November 13, 2025
जे. डी. पराडकर लिखित “आजी आजोबांच्या गोष्टी” या पुस्तकावर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व गायिका रंजना जोगळेकर यांनी व्यक्त केलेले मनोगत — नातेसंबंधातील ऊब आणि संस्कारांची कहाणी.
Home » वाचकाला बालपणाची आठवण करून देणारे पुस्तक
मुक्त संवाद

वाचकाला बालपणाची आठवण करून देणारे पुस्तक

कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी आजोबांवर भरभरून लिहिताना या प्रत्येकाच्या स्वभाव आणि गुणं वैशिष्ट्याचे, त्यांच्या मायाळू वृत्तीचे, काटेकोरपणाचे, शिस्तीचे, संस्कारांचे अनेक पैलू पराडकर यांनी अगदी सहजपणे आणि भावनाप्रधान शब्दातून उलगडल्यामुळे माझ्या मनाला कमालीचे भावले. बालपणी प्रत्येकाने केलेल्या गमतीजमती, शाळेतील शिक्षकांची शिस्त हे सारं वाचताना वाचकांना नक्कीच आपलं बालपण आठवेल.

सौ. मृणाल कुलकर्णी
अभिनेत्री

एक गोष्ट नक्की आहे की आपण आपल्या घरातल्या मुलांशी, नातवंडांची जितकं बोलू , जितका संवाद साधू , तितका आपला आणि त्यांचा एक सुंदर बंध तयार होतो. माझ्या पिढीला सुदैवाने आई वडील आणि आजी – आजोबांकडून अनेक संस्कार मिळाले. त्यांच्या निकटच्या सानिध्याने, त्यांच्या वागण्याने -बोलण्याने, किस्से सांगण्याने, कहाण्यांनी आमचे जीवन समृद्ध झाले. त्यातून घडणारे अप्रत्यक्ष संस्कार हे किती अनमोल असतात याचे वर्णनही करणे अवघड आहे. परंतु वय वाढत जाते तसे आपल्यावर पडलेल्या त्या विलक्षण प्रभावाची जाणीव अधिक गडद होत जाते. माझ्या सुदैवाने मी एका वटवृक्षाच्या छायेत जन्मले आणि वाढले. गो. नी. दांडेकर या माझ्या आजोबांनी केवळ आपल्या कुटुंबावरच नाही, तर मराठी रसिक वाचकांवरही संस्कार केले आपल्या लिखाणातून, गड किल्ल्यांच्या भटकंतीतून, आपल्या सानिध्यातून, आपल्या वाणीतून… माझ्या आई-वडिलांनी ही तोच वारसा पुढे चालवला. आमच्या सकट, असंख्य विद्यार्थ्यांना गोष्टी, कथा, कहाण्या सांगत त्यांना घडवलं. मूल्य संस्कार दिले. त्यांचे सानिध्य आम्हाला समृद्ध करून गेले.

प्रत्येक घरातले आजी आजोबा हे अनन्यसाधारण महत्त्वाचं नातं असतं. त्यांचे मायेचे हात आपल्या डोक्यावर पाठीवर फिरले की जग जिंकल्याचं समाधान मिळतं. मात्र अनेकदा आपण त्या नात्याला पारखे झालो की मगच त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि हा केवळ भारतातच नाही तर जगातल्या प्रत्येक देशातला अनुभव आहे. अनेक नामवंतांनी आपल्या आजोळ बद्दल आजी-आजोबा बद्दल भरभरून लिहिलेलं आहे.

नातवंडांना आपल्या कुशीत घेऊन गोष्टी सांगणारे आजी आजोबा हे एकेकाळी घराघरातून दिसणारं दृश्य विविध कारणांमुळे काहीसं दुर्मिळ झालंय हे खरं आहे. परंतु मुलांवर बालपणी खरे संस्कार कोणाकडून केले जात असतील, तर आई नंतर नाव घ्यावं लागेल ते आजी आजोबांचेच. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या नातवंडांना वळण लावताना अथवा त्यांच्यावर संस्कार करताना आजी आजोबांना देखील आपलं बालपण आठवतं. नातवंड असोत अथवा आजी-आजोबा एकाच वयाचे होऊन खेळ आणि मजा मस्ती करण्यात दंग होऊन जातात. या वातावरणामुळे घरात गोकुळ फुलल्याचा आनंद प्रत्येकालाच घेता येतो. जरा काही मनाविरुद्ध झालं, तर तक्रार करण्याची नातवंडांची हक्काची जागा म्हणजे आजी आजोबा. टक्के टोणपे खाऊन, अनुभवाची शिदोरी भरगच्च भरल्यामुळे आजी आजोबा हे घरातील एक निर्णयाचे स्थान झालेले असते. त्यांचा शब्द हा घरात अंतिम समजला जातो. अडचणी आणि संकटांना कसे तोंड द्यायचे, याच्यासाठी त्यांच्याकडे नक्कीच संयमाचा मार्ग असतो. म्हणूनच आजी आजोबा हा नातवंडांसह घरातील प्रत्येक सदस्याचा ‘ हळवा कोपरा ’ बनलेले असतात.

कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी आजोबांवर भरभरून लिहिताना या प्रत्येकाच्या स्वभाव आणि गुणं वैशिष्ट्याचे, त्यांच्या मायाळू वृत्तीचे, काटेकोरपणाचे, शिस्तीचे, संस्कारांचे अनेक पैलू पराडकर यांनी अगदी सहजपणे आणि भावनाप्रधान शब्दातून उलगडल्यामुळे माझ्या मनाला कमालीचे भावले. बालपणी प्रत्येकाने केलेल्या गमतीजमती, शाळेतील शिक्षकांची शिस्त हे सारं वाचताना वाचकांना नक्कीच आपलं बालपण आठवेल.

बालपणी प्रत्येकाने आपल्या आजोळी जाऊन केलेली मज्जा वाचत असताना मामाचं गाव डोळ्यासमोर उभं राहत. आजोळचं सारं वैभव वाचताना आजची पिढी या आनंदाला पारखी होतेय असं वाटू लागतं. प्रत्येक विवाहित स्त्रीचे माहेर , हे तिच्या मुलांचे आजोळ असले, तरी माहेर ही संकल्पना प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी आनंददायी असते. माहेरी जाण्याची परवानगी मिळाली, की त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर फुलणाऱ्या आनंदाचे वर्णन करायला शब्दही कमी पडतील. माहेरी जाऊन आल्यानंतर प्रत्येक स्त्री येताना खूप मोठी ऊर्जा घेऊन परतत असते. माहेरचे सुंदर वर्णन पराडकर यांनी केले आहे.

घरातील आजी आणि आजोबा ही दोन व्यक्तिमत्व कशी असतात ? याचं वर्णन वाचताना आपल्याला आपलेच आजी आजोबा आठवू लागतात. आजी आणि आजोबा एकमेकांची मनं कशी ओळखतात ? ही दोन्ही व्यक्तिमत्व ‘ मेड फॉर इच अदर ’ म्हणजे एकमेकांसाठीच बनलेली असल्याने एकमेकांच्या मनातलं ओळखणं त्यांना सहज शक्य होत असतं. लेखकाला बालपणी व्यक्तीश: आजोबांचे प्रेम मिळालेले नसतानाही, त्यांनी आजोबा या व्यक्तिमत्त्वावर मांडलेले विचार वाचकांना नक्कीच अंतर्मुख व्हायला लावणारे आहेत.

राजश्री आजीने आपल्या नातवावर केलेले संस्कार, सध्याच्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहेत. मुलं मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवत नाहीत, या तक्रारीला छेद देणारी राजश्री आजीची कथा बोध घेण्यासारखे आहे. कडबोळी हा पदार्थ सर्वांनाच आवडणार आहे. आजीच्या हातची कडबोळी किती चविष्ट आणि खुसखुशीत होती, हे सारे वर्णन करताना लेखकाचे आजी वरील निस्सीम प्रेम दिसून येते. लाडू आजी या कथेतील आजीचे वर्णन म्हणजे एक संघर्षमय प्रवास आहे. अकाली वैधव्य आल्यानंतर एखादी स्त्री स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साऱ्या परिस्थितीचा जिद्दीने कसा सामना करते, याचं भावनिक वर्णन पराडकर यांनी केलं आहे.

आजी आजोबांच्या गोष्टी या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्या समोरील अवघड परिस्थितीला तोंड देत कसं यशस्वी होऊ शकलं, याचं सुंदर वर्णन करताना पराडकर यांनी प्रत्येक व्यक्तिमत्वातील विशिष्ट गुण हेरले आहेत. या व्यक्तिमत्त्वांनी नकळत आपल्यावरही संस्कार केले हे सांगण्याचा मोठेपणा लेखकाने वेळोवेळी दाखवला आहे. या सर्वच व्यक्तिमत्त्वांचे वर्णन करताना पराडकर यांची भाषाशैली साधी – सरळ आणि सोपी आहे. हे पुस्तक वाचत असताना यातील प्रत्येक व्यक्तिमत्वाला आपण भेटलो आहोत अथवा ही व्यक्तिमत्व आपल्याच नात्यातील आहेत , असं वाचकांना नक्कीच वाटत राहील. चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी लेखक जे. डी. पराडकर यांची कोकणच्या विविध विषयांवर सलग आठ पुस्तकं प्रकाशित केली आहेत. “ आजी आजोबांच्या गोष्टी ” हे थोडं वेगळ्या विषयावरच पुस्तक आहे. याबद्दल संपादक घनश्याम पाटील आणि लेखक जे. डी. पराडकर यांचे मनापासून अभिनंदन ! अशाच वेगवेगळ्या विषयांवरील लेखनासाठी खूप शुभेच्छा !!

पाठराखण…

नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी मुलांना बालपणीच साऱ्या नात्यांचे महत्त्व सांगणं गरजेचं आहे . एकत्र कुटुंब पद्धती कालांतराने मर्यादित कुटुंब पद्धती बनल्याने, आता सारी नाती उलगडून सांगण्याची वेळ आली आहे. मोबाईलसह विविध कारणांमुळे परस्परातील संवाद हरवला आहे. बालपणी नातवंडांना गोष्टी सांगून विविध संस्कार करणाऱ्या आजी आजोबांचे घरातील स्थान एका मार्गदर्शकाचं होतं . अनेक घरातून आता विविध कारणांमुळे कुटुंब विभक्त होत आहेत. परिणामी नातवंडांना आजी आजोबांचं प्रेम मिळणं आणि आजी आजोबांना नातवंडांचे प्रेम मिळणं यामध्ये थोडी दरी निर्माण झाली आहे. हे सारं लक्षात घेऊन कोकणचे लेखक जे. डी. पराडकर यांनी लिहिलेले " आजी आजोबांच्या गोष्टी " हे पुस्तक म्हणजे, नातवंड आणि आजी आजोबा यासह सर्वच नात्यातील वीण घट्ट करणारे ठरेल. या पुस्तकातील भाषाशैली सहज सुंदर, ओघवती आणि प्रवाही असल्यामुळे छोट्या मुलांना देखील सहजपणे समजू शकेल. या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीमत्व वाचकाला काही ना काहीतरी शिकवून जाते. या प्रत्येक व्यक्तिमत्वाला आपण पूर्वी कधीतरी भेटलो आहोत, असा आनंद जे. डी. पराडकर यांच्या लेखनातून अनुभवायला मिळतो.

नातं ही संकल्पना सर्वार्थाने आनंददायी आहे. बालपणी मुलांसमोर नात्यातील पैलू उलगडले गेले, की नातं वृद्धिंगत होण्यास मदत होते. बालपणी मुलांना गोष्ट म्हटलं की , आठवतात ते आजी आजोबा ! लेखक जे. डी. पराडकर यांनी आजी आजोबांच्या गोष्टी या पुस्तकात ज्या व्यक्तिमत्त्वावर लिहिले आहे, ती सर्वच अत्यंत प्रेरणादायी आहेत. मुलांसह घरातील प्रत्येकाने ही सारी व्यक्तिमत्व वाचावीत आणि त्यातून आपल्या नात्यांचा शोध घ्यावा असं काळजाला भिडणारे लेखन पराडकर यांनी केलं आहे. या पुस्तकाची निर्मिती करणारे चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील आणि लेखक जे. डी. पराडकर यांना मनापासून शुभेच्छा !

सौ. रंजना जोगळेकर
गायिका

▪️ पुस्तकाचे नाव – आजी आजोबांच्या गोष्टी
▪️ लेखक – जे. डी. पराडकर
▪️ प्रकाशक – लाडोबा प्रकाशन पुणे
▪️ पृष्ठ संख्या – १००
▪️ मुखपृष्ठ – हेमंत सावंत
▪️ पुस्तक मागविण्यासाठी संपर्क – चपराक प्रकाशन ७०५७२९२०९२


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading