April 25, 2024
Vadnage Ganesh Festival article by Sarjerao Navle
Home » वडणगेचा गणेशोत्सव
मुक्त संवाद

वडणगेचा गणेशोत्सव

वडणगेत ५० वर्षापूर्वी सुरू झालेली गणेशोत्सवाची परंपरा आज तिसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडणगेतील त्याकाळातील पिढीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. आज परिस्थिती बदलली आहे. सर्व बाबतीत डोळे दिपावणारा आजचा सार्वजनिक गणेशोत्सव पाहिला तर जुना काळ आणि आत्ताचा काळ यात नक्कीच फरक आहे.

सर्जेराव नावले, मोबाईल – ८३८००९४६४२
( साभार- वडणगेच्या प्रथा आणि परंपरा)

वडणगेच्या गावगाड्यात दसरा साखर उत्सवाला १०० वर्षांची परंपरा आहे. या साखर परंपरेबरोबरच गावच्या सात गल्ल्यांतील सात तालमींमध्ये स्थापनेपासून गणपतीला तालमीत एका दिवळीत लहान शाडूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. (सध्याही तालमीत मूर्ती असते). पाच दिवस तालमीच्या गणपतीची मोजक्या लोकांकडून पूजा-अर्चा, आरती होत होती. पाचव्या दिवशी गणपती मूर्तीचे विसर्जन केले जायचे, असे साधे स्वरूप पूर्वी वडणगेच्या गणेशोत्सवाचे होते. अलिकडे डॉल्बीचा कानठळ्या बसविणारा आवाज, लेसर-शो आणि शार्पीच्या झगमगटात हरविलेल्या गणेशोत्सवाला वडणगेत एकेकाळी समाज प्रबोधन, जनजागृती आणि तरूणांच्यात शिवप्रेम, राष्टीभक्ती पेरण्याचा आणि ती रूजविण्याची परंपरा वडणगेतील काही मंडळानी जपली आहे. आता ही परंपरा काहीशी मागे पडली असली तरी विद्यार्थी दत्तक योजना, गरीब गरजुनां मदत, ऐतिहासिक देखावे करण्याची परंपरा काही मंडळांकडून सुरू आहे.

वडणगेमधील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव

वडणगेत पहिला सार्वजनिक गणेशोत्सव आणि देखावे सुभाष बाल मंडळाने सुरू केला. आंबेगल्लीत १९६५-६६ साली सुभाष तालीम मंडळ प्रणित सुभाष बाल मंडळ त्याकाळी स्थापन केले. शेजारपाजारच्या पोरांनी मिळून केलेले हे छोटेसे मंडळ होते. प्रा.आनंदा नावले, शिवाजी दिडे, कै.पांडूरंग नावले, सरदार दिंडे, कै.दिनकर दिंडे, कै.पांडूरंग केसरकर, कै.प्रदीप दुधाने, कै.अरूण दुधाने, कै.शशिकांत दुधाने, रमेश दुधाने, तानाजी केसरकर, शिवाजी व्हरगे, कै.पंडीत व्हरगे, कै.शिवाजी खुर्दाळे आदी तरूणांनी या मंडळाची स्थापना केली. या मंडळाचे कोण कॉलेजमध्ये, कोण शाळेत शिकत होते. कोणी कमावते नसल्यामुळे खर्चाला साहाजिकच मर्यादा होत्या. त्याकाळात आजच्या सारख्या प्लास्टर आॅफ परिसच्या मूर्ता मिळत नव्हत्या. केवळ शाडू हाच एकमेव पर्याय असल्याने शाडूचीच मूर्ती मिळायची. गणपतीची मूर्ती आणण्यासाठी कोणाकडे त्याकाळात पुरेसे पैसे नसायचे. यावर प्रा.आनंदा नावले यांनी एक युक्ती शोधली. शिवपार्वती तलावात शाडूंच्या घरगती गणेश मूर्तीं विसर्जित केल्या जात होत्या. उन्हाळ्यात तलावातील पाणी आटले की, विरघळलेला शाडू एकत्र करायचा, आणि तो गणपतीपर्यत जपून ठेवायचा. गणपतीच्या काही दिवस अगोदर गोळा केलेल्या शाडूत कापूस मिसळून त्याची मूर्ती स्वतः प्रा. आनंदा नावले तयार करायचे, ती मूर्ती आंबेगल्लीतील दिंडे यांच्या घरासमोरच्या अंगणात छोटा मंडप घालून त्याची प्रतिष्ठापना करायची. असे काही वर्षे सुरू होते. कालांतराने मूर्तीला रंगवून तिची प्रतिष्ठापना करण्यात येवू लागली. मंडळातील मुले मोठी झाल्यावर सुभाष बाल मंडळाचे १९७२ साली सुभाष तरूण मंडळ असे नामकरण करण्यात आले.

ऐतिहासिक, समाजप्रबोधन आणि सजीव देखाव्यांचीही आंबेगल्लीत सुरूवात

सुभाष तरूण मंडळाने गणेशोत्सवावेळी प्रथमच १९७२-७३ पासून ऐतिहासिक, समाजप्रबोधन आणि सजीव देखाव्यांचीही परंपरा वडणगेत सुरू केली. (यापूर्वी ती दसरा साखर उत्सवात होती. याबाबतची माहिती ‘वडणगेची दसरा साखर जागर परंपरा‘ या मागील लेखात आहे). या मंडळाचे अनेकजण कोल्हापुरात शिकण्यासाठी जात असल्यामुळे कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांचे अनुकरण करून तसे देखावे गावात सुरू करण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्यांनी केला. समाज प्रबोधन, इतिहासाचा वारसा जपला जावा, या उद्देशाने मंडळाने ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक अशा विषयांवर प्रथम हालते देखावे केले. यात शिवकालीन, पौराणिक असे देखावे सादर केले. यात ‘शाहिस्तेखानाची बोटे तोडणारा‘, समुद्रमंथन, रामभक्त हनुमान आदी अनेक विषयांवर हालते देखावे केले. हे करत असताना आतासारखी अद्यावत साहित्य, साधने तंत्रज्ञान त्याकाळी नव्हती. मंडळाच्याच कार्यकर्त्यांनी त्यावेळी वडणगे सेवा सोसायटीच्या कापड दुकानातून तगडाचे पुठ्ठे, लाकडी रोल आदी साहित्य आणून त्यावर ऐतिहासिक व्यक्तीरेखांची चित्रे काढून त्यांचे कटआऊट करून त्यापासून हालता देखावा सादर केला जायचा. कालांतराने या मंडळाने १९७५ ला सजीव देखाव्यांची परंपरा सुरू केली. यासाठी मंडळांचे अध्यक्ष प्रा. आनंदा नावले शिवकालीन प्रसंगावर नाटक लिहायचे. त्याकाळी आजच्यासारखी कॅसेट, रेर्काडींग असली माध्यमे किंवा सोय नव्हती. ट्रॉलीवर स्टेज केले जायचे. आणि मध्ये माईक बांधून थेट संवादाच्या सादरीकरणातून देखाव्यांचे सादरीकरण केले जायचे. आदी एक-दोन महिना प्रा.नावले यांच्या घरात एका गोठा वजा असलेल्या खोलीत देखाव्यांच्या तालमी चालायच्या. मुसा मुल्ला (ईकबाल मुल्ला यांचे वडील) यांच्याकडून स्टेजसाठी साहित्य आणले यायचे. नाटकासाठी लागणारे मावळ्यांचे ऐतिहासिक ड्रेस, तलवारी, भाले, ढाली आदी साहित्य कोल्हापुरातून भाड्याने आणले जायचे. अल्यूमिनियनचे लाईटचे फोकस असायचे त्यावर लाल, पिवळे, हिरवे, निळे प्लॉस्टीक कागद बांधून त्याचा अनेक रंगांचा स्टेजवर लाईट पाडून देखाव्याला प्रकाशयोजना केली जायची. सुभाष तरूण मंडळाने

५० वर्षांपूर्वी सादर केलेल्या अनेक सजीव देखाव्यांची चर्चा आजही निघते. शिवकालीन सजीव देखाव्यात ‘संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज भेट’, ‘गड आला पण सिंह गेला‘, ‘रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते‘. असे अनेक शिवकालीन सजीव देखावे वडणगेत प्रथमच केले होते. या देखाव्यांत संभाजी केसरकर (बापू) आणि कै. बंडोपंत (बंडा) बापुसो चौगले यांनी सादर केलली छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका गाजली होती. वाय.टी. लांडगे (शशिकांत लांडगे यांचे वडील) यांनी साकारलेला औरंगजेब तसेच सरदार दिंडे यांनी साकारलेला संत तुकाराम, रामदास स्वामीं, ‘रायगडाला जेव्हा जाग येते‘ या देखाव्यात कृष्णात मोरे- गोंधळी यांनी सादर केलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, ‘गड आला पण सिंह गेला‘ या देखाव्यात विश्वास चौगले (टारझन) यांनी केलेली उदयभानची जबरदस्त भूमिका आजही चर्चिली जाते. सुभाष तरूण मंडळाच्या कार्यर्त्यांच्या भूमिका गणेशोत्सवाच्यानिमित्ताने अजरामर ठरल्या आहेत. याच मंडळाने काही विनोदी, सामाजिक सजीव देखावेही त्याकाळात सादर केले. ही नाटकेही प्रा. आनंदा नावले लिहायचे, यात जर्नादन केसरकर, विलास गोंधळी, सुरेश दुधाने, शिवाजी दिंडे, संपत गौड, जनार्दन महादेव चौगले, मारूती गोंधळी आदी भूमिका करायचे. हे सर्व करत असताना सर्वांकडे अर्थिक चणचण तर कायमच असायची, मग देखाव्याच्या उदघाटनाला आंबेगल्लीतील प्रतिष्ठीत नागरीक कै. गोविंद दादा जाधव, कै.गणपती शंकर उदाळे-आण्णा, कै बाबुराव महादेव चौगले, वाय.के.चौगले आदी मंडळींना बोलविले जायचे आणि त्यांनी उदघाटनाला ताटात टाकलेल्या देणगीच्या रक्कमेवर सर्वांची भिस्त असायची. मान्यवरांनी दिलेल्या देणगीतून कसाबसा खर्च भागायचा.

सुभाष ग्रुप आणि आदर्श कार्नर

आंबेगल्लीत १९९० कै.प्रवीण पोवार, माजी सरपंच सचिन चौगले, प्रकाश उदाळे, मदन चौगले, विनोद सावंत, जितेंद्र सावंत, लखन चौगले, निवास चौगले, प्रवीण चौगले आदी तरूणांनी एकत्र येत सुभाष ग्रुपची स्थापना केली. सुरूवातीला सुभाष क्रिक्रेट क्लब आणि नंतर सुभाष ग्रुप झाला. ग्रुपने अनेक वर्षापासून गणेशोत्सवही वेगळेपण जपत आला आहे. ग्रुपच्या स्थापनेपासून एकच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे या मंडळाचे वैशिष्ट्ये आहे. मोठ्या आकर्षक गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेबरोबरच काही वर्षे ग्रुपने सामाजिक, विनोदी सजीव देखावे सादर केल आहेत.

आंबेगल्लीतील आदर्श कार्नर मित्र मंडळानेही सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक, प्रबोधनपर सजीव देखावे सादर केले आहेत. आंबेगल्लीतील सुभाष मित्र मंडळानेही सजीव आणि तांत्रिक देखावे सादर केले आहेत. या मंडळाने यंदाच पावनखिंड हा ऐतिहासिक देखावा साकारला आहे. आंबेगल्लीतच स्वराज्य ग्रुपनेही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या मंडळाने आकर्षक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.

नवयुग भजनी मंडळाकडून मोठ्या मूर्तीची सुरूवात

१९७२-७३ पासून बाल सुभाष मंडळाने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवा नंतरच १९८०- ८१ साली नवयुग भजनी मंडळाने प्रथमच शाडूची ७ फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दुधाने यांच्या हॉटेलच्या गाळ्यात केली होती. गावात त्याकाळी सर्वात उंच मूर्ती नवयुग भजनी मंडळाने बसवली होती. त्याकाळी प्लास्टर आॅफ परिस नव्हते अशा काळात कै. शामराव कुंभार (पी.एस टेलर यांचे वडील) शाडूची ७ फुट मूर्ती तयार केली होती. कोल्हापूरनंतर इतकी मोठी मूर्ती पंचक्रोशीत आकर्षणाचा विषय ठरली होती. ही मूर्ती बसविण्यासाठी त्याकाळी कै. दिनकर दिंडे, सुरेश दुधाने, दत्तात्रय जाधव-नाना, भगवान जाधव, महादेव नरदेकर, बाजीराव जौंदाळ, शंकर संकपाळ आदी मंडळींनी पुढाकार घेतला होता. ७ फूट मूर्ती तिही शाडूची होती. आज प्लास्टर मूर्तीतून नद्यांच्या पाणी प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर असताना ३५ वर्षापूर्वी नवयुग भजनी मंडळाने पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.

वल्लिसो तरूण मंडळाने ४५ वर्षापूर्वी साकारला होता ‘माझा सुंदर गाव’

माळवाडीतील वल्लीसो दर्ग्यात १९७८ साली आर्युवेदाचार्य डॉ. सुनील पाटील, बाबासाहेब ठमके, संभाजी ठमके, यशवंत वाघवे, प्रा. विजय सुतार आदी तरूणांनी एकत्र येत दर्ग्यासमोर शाडूच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून माळवाडीत गणेशोत्सवाचा ‘श्रीगणेशा‘ केला. त्याच वर्षी ‘माझा गाव’ या हालत्या तांत्रिक देखाव्यातून वडणगेसारखा अख्खा गावच देखाव्यात हुबेहुब साकारला होता. तलाव त्यात बोटींग, धावणारी बस यासह शेत, शिवारं, जनावरे, गोठा अशा प्रतिकृतीतून अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन या देखाव्यातून घडविले होते. त्याकाळी मनोरंजनांची साधनेच नसल्याने हा तांत्रिक देखावा पाहण्यासाठी दोन दिवस अख्खा गाव फुटला होता. हीच तांत्रिक देखाव्यांची परंपरा माळवाडीवर वल्लीसो मंडळाने टिकवली. काहीवेळा सजीव देखावे सादर केले पण तांत्रिक देखाव्यात या मंडळाने आपला बाज कायम राखला आहे. अलिकडे २००१ पासून सर्जेराव पाटील- टेकडे, विजय ठमके, अनिल कुरूंदकर, संतोष लोहार, किशोर लोहार, मुकेश लोहार, शशिकांत पाटील, कुमार ठमके, नवनाथ ठमके, शहाजी ठमके आदी तरूणांच्या पुढाकारातून दर्ग्यासमोर साकारलेले तांत्रिक देखावे आजही वडणगेकरांच्या कायमचे लक्षात आहेत. यात म्हैसूरचे वृध्दांवन गार्डन, कैलास मानससरोवरातील बर्फांचे शिवलिंग, धबधबा हे देखावे विशेष आकर्षण ठरले आहेत. दरम्यान वल्लीसो बाॅईज मंडळाने अलिकडे बिरोबा मंदिराशेजारी शंकराच्या जटेतून अवतरलेली गंगा हो पौराणिक तांत्रिक देखावाही आकर्षण ठरला होता.

क्रांती तरूण मंडळ

१९८३-८४ च्या दरम्यान मनोजकुमार यांचा क्रांती चित्रपट त्यावर्षी प्रंचड गाजला. या चित्रपटापासूनच प्रेरणा घेत रणदिवे गल्लीत कै. हंबीरराव पाटील, शिवाजी पाटील, खंडेराव झेंडे, विश्वास रणदिवे, प्रकाश शेलार, बाजीराव रणदेवे आनंदा तांबेकर आदी मंडळींनी सुरूवातीला क्रांती तरूण मंडळाची स्थापना केली. काही वर्षे सजीव देखाव्यासह तांत्रिक देखावेही सादर केले आहेत. सामाजिक प्रश्नावर सादर केलेल्या हागणदारीमुक्त गाव या सजीव देखाव्याला गणराया अर्वाड मिळाले आहे. नंतरच्या काळात राजेंद्र तांबेकर, रामचंद्र रणदिवे, सर्जेराव रणदिवे, अजित रणदिवे, अमर इंगवले, सुशांत घोरपडे, विकी पाटील, प्रवीण रणदिवे, सुनील पाटील, सागर रणदिवे, अक्षय इंगवले, केदार पाटील, संदीप तांबेकर, संदीप पाटील, रणजीत रणदिवे आदी तरूण मंडळी सध्या या मंडळाची धुरा वाहत आहे.

धर्मादित्य फ्रेंडस सर्कल

माळवाडीतच बराले गल्लीत १९८९ साली विलास बराले, सुनील नरदेकर, अनिल बराले, संदीप बराले, संतोष महानवर, अमित बराले, सागर लोहार, राजेंद्र पांडे आदी तरूणांनी एकत्र येत धर्मादित्य फ्रेंडस सर्कल या गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. स्थापनेपासून सजीव देखावे सादर करण्यास सुरूवात केली. तसेच काही तांत्रिक देखावेही या मंडळाने सादर केले.या मंडळाने सादर केलेला ‘व्यथा बळीराजाची’ या शेतकरी आत्महत्येवरील सामाजिक सजीव देखाव्याला देखावा स्पर्धेचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही मिळाले आहे.

जय भवानी चौक तरूण मंडळ

मठगल्लीत १९७५ साली कै.विक्रम खडके, बाळासाहेब मोरे, पोपट माने, बाळू माने, बाबासाहेब खडके, राजू माने, सरदार पाटील, विश्वास पाटील, रघुनाथ पाटील आदी तरूणांनी एकत्र येत मठगल्लीच्या चौकात जय भवानी तरूण मंडळाची स्थापना केली. या जय भवानी चौक मंडळामुळेच येथील चौकाला जय भवानी चौक असे वडणगेत प्रथम नाव पडले आहे. सुरूवातीला काही सजीव देखाव्याचे आयोजन करत मंडळाने वेगळी ओळख निर्माण केली. काही विनोदी नाटीका, समाजप्रबोधन करणारे व्यसनमुक्त, दारूबंदी आणि विषयांवर जयभवानी चौक मंडळाने सादर केले आहेत. तांत्रिक देखाव्यात मंडळाच्या कार्यकर्तांनी आकर्षक कारंजा, विद्युत रोषणाई तसेच एक वर्षी केलेली पाण्यातून प्रसाद देणारा गणपती हा देखावा आकर्षण ठरला होता. गणेश मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्ये ठरले आहे. मंडळाचे उत्तम मोरे, अनिल मोरे, अजित पाटील- सवळेकरी, रवी मोरे, दिग्विज खडके, अजित खडके, अभिजीत भोपळे, आकाश भोपळे, सुरज भोपळे, विनायक भोपळे, बाॅबी मोरे आदी तरूण कार्यकर्ते सहभागी होत मंडळाची परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात.

शिवराष्ट्र सर्कल..

मठ्ठगल्लीतच १९८५ साली अनिल ठाणेकर, कै.तानाजी मुरावणे-आबा, वसंत पाटील- बापू, वसंत दाभोळकर, बराले मामा, शिवाजी सावंत-मोहरेकर, पंडीत माने, कृष्णात चौगले, भिमराव तांबडे आदी मंडळींनी एकत्र येत शिवराष्ट्र सर्कल या गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. मंडळाची बैठी ६ फूट मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तशीच बैठ्या मूर्तीची आजपर्यत प्रतिष्ठापना केली जाते.सुरूवातीला समाज प्रबोधनावर सजीव देखावे सादर करण्यात आले. संभाजी महारांजावर सादर केलेला ऐतिहासिक देखावा खूप गाजला होता. त्यानंतर या मंडळाने डायनानोर तांत्रिक देखावा तर मिरवणुकीला रस्त्यावर चालणारी मगर आकर्षण ठरली होती. सध्या या मंडळाचे ऋषिकेश ठाणेकर,युवराज साळोखे, साईनाथ मुदगल, स्वप्निल मुरावणे, योगेश धुमाळ, सारंग मुरावणे आदी तरूण मंडळी या मंडळात कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतात.

सुर्या सर्कलचे वेगळेपण

मठ गल्लीतील जयवंत कुंभार, अशोक भोपळे, रमेश कुंभार, पांडूरंग जाधव, सरदार चेचर, यशंवत कुंभार, पांडूरंग पाटील, राजू धुमाळ, शिरीष कुंभार, शैलेश कुंभार, संजय एकशिंगे आदींच्या पुढाकाराने १९९८ साली सुर्या सर्कल या मंडळाची स्थापना झाली. स्थापनेपासूनच मंडळाची आकर्षक आणि भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास सुरूवात केली. पहिल्याच वर्षी गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला चक्क हत्ती आणून हत्तीवरून प्रसादाचे वाटप केले होते. सुर्या सर्कल कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या देखाव्यांची आजही आठवण काढली जाते. या मंडळाने ग्रामपंचायत इमारतीवर आणि स्टेजवर शोले या चित्रपटाचा विनोदी सजीव देखावा साकारला होता. या देखाव्यात के.वाय.चेचर गब्बरसिंग, सांभा- अमोल मुदगल, जय- विजय चेचर, वीरू- युवराज कुंभार, बसंती सागर तोरसे, अन्य डाकू जया टेलर, विशाल चेचर. या मंडळाने लगान हा विनोदी देखावाही आकर्षण ठरला होता.

सुर्या सर्कलने प्रथमच आणले शिवगर्जना ढोलपथक

२०१५ साली वडणगे गावात प्रथमच पुणे येथील शिवगर्जना ढोलपथक आणले होते. यानिमित्ताने असे पुणे, मुंबई येथे अशी ढोलपथके होती.ती कोल्हापुरातील मंडळे आणत होती. १० वर्षापूर्वी सुर्या सर्कलने ग्रामीण भागात सर्वप्रथम असे भव्य ढोलपथक आणले होते. आता कोल्हापुरातही स्थानिक शिवगर्जना ढोलपथके तयार झाली आहेत. त्याकाळी अशी पथके नसताना सुर्या सर्कलने आणलेले ढोलपथकांचे आकर्षण ठरले होते.

विठ्ठल तालीम मंडळांची सजीव देखाव्यांची परंपरा

१९८० नंतर विठ्ठल गल्लीतील विठ्ठल तालीम मंडळाने गणेशोत्सवाला देखाव्यांची परंपरा सुरू केली. सजीव देखाव्यात ऐतिहासिक ,पौराणिक आणि समाज प्रबोधन देखावेही विठ्ठल तालीम मंडळाने केले . मंडळाने सादर केलेल्या अनेक शिवकालीन देखाव्यांनीही वाहवा मिळविली आहे. या मंडळाने १९९४ साली तालमीशेजारी गुरव गल्लीत सादर केलेला आधुनिक शोला या सजीव देखाव्याची आजही आठवण काढली जाते. या देखाव्याचे एकाच रात्री २१ प्रयोग मंडळाच्या कलाकारांनी सादर केले होते. यात गब्बरसिंगती भूमिका- पंडित उर्फ नारायण पोतदार, जय कै.किरण मांगलेकर, वीरू चंद्रकांत शिंदे-परीट, सांभा- संतोष उर्फ सोन्या बराले, बसंती- महेश नांगरे, अन्य भूमिकामध्ये- दिलीप प्रभावळे, अजित नांगरे यांच्या भूमिकांना वडणगेकरांनी दाद दिली होती. अशावेळी या मंडळाला पाठबळ देण्याऱ्यात माणिक जाधव, मोहन नांगरे,रणिजत बराले, गजानन नाईक, अशोक जाधव-प्लम्बर, कृष्णात चव्हाण, दिलीप बराले, अनिल बराले, सुरेश परीट, राहूल जाधव आदी तरूणांचा पुढाकार असायचा.

चावडी गल्लीत एक गल्ली एक गणपतीची परंपरा

चावडी गल्लीत १९९१ ला नवजवान तरूण मंडळ आणि पूर्वीचे हनुमान तरूण मंडळ यांनी एकत्र येत चावडी गल्लीत हनुमान तरुण मंडळाची एकच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. विजय पाटील, चंद्रशेखर उर्फ महादेव अस्वले, महादेव पाटील-बोणे, अनिल उर्फ पिंटू पाटील, सुधीर होनखांबे सर, सुनिल अस्वले सर, शामराव पाटील, सुहास अस्वले, पंडीत अस्वले, अंकुश कदम, उत्तम कदम, पांडूरंग पाटील-बोणे, युवराज पाटील (किरूळकर) यांनी हनुमान मंडळातर्फे समाज प्रबोधन करणारे सजीव देखावे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मंडळाने सादर केलेल्या क्षणाची मजा जीवनाला सजा या एडस जनजागृती देखाव्याला करवीर पोलिसांकडून गणराया अर्वाड मिळाले आहे. याशिवाय दारूनं झपाटलं, संसारातून उठलं या व्यसनमुक्तीच्या देखाव्याला ही त्यावेळी भरभरून प्रतिसाद मिळाला होता. याच मंडळाने सादर केलेल्या महापुराचा पंचनामा हा सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा सजीव देखाव्याची आजही चर्चा केली जाते. यंदाच शुक्रवारी (ता.२२ सप्टेंबर) रोजी सादर केलेल्या भद्रकाली ताराराणी या ऐतिहासिक सजीव देखाव्याला भरभरून लोकांनी दाद दिली. महेश राजाराम पाटील यांनी साकारलेली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका दमदारपणे सादर केली. महाराणी ताराराणी यांच्या भूमिकेसाठी प्रथमच एका तरूणीला स्थान देत हनुमान मंडळाने यंदा वेगळेपण जपले. याबरोबरच स्टेजवर ऐतिहासिक नेपथ्य, सजावच आणि देख्याव्यात चक्क ताराराणींची घोड्यावरून इन्ट्री यांचे आकर्षण ठरले.

शिवाजी गल्लीतील मंडळांचा आदर्श

गणराज ग्रुप

शिवाजी गल्लीत गणराज ग्रुपने शिवपार्वती तलावात १९९४ ला प्रथमच बॅरेलचा तराफा करून निम्या तलावात पाण्यावर मंडप उभारून मोठ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. निम्या तळ्यात पाण्यावर मंडप आणि भक्तांना दर्शनासाठी तराफ्याचाच झुलता पूल वडणगे गावच्या इतिहासात प्रथमच गणराज ग्रुपने असा भन्नाट प्रयोग केला होता. पुढे काही वर्ष शिवाजीगल्लीच्या समोर तळ्यात घाटावर अनेक वर्षे पाण्यात मंडप घालून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. गणराज ग्रुपचे दिलीप महादेव जौंदाळ, नामदेव तेलवेकर, जोतीराम खवरे, राजू पाटील-हळदीकर, तानाजी तेलवेकर, जयसिंग खुर्दाळे, सुनील पोवार, संजय(काका) जौंदाळ, राजू पोवार, अनिल पोवार, बाळू खुर्दाळे आदी तरूणांनी यासाठी कष्ट घेतले.

गरीब विद्यार्थी दत्तक घेण्याची शिवसाई मंडळाची आदर्श परंपरा

शिवाजी गल्लीतील शिवसाई तरूण मंडळाने २००२ साली सुरू केलेली गरीब विद्यार्थी दत्तक योजना वडणगे गावातच नव्हे तर पंचक्रोशीत आदर्श ठरली आहे. गणेशोत्वात डामडौलाला व वायफळ खर्चाला फाटा देत मंडळाने या विद्यार्थी दत्तकबरोबरच महिलांच्यात लोकसंस्कृतीचे जतन होण्यासाठी झिम्मा-फुगडी, उखाणे स्पर्धाचे आयोजनही अखंडपर्यत केले आहे. एका वर्षी गल्लीतीलच एका लहान मुलाच्या वडिलांचे अचानक निधन झाले त्याचवर्षी या मंडळाने या मुलाचा शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचल्याची संकल्पना पुढे आली. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी ही संकल्पना शिवसाईच्या कार्यकर्यांपुढे मांडली. त्याचवर्षी या संकल्पनेला मंडळाच्या इतर कार्यकर्यांनी पाठबळ देत पहिल्याच वर्षी या विद्यार्थ्याला तीन हजारांची अर्थिक मदत केली. यातून मग दरवर्षी गणेशोत्सवाला खर्चाला फाटा देत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याची परंपरा सुरू झाली. प्राचार्य डॉ.महादेव नरके, त्यावेळचे अध्यक्ष अनिल नरके, इंजिनियर आदित्य पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, अमृत पाटील आदीं मंडळींनी ही संकल्पना सरोज आर्यनचे अजित जाधव यांना सांगितल्यानंतर त्यांनी मंडळाला काही रक्कम देवू केली. आणि मग त्यातून दरवर्षी गावातील अनेक निराधार, गरीब विद्यार्थांना शिवसाई मंडळाकडून शिक्षणासाठी दत्तक घेतले जावू लागले. गावातील गरीब गरजू मुलांची माहिती काढण्याचे काम मंडळाचेच कार्यकर्ते आणि देवी पार्वती हायस्कुलचे कृष्णात इरूडकर सर आणि प्रताप पाटील सर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. त्यांनी हुशार पण अर्थिकदृष्टया गरीब मुलांची माहिती मंडळांला द्यायची आणि मंडळाच्या कार्यर्त्यांनी एकत्र निर्णय घेत गणेशोत्सव साध्यापध्दतीने करत त्यातील रक्कम बाजुला काढत गरीब मुलांना शालेय साहित्य, वह्या, गणवेश, बॅग, बूट आदी शैक्षणिक साहित्याची मदत देण्यास सुरूवात केली. याबरोबरच या मुलांना गावातीलच डॉ.अजित देवणे यांच्याकडे मोफत औषध उपचाराचीही सोय करण्याची तरतूद केली. मंडळाच्या २१ वर्षांच्या वाटचालीत आतापर्यत ७० गरीब विद्यार्थांना शिवसाई मंडळाने दत्तक घेत त्यांची शैक्षणिक जीवन उज्वल केले आहे. या मुलांच्यातील काही विद्यार्थी स्कालरशीप आदी परीक्षेत चमकले आहेत. २१ वर्षात मंडळाने केलेले अनेक विद्यार्थी आज नामांकीत कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करत आहेत. विद्यार्थी दत्तक योजनेबरोबरच गावातील महिलांमध्ये कलागुण वाढीस लागावेत, लोकसंस्कृती सची जोपासना व्हावी, यासाठी महिलांसाठी झिम्मा-फुगडी, उखाणे स्पर्धा घेऊन गावातील महिलांना प्रोत्साहन देण्याचे कामही शिवसाई मंडळाने केले आहे. त्यांची ही परंपरा २१ वर्षे अखंडीत सुरू आहे.

शिवाजी गल्लीतील घरगुती गणपतींचे सामुहिक विर्सजन

शिवाजी गल्लीत अनंत चथुर्दशीला गल्लीतील अनेक घरगुतीचे सामुहिक विसर्जन केले जाते. ७० ते ८० वर्षापूर्वी कै. शंकर धोंडी पाटील आण्णा, कै. तुकाराम इरूडकर, कै. दत्तात्रय पाटील (डॉ.अजित पाटील यांचे आजोबा), कै, आनंदराव पाटील, विनायक नाईक-वडाम, पी.आर.पाटील आदी जेष्ठ मंडळीनी गल्लीतील घरगुती गणपती अनंत चथुर्दशी विर्सजन सुरू करण्याची परंपरा सुरू केली. प्रत्येक घरातून पूर्वी लाकडी खूर्च्या केळींच्या पानांनी, कर्दळी, ऊसाने, फुलांनी सजवून त्या सजविलेल्या खुर्च्यांमध्ये गणेशाची मूर्ती ठेवायची आणि सर्व मुर्त्यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात गल्तीतून सामुहिक मिरवणूक काढली जाते आणि तळ्यावर सामुहिक आरती केल्यावर सर्व मूर्तींचे तलावात विसर्जन केले जाते. जुन्या जाणत्या बुजुर्ग मंडळींनी सुरू केलेली गणेशोत्सवातील ही परंपरा शिवाजी गल्लीत तितक्याच जल्लोषात आजही जपली जाते.

पार्वती गल्लीतील मंडळाचा समाजप्रबोधनाचा जागर

पार्वती गल्लीत ३१ आक्टोंबर १९८४ साली उत्तम शामराव देवणे, विलास महादेव कचरे, तानाजी बराले, कै.पंडीत कचरे, कै.नानासो व्हरगे, अंकुश माजगावकर, निवास देवणे मनोहर दिंडे, आदी तरूणांनी एकत्र येत धर्मवीर संभाजीराजे तरूण मंडळाची स्थापना केली. सुरूवातीला सजीव देखाव्यांचे सादरीकरण करत मंडळाने वेगळेपण जपले. काही वर्षानंतर १९९९ ला धर्मवीर संभाजीराजे मंडळाची दोन मंडळे झाली. एक राजेसंभाजी मित्र मंडळ व राजेसंभाजी तरूण मंडळ.

राजेसंभाजी तरूण मंडळाचा समाज प्रबोधनाचा जागर

राजेसंभाजी तरूण मंडळाने कै.ईश्वरा देवणे, नंदकुमार देवणे, पंडीत बराले, निवास देवणे, हरिश तेलवेकर ,आर.बी.देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज प्रबोधन करणारे देखावे सुरू केले. या मंडळाने ऐतिहासिक, सामाजिक आणि व्यसनमुक्तीवर आधारित देखावे सादर केले आहेत. या मंडळाने सादर केलेला वीर शिवा काशिद या सादर केलेल्या ऐतिहासिक सजीव देखाव्यातील छत्रपती शिवाजी महारांजाची दिग्विजय देवणे याची भूमिका तर वीर शिवा काशिद यांची निलेश पाटील याने केलेली भूमिका त्यावेळी आकर्षण ठरली होती. याच मंडळाने छावा- स्वराज्य रक्षक संभाजी, दख्खनचा राजा जोतिबा, पावनखिंड, भक्तप्रल्हाद, रामराज्य येईल काय़ या पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्याबरोबरच सामाजिक विषयांवर अनेक सजीव देखावे सादर केले. याच मंडळाने सादक केलेल्या स्त्री जन्मा तुझी कहाणी या सामाजिक देखाव्याला गावस्तरावरील शिवसाई मंडळाच्या देखावा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता. मंडळासाठी सध्या अमर पाटील, रघुनाथ पाटील सर, संदीप पाटील, अमर टिटवे आदीचे मार्गदर्शन मिळते.

राजेसंभाजी मित्र मंडळ

विलास कचरे, अर्जून कचरे, एकनाथ कचरे, प्रकाश दिंडे, अशोक देवणे, आण्णासो पाटील आणि काही मंडळांनी राजेसंभाजी मित्र मंडळाव्दारे गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवली आहे.

कृषिराज तरूण मंडळ

शहाजी व्हरगे यांच्या दारात १९८९ च्या दरम्यान कृषिराज तरूण मंडळाची स्थापना केली. सुरूवातीला शहाजी व्हरगे, बंडोपंत पाटील, नाथाजी कचरे, कै. तानाजी शेलार, चंद्रकांत सासने, पंडित शेलार, प्रकाश कचरे, प्रकाश बराले, युवराज बराले, शहाजी बराले, सुकुमार सुतार आदींनी कृषिराज तरूण मंडळाची स्थापना केली. सुरूवातीपासून शहाजी व्हरगे यांच्या कल्पनेतून आकर्षक तांत्रिक देखावे केले.यात झुलता पूल, किंगकाॅग, डायनासोर, ड्रगन असे तांत्रिक देखावे केले. सजीव देखाव्यात २००१ साली केलेला कारगीलचे युध्द हा देखावा प्रचंड गाजला होता.या देखाव्याची स्क्रीप्ट सुकुमार सुतार यांनी लिहली होती. तर तांत्रिक बाबी शहाजी व्हरगे अगदी बारकाईने केल्या होत्या. मंडळाच्या २५ कार्यकर्तांचा संच या देखाव्यात सहभागी झाला होता. देखाव्यात खरोखरच कारगिलचे युध्द सुरू असल्याचे बघणाऱ्याला वाटत होते.

जाधव तालीम मंडळाचा मिरवणुकीत पारंपारिक बाज

जाधव मळ्यातील जाधव तालीम मंडळाने १९९६ पासून भव्य प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. जाधव तालीम मंडळाचे गणपतीत मिरवणुकीचे वेगळेपण हे वडणगेच्या गणेशोत्सवाचे आकर्षणाचा केद्रबिंदू असतो. मिरवणुकीत डाल्बीला फाटा देत पारंपरिक मिरवणूक काढण्याचे वैशिषट्ये यामंडळाने जपले आहे. मंडळाच्याच कार्यकर्त्यांचा मिरवणुकीत सहभाग असतो. मंडळाने आतापर्यत लेझीम, मर्दानी खेळ, नाशिक कुंभमेळा, लेझीम तामिळ नृत्य, सासनकाठी, सातारा बगाड यात्रा, मंजुनाथ महोत्सव, कावड यात्रा,शिमोगा महोत्सव आदी कला प्रकारातून जाधव तालीम मंडळाने पारंपरिक बाज कायम ठेवला आहे. सर्वात महत्वाचे महत्वाचे म्हणजे बाहेरून कलाकार न आणता मंडळाचेच कार्यकर्ते या सर्व कलाप्रकारात सहभागी होतात हेच जाधव तालीम मंडळाचे वैशिष्ट्ये आहे. जाधव मळ्यातील प्रमोद जाधव,पंढरीनाथ जाधव सर, जितेंद्र जाधव, चंद्रशेखर जाधव, दीपक जाधव, धनंजय जाधव, विठ्ठल जाधव, तानाजी जाधव, श्रीधर जाधव, रणजीत जाधव, गणेश जाधव, सागर जाधव, सुभाष जाधव, अमोल जाधव, मनोज जाधव, राजेंद्र जाधव, संभाजी जाधव श्रीरंग जाधव, सुनील जाधव, निलेश जाधव, वैभव जाधव आदी जेष्ठ आणि तरूण मंडळी मंडळाची परंपरा कायम सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेतात.

संयुक्त तरूण मंडळाची महाप्रसाद वाटप परंपरा

विजय हौसिंग सोसायटीत १९९० साली कै. बाबुराव बराले, रामचंद्र माजगावकर, राजाराम तेलवेकर, कै.सर्जेराव चोपडे, कै प्रकाश भोपळे, कै, बाजीराव टिटवे, कै.संजय थोरात, आनंदराव उलपे, शशिकांत नावले, विष्णू सुतार, संजय माने आदी संयुक्त तरूण मंडळाची स्थापना केली. गणेशोत्सवात लोकांना महाप्रसाद वाटप करायचा ही परंपरा संयुक्त मंडळाने वडणगे गावात सर्वात प्रथम सुरू केली. त्यानंतर इतर मंडळाने महाप्रसाद वाटप सुरू केले. सजीव देखावे काही वर्षे सादर केले. अखंड २२ वर्षे महाप्रसाद वाटप करणारे मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे.

भगवा चौक तरूण मंडळ

विजय हौसिंग सोसायटीतच १९८९ साली भगवा चौक तरूण मंडळाची स्थापना युवराज कुंभार, शिवाजी जाधव, तानाजी जाधव, दत्ता पाटील, पिटू पाटील गोरखनाथ कुंभार, सतीश जाधव, उत्तम सुतार आदी तरूणांनी एकत्र येवून केली. काही वर्षे सजीव देखावे, महाप्रसाद वाटप केले.या भगवा चौक मंडळाने केरळचे प्रसिध्द थंबल्लम हे वाद्य आणले आहे. या माध्यमातून या मंडळाने वेगळेपण जपले आहे.

शिवप्रेमी तरूण मंडळ

विजय हौसिंग सोसायटीत १९८६ साली शिवप्रेमी तरूण मंडळाची स्थापना विष्णू सुतार,दिनकर लोहार, प्रशांत जौंदाळ, विनायक देवणे, मुरलीधर पोतदार युवराज जौंदाळ प्रतिक शेलार, रवी सुतार, रघुनाथ सुतार, शुभम पाटील मोहन शेलार, मुकेश पोतदार, बबलु पाटील,केदार पाटील, प्रथमेश शिंदे, रोहित शेलार, बी.डी.चेचर, नंदू चव्हाण, महादेव चौकीकर, अविनाश चौकीकर, देवराज कचरे आदींनी केली. या मंडळाने डाल्बीला फाटा पारंपरिक वादयात गणपतीची विसर्जन मिरवणूक स्थापनेपासून काढली जाते.

साखळकर गल्लीतील शिव पार्वती तरुण मंडळ

हे मंडळ १९९० मध्ये कै. शंकर देवणे ,कै. बाजीराव साखळकर, दिलीप पाटील, अमर कुंभार, कै. संजय कुंभार, राजू शेलार दुकानदार , कुंडलिक शेलार मिस्त्री , कै. तानाजी जाधव, विलास पवळ, प्रकाश व्हरगे , उत्तम जाधव यांच्या पुढाकाराने स्थापन केले.१९९४ मध्ये श्री शिव पार्वती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ असे नामकरण केले. त्याच वर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. पौराणिक सजीव देखावा स्वर्गात आधुनिक माणूस याचे रेकॉर्डिंग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आवाजात केले होते. तांत्रिक बाबी दिलीप एकशिंगे यांनी केल्या .प्रमुख भूमिका दीपक देवणे, विजय साखळकर, दिलीप प्रभावळे , रमण देवणे यांनी सादर केल्या. त्याच वर्षी गावात पहिला महाप्रसाद या मंडळाने सुरू केला तो गेली २९ वर्षे चालू आहे.

वडणगेतील इतर मंडळे

* पंचमुखी तरूण मंडळ, पार्वती मंदिर शेजारचे शिवपार्वती मंडळ, वेताळ गल्ली मंडळ, संयुक्त इंदिरा नगर मंडळ. सासने मळा मंडळ.

वडणगेत ५० वर्षापूर्वी सुरू झालेली गणेशोत्सवाची परंपरा आज तिसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडणगेतील त्याकाळातील पिढीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. आज परिस्थिती बदलली आहे. सर्व बाबतीत डोळे दिपावणारा आजचा सार्वजनिक गणेशोत्सव पाहिला तर जुना काळ आणि आत्ताचा काळ यात नक्कीच फरक आहे. पण एका चांगल्या उद्देशाने सुरू झालेली गणेशोत्सवाची वडणगेची आदर्श परंपरा टिकविणे, जपणे प्रत्येक वडणगेकराचे कर्तृत्व आहे.

Related posts

भयमुक्त मनाने साधना करण्याची गरज

चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची सारणीः अपेडा

व्यसन कशाचे हवे ?

Leave a Comment