अंतःरंगाचा विचार त्याच्या मनाला स्पर्शच करत नाही. पण बाह्यरंगाच्या भोगात तो इतका गुरफटला आहे त्यातून केवळ दुःख पदरी पडत आहे हेही समजण्याची बुद्धी त्याला राहीलेली नाही. अंतःरंगाच्या ज्ञानातून मिळणारा आनंद हा शाश्वत आणि खरा आनंद आहे. पण त्याचाच विसर पडल्याने खऱ्या आनंदाला तो मुकत चालला आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
ऐसेनि विश्व सकळ । जेणे विषोचि मानिले केवळ ।
तया एक जाणें फळ । देहभरण ।। ५६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे, असे तामस ज्ञान मानतें, व त्या तामस ज्ञानास देहभरण हेंच एक फळ आहे असे समज.
जीवनात आलेल्या प्रत्येक गोष्टीचा भोग घ्यायचा. यासाठीच आपला जन्म झाला आहे, असेच समजून वागायचे. केवळ भोगातूनच आनंद मिळतो अशा भावनेने जगायचे अन् वागायचे. पण प्रत्यक्षात या भोगातून आनंद कमी दुःखच अधिक होते, हे त्यांच्या लक्षातही येत नाही. इतके त्या भोगाच्या आहारी गेलेले असतात. जीवन हे केवळ उपभोगण्यासाठीच आहे असे समजूनच ते वागत असतात. सध्या माणसाची वृत्ती ही अशीच झाली आहे. त्यामुळेच अनेक समस्या वाढत आहेत. यात मानवच नष्ट होतो की काय अशी भीतीही व्यक्त केली जात आहे, पण याकडेही पाहायला त्याला वेळ नाही इतका तो या बाह्यरंगाच्या भोगाच्या आहारी गेलेला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे याकडे तो लक्षही देत नाही. एवढ्याश्या गोष्टीने काय होते असे म्हणून त्याने एक एक करत हजारो प्राणी मारले, हजारो झाडे छाटली. काय होतयं, चालतयं की असे म्हणत तो सर्व गोष्टीचा केवळ उपभोगच घेत फिरत आहे. जंगलाचे महत्त्व न ओळखता जंगलातून रेल्वे, रस्ते, बोगदे खोदून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. एका रस्त्याने असा काय तोटा होतो म्हणत त्याने जिकडे तिकडे रस्तेच रस्ते उभारले आहेत. यात जंगल किती नष्ट झाले यातून वन्यप्राण्यांचे, पक्षांचे अधिवास किती नष्ट झाले याचा विचारही तो करत नाही. झाडांची तोड मोठ्याप्रमाणात होत असल्याने वृक्षसंपदाच धोक्यात आली आहे. जैवविविधताच नष्ट झाली आहे. वन्यप्राण्यांचे अधिवासच नष्ट झाल्याने त्यांचा वावर मानवी वस्तीत होत आहे. पण तरीही त्याकडे गांभिर्याने पाहीले जात नाही.
जगा व जगू द्या या विचाराचा विसर पडला आहे. केवळ जगा अन् जग उपभोगा हेच ध्येय आता झाले आहे. वन्यप्राण्याचा अधिवास नष्ट झाल्याने त्यांचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे, हे समजून घेण्याची त्याची वृत्तीच राहीलेली नाही. तसे असते तर सिमेंटची जंगले उभीच राहीली नसती. सिमेंटच्या जंगलांनी तापमानात वाढ होत आहे. पण याकडेही मानवाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी मुरायलाच त्याने जागा ठेवलेली नाही, अशामुळे जमिनी तापू लागल्या आहेत अन् पृथ्वीच्या पोटातही तापमान वाढू लागले आहे. थंडावा, गारवाच नष्ट झाला आहे. हे मानवासाठी घातक आहे याचा विचारही त्याच्या मनाला स्पर्श करत नाही इतका तो भोगवृत्तीच्या आहारी गेला आहे.
मोठमोठाले वृक्ष नष्ट झाल्याने त्याच्या डोलीत राहाणारे पक्षीही आता दुर्मिळ झाले आहेत. एकंदरीत जैवविविधताच धोक्यात आली आहे. केवळ उपभोगाचाच विचार केल्याने हे सर्व होत आहे. प्रदुषण प्रमाणापेक्षा अधिक वाढत आहे. हे प्रदुषण पंचमहाभुतांचे आहे याचा विसर पडला आहे. कारण या पंचमहाभूतापासूनच देह तयार झाला आहे तोही प्रदुषित होईल अन् नष्ट होईल याचेही भानही मानवाला राहीलेले नाही. अशाने मानव जातच नष्ट होईल की काय असे वाटणे आता स्वाभाविक आहे. इतकी तामसवृत्ती मानवामध्ये बळावलेली आहे.
अंतःरंगाचा विचार त्याच्या मनाला स्पर्शच करत नाही. पण बाह्यरंगाच्या भोगात तो इतका गुरफटला आहे त्यातून केवळ दुःख पदरी पडत आहे हेही समजण्याची बुद्धी त्याला राहीलेली नाही. अंतःरंगाच्या ज्ञानातून मिळणारा आनंद हा शाश्वत आणि खरा आनंद आहे. पण त्याचाच विसर पडल्याने खऱ्या आनंदाला तो मुकत चालला आहे. अन् ज्याला तो आनंद म्हणत आहे तो केवळ दुःखाचा सागर आहे हेच त्याच्या लक्षात येईनासे झाले आहे. यासाठी मानवाने तामसीवृत्ती सोडून खऱ्या आनंदाचा शोध घेण्याचा अन् तसे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा मानवजातच धोक्यात येऊ शकते.