मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, हृद्यचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र (तेजचक्र), ललाट चक्र, सहस्राधार चक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
rajghorpade1971@hotmail.com
कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकासूनि ।
आधारादि भेदूनि । आज्ञावरी ।।1038 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा
ओवीचा अर्थ – कुंडलिनी जागी करून, सुषम्मा नाडीचा विकास करून व आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून
आजकाल कोणत्याही गोष्टीत प्रथम फायदा – तोटा पाहिला जातो. गोष्ट फायद्याची असेल, तर तिचा स्वीकार पटकन् केला जातो. यासाठी अध्यात्माचा फायदा नेमका काय आहे, याबाबत सध्याच्या युगात जागृती करण्याची गरज आहे; पण याचा फायदा मिळायला अनेक वर्षे लागतात. यासाठी तसा त्यागही करावा लागतो. गुरुकृपा झाली तर मात्र पटकन् लाभ होतो, पण यासाठी साधना करावी लागते. नित्य साधनेने आत्मज्ञानप्राप्ती सहज शक्य आहे. ध्यान, साधना याचे फायदे काय आहेत, यासाठीच याचे फायदे प्रथम जाणून घेण्याची गरज आहे.
फायद्याच्या गोष्टी दिसल्या तर नव्या पिढीला अध्यात्माची गोडी निश्चितच लागेल. ध्यानाने मन स्थिर होते. मनातील दुष्ट विचार नाहीसे होतात. त्यावर नियंत्रण बसते. ध्यानधारणेच्या प्रक्रियेत कुंडलिनी जागृतीला महत्त्व आहे. सतत नामस्मरणाने, भक्तीने कुंडलिनी सहज जागृत होते. सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राची नित्य साधना केल्यास गुरुकृपा होऊन कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृतीस शास्त्रीय आधार आहे. विज्ञान युगातील पिढीने हे शास्त्र जाणून घेण्याची गरज आहे.
अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. येथे चमत्कार, जादू यांना थारा नाही. चमत्कार, जादू ही फसवणूक आहे. जे चमत्कार करून दाखवतात, जादू करून दाखवतात ते स्वतःला व इतरांनाही फसवत असतात. यासाठी कुंडलिनी जागृतीचे शास्त्र अभ्यासणे गरजेचे आहे. शरीरातील शक्तिकेंद्रे जाणून घ्यावीत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, हृदयचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र (तेजचक्र), ललाट चक्र, सहस्राधार चक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. कुंडलिनी नावाची तेजःशक्ती – निजाशक्ती जेव्हा सर्व दोषांचा नाश करते तेव्हा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होण्यास प्रतिबंधक असलेली कारणे नष्ट होऊन त्याला सूक्ष्म व शुद्ध बोधव्य लाभते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.