October 6, 2024
Andro Dreams in 54 th international film festival
Home » Privacy Policy » अडचणी आणि रुढीवाद यांच्याशी लढा देत केवळ मुलींसाठीचा फुटबॉल क्लब चालवणाऱ्या महिलेची कथा
गप्पा-टप्पा

अडचणी आणि रुढीवाद यांच्याशी लढा देत केवळ मुलींसाठीचा फुटबॉल क्लब चालवणाऱ्या महिलेची कथा

‘अँड्रो ड्रीम्स’ या मणिपुरी चित्रपटाच्या सादरीकरणाने 54 व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर विभागातील चित्रपटांच्या प्रदर्शनाला प्रारंभ

लैबी फान्जोबाम ही साठ वर्षांची महिला मणिपूर या ईशान्येकडील राज्यातील अँड्रो या दुर्गम खेडेगावात हातमाग आणि विणकामाचे दुकान चालवते. वरवर पाहता ही एक अत्यंत सामान्य कथा वाटते. मात्र लैबी फान्जोबाम ही साधीसुधी स्त्री नाही. ती तिच्या प्राचीन गावातील कठोर पितृसत्ताक सामाजिक व्यवस्था, आर्थिक अडचणी आणि रुढीवाद यांच्याशी लढा देत केवळ मुलींसाठीचा फुटबॉल क्लब चालवते.  

तिच्या या अनोख्या आणि आदर्शवत कहाणीबाबत एका छोट्याश्या वृत्तपत्रात छापून आलेल्या लेखावर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मीना लाँगजॅम यांची नजर पडली आणि त्यांनी ही कहाणी ‘अँड्रो ड्रीम्स’ या नावाने चंदेरी पडद्यावर सादर केली. हा माहितीपट म्हणजे लैबी ही उत्साही मनाची वृद्धा आणि तिचा तीन दशकांपासून सुरु असलेला ‘अँड्रो महिला मंडळ फुटबॉल क्लब संघटना (एएमएमए-एफसी) हा केवळ मुलींसाठी असलेला फुटबॉल क्लब यांची गोष्ट सांगतो. हा चित्रपट या सर्वांसमोर उभी ठाकणारी आव्हाने आणि त्यांच्या क्लबमधील लक्षवेधी खेळ खेळणारी तरुण फुटबॉल खेळाडू निर्मला हिच्या संघर्षाचे दर्शन घडवतो.

‘अँड्रो ड्रीम्स’ या 63 मिनिटांच्या चित्रपटीय इतिवृत्ताने 54व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ केला. या प्रायोगिक माहितीपटाच्या निर्मितीची धुरा महिला दिग्दर्शक, महिला निर्माती आणि महिला कलाकार यांच्या त्रिमूर्तीने सांभाळली आहे.  

लैबी फान्जोबाम हिच्या प्रेरक कहाणीबद्दल बोलताना दिग्दर्शिका लाँगजॅम यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की लैबी ही तिच्या कुटुंबातील चौथी आणि बहुतांश वेळा दुर्लक्षित राहिलेली मुलगी आहे. मात्र, या सर्व विपरीत परिस्थितीशी झगडून ती तिच्या गावातून मॅट्रिक होणारी पहिली महिला ठरली आणि प्राथमिक शिक्षिका झाली. तिने तिच्या गावात हातमाग आणि विणकामाचे दुकान सुरु केले आहे.

चित्रपटातील प्रमुख पात्र साकारणाऱ्या लैबी फान्जोबाम यांनी या माहितीपटाच्या निर्मितीबद्दल आनंद व्यक्त केला. या चित्रपटाने तिचे वास्तव आणि संघर्ष यांचे दर्शन जगाला घडवून तिचा गौरव केला..

गोवा येथे आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात बोलताना दिग्दर्शिका लाँगजॅम म्हणाल्या, “हा चित्रपट म्हणजे मणिपूरच्या लोकांच्या कोणी कधी ऐकून न घेतलेल्या आणि इतर माध्यमांमध्ये प्रतिनिधित्व न मिळू शकलेली कथा आहे.” त्या पुढे म्हणाल्या की त्यांचा हा अपघाती दिग्दर्शकीय प्रकल्प म्हणजे मुख्य माध्यमांमध्ये धूसरपणे दिसणाऱ्या मणिपुरी लोकांच्या जीवनाचे दर्शन घडवण्यासाठीचा प्रयत्न होता. ‘अँड्रो ड्रीम्स’ हा चित्रपट सर्व विरोधी घटकांशी लढा देत असलेल्या लैबी आणि तिच्या फुटबॉल क्लबमधील मुली यांच्या वास्तव जीवनाचे चित्रण करतो,” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिग्दर्शिका म्हणाल्या.

माहितीपट निर्मितीच्या शैलीबद्दल बोलताना लाँगजॅम यांनी विस्तृतपणे सांगितले की, “माहितीपट तयार करणे म्हणजे त्यातील विषयाशी दीर्घकालीन नाते जोडण्यासारखे असते आणि याचा आवाका केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित नसतो.” मीना लाँगजॅम या चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सुविख्यात व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना याआधी निर्मिलेल्या ‘ऑटो ड्रायव्हर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच मणिपुरी महिला ठरल्या आहेत.

‘अँड्रो ड्रीम्स’ या चित्रपटाच्या कार्यकारी संचालक जानी विश्वनाथ यांनी अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी निधी देण्यामागे असलेल्या प्रेरक शक्तीबद्दल बोलताना सांगितले, “महिला या समाजाच्या “मूक आधारस्तंभ” आहेत आणि मी अशा अधिकाधिक महिलांना समाजासमोर आणून त्यांना आवश्यक संधी उपलब्ध करून देणार आहे. मला अशा कुशल मात्र निधीचा अभाव असणाऱ्या अतुलनीय प्रतिभांना प्रोत्साहन देऊन, चालना देऊन मदत करायची आहे.”

इफ्फीमध्ये चित्रपट रसिकांना अत्युत्कृष्ट चित्रपटाशी संबंधित आनंदाचा अनुभव देणाऱ्या भारतीय पॅनोरमा विभागामधील फीचर प्रकारच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा प्रारंभ ‘आत्तम’ या मल्याळी चित्रपटाने तर नॉन-फीचर प्रकारच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा प्रारंभ ‘अँड्रो ड्रीम्स’ या मणिपुरी चित्रपटाने झाला. दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित 54 व्या इफ्फीमध्ये यावर्षी 25 फीचर आणि 20 नॉन-फीचर चित्रपट दाखवले जाणार आहेत.

चित्रपट कलेच्या मदतीने भारताची समृध्द संस्कृती आणि वारसा यांच्यासह भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ष 1978 मध्ये इफ्फीच्या छत्राखाली भारतीय पॅनोरमा विभागाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच, भारतीय चित्रपट विभाग वर्षभरातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्याप्रती समर्पित राहिला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading