क्षणाक्षणाला हिंदुत्व दाखविणारे दंडुके, ‘मिशी’- ‘धारी ‘ आहेत कुठे ?
आपल्या इतिहासाकडून आपण काय शिकायचं असतं, हे ज्या सत्ताधाऱ्याना माहीत नसतं त्यांना इतिहास म्हणजे फक्त महाराजांच्या नावाने घोषणाच देणे माहीत असतं. त्यांना पुतळा उभारण्यामागची खरी सचोटी कशी कळणार ? मग ‘टिकली की कुंकू ‘ यावरून क्षणाक्षणाला हिंदुत्व दाखविणारे दंडुके, ‘मिशी’- ‘धारी ‘ महाराजांचा पुतळा कोसळला, तरी आपली सोयीस्कर भूमिका घेऊन अशाच सत्ताधाऱ्यांचे मांडलिक होऊन गप्प बसणे पसंत करत असतात.
अजय कांडर
मोबाईल – ९४०४३९५१५५
टिकली की कुंकू यावरून क्षणाक्षणाला हिंदुत्व दाखवून देणारे सद्या कुठे आहेत ? शिवाजी महाराज, संभाजी राजे यांच्या विचारांचा वारसा आपणच चालवत आहोत, असे सोयीनुसार बोलणारे ‘दंडुके, ‘मिशी’- ‘धारी ‘ यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी एक अवाक्षरही जाहीरपणे उच्चारल्याची वार्ता कुठे ऐकू आली नाही. त्यामुळे हे गेलेत कुठे ? असा सवाल आता उपस्थित होत असून सिलेक्टिव्ह घटनांमध्येच ते उभे राहतात का ? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर प्रामुख्याने सत्ताधारी व्यवस्थेने खोटं बोलण्याची जी शोभा केली ती आता पुरे झाली आहे. किमान यापुढे तरी जनतेच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या अशा विषयात गांभीर्य राखून कृती करावी एवढीच माफक अपेक्षा आहे.
विचारांचा वारसा चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्ती एका पक्षाच्या नसतात. किंवा त्या कोणत्या एका नेत्याच्या इशाऱ्यावर आपली कृती करत नसतात. त्यांची स्वतंत्रदृष्टी विकसित झालेली असते. म्हणूनच ते शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा अलौकिक पुरुषांचा किंवा महामानवांचा विचार घेऊन समाजाचे प्रबोधन करत असतात. मात्र अलिकडे सोयीनुसार आपली नावे बदलून आपण कुणाची ‘भिड’ भाड’ ठेवत नाही, अशा ‘मनोहरी’ तोऱ्यात वावरणारे काही शिवभक्त दिसतात. मात्र ही ‘भिड’ ‘भाड ‘ विशिष्ट जातीच्या आणि चुकीच्या धर्म अस्मितेच्या आडून यायला लागली,की या सगळ्यांमध्ये काही पाणी मूर्त आहे, अशी शंका घ्यायला वाव मिळतो.
मालवण राजकोट किल्ल्याजवळ उभारलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काही दिवसात कोसळला. संपूर्ण महाराष्ट्रभर या विरोधात सर्व जनतेतून संताप व्यक्त करण्यात आला. प्रसंगी खोटं बोलून सत्ताधारी व्यवस्थेने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तरीही उठसुट शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं नाव घेणाऱ्या काही लोकांनी मात्र यावर सोईस्कर मौन बाळगलं. यात आश्चर्य काहीच नाही. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न घेऊन लढत राहिले आणि ते यशस्वी ही झाले; परंतु त्यांनी कधीच कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा द्वेष केला नाही. अठरापगड जातीचे वेगवेगळ्या धर्माचे मावळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे होते. प्रसंगी या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिले. याचं कारण त्यांच्यासमोर आदर्श होती ती शिवाजी महाराजांची सर्व जाती- धर्मातील माणसावरची निष्ठा. परधर्मातील स्त्रीला आपल्या मातेसमान समजणारा हा राजा हे जग असेपर्यंत आदर्श तर असेलच; परंतु महाराजांची प्रत्येक कृती त्यांच्या वागणुकीनुसारच आपण अंमलात आणणे म्हणजेच शिवभक्त होणे हे मात्र आपण सोयीस्कर विसरून गेलो आहोत.
फक्त घोषणा देऊन, धर्माधर्मामध्ये द्वेष माजवून, धर्माच्या नावाखाली अस्मितेची धुळवड उडवून शिवभक्ती जागृत होत नाही. तर प्रसंगी कठोर वागून ‘ धर्म हाच राष्ट्रवाद ‘ ही संकल्पना न मानता माणसामाणसांमध्ये संवाद कसा घडेल याची प्रत्यक्ष कृती करणे म्हणजे शिवभक्त होणे होय! पण आज असे विचारशील शिवभक्त मावळे बहुसंख्येने दिसत नाहीत. जात धर्म विसरून निव्वळ माणसांवर प्रेम करतात, तेच खरे आजचे मावळे आहेत. कारण महाराजांनी धर्मावर नाही तर माणसावर प्रेम करायला शिकवले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले,” पुतळा वाऱ्यामुळे कोसळला.”खरं तर हा विनोद आहे.कोणत्याही पक्षाचं सरकार सत्तेवर येऊ दे,असे विनोद सत्ताधारी आपल्यावर वेळ येते तेव्हा करतच असतात. त्यातही निवडणूक जवळ असेल, तर अशा विनोदाला अधिक धार चढत जाते; पण अशी वक्तव्य करताना आपण जनतेचा विश्वास गमावत असतो याचे भान मात्र त्यांना राहत नाही. जेव्हा कोणताही भ्रष्टाचार न करता पुतळे उभारले जातात तेव्हा ते कोणत्याही नैसर्गिक संकटात ही उभे असतात. जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी बनवलेला गुजरात नर्मदा तीरावरील जगातील सर्वात उंच समजला जाणारा १८२ मीटर उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हे याचे उत्तम उदाहरण आहे.
आपली वेळ येते तेव्हा राजकारण करू नका असे सांगितले जाते. आजच्या सत्ताधाऱ्यांनी पुतळ्याप्रकरणी हेच केले. पण राजकारण तर प्रत्येक गोष्टीत असतेच. उलट सकारात्मक राजकारण केले तर अधिक विश्वास संपादन करता येतो.या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी या राज्याचा प्रमुख म्हणून लागलीच जनतेची माफी मागितली असती आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे घोषित केले असते तर त्यांनी आपली शिवभक्तीच दाखवून दिली असती आणि त्यातून थोडा का होईना विश्वास तरी संपादन केला असता.पण नुसती बोलाची कढी आणि बोलाचाच भात.
आजवर महाराष्ट्रातच नव्हे तर इतरही ठिकाणी महाराजांचे अनेक पुतळे उभारले गेले;परंतु त्यातील एकही पुतळा साध्या वाऱ्यानेच काय मोठमोठ्या वादळांनीही खाली पडला नाही किंवा अर्धवट तुटला नाही. ही पहिलीच घटना आहे, की शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा तुटला आणि तोही उभारल्यानंतर काही महिन्यात. 1922 साली छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झालं. त्यानंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या बंगल्याच्या आवारातच पुणे येथे शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले. 17 टन वजनाचा हा पुतळा मुंबईवरून बनवून पुण्याला आणण्यात आला. पुतळा आणायला अपार कष्ट पडले. एका हातात तलवार घेऊन घोड्यावर बसलेले महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेनंतरच्या कालखंडातील ध्येयपूर्तीचे समाधान चेहऱ्यावर दर्शविणारी या पुतळ्याची भाव मुद्रा आहे. अजूनही हा पुतळा सुस्थितीत असून तो ऊन, वारा,पाऊस झेलत डौलात उभा आहे. आपण आपल्या इतिहासाकडून काय शिकायचं असतं तर हे. पण ज्यांना इतिहास म्हणजे फक्त महाराजांच्या नावाने घोषणाच देणे माहीत असतं, त्यांना पुतळा उभारताना त्यामागची खरी सचोटी अशी असते हे कसे कळणार?
( लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार आहेत. )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.