November 11, 2024
Awareness of true personality through the name
Home » नावातून, नामातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाची जागृती
विश्वाचे आर्त

नावातून, नामातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाची जागृती

दुर्योधन हे नाव सहसा कोणतेही नातेवाईक व आईवडील ठेवत नाहीत. दुर्योधन हे नाव आठवताच दुष्ट, दुराचारी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहाते. इतके हे नाव बदनाम झाले आहे. म्हणजेच नावावरून कार्य, कर्तृत्व अशी ओळख निर्माण होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

उपजलिया बाळकासि । नांव नाही तयापासी ।
ठेविलेनि नांवेसी । ओ देत उठी ।। ३३० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा

ओवीचा अर्थ – नुकतेच जन्मास आलेले मूल आपल्याबरोबर नांव घेऊन येत नाही, परंतु त्या मुलाला ठेविलेल्या नांवाने हाक मारली असता ते ओ देत उठते.

नावामुळे त्या वस्तूला, व्यक्तीला एक ओळख निर्माण होते. जन्माच्या अगोदर किंवा जन्मावेळी कोणीही नाव घेऊन जन्मास येत नाही. जन्मानंतरच मुलगा आहे की मुलगी हे पाहून त्यानंतर त्याचे नाव ठेवण्यात येते. यातून त्याची ओळख निर्माण होते. जन्म हा काही जातीनुसार किंवा धर्मानुसार ठरत नसतो. पण आपले आईवडील, नातेवाईक हे आपले नाव धर्मानुसार, जातीनुसार ठरवतात. त्यामुळे आपणाला त्या जातीची, धर्माची ओळख मिळते. जन्माला येताना हे काही नसते हे लक्षात घ्यायला हवे. हिंदूंची नावे वेगळी, मुस्लिम नावेही वेगळी असतात. ही आपली ओळख निर्माण करतात. पण प्रत्यक्षात आपली खरी ओळख ही नसते.

दुर्योधन हे नाव सहसा कोणतेही नातेवाईक व आईवडील ठेवत नाहीत. दुर्योधन हे नाव आठवताच दुष्ट, दुराचारी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहाते. इतके हे नाव बदनाम झाले आहे. म्हणजेच नावावरून कार्य, कर्तृत्व अशी ओळख निर्माण होते. प्रत्यक्षात तो तसा असेलच असे नाही. पण त्याने आपले व्यक्तिमत्व तसे घडवावे असा मानस हा आपल्या सगेसंबंधींचा असतो. आपला मुलगा दुष्ट-दुराचारी व्हावा असे कोणत्याही मात्यापित्याला वाटत नाही. त्यामुळे दुर्योधन हे नाव ठेवण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. पण दुर्योधन या शब्दाचा अर्थ ज्याच्याविरुद्ध युद्ध करणे किंवा ज्याला पराचित करणे अत्यंत कठीण आहे अशी व्यक्ती असा आहे. यातून उलट त्या व्यक्तीचे उत्तम व्यक्तिमत्त्व समोर येते. तरीही आपली मानसिकता हे नाव ठेवण्याची होत नाही.

आजकाल नवनवे पदार्थ, वस्तू तयार होत आहेत. अशा पदार्थांची नावे आपण मराठीमध्ये जशीच्या तशीच वापरताना आढळते. उदाहरणार्थ आईस्किम, मॅगी, पिझ्झा, बर्गर अशी ही इंग्रजी नावे आपण जशीच्या तशीच वापरत आहोत. संस्कृतमध्ये मात्र तसे होत नाही. संस्कृतमध्ये नावे देण्याची विशिष्ट पद्धती आहे. त्यानुसार त्या भाषेत नवे शब्द निर्माण होतात. हे संस्कृत या भाषेचे वैशिष्ट्य आहे. त्या पदार्थाच्या गुणधर्मावरून त्या पदार्थाचे संस्कृत नाव तयार करण्यात येते. आईस्क्रिमला संस्कृतमध्ये पयोहिमम् अशा शब्द आहे. आईस्क्रिममध्ये असणाऱ्या बर्फ, दुध आणि साखर यावरून हा शब्द तयार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर संस्कृतमध्ये पिझ्झाला पिष्ठजा, ब्रेडला मृदुरोटिका, मॅगीला नलिकापूपः असे शब्द आहेत. सांगण्याचा उद्देश इतकाच की गुणधर्मावरून त्याचे नामकरण केले जाते.

जन्माच्यावेळी हा भविष्यात काय होईल हे काही सांगता येत नाही. जन्मावरून नावरस नावही ठेवले जाते. पण आई-वडील, नातेवाईक हे मुलाचे नाव आपल्या आवडीनुसार ठेवतात. यातून त्याला एक ओळख प्राप्त होते. त्या नावाने त्याला हाक मारली की त्याला ते मुल प्रतिसाद देते. पण मानवाची खरी ओळख ही सुद्धा एका नावातच आहे. सद्गुरु हे सुद्धा एक व्यक्तीच आहेत. प्रत्येक व्यक्तीची ओळख ही एकच आहे. एकाच नामात त्यांची ओळख आहे. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. अन् हीच त्या व्यक्तीची ओळख आहे. सोहम, ओम तत् सत् ही नावे त्या व्यक्तीची आहेत. या नामाचा जप केला, साधना केली तर यातून आपलीच आपणाला ओळख होते. म्हणजेच आपणच आपणाला जागे करतो. या नामाला आपणच आपणाला प्रतिसाद देतो. हे जागे होणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे असे आहे. स्वतःला स्वतःच जाणणे म्हणजेच ब्रह्मसंपन्न होणे. ही संपन्नता आपणाला अमरत्व प्राप्त करून देते. यासाठी माणसाने स्वतःची खरी ओळख करून घेणे गरजेचे आहे. हाच खरा मानव धर्म आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading