पावसाच्या पहिल्या सरींच्या जोरावर मोकळ्या जागेत उगवणारं हिरवं गवत त्यावरील जलबिंदूंच्या तळव्यांना होणाऱ्या नाजूक स्पर्शांमुळे एवढं काही मुलायम भासतं की असा स्पर्श केवळ निसर्गाकडूनच अनुभवावा याची दीर्घकाळ आठवण देणारा असतो. निसर्गातील या हिरव्या गालिच्यांवर स्वतःला झोकून देण्याचा मोह आवरणं मोठं कठीणच असतं.
जे . डी . पराडकर
9890086086
jdparadkar@gmail.com
निसर्गाचे खरे रूप पहायचे असेल तर ते पावसाळ्यातच ! सुरुवातीचा पाऊस सर्वांनाच हवा असतो. हाच पाऊस नियमित पडू लागला की नकोसा होतो. मात्र या पावसावरच निसर्गाचं सारं चक्र फिरत असतं. पृथ्वीवरील प्रत्येक सजीव पावसाची आतुरतेने वाट पहात असतो. माणसाला जसं मन आहे त्यापेक्षा अधिक भावनाप्रधान मन निसर्गाला आहे. दोघांमध्ये फरक आहे तो केवळ सोशिकतेचा. कोणतीही गोष्ट सहन करायची झाली तर ती समोरच्यानेच अधिक करावी अशी मानवी मनाची सर्वसाधारण प्रवृत्ती आहे.
निसर्ग मात्र खूप सोशीक आहे. प्रत्येक घरात सोशिकतेचं उत्तम आणि आदर्श उदाहरण त्या घरातील माता असते. या मातेच्या प्रमाणेच निसर्गाचं हृदय असतं. माता आणि निसर्ग हे दोघंही सोशिक हृदयाचे असले तरी त्या कोमलतेलाही मर्यादांचे बांध आहेतच. जे आपल्या मातेचं कोमल मन ओळखू शकत नाहीत ते निसर्गाच मन कसं जाणणार ? पावसाळा हा ऋतूच असा आहे की यामध्ये असंख्य सजीव नव्याने जन्म घेतात. केवळ श्वास घेणारा जीव म्हणजे सजीव नव्हे तर निसर्गातील प्रत्येक आनंददायी बाब सजीवच मानली पाहिजे. दुसऱ्याचं मन जाणण्यासाठी आपल्याकडेही तसं समजून घेणारं मन असावं लागतं.
बऱ्याचवेळी आपण आपल्या माणसाचं मन जाणण्यात यशस्वी होऊ शकत नाही तेथे आनंददायी बाबींची मुक्त हस्ते उधळण करणाऱ्या हिरव्या निसर्गाचं मन कसं जाणणार ? आपण आपल्या नियोजित कामाच्या पूर्ततेची अथवा मनात असणाऱ्या व्यक्तीची वाट पाहणं पसंत करतो. या वाट पाहण्यातही एक आगळावेगळा आनंद आहे. आपली वाट पाहणारं कोणी आहे ही संकल्पनाच मनस्वी आनंद देणारी आहे. एखादं अपेक्षित काम चटकन् झालं अथवा ज्या व्यक्तीची काही काळ अथवा वर्षे वाट पाहावी लागली ती व्यक्ती अनपेक्षितरित्या परत आली तर चेहऱ्यावर जो अवर्णनीय आनंद तरळतो तसाच आनंद निसर्गालाही होत असतो. या आनंदासाठी निसर्गाला पावसाची वाट पाहावी लागते. पाऊस एक प्रकारे निसर्गाचा साथीदार बनून येतो आणि त्याच्या आगमनाने निसर्गाला झालेला आनंद सारी सृष्टी आपल्या नजरेचं पारणं फिटेपर्यंत मनात साठवून ठेवते.
निसर्गालाही सजायला आवडतं. त्याचं नटणं म्हणजेच त्याला झालेला आनंद असतो. पावसाळ्यात विविध आकाराची, प्रकारांची आणि रंगाची येणारी फुलं म्हणजे निसर्गदेवतेची एक अजब करामतच म्हटली पाहिजे. ज्यांना नावं देखिल प्राप्त झालेली नाहीत अशी असंख्य रानफुलं या हंगामात आपलं अस्तित्व सिध्द करतात. पावसाळ्यात निसर्गाचं वर्णन हिरवा निसर्ग म्हणून आपण मोठ्या अभिमानाने करीत असलो, तरी त्याचं हिरवेपण टिकविण्याएवढं निःस्वार्थी प्रेम आपण त्याच्यावर खरंच करतो का ? हा प्रत्येकाला अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.
पावसाच्या पहिल्या सरींच्या जोरावर मोकळ्या जागेत उगवणारं हिरवं गवत त्यावरील जलबिंदूंच्या तळव्यांना होणाऱ्या नाजूक स्पर्शांमुळे एवढं काही मुलायम भासतं की असा स्पर्श केवळ निसर्गाकडूनच अनुभवावा याची दीर्घकाळ आठवण देणारा असतो. निसर्गातील या हिरव्या गालिच्यांवर स्वतःला झोकून देण्याचा मोह आवरणं मोठं कठीणच असतं. लाखो रुपये खर्चून टुमदार बंगल्यापुढे हिरवे गालीचे मुद्दामहून निर्माण करावे लागतात. निसर्ग मात्र आपल्या अंगणात हिरवे गालिचे जागोजागी पसरवत जातो. त्याच्या हिरवेपणात मुलायम स्पर्शाची अविस्मरणीय अनुभूती असते. या निसर्गनिर्मित गालिचांना स्पर्श करायचा तो उघड्या पावलांनीच. तळव्याच्या नाजूक भागाला हिरव्या गालिच्यांचा होणारा स्पर्श हा प्रथम धुंद करणारा आणि जोडीदार सोबत असेल तर नंतर बेधुंद करणारा असतो.
मानवाला लुप्त झालेल्या भावनांची सुप्त जाणीव करून देण्याची ताकद निसर्गाच्या या आगळ्या आविष्कारामध्ये असते. मात्र याची अनुभूती घेण्यासाठी निसर्गाशी आपलं प्रामाणिक नातं जोपासलेलं असणं तितकंच महत्वाचं आहे. आज निसर्गाचा होणारा ऱ्हास पाहता काही ठराविक मंडळींनीच निसर्गाची काळजी घ्यायची आणि बाकीच्यांनी त्याचा बेसुमार ऱ्हास करायचा हे अत्यंत धोक्याचं आहे. निसर्ग सजीवांवर मातेप्रमाणे माया करतो. जशी माता करुणेचा सागर म्हणून ओळखली जाते तशी ती क्रोधित झाली तर त्याची व्याप्ती देखील सागराप्रमाणेच असते.
निसर्ग सजीवांना जे हवं असतं ते भरभरुन देतो याचा अर्थ त्याच्याशी किमान कृतज्ञ तरी राहावं. मात्र स्वार्थापोटी मानवाची कृतज्ञता गेली काही वर्षे कृतघ्नतेत बदलत गेली आहे. परिणामी एकवेळ मातेचा क्रोध परवडला पण मातृ हृदय असलेल्या निसर्गाचा क्रोध मानवालाच नव्हे तर सजीवांसह अखिल सृष्टीला तो झेपण्यासारखा नाही. यासाठी वृक्ष लागवडीचे फार्स करण्यापेक्षा वृक्षतोड पूर्णतः थांबविणे महत्वाचे आहे. निसर्ग हा आता आपला केवळ सखाच राहिला नसून तो प्रत्येकाचा श्वास बनलाय. आपला श्वास अखंडपणे सुरू राहावा असं जर प्रत्येकालाच वाटतं, तर आपल्या प्रकृतीआधी निसर्गाची काळजी घेतली गेली पाहिजे.
निसर्ग जर आनंदी असेल तर मानवी प्रकृती सदैव निरोगी राहील यात शंका नाही. पावसाळ्यात जागोजागी दिसणारी हिरवी शेती म्हणजे नजरेचं पारणं फेडणारं दृश्य. हिरवी शेती पाहिली की मन उल्हसित होतं. ही शेती म्हणजे केवळ शेतकऱ्यांच्याच मनात उत्साह निर्माण करते असे नव्हे , तर पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन नैराश्यातून बाहेर काढून शेतीच्या हिरव्या रंगाची समृद्धी खऱ्या अर्थाने अधोरेखित करते.
शेती म्हणजे एका दाण्यातून निर्माण होणारी अनेक दाण्यांची किमया आहे. यासाठी शेतकरी कुटुंबाचे कष्ट म्हणजे शेतीचे खतपाणी म्हटले पाहिजे. या हिरव्या शेतीमधून प्रत्येकानं खूप काही शिकण्यासारखे आहे. पेरा म्हणजे उगवेल ! ही म्हण खूप काही सांगून जाते. जीवनात प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी काही पेरणं गरजेचं असतं. जे पेरतात आणि प्रतिक्षा करतात त्यांच्या पदरात अपेक्षित दान पडतेच. मेहनत न करता केवळ भविष्य पाहून स्वप्न पाहात राहणाऱ्यांची स्वप्न अखेरीस दिवास्वप्नंच ठरतात. निसर्गदेवतेच्या या हिरव्या शालूवर शोभून दिसण्यासाठी रंगीबेरंगी रानफुलांची परस्परात जणू स्पर्धाच लागलेली असते. ही रानफुले म्हणजे केवळ निसर्ग देवतेचे वळेसर असतात असे नव्हे, तर आपलं अस्तित्व निसर्गदेवतेच्या चरणी अर्पण करून जणू पूजेची आरास बनण्याचं आनंददायी कर्तव्य देखील ही फुलं पार पाडत असतात.
निसर्ग सजीवांसाठी एवढं सारं करीत असताना मानव छोट्यामोठ्या प्रमाणात त्याला डिवचण्यासह ओरबाडण्याचं काम करतोय. निसर्ग जेवढा मायाळू आहे तेवढाच त्याचा प्रकोप विनाशकारी आहे. मात्र केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यात मश्गुल असणाऱ्या मानवाला हे समजावणार कोण ? हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. निसर्ग हिरवा आहे तो भविष्यात तसा राहील का, हे सारं मानवाच्या हातात आहे. अन्यथा हिरवाई निर्माण करायला लागणाऱ्या कालावधीपेक्षा ऱ्हास होण्यास काही क्षण पुरेसे ठरतात हे वास्तव आहे. ज्याचा वापर अत्यंत जपून करणं आवश्यक आहे अशा पाण्याची महती कोणाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. तरीही प्रचंड तहान लागली की पाण्याचं महत्व लक्षात येते. जेथे पाणी अजूनही मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे तेथे आजही पाण्याच्या काटकसरीने वापराचे महत्व कळलेले नाही. या उलट दुष्काळग्रस्त भागात जेथे पाणी पाणी करावे लागत आहे, ते पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकत आहेत.
वेगाने कमी होत जाणारे जलस्त्रोत ही भविष्यातील मोठी चिंता असताना पाण्याच्या वापराचे नियोजन अद्याप अपेक्षित पध्दतीने होऊ शकत नाही हे वास्तव आहे. जसं पाण्याच्या साठ्यासाठी आणि त्याच्या वितरणासाठी नियोजनाची गरज आहे त्याप्रमाणे जलस्त्रोत कमी होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना तत्काळ करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत पशुपक्षी पाण्याविना तडफडून प्राण सोडू लागले आहेत. मानवाने यातून काही बोध घेतला नाही तर या गंभीर परिस्थितीचा सामना करण्याची वेळ भविष्यात मानवावर येणार यात शंका नाही.
‘पाणी हे जीवन आहे ‘ , केवळ अशा प्रकारच्या जाहिराती दाखवून बोध घेण्याएवढा मानव विचारी राहिला आहे असं म्हणता येणार नाही. पाण्याचं महत्व पटवून देण्यासाठी काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्ती मोजक्या आहेत. याउलट जलस्त्रोतांची उधळपट्टी आणि पर्यावरणला बाधा पोहचेल अशा पध्दतीने वागणाऱ्या मंडळींची आणि मानवी समूहाची संख्या दिवसाला वाढत आहे. अशा परिस्थितीत कठोर निर्बंधांशिवाय पर्यावरणाचं संवर्धन सोडाच पण संतुलन राखणंही अशक्यप्राय बनलंय. मला काय त्याचे ? या उक्तीने वागण्याची मानवी सवय असल्याने, संकट माझ्यापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत मी निर्धास्त राहणार. हे भविष्यासाठी धोक्याचे ठरणार यात शंका नाही . वाढतं शहरीकरण , वाढती सदनिकांची संख्या, वाढती लोकसंख्या या तुलनेत जलसाठ्यांचं प्रमाण वेगानं वाढविणे आवश्यक असताना याचा मेळ घातला जात नाहीये हे वास्तव आहे.
पर्यावरण संवर्धनाचा गाजावाजा खूप मोठा होतो, तुलनेत उपाययोजना मात्र केवळ नियोजनातच असतात. या नियमावलीची अंमलबजावणी होणं हीच काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार पाडले जाते मात्र त्याचे संवर्धन करण्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदावरच शोभून दिसतात. पर्यावरणाची शोभा वाढविण्यास या कागदावरील आकड्यांचा उपयोग कसा होणार ? ही खरी समस्या आहे.
अखेरीस पाण्याची उपलब्धता पूर्णत: पावसावर अपेक्षित आहे. पाऊस पडणे हे पर्यावरण पूरक वातावरणावर अवलंबून असताना, पर्यावरणाची अतोनात होणारी हानी आज सर्वच स्तरावर स्वतःचे हितसंबध आणि लाभ जोपासण्यासाठी दुर्लक्षित केली जातेय हे सर्वांच्या नजरेसमोरील वास्तव आहे.
विविध मागण्यांसाठी मोठमोठी आंदोलने देशाच्या विविध भागात वेळोवेळी होत असतात. एखादं आंदोलन अथवा मोर्चा सामूहिक स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी झाले तर खऱ्या अर्थाने मानवाला पर्यावरण रक्षणाचा अथवा संवर्धनाचं महत्व पटलं असं म्हणता येईल. अशा आंदोलन अथवा मोर्चासाठी कोणत्या नेतृत्वाचीही गरज नाही. निसर्ग हा रक्षणकर्ता मानून त्याच्या म्हणजे पर्यायाने स्वतःच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना व्हाव्यात म्हणून आंदोलन अथवा मोर्चा निघणं नक्कीच गैर नाही. निसर्ग गरीब – श्रीमंत असा भेद करत नाही अथवा तो जात – पात मानत नाही. कदाचित यामुळेच त्याला निसर्गदेवतेची उपमा दिली असावी. त्याचा कोप झाला तर त्यामध्ये सर्वांना समान परिणाम भोगावे लागतात.
वशिलेबाजी, दबाव, आमिष यातील कोणत्याही प्रलोभनांना निसर्ग भुलणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. निसर्गदेवतेचं नंदनवन असलेल्या कोकणात गेली काही वर्षे खाण प्रकल्प, अवैध वाळू उत्खनन, जांभा आणि काळ्या दगडाचे उत्खनन याबरोबरच मातीचे उत्खनन या प्रकारांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. विशेष म्हणजे या उत्खननावर बंदी आल्यापासून याचं प्रमाण चौपट झालंय. उत्खननावर बंदी आणून शासनाने आपला महसूल पर्यावरण रक्षणासाठी सोडला असला तरी बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या उत्खननाचा महसूल कोणाच्या हातात पडतोय हे नाव घेऊन सांगण्याची आवश्यकता नाही. याच्या जोडीला जंगलमाफियांनी तर, कोकणच्या नंदनवनाचं वाळवंट करण्याची जणू सुपारीच घेतली आहे याची खात्री वृक्षतोडीमुळे उजाडबोडके होणारे डोंगर पाहिल्यावर आपोआपच होते.
कोकणातून कुंभार्ली आणि आंबा घाट मार्गे दररोज ५० ट्रक भरून जळाऊ लाकूड पश्चिम महाराष्ट्रात पाठवले जाते. शासकीय जमिनीवरील जंगल तोडण्यासही मागेपुढे पाहिले जात नाही. यावरून वनविभागाचं काम पर्यावरण रक्षणाचं आहे की केवळ वृक्षतोडीला परवानगी देण्याचं, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो खरा. याचे परिणाम दिसण्यास फार कालावधी लागत नाही. या स्वैर उत्खननामुळे हजारो ब्रास माती ओढे, नद्या, खाड्यांमध्ये येऊन कधीच विसावली आहे.
एकेकाळी येथे बारमाही वाहती नदी – ओढा होता, असा फलक लावण्याची दुर्दैवी वेळ आज आली आहे. भविष्यात येथे मानवी वस्ती होती असा फलक लागण्याआधी मानवी समुहांनी जागं होण्याची गरज आहे. पर्यावरण हा आपल्या कुटुंबातील बुजुर्ग आणि अनुभवी सदस्य आहे तसेच त्याच्या मर्जीनुससारच आपल्याला जीवनावश्यक बाबी मिळत आहेत याची अंतर्यामी जाणीव निर्माण होण्याची आज खरी गरज आहे. पाण्याअभावी पशु – पक्षांचे होणारे मृत्यू ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याने त्यांची कमी होणारी संख्याही पर्यावरण रक्षणास घातक आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीस कोकणचं तापमान ३९ अंशांच्यावर पोहचलं हे अत्यंत धोकादायक असताना त्या पाठोपाठ दिवसभर वातावरणात धूसरपणा येणं हे मानवाच्या प्रकृतीस घातक ठरणारं आहे. जर मानवाची परिस्थिती अशी केविलवाणी झाली, तर पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणाऱ्या पशुपक्षांची अवस्था अत्यंत दयनीय होणार. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. आज करु उद्या करु अशी चालढकल करुन पश्चात्तापाची वेळ येण्यापेक्षा मनाचा कठोर निग्रह करुन जोमाने प्रयत्न करणे यातच आपल्या प्रत्येकाचे भविष्य दडलंय. पाणी आहे म्हणून ते निष्काळजीपणे वापरणे भविष्याच्या दृष्टीने धोक्याचे असून पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.
आपण पाणी जपून वापरायचंच आणि अन्य मंडळींना देखिल ते जपून वापरण्याबाबत प्रबोधन करायचं व्रत प्रत्येकानं हाती घेतलं पाहिजे. असं केल्याने वाचविलेले पाणी साहजिकच अन्य मंडळींना उपयोगी पडू शकेल. पूर्वी प्रमाणे गावागावीतल ओढे – नद्या बारमाही वाहायला हव्या असतील, तर पर्यावरणाचं संतुलन राखण्याबरोबर त्याच्या संवर्धनासाठी यशस्वी मोहीम हाती घेणं काळाची गरज आहे. याची सुरुवात स्वतः पासून केली की, जोडीला आणखी मदतीचे हात येवू लागतील. भविष्यात मुबलक पाणी हवं असेल, तर त्याग करायची सवय लावून घेण्याबरोबरच निसर्गासाठी वेळ द्यायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.