July 27, 2024
Devotion creates After universe of Swadharma article by rajendra ghorpade
Home » स्वधर्माच्या विश्वरूपातून भक्तीच्या बीजाची पेरणी
विश्वाचे आर्त

स्वधर्माच्या विश्वरूपातून भक्तीच्या बीजाची पेरणी

देवाला सर्वजण मानतात असे नाही. काहीजण तर देवाला निवृत्त करा असा विचार मांडतात. देव मानणे, न मानणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला त्या शक्तीचा अनुभव आला तो देवाला मानतो. ज्याला हा अनुभव नाही, तो मानत नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

आतां यावरी एकादशीं। कथा आहे दोन्ही रसीं।
जेथ पार्था विश्वरूपेसीं । होईल भेटी ।। १ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १० वा

ओवीचा अर्थ – आता यानंतर अकराव्या अध्यायामध्ये दोन ( शांत आणि अद्भुत ) रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरुपाचे दर्शन होणार आहे ?

सद्गुरू भक्तांना विविध अनुभव देत असतात. भक्तीमार्गाची ओढ लागावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. सद्गुरूंची खरी ओळख झाल्याशिवाय भक्तांमध्ये भक्ती उत्पन्न होत नाही. बारावा अध्याय हा भक्तियोग आहे. यापूर्वी अकराव्या अध्यायात भगवंत विश्वरूप दर्शन देतात. यातूनच देवाची ओळख पटल्यानंतरच भक्तीची ओढ लागते.

देवाला सर्वजण मानतात असे नाही. काहीजण तर देवाला निवृत्त करा असा विचार मांडतात. देव मानणे, न मानणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला त्या शक्तीचा अनुभव आला तो देवाला मानतो. ज्याला हा अनुभव नाही, तो मानत नाही. देव आहे. हा संस्कार बाल वयात केला जातो. देवाला नमस्कार करा असे सांगितले जाते. पूज्य व्यक्तींचा आदर करा, असेही सांगितले जाते. हे संस्कार आहेत. असे संस्कार गरजेचे आहेत. या संस्कारातून व्यक्तींमध्ये काही आदर्श निर्माण होतात.

आजकाल आई-वडिलांचे खून करायलाही मुले मागे पुढे पाहत नाहीत. तेथे त्यांची सेवा करणे हा संस्कार तर, केव्हाच विसरला गेला आहे. चांगला समाज घडावा, चांगल्या संस्काराची पिढी घडावी असे वाटत असेल तर तसे संस्कार बालमनावर व्हायला हवेत. धार्मिक पुस्तके ही चांगले संस्कार शिकवतात. यातून कोणाच्या मनात भीती उत्पन्न होत नाही. देवाचे अस्तित्व मानणारे भित्रे असतात असे नाही. कोणाच्यातरी अधिकाराखाली ते वावरतात असे कदापीही नाही.

एक ज्येष्ठ विचारवंत त्यांच्या भाषणात म्हणाले, एका ठिकाणी आग लागली होती. प्रत्येकजण आग आटोक्यात आणण्यासाठी धडपडत होता. त्यात एक चिमणीसुद्धा तिच्या चोचीतून पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होती. त्या चिमणीचा प्रयत्न पाहून एक जण म्हणाला तुझा पाण्याच्या एका थेंबाने आग आटोक्यात येणार नाही. त्यावेळी ती चिमणी म्हणाली मी आग लावली नाही हे सांगण्यासाठी माझा हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही आग लावणारे नाही. या उदाहरणानंतर पुढे भाषणात हे विचारवंत म्हणाले, आज काल देशमुख, चित्पावन, मराठा, वैश्य संमेलन होत आहेत. जातीची बीजे ही संमेलने पेरत आहेत. यावर या विचारवंतांनी कडाडून टीका केली. प्रत्यक्षात हे समाज एकत्र आले आहेत. ते त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, प्रश्न सोडविण्यासाठी. हे प्रश्न सुटले नाहीत तर सामाजिक शांती, एकोपा नष्ट होईल. याचा या विचारवंतांना विसर पडला असावा. उदाहरणे आग आटोक्यात आणण्याची द्यायची आणि कृती मात्र आग लावण्याची करायची हा आजच्या विचारवंतांचा धंदा झाला आहे.

स्वधर्माचा विचार हा विश्वशांतीचा आहे. हे विचारात घ्यायला हवे. यासाठीच ज्ञानेश्वर माऊलीची धडपड आहे. यातून भडकावू विचार पसरवण्याचे कार्य केले गेले नाही. उलट या विचारातून विश्वाची ओळख करून देऊन भक्तीमार्गाचे बीज पेरण्याचे काम केले गेले आहे. स्वच्या ओळखीतूनच विश्वाची ओळख करून घ्यायची आहे. एकदा का या विश्वरुपाची अनुभुती आली की भक्तीची ओढ आपोआपच लागते. हेच या स्वधर्माचे विश्वरूप आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पिके, झाडांशी मैत्री केल्यास त्यांचीही भाषा समजते

महिला आरक्षण –  देशाच्या आर्थिक सक्षमतेची नांदी !

डॉक्युमेंटरी फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म मेकिंगचा शिवाजी विद्यापीठात अभ्यासक्रम

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading