जयसिंगपूर : शेतकऱ्यांचे साहित्य निर्माण झाले तरच शेतीच्या प्रश्नांना वाचा फुटेल यासारखे अनेक उद्देश ठेवून शेतकरी साहित्य संमेलन भरवले जाते. शेतकरी व शेती संदर्भात चर्चा घडवून आणणारे असे हे १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याच्या जयसिंगपूरमध्ये होत आहे. हे संमेलन भरविण्याचा मान शरद कृषी विद्यापीठ व यड्रावकर शिक्षण व उद्योग समूहाला मिळाला आहे.
आठ व नऊ फेब्रुवारी २०२५ रोजी जयसिंगपूर येथील सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये दोन दिवसाचे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचे साहित्य संमेलन व्हावे यासाठीची मागणी या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे व संयोजक मुंबई हायकोर्टातील विधिज्ञ सतीश बोरुलकर यांनी केली होती. त्या अनुषंगाने आपण हे संमेलन भरवत आहोत असे यड्रावकर म्हणाले. या संमेलनाच्या माध्यमातून दोन दिवस केवळ शेती आणि शेतकरी यांच्या संदर्भातील परिसंवाद, चर्चासत्रे, प्रबोधनपर व्याख्यान, महाराष्ट्राच्या शेतीची सद्यस्थिती, कवी संमेलन अशा प्रकारचे विविध कार्यक्रम पार पडणार असून यामध्ये विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील अनेक मान्यवर शेतकरी व शेती तज्ञ सहभागी होणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रासाठी हे संमेलन मार्गदर्शक ठरेल, यापूर्वी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून २०१५ पासून अशा प्रकारच्या संमेलनाची सुरुवात झाली असून आजपर्यंत अकरा शेतकरी साहित्य संमेलने पार पडली आहेत. या बाराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.