नाचणीचा वापर जितका चांगला तितके आरोग्य चांगले हे समीकरण या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त घरात लागू करायला हरकत नसावी. नाचणीचा वापर वाढला तर सर्वांनाच फायदा होणार हे नक्की..
प्रशांत दैठणकर
आहारात भरडधान्याचा समावेश करताना त्याचा नेमका वापर कसा करायचा याबाबत फारशी माहिती नव्या पिढीला नाही. अगदी नाचणीचाच विचार केला तर नाचणीची भाकरी इथेपर्यंत खूप जणांना माहिती असेल पण मुलांना त्यांच्या आवडीच्या पदार्थातून नाचणीतील पोषणमुल्ये देता येतील.
नाचणीचे काही पदार्थ आपण कसे बनवायचे याची माहिती घ्यायला हवी यात सर्वात चांगला आणि सर्वांना आवडेल असा पदार्थ म्हणजे नाचणीचे लाडू होत. यासाठी नाचणी दळून त्याच्या पिठाचा वापर होतो. नाचणी पीठ शक्यतो शुध्द तुपात खमंग भाजावे यात आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर यांचे पीठ करुन त्यात वेलची पावडर आणि काजू यांचे काप मिसळावे आणि तूप घालून त्याचे घट्ट लाडू बांधून घ्यावे यावर सजावटीसाठी बदामाचे काम तसेच चांदी वर्ख यांचा वापर करता येईल.
अशाप्रकारे केलेले लाडू खूप काळ टिकतात पण ते टिकण्याची वेळ येणार नाही अशा रितीने झटकन संपतील आणि भरपूर खनीजे आणि इतर पोषणमुल्ये शरिराला मिळतील. नाचणी गुणधर्माने शीत असल्याने उन्हाळयात याचा वापर लाभदायक ठरेल.
मुलांना आवडेल असा आणखी पदार्थ म्हणजे नाचणीची इडली होय. एक वाटी नाचणी पीठ, अर्धा वाटी उडद दाळ आणि अर्धा वाटी तांदूळ रात्री भिजवावे. ते भिजवताना वेगवेगळे भिजवलेले उत्तम. त्यानंतर मिक्सरच्या भांडयात इडलीचे पीठ मिश्रण करतो त्याप्रमाणे हे तीन पदार्थ एकत्रित करुन घ्यावे व इडली पात्राच्या आधारे इडल्या करुन घ्याव्यात.
या इडल्यांसोबत ताजी नारळ किंवा पुदीना चटणी आणि सांबार आपणाला बनवता येईल. सर्वसाधारण पणे रविवारी सकाळी काही वेगळा नाश्ता करण्याची पध्दत अनेक घरांमध्ये असते. यात दक्षिणात्य इडली ऐवजी नाचणीची इडली आपण केली तर चेंज होण्यासोबत पोषणमुल्ययुक्त आहाराचाही लाभ होईल.
नाचणीचा वापर जितका चांगला तितके आरोग्य चांगले हे समीकरण या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त घरात लागू करायला हरकत नसावी. नाचणीचा वापर वाढला तर सर्वांनाच फायदा होणार हे नक्की..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.