September 7, 2024
A woman is also a human being Ajay Kandar article
Home » स्त्री ही सुद्धा एक माणूस असते
मुक्त संवाद

स्त्री ही सुद्धा एक माणूस असते

तनिषाचा हॉटेल वरील अनुभव अंगावर काटा आणणार होता. असा अनुभव देहविक्री करणाऱ्या कुठल्याही महिलेला येऊ नये अशीच प्रार्थना कोणीही संवेदनशील माणूस करेल. देहविक्री करणारी महिला सुद्धा एक माणूस असते. याचं भान जोपर्यंत पुरुष वर्गाला येत नाही, तोपर्यंत देहविक्री करणाऱ्या महिलेशी वर्तन करताना पुरुषाकडून विकृत गोष्टी होतच राहणार आहेत. पण यातून समाज किती बधिर झालाय हे दिसून येते.

समाजाने आपली विवेक बुद्धी हरवल्यावर अजून काय घडणार? असा प्रश्न पडत राहतो. तनिषाशी बोलत असताना कुंटणखाण्याच्या आत मधल्या खोल्यांमधून अजून चार पाच मुली बाहेर कुंटणखाण्याच्या हॉल मध्ये आल्या. त्यांना पाहून तनिषा बावरली, बिथरली. तिला आमच्याशी पुढे काय बोलावं हे कळेना. तिचा चेहरा पडलेला होता. हॉटेलमध्ये आपली जी विटंबना झाली ती आपल्या सहकारी महिलांना कळेल की काय? असं तिला वाटलं असावं. त्यामुळे तिने आपल बोलणं जिथल्या तिथे थांबवलं. मग त्या मुली तिच्याच बाजूला येऊन बसल्या. जॉन भाईंनी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरवात केली.

तेव्हा त्यांच्यातील एक खट्याळ मुलगी म्हणाली, “साहेब तनिषा काय सांगत होती. आमच्या बद्दल काही तक्रार तर केली नाही ना?” त्यावर जॉन भाई म्हणाले नाही, “नाही. तनिषा कुणाबद्दल वाईटसाईट बोलणारी मुलगी नाही.”

जॉन भाईंच्या या बोलण्याचं मला आश्चर्य वाटलं. जॉन भाईना देहविक्री करणाऱ्या वस्तीमधील देहविक्री करणाऱ्या मुलींच्या स्वभावाचीपण एवढी इत्यंभूत माहिती कशी काय ? असा मला प्रश्न पडला. पण यावर एक गोष्ट लक्षात आली; ती म्हणजे जॉन भाईंनी देहविक्री करणाऱ्या महिलांची फक्त आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यांची मानसिक स्थितीही समजून घेतली होती.

अंतर्मनातून एखादा माणूस अतिशय निर्मळ असल्याशिवाय आणि जगावर प्रेम करण्याची भावना त्याच्यात असल्याशिवाय अशा ‘बदनाम वस्ती’ मधील महिलांना एवढं समजून घेणे शक्य नसते. अशा माणसाला देवदूत म्हटलं जातं. पण जॉन भाईंना देवदूत तरी कसं म्हणावं. या जगात देव असता तर अशीही ‘बदनाम वस्ती’ जगात कशी निर्माण झाली नसती. स्वतःचे शरीर विकणे हे पाप आहे की पुण्य आहे. हा प्रश्न गौण आहे किंवा देहविक्री व्यसायाला प्रतिष्ठा आहे किंवा नाही ही गोष्ट क्षणभर गौण समजू पण त्यापेक्षा वाईट म्हणजे शरीराला अनंत यातना सहन करून मनाविरुद्ध देहाची विक्री केली जाते. मग या महिलांच्या दृष्टिकोनातून जगात जर देव असता तर अशी कृती करण्याची वेळ त्यांच्यावर आलीच नसती. म्हणूनच जॉन भाई म्हणतात ते खरंच आहे की, या जगातील स्त्रीची देहविक्री ज्या वेळी बंद होईल त्याच वेळी खरतर स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून या ‘पुरुषी समाजाने ‘ स्वीकारलं अस मानता येईल.

जॉन भाई देहविक्री करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांसंदर्भात अगदी तपशीलवार विचार करायचे. हे त्यांच्या रोजच्या बोलण्यातून जाणवत होते. मी त्यांना एकदा म्हणालो, “जॉन भाई तुम्ही या महिलांसाठी किती करता. तुमच्यासारख्या व्यक्तींमुळे या देहविक्री करणाऱ्या महिलांना थोडा तरी आधार मिळतो आहे.” माझ्या या बोलण्यावर जॉन भाई शांतपणे म्हणाले, “या महिला वर्गासाठी माझ्यासारखी एखादीच व्यक्ती सेवाभावी वृत्तीने काम करून चालणार नाही; तर या कामासाठी एकाच वेळी हजारो हात पुढे यायला हवेत.” जॉन भाईंचं म्हणणं खरंच होतं. आपल्या देशात लाखोच्या पटीत देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. त्यांच्या समस्या कित्येक पटीत आहेत. त्या सोडवण्यासाठी संपूर्ण समाजाने आपल्यातील संवेदनशीलता दाखविली पाहिजे. पण ती संवेदनशीलता दाखविली जात नसल्यामुळे देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. याला सत्तेवरील राजकीय व्यक्तींची असंवेदनशीलताही कारणीभूत असते. सरकारने या महिलांच्या प्रश्नांसंदर्भात प्राधान्यक्रमच ठरवलेला नाही. हा वर्गच स्वतंत्रपणे समाजात अस्तित्वात आहे इथपर्यंतची समज सत्ताधारी वर्गाची वाढलेली नसते.

एक राजकीय व्यक्ती मुख्यमंत्री पदावर असताना त्याच्या पत्नीने देहविक्री करणाऱ्या महिलांविषयी जे वक्तव्य केले होते त्यात या देहविक्री करणाऱ्या महिलांकडे उच्चभू – श्रीमंत वर्गाची बघण्याची दृष्टी कशी संकुचित आहे हे स्पष्ट होत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या त्या पत्नीने एका कार्यक्रमात असे वक्तव्य जाहीरपणे केले होते की, “या महिला आहेत म्हणून समाज सुरक्षित आहे. या देहविक्री करणाऱ्या महिलांनी आपला देह विक्रीचा व्यवसाय निष्ठेने करावा. पैसा भरपूर त्यात कमवावा.” या त्यांच्या वक्तव्यातून माजी मुख्यमंत्र्यांच्या त्या पत्नीच्या मानसिक दारिद्र्याचाच प्रत्यय येतो. अपवाद सोडता आजच्या राजकीय व्यक्तींचे मानसिक दारिद्र्य अशाच प्रकारचे आहे.

अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वारंवार आठवण होत असते. बाबासाहेबांनी कामाठीपूरामध्येच देहविक्री करणाऱ्या महिलांची परिषद घेतली होती. तर दुसरी परिषद देहविक्री, मुरळी, जोगत्या या महिलांची मुंबई वरळी येते घेतली होती. या दोन्ही परिषदांमधून त्यांनी पुरुषांना बळी गेलेल्या या सर्वच शोषित महिलांना प्रबोधन करताना सांगितले होते की, “तुमचा स्वाभिमान गहाण ठेवून तुम्ही कोणतीच गोष्ट करू नका. देहविक्री करणे यातून स्वाभिमान संपलेला असतो. तुमच्या मुलांना, मुलींना आई आहे पण बाप नाही. त्यांनी खूप शिकलं पाहिजे. उच्चशिक्षित झालं पाहिजे. संघर्ष करून खूप मोठं व्हायला पाहिजे. तुमच्या मुली पुन्हा याच व्यवसायात आल्या तर तुमचं सारं जगणं व्यर्थ.”

बाबासाहेबांचा हा दृष्टिकोन किती महत्वाचा होता हे आजही लक्षात येते. पण ही दृष्टी आजच्या कोणत्याही राजकीय नेत्याला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल!

अजय कांडर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आशा आहे शेतकरी आत्महत्या थांबण्याची…

संसारातील अनित्यता ओळखूण त्यानुसार जीवनात बदल करणेच हाच संन्यास

ज्ञानेश्वरीतील ओव्यावर निरुपण असणारी पुस्तके

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading