशूर लोक पुढे यायचे. आलेल्या संघाला जेवण, राहणे त्यांच्या पाहुणचारात हिरीरिने सहभाग घ्यायचे. स्पर्धा असो अथवा वडणगे सोसायटीत दत्त जयंतीला महाप्रसाद वडणगेतील दानशूर मंडळी अन्नधान्याच्या रूपाने मदत करण्यात नेहमीच पुढे राहिले आहेत. श्रमदानाच्या जोडीला दिलदार आणि दानशूर वडणगेकर याच मातीत निर्माण झाले आहेत.
कुस्ती, कब्बडी, हॉलीबॉल, क्रिक्रेट आणि अलिकडच्या काही वर्षात फुटबॉल या खेळांने गावची जिल्ह्यात आणि राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे असले तरी वडणगे गावाला सुसज्ज मैदान नसल्याची सल वडणगेतील प्रत्येक क्रीडा प्रेमीच्या मनात अनेक वर्षे घर करून राहिली होती. पूर्वी समर्थ सेवा क्रिक्रेट क्लबच्या खेळाडूंनी मराठी शाळेच्या मैदानावर आणि सध्या तयार झालेल्या मैदानावर क्रिक्रेट खेळ फार खडतर परिस्थितीत जिवंत ठेवला. क्रीडा मंडळापासून मराठी शाळेच्या भिंतीपर्यत असलेले शेणाचे ढीग आणि मोठमोठे असलेले खड्डे तसेच गाव हागणदारीमुक्त होण्यापूर्वी कल्पनाही करवत नाही, अशा स्थितीत समर्थ सेवा क्रिक्रेट संघाचे खेळाडू फार कठीण परिस्थितीत क्रिक्रेटचा सराव करायचेत हे वास्तव होते. अशा परिस्थितीत समर्थ क्रिक्रेट क्लबने श्रमदानातून क्रिक्रेटचे पीच तयार केले होते. यावर जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिक्रेट स्पर्धाही अनेकवेळा आयोजित केली होती. यातूनच क्रिक्रेट खेळाची आवड, जिद्द वडणगेकरांनी जपली आहे. अलिकडेच काही वर्षाच फुटबॉल खेळ ही वडणगेत चांगलात रूजला आहे. ग्रामीण फुटब़ॉल स्पर्धांमध्ये वडणगे फुटबॉल संघ नाव कमवत आहे.
दीड-दोन वर्षापूर्वी याच खेळाच्या आवडीतून वडणगेला सुसज्ज क्रीडांगण असावे, असे प्रत्येक खेळाडूंना वाटत होते. यातून मग काही मंडळींनी पुढाकार घेत सुसज्ज क्रीडांगण तयार करण्याचा मनात ध्यास घेतला. आणि सध्याचे सुसज्ज मैदान तयार झाले. गावातील या मातीत घडलेल्या आणि यशस्वी झालेल्या काही मंडळींनी येथे प्रत्येकाचे नाव देणे उचित नाही, अनेक लहान मोठ्या मंडळींनी कोणी मोठी हेवी मशिनरी दिली, कोणी पोकलॉन, कोणी जेसीबी, कोणी लाल माती, तर कोणी बांधकामाचे साहित्य उपलब्ध करून दिले. कोणी रोख रक्कम देवू केली. यातून या दानशूर मंडळींचा, काही मंडळांचा, युवा मंचचा या मैदानासाठी मोलाचा हातभार तसेच योगदान लाभले आहे.
मैदानाच्या उभारणीसाठी जेष्ठ बांधकाम व्यावसायिक श्री.व्ही.बी.पाटील साहेब, अर्थ मुव्हर्स असोचे अध्यक्ष आर.डी.पाटील साहेब, राजेंद्र सुर्यवंशी, समीर नलवडे, शक्ती खाडे बाहेरील दानशुरांचेही मोठे सहकार्य मिळाले आहे. गावातील आणि गावाबाहेरील दानशुरांनी केलेल्या मदतीतून आणि मैदानासाठी राबणाऱ्या अनेक वडणगेतील तरूण, जेष्ठ मंडळीच्या परिश्रमातून वडणगेत सुसज्ज असे शिवपार्वती क्रीडांगण साकारले आहे.
तयार झालेल्या या सुसज्ज मैदानावर आता वडणगेतील यापुढच्या अनेक पिढ्यां खेळतील, घडतील आणि आपले खेळातील करियर करत राहतील. विकासाच्या प्रक्रियेत केवळ रस्ते, गटर याच सुविधा असून चालत नाहीत तर भावी पिढी घडविण्यासाठी खेळण्यासाठी, सदृढ समाजासाठी गावाला सुसज्ज मैदान असणे म्हणजे गावच्या लौकिकात भर घालण्याचे लक्षण मानले जाते. आणि हाच लौकिक वडणगेच्या नव्या दमाच्या तरूणांनी मिळविण्याचा या क्रीडांगणाच्या निमित्ताने केला आहे. हे सुसज्ज मैदान टिकविणे, त्याची जपणूक करणे प्रत्येक वडणगेकराचे कर्तव्य आहे. शिवपार्वती क्रीडांगणाच्या निमित्ताने वडणगेच्या इतिहासात निश्चिच भर घातली आहे. त्यानिमित्त सर्व देणगीदार, दानशूर आणि मैदानासाठी राबणाऱ्या प्रत्येक हाताला या पुढील प्रत्येक पिढ्या धन्यवाद देत राहतील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.