September 8, 2024
Beauty article by Jitendra D paradkar
Home » सौंदर्य !…
मुक्त संवाद

सौंदर्य !…

विशेष म्हणजे पूर्वीची ही पध्दत आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे. पूर्वीच्या घरांना असणाऱ्या भिंती जाड असण्याचे कारण म्हणजे उष्णता आत मध्ये येऊ नये आणि घरातील वातावरण थंड रहावे. पूर्वीची माणसे घरांची उभारणी करताना निसर्गाशी एकरूप होण्याचा महत्वाचा विचार सतत करी . निसर्गाच्या विरुध्द जाऊन वास्तूत सौंदर्य येणार कसे ? हा मुख्य विचार या विचारी मंडळींकडे नक्कीच होता.

जे . डी . पराडकर
jdparadkar@gmail.com 9890086086

सौंदर्य हे पहाणाऱ्याच्या दृष्टीत असावे लागते. सौंदर्याचे आकलन होणारी दृष्टीच नसेल , तर स्वर्गासमान दिसणारे सौंदर्यही फिके पडेल. आपल्या आजूबाजूला सौंदर्य दडलेल्या अनेक गोष्टी असतात . याकडे आपण डोळसपणे पाहिले की थकवा निघून जातो एवढी ताकद सौंदर्यात आहे . सौंदर्य न्याहाळताना दृष्टी मात्र नितळ असायला हवी . निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतेच. आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो त्या अर्थाने आपल्याला त्याचे आकलन होत जाते . सौंदर्य न्याहाळताना अंतर्मन जागृत करण्याची गरज असते. वर वर पाहिले तर सौंदर्यातील गाभा मनापर्यंत पोहचणे अशक्य ठरते. एखाद्या स्त्रीचे सौंदर्य थक्क करून टाकणारे असले की पहाणाऱ्याचे अंतर्मन जागृत होते . मात्र नजर नितळ असेल , तर स्त्रीच्या त्या अलौकिक सौंदर्यात आपली भगिनी किंवा माता दिसू लागते . साधेपणात देखील सौंदर्य दडलेले असते . शब्दात , आवाजात अशा अनेक गोष्टींना सौंदर्याची किनार ही असतेच. सौंदर्याअभावी हे जग मिथ्या भासेल. सौंदर्य आहे म्हणून आनंद आहे आणि जगण्याची ओढ देखील आहे. मानवनिर्मित वस्तू असो अथवा सजीव या प्रत्येकात सौंदर्याचा अंश हा असतोच. निसर्गाने तर आपल्या सौंदर्य निर्मितीतून पृथ्वीला सुंदर साज चढवला आहे . निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या सौंदर्यात माणूस आकंठ बुडून जातो आणि त्याला एक नवी दृष्टी प्राप्त होते. कोकणात सण उत्सवाच्या पूर्वी घराच्या भिंती लाल मातीने सारवून घराला नवे सौंदर्य आणले जाते. सौंदर्याबाबत प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असल्या तरीही प्रत्येकाची ओढ सौंदर्याकडेच असते यात कोणताही संदेह नाही. घर कितीही साधे असले तरीही त्यात कोकणातील तांबड्या मातीच्या सारवणाने सौंदर्य आणायची कल्पकता दृष्टीत असावी लागते.

सण उत्सव म्हणजे कोकणवासियांच्या उत्साहाला एक नवं उधाण येते . आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानून सण उत्सव बेभान होऊन साजरे करण्याची परंपरा कोकणवासी कधीही चुकवत नाहीत. फार पूर्वीपासून कोकणातील घरांच्या भिंती या दगड मातीच्याच असल्याचे पहायला मिळते. घर मजबूत असावे यासाठी या भिंतींची जाडी थेट दोन फुटांपर्यंत असल्याचे आजही पहायला मिळते . दगड मातीच्या या भिंतींना आतून बाहेरून तांबड्या मातीने सारवून गिलावा करण्याची पध्दत कोकणात फार पूर्वीपासून प्रचलित आहे. विशेष म्हणजे पूर्वीची ही पध्दत आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे. पूर्वीच्या घरांना असणाऱ्या भिंती जाड असण्याचे कारण म्हणजे उष्णता आत मध्ये येऊ नये आणि घरातील वातावरण थंड रहावे. पूर्वीची माणसे घरांची उभारणी करताना निसर्गाशी एकरूप होण्याचा महत्वाचा विचार सतत करी . निसर्गाच्या विरुध्द जाऊन वास्तूत सौंदर्य येणार कसे ? हा मुख्य विचार या विचारी मंडळींकडे नक्कीच होता. घराच्या जाड भिंती वर्षातून किमान दोन वेळा तरी लाल मातीने सारवल्या जातात. या मागे भिंतीची मजबुती आणि घराचे सौंदर्य वाढविणे असा दुहेरी उद्देश होता. तांबडी माती ही कोकणची ओळख समजली जाते. या मातीने घरांच्या भिंती सारवायची पध्दत ही देखील ग्रामीण भागाची एक आगळीवेगळी ओळख म्हटली पाहिजे .

पूर्वीच्या लोकांनी शास्त्र आणि सौंदर्य याची सांगड घातली. लाल माती हाताला लागणे वैज्ञानिक दृष्टीने महत्वाचे असल्याने वर्षातून किमान दोन वेळा तरी ही माती कालवल्यानंतर काही काळ दोन्ही हात या मातीत रहातात . ही माती देखील गावात ठराविक ठिकाणीच उपलब्ध होते . भिंत तांबड्या मातीने सारवण्याचे सोपस्कार काही कमी नसतात. ठराविक प्रकारची माती आणून , ती माती बारीक करून अक्षरशः पीठासारखी करावी लागते . गुळगुळीत केलेली तांबडी माती भिंतीना घोटाई करण्यायोग्य पाणी घालून पातळ केली जाते . कापडाच्या साहाय्याने मातीचा गिलावा भिंतींना दिला जातो . एक गिलावा वाळल्यानंतर दुसरा गिलावा देऊन भिंतीची समपातळी करण्याचा प्रयत्न केला जातो . तत्पूर्वी भिंतीना असणारी मोठी छिद्रे मातीच्या घट्ट गोळ्याने लिंपून घेतली जातात . सण उत्सवापूर्वी आपलाच उत्साह आणि आनंद वाढविण्यासाठी घराच्या साधेपणाला तांबड्या मातीने सारवून घराचे सौंदर्य वाढविण्याची ही पध्दत नक्कीच कौतुकास्पद आहे. सौंदर्य हे पहाणाऱ्याच्या दृष्टीत असायला हवे , हे तत्व येथे तंतोतंत दिसून येते . पावसाळ्यात घराच्या सौंदर्याला आलेली बाधा अशाप्रकारे दूर करून मातीच्या श्रीमंतीतून सौंदर्य अंतर्मनापर्यंत पोहचवण्यासाठी नितळ दृष्टी असावी लागते.

सारवण म्हणजेच सडासंमार्जन ! फार पूर्वीपासून घरासमोर सडासंमार्जन करण्याची पध्दत आहे . घरातील जमीन आणि अंगण सारवल्यानंतर घराच्या सौंदर्यात अधिक भर पडते . दगड मातीच्या भिंती तांबड्या वस्त्रगाळ मातीने सारवल्यानंतर त्याचे डाग घरातील जमिनीवर आणि अंगणात पडतात . यानंतर जमीन शेणाने सारवणे हे क्रमप्राप्त असते . जमीन सारवल्यानंतर घराच्या भिंती तांबड्या आणि जमीन हिरवीगार हे नैसर्गिक रंग नजरेचे पारणे फेडतात . जशी हाताला माती लागणे शास्त्रीय दृष्टीने महत्वाचे असते तद्वत पावलांना मातीचा स्पर्श होणे आवश्यक असते . दगड मातीच्या घरात या दोन्ही गोष्टी सहज मिळत आल्या . तांबड्या मातीने घराच्या भिंती सारवल्यानंतर जसे घराचे सौंदर्य वाढते तसे घरापुढील अंगण या सौंदर्यात आणखी भर घालण्याचे काम करते . घरापुढील अंगणाची विशिष्ट रचना ग्रामीण कल्पकतेची साक्ष पटवून देते . घरातील जमीन आणि घरापुढील अंगण हे दर पंधरा दिवसांनी सारवले जाते . अंगण आणि जमीन सारवण्याचीही काही विशिष्ट पध्दती आहेत . सारवणात बोटांनी रेषा ओढत केलेल्या सारवणाला बोटी सारवण म्हणतात . अंगण मात्र झाडूने सारवले जाते . जमिनीवर सारवणाचे थर बसत गेल्यानंतर त्यालाही गिलाव्याप्रमाणे थर बसत जातात . जमिनीचे सौंदर्य वाढविण्याचा हा प्रकार आरोग्यदायी देखील मानला जातो .

मनाच्या सौंदर्याला साधेपणातही सुंदरता दिसून येते . कोकणातील पूर्वीची घरं दगडमातीची असली तरी या जाडजूड भिंतींमध्ये नात्यांना परस्परात जखडून ठेवण्याची मजबूती होती . घराची ओढ लागावी अशी नाती घट्ट विणली जावी लागतात . एकत्र कुटुंब पध्दती हे घराचे खरे सौंदर्य . कुटुंबप्रमुख हा घराचा मुख्य खांब . पूर्वीची कुटुंबरचना नात्यातील वीण घट्ट करणारी होती . बदलत्या काळात सोयीसाठी यात बदल होत गेले . कुटुंबं विखुरली गेली आणि सोयीच्या नावाखाली तांबड्या मातीच्या भिंती एकाकी पडल्या . हे एकटेपण सहन न झाल्याने कुटुंबप्रमुख गळून पडला . अखेरीस राहिले काय ? तर एक केविलवाणा उदासपणा . सोयीसाठी आपण आपल्या मूळ घरापासून , आपल्या माणसांपासून कितीही दूर गेलो तरीही आपण आपल्या तांबड्या मातीला कदापी विसरता कामा नये . आपण ही तांबडी माती कधीही विसरू नये यासाठीच पूर्वजांनी भिंती या मातीने सारवण्याची आणि त्यांचे सौंदर्य वाढविण्याची कल्पकता शोधली नसेल ना ? लाल मातीच्या भिंतीना मुळातच सौंदर्य असले तरीही या सौंदर्यात आणखी भर घालण्याचे काम घराच्या पुढील बाजूस असणाऱ्या लाकडी खिडक्या करत आल्या . या लाकडी खिडक्यांतून घरात भरपूर प्रकाश खेळत असल्याने या प्रकाशाने घरातील जमीन आणि तांबड्या मातीच्या भिंती उजळून निघत .

पूर्वीच्या घरांना भिंती जशा दगड मातीच्या आणि जाड असत तशा याचे छप्पर देखील खापराच्या नळ्यांचे असे . अर्धगोल आकाराची ही खापरे उलट सुलट पध्दतीने बसवली जात . या खापरांमुळे घराच्या सौंदर्यात अधिक भर पडे . खापरांनंतर मंगलोरी मातीची फिक्कट केशरी रंगाची कौले आली आणि या घरांचे सौंदर्य आणखी खुलत गेले . खापरे लावणे हे मोठे कौशल्याचे काम होते . मात्र बदलत्या काळात आलेली मंगलोरी कौले एकावर एक सहजपणे लावता येत आणि लाकडी रिपेवर अडकत जात . आता पूर्वीची बंद आणि पडत आलेल्या घरांवर क्वचितच ही खापरे पहायला मिळतात . खरं तर सौंदर्य हे घराच्या तांबड्या मातीच्या भिंतीत , लाकडी खिडक्यात आणि घरावरील खापरात नव्हतेच. ते दडलेले होते या घरातील नात्यांमध्ये असणाऱ्या आपलेपणात . कोणत्याही कामात घरातील प्रत्येक सदस्याची मदत होत असे . प्रत्येकावर टाकलेली जबाबदारी आनंदाने पार पाडली जाई . घरातील या एकोप्यातच खरे सौंदर्य दडलेले होते . कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर गावच्या घराची मूळ ओळख देखील पुसली गेली . तांबड्या चिऱ्याच्या भिंती आल्या , त्याच्यावर वाळू सिमेंटचा गिलावा आला , खापरांची जागा सिमेंट स्लॅबने घेतली . लाकडी खिडक्यांच्या जागी स्लायडिंग आले . घरातील जमिनीला मार्बल किंवा ग्रेनाइट बसला . सुदैवाने मूळ घरापासून दूर असणाऱ्या कुटुंब सदस्यांची तांबड्या माती विषयी असलेली ओढ मात्र तीळभरसुध्दा बदलली नाही . गणेशोत्सव असो अथवा शिमगा या दोन सणांच्या दरम्यान तांबड्या मातीविषयी असणारी ओढ आपोआप दिसून येते .

सौंदर्य हे ओढूनताणून आणता येत नाही . यासाठी मनाचे सौंदर्य प्रथम खुलावे लागते . पावसाळ्यात निसर्ग हिरवाईने आणि रानफुलांच्या साजाने सृष्टीचे सौंदर्य असे काही खुलवतो की मानवाने कितीही प्रयत्न केला , तरी सृष्टीच्या या सौंदर्याशी स्पर्धा करता येणार नाही . दृष्टीने जमेच्या बाजू पाहण्याची सवय लागली की प्रथम सौंदर्यच नजरेस पडते . सौंदर्याचा नेहमी आस्वाद घ्यायचा असतो . हा आस्वाद अनंतकाळ घेता यावा यासाठी सौंदर्य जपायचे असते . बारीकसारीक गोष्टीतील सौंदर्य टिपण्याची सवय झाली की मनावरचे ताण हलके होत जातात . कालांतराने सौंदर्य मन प्रफुल्लित करत असल्याची अनुभूती येत जाते . काही वेळा सौंदर्य हे शाप ठरावे अशा विकृत नजरा समाजात अवतीभोवती गरगरत असतात . असे घडू नये म्हणून सौंदर्य न्याहाळण्यासाठी दृष्टी नितळ आणि पवित्र हवी . याबरोबरच स्त्रीच्या सौंदर्यात प्रत्येकाला आपली भगिनी आणि माता दिसली तर सौंदर्य हे कधीही शाप ठरणार नाही . चेहऱ्यापेक्षा ज्याच्याकडे शब्दांचे सौंदर्य अधिक असते तो जग जिंकू शकतो . यासाठी शब्दसामर्थ्यावर भर द्यायला हवा . तांबड्या मातीत सौंदर्य खुलवण्याची ताकद आहे , तशी ती टिकवण्यातही आहे . गरज असते ती या तांबड्या मातीशी एकनिष्ठ रहाण्याची , तिच्या विषयीची ओढ अधिक घट्ट करण्याची .

(छाया : ऋषिकेश जाधव , सालपे)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आनंद गळाभेटीचा…

सुखाचा पाऊस आलाच नाही

चार दिवसासाठी मान्सूनचा जोर कमी होणार !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading