June 19, 2024
Shivaji Jadhav article on Chat GPT
Home » चॅट जीपीटीचे तूफान !
संशोधन आणि तंत्रज्ञान

चॅट जीपीटीचे तूफान !

चॅट जीपीटी परिपूर्ण नाही. माहिती मिळविण्यासाठी त्याची मदत नक्की होते. पण ही माहिती खरी की खोटी याची जबाबदारी चॅट जीपीटी घेत नाही किंवा मशीनकडे माहितीची सत्यता तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे चॅट जीपीटीतून आलेली माहिती खरीच असेल, असे मानणे अडाणीपणा ठरेल.

शिवाजी जाधव,
डॉ. ग. गो. जाधव अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

चॅट जीपीटीने जगभर धुमाकूळ घातला आहे. जानेवारी 2023 पासून रोज 1 कोटी 30 लाख युजर्स चॅट जीपीटीचा ग्राहक होत आहे. ही आकडेवारी नुसतीच अचंबित करणारी नाही तर गुगल आणि मेटासारख्या कंपन्यांना थेट आव्हान देणारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा केवळ एक अविष्कार नसून जगातील बलाढ्य-धनाढ्य अ‍ॅलन मस्क आणि बिल गेट्स यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू आहे, ही यातील नोंद घेण्याची बाब आहे. अगामी काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. काहीही असले तरी माणसाला प्रथमच माणसासारखा विचार करणार्‍या प्रोग्रामने थेट आव्हान दिले आहे आणि हे आव्हान येत्या काळात आणखी खडतर होत जाणार आहे.

सध्या जगभर चॅट जीपीटीची चर्चा सुरू आहे. प्रचंड वेगाने डाऊनलोड होणारे आणि गुगलला पर्याय मानले जाणारे चॅट जीपीटी अनेकांच्या अभ्यासाचा, संशोधनाचा आणि कुतूहलाचा विषय बनले आहे. चॅट जीपीटी हे एक नैसर्गिक भाषा प्रक्रिया मॉडेल आहे. ओपन एआयने हे मॉडेल जून 2020 मध्ये विकसित केले. जीपीटी म्हणजे जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. या विषयावरील मूळ शोधनिबंध 2018 मध्ये प्रकाशित झाला होता. हे मॉडेल व्यवहारात येण्यापूर्वी आणि कोट्यवधी युजर्सनी डाऊनलोड करण्यापूर्वी ते संशोधन प्रकाशित झाले होते. ‘जनरेटिव्ह प्रीट्रेनिंगद्वारे भाषेची समज सुधारणे’ या आशयाचा हे संशोधन अद्यापही ओपन एआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अ‍ॅलेक रॅडफोर्ड, कार्तिक नरसिंहन, टीम सलिमन्स आणि इल्सा सुत्स्केव्हर आदींचे हे संशोधन प्रकाशित झाल्यानंतर या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे जगभरातील संशोधकांचे लक्ष वेधले गेले. याच संशोधनाचा आधार घेऊन आता जगभरातील विविध संशोधक काम करत आहेत. हे संशोधन मूलतः भाषेसंदर्भात आहे. नैसर्गिक भाषेच्या आकलनामध्ये विविध प्रकारच्या कार्यांचा समावेश होतो. यामध्ये मजकुर एकमेकांना जोडणे, प्रश्नांना उत्तरे देणे, अर्थ लावणे, अर्थाची समानता सर्व पातळ्यांवर तशीच टिकवून ठेवणे शिवाय भाषेतील मजकुराचे दस्तऐवजीकरण आणि वर्गीकरण अशा अनेक प्रकारच्या कार्यांचा यामध्ये समावेश करता येतो. मार्किंग न केलेला किंवा कोणतेही लेबल न लावलेला प्रचंड मजकूर इतस्ततः विखुरलेला आहे. असा विखुरलेला तसेच लेबल असलेला म्हणजेच मार्किंग केलेला मजकूर जनरेटिव्ह प्रीट्रेनिंगद्वारे अभ्यासला गेला. यासाठी संशोधकांनी 71 संदर्भ वापरले. हेच संशोधन पुढे ओपन एआयने चॅट जीपीटीच्या रूपात बाजारात आणले आणि आता ते तुफान लोकप्रिय होत आहे.

चॅट जीपीटी हे ‘जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर-3’ वर बेतलेले आहे. यापूर्वी ओपन आयने याच्या काही आवृत्त्या जारी केल्या. परंतु जीपीटी-3 ही सर्वात अलिकडची आणि प्रगत आवृत्ती आहे. नैसर्गिक भाषेबद्दलचे हे मॉडेल असले तरी ते संवादात्मक स्वरूपाचे आहे. यामध्ये डीप लर्निंग अल्गोरिदम वापरण्यात आला आहे. मानवासारखा प्रतिसाद देण्यासाठी त्याला तयार करण्यात आले आहे. माणूस जसा विविध विषयांवर संभाषण करतो, तशा पद्धतीने मशीन प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, अशी चॅट जीपीटीची रचना केली आहे. ते बहुतेक करून मोठ्या प्रमाणात टेक्स्ट डेटावर प्रक्रिया करते. डीप न्यूरल नेटवर्कचा वापर करून टेक्स्ट डेटासोबत चॅट जीपीटी काम करते. प्रश्न दिल्यानंतर हे मॉडेल इनपुटवर प्रक्रिया करणे सुरू करते. त्याच्याकडील मेमरीतून विचारलेली संबंधित माहिती निवडली जाते आणि त्यानंतर माहितीवर आधारित प्रतिसाद तयार केला जातो. प्रश्न आल्यापासून उत्तर मिळेपर्यंत अनेक टप्प्यातून जीपीटीचा प्रवास होतो. माहितीच्या महाजालातून नेमकी माहिती शोधणे, तिचे वर्गीकरण करणे आणि अनुक्रम लावणे आणि त्यातून नेमकी माहिती प्रश्नकर्त्यांपर्यंत पोहोचवणे ही अत्यंत किचकट प्रक्रिया विविध टप्प्यांतून जाते.

जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मरमध्ये चॅटबॉटचा वापर केल्यानंतर यामधील रंगत वाढली. चॅटबॉट हा संगणक प्रोग्राम आहे. तो मानवी वापरकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी तयार केला गेला आहे. विशेषतः इंटरनेटवरील संभाषणाचे किंवा प्रश्न उत्तराच्या स्वरूपाच्या माहितीचे अनुकरण वा सादरीकरण करण्यासाठी तो डिझाईन केला आहे. याचा वापर ग्राहकांना सेवा देण्यासाठी केला जातो. माहितीचा पुनर्वापर किंवा माहिती देण्यासाठी तसेच इतर अन्य सामायिक उपयोगासाठी त्याचा उपयोग होतो. विविध वेबसाईट्स, मेसेजिंग प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अ‍ॅप्समध्ये चॅटबॉट एकत्रित केले जाऊ शकतात. वापरकर्त्याने विचारलेली माहिती समजून घेण्यासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदमचा उपयोग केला जातो. मानवी हस्तक्षेपाशिवाय वापरकर्त्यांना जलद, अचूक आणि स्वयंचलित माहिती उपलब्ध करून देण्याचे चॅटबॉटचे मुख्य ध्येय आहे. वापरकर्त्यांना तातडीने उपयुक्त माहिती पुरविण्यासाठी त्याची निर्मिती झाली. ही सुविधा ओपन आयने 2020 पासून उपलब्ध करून दिल्याने आता चॅट जीपीटीवर युजर्सच्या उड्या पडू लागल्या आहेत.

ओपन एआय या संस्थेने चॅट जीपीटी हे अपत्य आहे. हे आणि अशी आणखी काही अपत्ये जन्माला यावीत यासाठी मायक्रोसॉफ्टने पुढाकार घेतला आहे, ही बाब या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखी आहे. बिल गेट्स आणि पॉल अ‍ॅलन यांनी 1975 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली. ही कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांत गणली जाते. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमसह हार्डवेअर आणि अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात कंपनीने प्रचंड गुंतवणूक केली आहे. ओपन एआयसोबत सध्या मायक्रोसॉफ्ट काम करत आहे. चॅट जीपीटीसह अनेक प्रकारच्या भाषा मॉडेल्सवर मायक्रोसॉफ्ट ओपन एआयसोबत माहिती शेअर करते. जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मरचे मॉडेल विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने ओपन एआयला नुसतीच आर्थिक मदत केली नाही तर सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. दोन्ही कंपन्या संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी एकत्र काम करत आहेत. जगातील मोठ्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही, असे या दोन्ही कंपन्यांचे मत आहे. त्या दृष्टीने संशोधन सुरू असून चॅट जीपीटी हा अशाच एका संशोधनाचे फलित आहे.

ओपन एआय आणि मायक्रासॉफ्ट यांच्यातील संबंध नीट समजून घ्यायचे असतील तर ओपन एआय कंपनी कोणाची आहे, ते समजून घेणे आवश्यक आहे. ओपन एआय ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा आहे. जगातील गर्भश्रीमंताच्या यादीत असणार्‍या अ‍ॅलन मस्क यांच्या मालकीची ही कंपनी आहे. डिसेंबर 2015 मध्ये कृत्रिम बुुद्धिमत्तेवर संशोधन करण्यासाठी तिची स्थापना झाली. संपूर्ण मानवतेला फायदा होईल अशा पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल, याचे संशोधन करण्याचे या प्रयोगशाळेचे उद्दीष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निमित्ताने जगातील दोन अत्यंत शक्तीशाली उद्योजक-व्यापारी अ‍ॅलन मस्क आणि बिल गेट्स एकत्र आले आहेत, ही बाब जगाने नोंद घेण्यासारखी आहे.

चॅट जीपीटीला जगभरातील लोक वेड्यासारखे डाऊनलोड करून घेत आहेत. जगात सर्वात झपाट्याने डाऊनलोड झालेले हे अ‍ॅप आहे. 10 कोटी युजर्सचा टप्पा गाठण्यासाठी इस्टाग्रामला अडीच वर्षे लागली. सध्याच्या घडीला इस्टाग्राम सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म मानला जात आहे. दुसर्‍या बाजूला टिकटॉकला 10 कोटी युजर्सपर्यंत जायला 9 महिने लागले. चॅट जीपीटी मात्र हा टप्पा अवघ्या दोन माहिन्यात गाठू शकले, यावरून त्याची लोकप्रियता लक्षात यायला हरकत नाही. सिमिलर वेबच्या अहवालानुसार, जानेवारी 2023 पासून रोज 1 कोटी 30 लाख युजर्स चॅट जीपीटीचा ग्राहक होत आहे. ही आकडेवारी अचंबित करणारी आहे. ओपन एआयच्या वेबसाईटला गेल्या काही दिवसांत रोज अडीच कोटी लोक भेट देत आहेत. या वेबसाईटचे ट्राफिक साधारणतः अडीच टक्क्यांनी वाढले आहे.

चॅट जीपीटीची वाढती लोकप्रियता गुगलसाठी चिंतेचा विषय बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आम्ही काम करत असून लवकरच गुगलच्या युजर्ससाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेले तंत्रज्ञान सादर करत आहोत, असे समोर येऊन गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना जाहीर करावे लागले. गुगलसमोर चॅट जीपीटीने मोठे आव्हान उभे केले आहे. युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे चॅट जीपीटी देत असेल तर गुगलवर विसंबून असलेला ग्राहक निश्चितपणे कमी होणार आहे. याची पूर्वकल्पना गुगलला आल्याने त्यांनीही यादिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.चॅट जीपीटीच्या वापराचा संदर्भ देत जग कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा पद्धतीने आश्रय देत आहे, याची चर्चा सुरू झाली असून आता यामध्ये भर म्हणून गुगलबरोबरच चीनच्या ‘बायडू’नेदेखील आपले स्वतःचे चॅट तंत्रज्ञान विकसित करण्याची घोषणा केली आहे. याचाच अर्थ यापुढील काळात तंत्रज्ञान कंपन्यांची स्पर्धा कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आदी क्षेत्रामध्ये असणार आहे. अत्यंत साधा आणि सोपा इंटरफेस हासुद्धा चॅट जीटीपी तुफान लोकप्रिय होण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. गुगल किंवा मेटा या कंपन्या यापुढील काळात संशोधनाची दिशा बदलतील आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अनेक क्रांतीकारी घडामोडी पहायला मिळतील.

चॅट जीपीटी आता सर्वांसाठी मोफत आहे. याचाच अर्थ ती सदा सर्वकाळ मोफत राहिल असे नाही. ओपन एआयने डेटा गोळा करण्यास सुरूवात केली असून लवकरच त्यांचे पेड व्हर्जन सुरू होणार आहे. अलिकडेच चॅट जीपीटीचे प्लस मॉडेल सादर करण्यात आले आहे. अमेरिकेत वर्गणीदरांसाठी हे मॉडेल उपलब्ध असून दरमहा 20 डॉलर असे शुल्क सध्या आकारण्यात येत आहे. विशिष्ट स्वरूपाची माहिती हवी असणार्‍या किंवा वर्गीकृत माहितीची गरज असणार्‍यांसाठी ही सशुल्क सेवा पुरवली जात आहे. तथापि, चॅटबॉट सध्या तरी विनाशुल्क वापरला जात आहे. पण बिल गेट्स असतील किंवा अ‍ॅलन मस्क असतील, दोघेही व्यापारी आहेत. उलट येत्या काळात या बदलामुळे नवे बिझनेस मॉडेल तयार होणार आहे. हे दोघे ते नक्की करतील. संशोधन, शिक्षण संस्था, अभ्यासक, स्वतंत्र काम करणार्‍या संस्था अशा पद्धतीने डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ओपन एआयकडून वापरकर्त्यांसाठी अनेक नवे बदल आणि मार्गदर्शक सूचना येण्याची शक्यता आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा अविष्कार म्हणजे माणसाने सर्व शस्त्रे खाली टाकली आणि आता सर्व काही यंत्र करणार, अशी भाबडी अशा बाळगण्याचे कारण नाही. माणसारखी कृती करण्यासाठी यंत्राला तयार करण्यात आले आहे. याचा अर्थ प्रतिमाणूस तयार केलेला नाही. यातून अनेक कायदेशीर आणि कॉपीराईटचे मुद्दे समोर येणार आहेत. आता हे सर्व काही प्राथमिक टप्प्यात आहे.

त्याच्याविषयी काही अंदाज बांधणे किंवा कोणत्यातरी निष्कर्षाला पोहोचणे घाईचे ठरेल. आपल्याला हवी ती सर्वच माहिती चॅट जीपीटीकडे नाही. जी माहिती 2021 पर्यंत फीड करण्यात आलेली आहे, त्या माहितीतील आपण विचारलेली माहिती शोधून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. 2021 नंतरची माहिती, आकडेवारी किंवा चालू घडामोडी आदींची माहिती चॅट जीपीटीकडे उपलब्ध असण्याचे कारण नाही. किंबहुना, अत्यंत महत्त्वाची परंतु डेटाबेसमध्ये नसलेली माहिती चॅट जीपीटी देऊ शकणार नाही. हे तंत्रज्ञान घडून गेलेल्या घटनांची यादी किंवा तपशील देऊ शकते. अर्थात हा सर्व तपशील डेटाबेसमध्ये असायला हवा. चालू घडामोडी किंवा तर्कावर आधारित भविष्यातील घडामोडींचे आकलन मशीनला असू शकणार नाही. त्या दिशेने प्रयत्न जरूर सुरू आहेत. मानवी भावना, विचार पद्धती आणि कृती मशीन करू शकेल का, अशा अनेक पातळीवर संशोधक काम करत आहेत. चॅट जीटीपीमुळे अशा प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

चॅट जीपीटी परिपूर्ण नाही. माहिती मिळविण्यासाठी त्याची मदत नक्की होते. पण ही माहिती खरी की खोटी याची जबाबदारी चॅट जीपीटी घेत नाही किंवा मशीनकडे माहितीची सत्यता तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे चॅट जीपीटीतून आलेली माहिती खरीच असेल, असे मानणे अडाणीपणा ठरेल. चॅट जीपीटी विचारलेल्या प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल परंतु त्याचा संदर्भ काय, हे त्याला सांगता येणार नाही. तो संदर्भ कितपत अधिकृत आहे, हे त्याला स्पष्ट करता येणार नाही. उदा. शिवाजी विद्यापीठाबद्दल त्याला माहिती विचारली तर ऑनलाईन डेटाबेसमधील माहिती संकलित करून नेमकी माहिती चॅट जीपीटी देईल. पण विद्यापीठातील एखाद्या प्राध्यापकाबद्दल माहिती विचारली तर ती माहिती देण्यास हे तंत्रज्ञान असमर्थ ठरते.

चॅट जीपीटी नैसर्गिक भाषेवर आधारित मॉडेल असले तरी त्याला प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ समजेलच असे नाही. भाषेच्या विविध छटा, त्याचे स्थानिक संदर्भातील अर्थ याचा उलगडा त्याला होऊ शकत नाही. शब्द किंवा वाक्याचा नेमक्या अर्थाची उकल न झाल्याने अनर्थ होऊ शकतो, हेही याठिकाणी वापरकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवे. शिक्षण क्षेत्रावर याचा प्रतिकूल परिणाम संभवतो. विद्यार्थी चॅटबॉटमधून आलेली माहिती जशीच्या तशी होमवर्क आणि प्रॅक्टिकल्समध्ये देऊ लागले. चॅट जीपीटीकडून आलेली माहिती अधिक संघटीत स्वरुपाची असते. शिवाय ती कॉपी पेस्ट करता येते. त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी रेडिमेड आशय उचलण्याचा प्रयत्न केला. परिणामी, न्यूयॉर्क शहरातील शिक्षण विभागाने आदेश काढून चॅट जीपीटीवर बंदी आणण्याचा निर्णय जाहीर केला. विद्यार्थ्यांची चिकित्सक दृष्टी आणि समस्या सोडवण्याची कृती यातून संपुष्टात येईल, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली. या सर्व दुष्परिणामांकडेही गांभीर्याने पहावे लागेल.

चॅट जीपीटी इंटरनेटवर सध्या असलेल्या माहितीच्या आधारावर पुढे मागणीनुसार माहिती पुरवते. अशा वेळी सध्याची भेसळयुक्त माहिती तशीच पुढे जाण्याचा धोका आहे. इंटरनेटवर माहितीचे प्रचंड प्रदूषण झालेले आहे. हीच माहिती संघटितपणे चॅट जीपीटी पुरवणार असेल तर ही माहिती पूर्वग्रहांनिशी येणार यात शंका नाही. त्यामुळे हाती आलेली माहिती जशीच्या तशी वापरणे धोकादायक ठरणार आहे. शिवाय भाषेतील व्यंग आणि विडंबन समजून घेण्यात मशीन अपयशी ठरते. त्याला एखादे वाक्य कधी गांभीर्याने घ्यायचे किंवा कधी चेष्टेत घ्यायचे, याची जाणीव नसते. अनेकवेळा कॉमन सेन्स काम करतो. चॅट जीपीटीला असा कॉमनसेन्स नसल्याने व्यवहारात नसलेल्या अनेक गोष्टी त्याच्या उत्तरातून समोर येण्याची भीती आहे. व्यवहारिक आणि वास्तववादी नसलेली उत्तरे मिळाल्यास वापरकर्त्यांचा गोंधळ उडू शकतो. बनावट आणि बोगस माहिती, खोटे आणि दिशाभूल करणारे दावे येऊ लागल्यास अनेक कायदेशीर प्रश्नही निर्माण होऊ शकतात. अवमान, बदनामी किंवा तत्सम अवैध कृती झाल्यास त्याचे गंभीर परिणामही समोर येण्याचा धोका आहे. त्यामुळे चॅट जीपीटी भावनेच्या भरात हुरळून जाऊन वापरण्याची गोष्ट नसून एक जबाबदार वापरकर्ता म्हणून ती नीटपणे समजून घेऊन त्याचे आकलन झाल्यानंतरच त्याचा वापर करणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

Related posts

श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर समाधी स्थान…

लोकमहर्षी युगपथदर्शी डॉ. पंजाबराव देशमुख

उसावरील तपकीरी ठिपके व तांबेरा रोगांचे नियंत्रण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406