September 8, 2024
article-on-animal-poisoning
Home » जाणून घ्या जनावरांना कशाची होते विषबाधा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या जनावरांना कशाची होते विषबाधा

. ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणारी विषबाधा :-  जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणाऱ्या विषबाधे ला किरळ लागणे असे म्हणतात.

विषबाधा होण्याची करणे:-

  • ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी ज्वारीचे पोंगे खाल्यामुळे धुरीन पासून हायड्रो सायानिक असिड तयार होते व जनावरांमध्ये विषबाधा होते.

लक्षणे :-

  • जनावरांनी कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्यास जनावरांचा मृत्यू ताबडतोब होतो.
  • कमी प्रमाणात पोंगे खाल्यास खालील लक्षणे दिसतात-
  •  जनावारंचे पोट फुगते .
  • जनावरे अस्वस्थ होतात.
  • जनावारंचा श्वासोच्छ्वास व ऱ्हाद्याचे ठोके वाढतात.
  • श्वसनाला त्रास होतो.
  • जनावरे थरथर कापते .
  • शेवटी जनावरांचा मृत्यू श्वास बंद पडल्यामुळे होतो.

उपचार :-

  •  या मध्ये जनावरांचे पोट फुगलेले असते त्यामुळे सर्वप्रथम पोटातील हवा काढावी .
  • पशु वैद्यक डॉक्टरांच्या सल्ल्याने गाई -म्हशींना – सोडियम नायट्रेंट — ३ ग्राम व सोडियम थायोसल्फेट —१५ ग्राम हे दोन्ही २०० मिली शुद्ध पाण्यात मिसळून शिरेद्वारे द्यावे. लहान वासरांना – सोडियम नायट्रेंट — १.५ ग्राम व सोडियम थायोसल्फेट —७.५ ग्राम हे दोन्ही ५० मिली शुद्ध पाण्यात मिसळून शिरेद्वारे द्यावे.
  • इंजेक्शन निकेथेमाइड द्यावे.

प्रतिबंधक उपाय:-

  • शेतकऱ्यांनी आपले जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजी पूर्वक लक्ष द्यावे.
  • जर ज्वारीचे पिक लहान अवस्थेतेत वाया गेले असेल तर ते उन्हात वाळवल्या नंतरच खाऊ घालावे कारण उन्हात वळवल्या नंतर त्यातील विषाचे प्रमाण कमी होते.
  • काही शेतकरी ज्वारीचे पिक विळ्याने कापून काढल्या नंतर त्या शेताला पाणी देतात त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे फुटतात, अशा शेतात जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.

. युरियाची विषबाधा:-

        ही विषबाधा सर्व पाळीव प्राण्यामध्ये होते. युरियाची विषबाधा होऊन बऱ्याच जनावरांचा मृत्यू होतो.

विषबाधा होण्याची करणे:-

  •  युरियाचा पशु खाद्यामध्ये अधिक वापर केल्यास उदा. युरिया -मोल्यासीस , मुरघास.
  • युरिया प्रक्रिया केलेल्या  चार्यासोबात सोयाबीन पेंड किंवा सोयाबीनचा भरडा खाऊ घातल्यास.
  • शेतात पेरणी करताना बांधावर ठेवलेले युरिया खत जनावरांनी खाल्यास .
  • युरिया किंवा इतर खताची पोती जनावरांनी चाटल्यास .
  • दुभत्या जनावरांना खुराकातून अधिक प्रमाणात युरिया खाऊ घातल्यास.

लक्षणे :-

  •  जनावरांच्या तोंडाला फेस येतो.
  • पोटामध्ये वेदना होतात.
  • जनावरांना नीट उभे राहता येत नाही.
  • जनावरांची पोट फुगी होते.
  • जनावरे सतत उठ बस करतात व थोडी थोडी लघवी करतात.
  • जनावरांचे डोळे मोठ मोठे होतात.
  • जनावरांना झटके येतात.
  • जनावरे बेशुद्ध होतात व शेवटी त्यांचा मृत्यु होतो.
  • जर जनावरांनी युरिया अधिक प्रमाणात खाला असेल तर त्यांचा मृत्यू अर्ध्या तासात होतो.

उपचार :-

  • युरियाची विषबाधा झालेली आहे हे लक्षात आल्यानंतर जनावरांना तत्काळ २ ते ८ लिटर ताक उपलब्ध असल्यास पाजावे.
  • ताक उपलब्ध नसल्यास माठातील किंवा रांजणातील थंड पाणी पाजावे मोठ्या जनावरांना ४० लिटर व लहान जनावरांना २० लिटर पाजावे.
  •  पोटातील हवा काढण्यासाठी जनावरांच्या तोंडात घोड्याला घालतो तसा लगाम घालावा जेणेकरून जनावरांचे  तोंड सतत उघडे राहील व पोटातील अमोनिया वायू बाहेर पडेल.
  • नंतर पशुवैध्यक डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.

प्रतिबंधक उपाय:-

  •  पेरणी च्या वेळी शेतात पेरणी सुरु असताना मोकळ्या जानावारांवर लक्ष ठेवावे कारण ते जनावर खत खाणार नाही त्यामुळे खताच्या पोत्याचे  तोंड व्यवस्थित बांधून ठेवावे.
  • पशु खाध्याद्वारे आवश्यकते पेक्षा अधिक युरियाचा वापर करू नये.
  • खताची पोते व पशु खाद्याची पोते वेगवेगल्या ठिकाणी ठेवावेत.
  • युरिया प्रक्रिया केलेल्या चार्यासोबत सोयाबीनची पेंड किंवा सोयाबीनचा भरडा जनावरांना खु घालू नये.

३. किटकनाशकांची विषबाधा:- 

सध्या पशुधनाचे व्यवस्थापन करतांना जनावरांच्या अंगावरील गोचिड ,गोमाशा व इतर बाह्य परोपजीविंचे नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. कारण बाह्य परोपजीविंचे पशुधानामध्ये अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात जसे कि दुभत्या जनावरांचे दुध कमी होणे, वासरांची वाढ कमी होणे, जनावरांना संडास लागणे,काही परोपजीवी काही रोगांचा प्रसर करतात त्यामध्ये महत्वाचे म्हणजे लम्पी सारखे आजार,गोचिड ताप, रक्ताची लघवी इत्यादी रोगामुळे जनावरांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. आज बाह्य परोपजीविंचे नियंत्रण करण्याची फार मोठी समस्या पशुपालाकांसमोर आहे.त्यासाठी बाजारात विविध प्रकारची कीटकनाशके  उपलब्ध आहेत परंतु त्यांचा वापर चुकीच्या पद्धतीने किंवा योग्य प्रमाणात न केल्यामुळे बऱ्याच जनावरांमध्ये विष बाधा होते आणि वेळेत उपचार न मिळाल्यास जनावरांचा मृत्यू होतो व शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होते.

 कीडनाशकांचे चार प्रकार-

१. ओर्गानोक्लोरीन:- यामध्ये आल्ड्रिन, एंडोसल्फोन इ.
२. ओर्गानोफोस्फेट:- यामध्ये डाय क्लोरोवास , माल्याथीओंन इ.
३. कार्बामेटस:- यामध्ये कार्बारिल, अल्डीकार्ब इ.
४. पायरेथ्रोइडस:- यामध्ये सायपरमेथ्रीन व परमेथ्रिन इ.

तसेच विविध प्रकारची तण नाशक व मुषकनाशक यांचा ही वापर करण्यात येत असल्यामुळे यांचीही विषबाधा जनावरांना होत असते.

ओर्गानोक्लोरीन व पायरेथ्रोइडस यांची विषबाधा झाल्यास दिसणारी लक्षणे अशी – जनावरांच्या शारीरिक हालचालीमध्ये बदल होतो जसे कि..

  • जनावरे रागीट बनतात .
  • जनावरे न दिसणाऱ्या वस्तूवर उड्या मारतात.
  • जनावरे भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतात.
  • जनावरे पागल झाल्यासारखी वागतात.
  • जनावरांना हात लावल्यास ती दचाकाल्यासारखी करतात.
  • जनावरांना ताप येतो व थर-थर कापतात.
  • काही जनवारांच्या तोंडातून लाळ गळते, डोळे मोठी होतात.

 ओर्गानोफोस्फेट व कार्बामेटस यांची विषबाधा झाल्यास जनावरांत दिसून येणारी लक्षणे अशी –

  • जनावरांच्या तोंडाला फेस येतो, डोळ्यातून पाणी गळते जनावरांना घाम येतो, संडास लागते व डोळे बारीक होतात.
  • जनावरांना श्वासोचछोवास घेण्यास  त्रास होतो.

किटकनाशके  जनावरांच्या अंगावर फवारताना घ्यावयाची काळजी:-

  • बाह्य परोपजीवेचे नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी त्यांच्या सोबत आलेली माहिती पत्रिका वाचून त्याप्रमाणेच करावी कारण सर्व किटक नाशके फार विषारी असतात त्यांचे प्रमाण घेताना विशेष काळजी घ्यावी.
  • शेतातील पिकांवरील किटक नाशके जनावरांच्या अंगावर फवारण्यासाठी वापरू नयेत त्यासाठी खास जनावरांसाठी उपलब्ध असलेली कीटकनाशकेच वापरावीत.
  • कोणतेही दोन किटकनाशके एकत्र मिसळून वारू नयेत .
  • जनावरे आजारी असताना त्यांच्या अंगावर किटक नाशकांची फवारणी करू नये.
  • गाभण जनावरे किंवा दुभत्या जनावरांमध्ये शिफारस केलेलीच किटक नाशके वापरावीत.
  •  जनावरांना च्या अंगावरती जखमा असताना कोणत्याही प्रकारची किटक नाशकांची फवारणी करू नये कारण जखमामधून किटक नाशक शरीरात जातात आणि त्यामुळे  विषबाधा होते.
  • कधी कधी शेतकरी गोचिड, गोमाशा नियंत्रणासाठी बी एच सी पावडर किंवा लिंन्डेन पावडर केरोसीन किंवा खाद्य तेलात मिसळून जनावरांना लावतात अशा वेळी या पावडर शरीरात शोषल्या जातात व जनावरांना विषबाधा होते त्यामुळे कोणत्याही पावडरचा वापर हा पाण्यात मिसाळूनच करावा.
  • जनावरांच्या अंगाला औषध फवारणी किंवा पावडर लावली असता जनावरांच्या तोंडाला मुंगशे घालावे जेणेकरून जनावर औषध चाटणार नाही. नंतर जनावरांचे अंग साबण पाण्याने स्वच्छ केल्यानंतर मुंगशे काढून टाकावे.
  • पिकांवर कीटकनाशक फवारणीचा पंप जनावरांच्या अंगावर फवारणी करण्यासाठी वापरू नये.
  • कीटकनाशक हि व्यवस्थित ठेवावीत जेणेकरून ती जनावरे चाटणार नाहीत किंवा लहान मुलांच्या हाताला येणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावीत.
  • कीटकनाशके वापरल्या नंतर रिकामी डब्बे व्यवस्थित खड्ड्यात पुरवीत.
  • कोणत्याही कीटकनाशक फवारणी मुळे जनावरांना  विषबाधा झाल्यास  तात्काळ पशुवैध्यक डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.

. पावसाळ्यात जनावरांना  झाडपाल्यामुळे होणारी विषबाधा:-

पाळीव प्राणी मुखात: चरणाऱ्या जनावरांमध्ये पावसाळ्यामध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असते. कारण पाऊस पडल्यानंतर विविध झाडाझुडपांची वाढ होते असते. चरणाऱ्या जनावरांमध्ये  विषारी झाडेझुडपे खाल्ल्यामुळे विषबाधा होते कारण जनावरांना कोणता झाडपाला खावा आणि कोणता खाऊ  नये हे कळत नसल्यामुळे इतर गवतासोबत जनावरे विषारी झाडांचा पाला खातात आणि विषबाधा होते व जनावरांना मृत्यू होतो व शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान  होते. काही झाडपाला खाल्यांमुळे जनावरांचा मृत्यु होत नाही परंतु विषारी घटकांचा अंश अंड्यात , मांसात किंवा दुधातून उतरतो व त्यामुळे माणसामध्ये विषबाधा होते.

जनावरांमध्ये झाडाझुंडपामुळे  होणारी विषबाधा टाळण्यासाठी आपल्या परिसरात कोणत्या  प्रकारची विषारी झाडेझुडपे आहेत व त्यांची विषबाधा कशा प्रकारे टाळता येईल हे शेतकऱ्याना माहित असणे खूप गरजेचे आहे. जनावरांना कोणत्या प्रकारची विषारी झाडेझुडपे खाल्ल्यामुळे विषबाधा होते ती झाडेझुडपे अशी….

१. गाजर गवत किंवा कॉंग्रेस गवत
२. रूचकी
३.घाणेरी
४. कण्हेर :-   अ. लाल कण्हेर ब. पिवळी कण्हेर
५. बेशरम
६. धोत्रा
७. एरंड

अशी शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर जनावरांना होणाऱ्या विषबाधा टाळता येऊ शकतात व जनावांचे मृत्यू चे प्रमाण कमी करता येऊ शकते. आपली होणारी आर्थिक हानी कमी करता येऊ शकते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आदित्याच्या झाडाप्रमाणे मन सामर्थ्यवान हवे

जीवन आनंदी करणारे सद्गुरुच माझ्या हृदयी

एका प्रेमाची गोष्ट…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading