June 20, 2024
Dr Anant Soor Book Bhogwata review by Pandit Kamble
Home » भोगवटा : सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी अनुभव मांडणारा कथासंग्रह
मुक्त संवाद

भोगवटा : सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी अनुभव मांडणारा कथासंग्रह

परिवर्तनीय मूल्यांच्या दिशेने जाणारी अनंता सूर यांची कथा ही समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही लोकशाही मूल्ये सांगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत रुजली पाहिजेत यासाठीचा संयंत विद्रोह करते.ती मानवी जगण्याला नवीन बळ देऊन नवोन्मेषक जाणीव निर्माण करून देते. हे नव्याने कथानिर्मिती करू पाहणाऱ्या कथाकारांसाठी खूप आशादायी अशी बाब आहे.

पंडित कांबळे,
संकल्प’, सांजा रोड, शिवाजीनगर, उस्मानाबाद पिन-४१३५०१
भ्र.९४२१३५६८२९

डॉ. अनंता सूर यांच्या भोगवटा कथासंग्रहास राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार २०२३ जाहीर

कृतिशील शिक्षक सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार २०२३ ची घोषणा करण्यात आली.यात कथा या साहित्य प्रकारात देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. अनंता सूर यांच्या ‘भोगवटा’ कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप २००१/-,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनच्या श्री गजानन महाराज महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. अनंता सूर यांच्या या ‘भोगवटा’ कथासंग्रहाला मिळालेला हा सातवा पुरस्कार आहे. यापूर्वी या कथासंग्रहाला जुनासुर्ला झाडीबोली साहित्य पुरस्कार,वैदर्भीय अभिव्यक्ती संस्था नागपूर, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूरचा बाबुराव बागूल राष्ट्रीय पुरस्कार, मूर्तिजापूरचा सृजनप्रतिभा वाङ्मय पुरस्कार,नाशिक येथील कादवा प्रतिष्ठाणचा श्री मुरलीधर राघो चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार,सातारा जिल्ह्यातील आसू येथील स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे.

समाजातील दुर्लक्षित, वंचित समाजातील मानवी घटकाचे दुःख अनेक कथा, कादंबऱ्यांमधून वाचायला मिळते. आपल्या नशिबी जे आले ते भोगले पाहिजे याप्रमाणे मनाची समजूत घालून हालअपेष्टा सहन करीत अपेक्षित जीवन जगणारी माणसं अनेक ठिकाणी बहुसंख्येने पाहायला मिळतात.समाजामध्ये दोन वर्ग स्पष्टपणे उभारलेले दिसतात. एक अतिशय श्रीमंत तर दुसरा अतिशय गरीब .पोटाची खडकी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकंती करणारे कितीतरी लोक आपणास अवतीभवती दिसतात. समाजातील, गावागावातील अनुभव तसेच आपल्या कष्टातून अनेक संकटांना सामोरे जाऊन जीवनात यशस्वी झालेली माणसेही आपण पाहतो. अशा माणसांच्या यशांच्या कथा आपण वाचतो आणि ऐकतोही. त्यातून वाचकांच्या आयुष्यालाही निश्चित अंशी दिशा मिळते. भटक्या विमुक्तांचे जीवन आणि त्याचबरोबर परिश्रमाने उभ्या राहिलेल्या व्यक्तींच्या घटनांचे कथन करणाऱ्या अशा वास्तव कथा लिहिणारे डॉ. अनंता सूर यांचा ‘भोगवटा’हा २०२१ मध्ये समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर यांनी प्रकाशित केलेला दुसरा कथासंग्रह आहे. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांचा ‘वाताहत’ हा पहिल्या कथासंग्रह मराठी साहित्यात दाखल झाला आहे. या कथासंग्रहाला मराठी साहित्यातील मनाचे आठ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले होते.आता ‘भोगवटा’ या दुसऱ्या कथासंग्रहाचेही मराठी साहित्यात कौतुकच होईल यात शंका नाही. कारण त्यांच्या कथा आशय विषयाने हृदयाला भिडणाऱ्या आहेत. अस्थिर समाजाचा आणि सुशिक्षित विद्याविभूषितांच्या आयुष्याचा भोगवटा लेखकाने या कथासंग्रहातून मांडला आहे.

‘भोगवटा’या कथासंग्रहातील ‘भोगवटा’ ही पहिलीच कथा आहे. बैना ही तुकारामची बायको झमकोल्याला महादेवाच्या दर्शनासाठी जाताना पोट दुखू लागल्यामुळे मागे थांबते आणि जंगलात वाट हरवते.माणसाची शिकार होता होता वाचते आणि पारध्यांच्या बिऱ्हाडावर येते. दोन-चार दिवसांनी एका पारध्या सोबत ती आपल्या घरी येते. परंतु बैनाला सासू व नवरा हाकलून देतात. तिला ‘बाटलेली बाई’ असे म्हणून आणि तिच्या पोटातील पापाचे मूल आहे म्हणून तिला स्वीकारले जात नाही. त्यावेळी ती विहिरीत जीव द्यायला जाते. परंतु पारधी तिला वाचवतो. पारध्याचा म्होरक्या तिची समजूत काढतो.” तुला पोट आहे तसे हातबी आहेत. धीर धर. कष्टाने जग.”म्हणून समजावतो. तिचा काहीही गुन्हा नसताना घरच्या पिढीजात अंधश्रद्धाळू लोकांमुळे तिला जगणे नकोसे होते. ज्या भटक्या विमुक्त जातीला तिरस्काराने पाहिले जाते तेच पारधी लोकं बैनाचा जीव वाचवतात.

बिराडावरच तिचे लग्न लावून देतात आणि तिचा संसार पुन्हा नव्याने सुरळीत करतात. मोठेपणाचा टेंबा मिरवणाऱ्या जातीपेक्षा जीव वाचवणारी आणि जीव लावणारी पारधी जातीची माणसं चांगली वाटतात हे लेखकाने ‘भोगवटा’ या कथेतून दाखवून दिलेले आहे. पारध्यांच्या पालावर सुंदर मुलीने राहणे किती अवघड आहे ते ‘नियती’ या कथेमधून डॉ. अनंता सूर यांनी दाखविले आहे. नारायण पारध्याचे मराठवाड्यातील माहूरकडचे बिऱ्हाड असते. रामाची बायको मैना ही सुंदर असते. पालावरचा जगणं, ससे- लावे-तितरांची शिकार करणं तसेच चोरी करतात म्हणून पोलिसांना ससेमीरा देऊन गुलामासारखे जगणे तिला नको वाटते. म्हणूनच ती नवऱ्याला म्हणते,” आपण मोलमजुरी करू पण ह्यो धंदा सोडा आंधी तुम्ही. या धंद्यामध्ये बदनामी जादा आहे.” ही जाणीव तिला झाली.त्यामुळे रामा आपल्या भावाला घेऊन रोजगार हमीच्या कामाला ठेकेदाराकडे लागतो. एके दिवशी ठेकेदार उद्याला सडकेवर डांबर टाकायचे म्हणून त्यांना डांबर गरम करायला बसवतो.परंतु डांबराच्या ड्रमखालील दगड फुटल्यामुळे उकळत्या डांबराच्या ड्रमखाली पडून ठेकेदार मरतो. त्याला परध्यांनीच मारले म्हणून त्यांना गाववाले शोधतील या भितीने ते रात्रीच पळून मुंबईला जातात. रामाच्या आईची इच्छा असते की आपल्या मुलांनी खूपशिकावे, मोठे व्हावे पण बाप ऐकत नाही. रामाचे वाऱ्याबरोबर शिक्षणाचे स्वप्नही कोसो दूर उडून जाते.” पारध्याले चोर म्हणत्यात समदे. हे चांगल्याचं जग न्हा ई.” असे रामाला वाटते. पण कामालाही कोणी लावीत नाही. अशी ही पारध्यांच्या संघर्षमय जीवनाची ससेहोलपट ‘नियती’ या कथेत लेखकाने रंगविली आहे. काम करून सन्मानाने जगावे म्हटले तरी हा समाज जगू देत नाही ही अगतिकता या कथेत रामाच्या रूपाने लेखकाने मांडली आहे.

‘माय’ ही लेखकाची स्वकथनपर कथा आहे. नवऱ्याच्या धास्तीने काम करणारी,आयुष्यभर खस्ता खाणारी माय त्यांनी या कथेतून वर्णिलेली आहे. ‘भानगड’या कथेत जयराम व रमाबाई यांच्या कुटुंबाची माहिती आहे. जयरामची एकुलती एक मुलगी रश्मीचे एका इंजिनियर मुलाची लग्न होते.तो एकुलता एक असून बारा एकर बारबाही पाण्याची शेती आहे म्हणून रश्मीला दिले जाते. मात्र लग्न होऊन चार वर्षे झाली तरी रश्मीला मूलबाळ होत नव्हते.त्यामुळे नवरा दररोज मारझोड करायचा. त्रास द्यायचा. शेवटी जयराम गावातीलच लक्ष्मण या मध्यस्थ्याला घेऊन ते नवरदेवाच्या घरी खडकी या गावी जातात. पर्याय म्हणून शेवटी ते दोघांनाही यवतमाळच्या दवाखान्यात जाण्यासाठी सांगतात. तेथे तपासणी केल्यावर मुलांमध्ये शुक्राणू कमी असल्याचा दोष निघतो. नवरा मारझोड केल्याबद्दल पश्चातापही करतो.आपण आजपर्यंत रश्मीची काहीही चूक नसताना मारझोड केली म्हणून तिला माफी मागतो.आणि मोकळ्या मनाने ती त्याला माफ़ही करते. अशी ही ‘ भानगड ‘ कथा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवर जाचक बंधने लादली आहेत.पुरुषात दोष असला तरी स्त्रियानाच कसे जबाबदार धरून तिला त्रास दिला जातो, तिच्यावर हकनाक अन्याय केला जातो तशा स्त्रीची ससेहोलपट लेखकाने या कथेमधून आविष्कृत केली आहे.

‘लॉकडाऊन’ या कथेमध्ये वर्धा जिल्ह्यातील येरला येथील भिमा नारायण बहुरूपी यांची कहाणी आलेली आहे. राम, रावण,पोलिसांचे रूप घेऊन पैसे मिळवायचे हा त्यांचा पिढीजात धंदा. याच बहुरूप्यांची काही कुटुंबे मिळून आंध्रामध्ये शंकर अण्णाच्या शेतात मिरची तोडण्याचे काम करतात. जनार्दन बहुरुप्याची पोरगी राणीबाई लग्नाला आलेली असते. चार पैसे मिळतील म्हणून ते सर्वजण आंध्रात जातात.ते काम संपल्यावर परत येताना ते पाटण बोरीला विहीर खोदण्याचे काम करतात.विहिरीचे चाळीस हजाराचे काम पूर्ण होताच लॉकडाऊन लागतो. कोरोना रोगाचा जगभर हाहाकार माजतो. पोलीस सारखे पैसे मागून त्यांना त्रास देतात.त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी ते रातोरात मुकुटबनला पडून येतात. तिथे संभा पारधी हा समदुखी त्यांना भेटतो. तेथे लॉकडाऊनच्या काळात भटक्या, गोरगरिबांसाठी पंचायत समितीत काही दिवस जेवणाची पॉकीटे मिळतात. लॉकडाऊनचे दोन टप्पे संपताच लगेच तिसरा टप्पाही सुरू होतो. गावी जायला परवानगी मिळते. भिक मागायला गेल्यावर जनार्दनची तरूण मुलगी राणीबाईचा कुणीतरी हात धरतो. ती कशीतरी पळून येते. गाव सोडायचे ठरते परंतु गावी जायला पैसे नाही म्हणून संभा पारधी झाडाला लावून फाशी घेतो. बहुरूपी आपल्या गावी येरल्याला निघून येतात. ही लॉकडाऊन काळातील भीषण वास्तवता या कथेमध्ये आलेली आहे. देशातील लाखो लोकांना या लॉकडाऊनचा फटका बसला.अन्न- पाण्यावाचून माणसे मेली. सरकारला मात्र याचे काहीही सोयरसुतक वाटले नाही. माणसे असह्य झाली. माणसांची किंमत मातीमोल झाली. भटक्या विमुक्तांचं, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे नाहक जीव गेले. लेखकाने संभा पारधी असो वा बहुरूपी असो त्यांच्या रूपाने एक उदाहरण म्हणून दाखविलेले आहे. अशी लाखो कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत.त्यांची ही प्रतिकात्मक कथा डॉ.अनंता सूर यांनी अगदी वास्तवपणे मांडलेली आहे.

‘कापूसकोंडी’ या कथेतील लेखकाने सखारामचे कुटुंब दाखविलेले आहे.सखाराम व चंद्रभागा हे वागदरा येथील शिवराम पाटलाच्या वाड्यात सालगडी म्हणून काम करतो.त्यांच्या मदतीने नंदा व सुंदरा या मुलींचे लग्न करतो. सुंदरीला नवरा मारझोड करतो त्यावेळी ते प्रकरण शिवराम पाटील मिटवितात.परत येतांना चोर पाटलांवर हल्ला करतात त्यावेळी सखाराम मध्ये पडून त्यांचा जीव वाचवतो.परिणामी सखारामचा हा प्रामाणिकपणा पाहून शिवराम पाटील वडगावची पाच एकर जमीन त्याच्या नावावर करतो. खदानित स्वतःची जमीन गेल्यावर शिवराम पाटील आलेले पैसे घेऊन मुंबईला आपल्या मुलांकडे राहायला जातात. सखाराम मिळालेल्या शेतीत चाळीस क्विंटल कापूस काढतो.कापसाला योग्य भाव नाही म्हणून तो कापूस घरात भरून ठेवतो.कालांतराने कापसात खाजकीडे सुटतात. त्यामुळे शेवटी ट्रॅक्टर लावून वणीच्या बाजारात तो कापूस नेतो.मध्येच लॉकडाऊन सुरू झाल्याने ग्रेडरमुद्दा भाव पाडून कापूस मागतात.त्यामुळे तो ग्रेडरविरुद्ध जावून औषध पितो. विषारी औषध पिल्यामुळे ग्रेडरने सरसकट लगेच सगळ्यांना भाव वाढवून दिला. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे काही पिकते तेव्हा त्याला भाव दिला जात नाही. त्याची सर्वजण पिळवणूक करतात.’कापूसकोंडी’ या कथेमधून शेतकरी जीवनाची हृदयद्रावक घटना लेखकाने उजागर केली आहे.

‘ कष्टाचं चिज’ ही लेखकाची स्वकथनपर कथा आहे. लेखकाने डॉ. यशवंत मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दया पवार यांच्या कवितेवर’एम.फिल. केलेले आहे. तर डॉ. प्रकाश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शरचंद्र मुक्तिबोध आणि नारायण सुर्वे यांच्या काव्यातील सामाजिक जाणीव’ या विषयावर प्राचार्य पदवी मिळवितांना होणारा त्रास या कथेतून दृग्गोचर झाला आहे. शेवटी लेखकाच्या कष्टाचं चीज होते. लेखकाला याचे समाधान वाटते. लेखकाची धडपड किती कष्टदायी होती, किती यातना सहन कराव्या लागल्या त्या सर्व गोष्टी या कथेमधून लेखकाने मांडलेल्या आहे. कष्टातून मिळालेल्या यशाचा आनंद हा वेगळाच असतो. तो या कथेतून आलेला आहे.

‘ वेदनेपल्याडचं नातं’ हीसुद्धा स्वकथनात्मक कथा आहे. या कथेमध्ये दैनंदिन ‘लोकमत’च्या ‘पत्रमैत्री’तून अश्विनी नावाच्या मुलीची झालेली ओळख, तिच्या आई-वडिलांची भेट, अश्विनीचा एका कॅटेगिरीच्या मुलासोबत चाललेले प्रेमप्रकरण या कथेमध्ये आले आहे. त्यामुळे घरात वाद होतो. तो वाद मिटविण्यासाठी लेखकाचा प्रयत्न सुरू होतो. त्यावेळी अश्विनीची आई झोपेच्या गोळ्या खाऊन मरते. मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या झालेल्या मानसिक धक्क्यानं तिचा नाहक बळी जातो. अशी ही वास्तववादी कथा लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेली आहे. लेखक तिचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. थोड्याशा ओळखीतून पुढे वाढत गेलेला गुंता लेखकाने या कथेतून अतिशय प्रभावीपणे मांडलेला आहे.आपल्याने होईल तेवढी मदत इतरांना करावी ही तळमळीची भावना नुकती लेखकाने ठेवली नाही तर प्रत्यक्ष कृतीतून ती दाखवूनही दिलेली आहे.कृतज्ञतेची भावना या कथेतून आविष्कृत झाली आहे.

‘ मरणकळा’ ही स्वकथनपर कथाही लेखकाच्या माजरीतील सरस्वती नावाच्या आत्याच्या जीवनातील सुख-दुखावर आधारलेली आहे.आत्याला हास्यकुमार नावाचा एक मुलगा होता.तो डॉक्टर असूनही अखेर जलपंडू नावाच्या आजाराने मरतो. त्यावेळी तिला जगण्यासाठी काहीच आधार न राहिल्यामुळे ती लेखकाच्या वडिलांना सुनील नावाच्या मुलाला दत्तक मागते. शेती आहे म्हणते.परंतु आई मात्र सुनीलला दत्तक द्यायला तयार नसते. आत्या जुन्या घरी देऊळ बांधते. देवळामागे खोली बांधून एकटीच राहते. आजाराने खोलीत पाठीला अळ्या पडून मरते. आत्याच्या जीवनातील अनेक चढ-उतार लेखकाने या कथेत कौशल्याने मांडले आहे. कोणत्याही माणसाचे दिवस सारखे नसतात. काळ हा परिवर्तनशील असतो.त्याचे भान माणसाने ठेवले पाहिजे हे आत्याच्या रूपाने लेखकाने दृष्टीपथास आणले आहे.

‘ आंधळी स्वप्ने’ या कथेतील नायक नामदेव आणि नायिका सुमन हे भटक्या जमातीतले.दोघेही शिकलेले असतात. सुमन बारावीपर्यंत शिकलेली असते. शिकलेल्या पोरीला नोकरीवाला नवरा भेटेना आणि अशिक्षित मुलगा करून घेईना. अशा अवस्थेत पालावर राहात असतांना दोघांचे लग्न होते. एकदा वडगावात चोरी होते.पोलीस येतात. सुमन सुंदर असल्यामुळे खूपच ओढाताण होते हे नामदेवच्या लक्षात येते. बिराडावर एवढी सुंदर बायको घेऊन राहणे चांगले नाही म्हणून तो मुंबईला जातो. मजुरांच्या झोपडीत आपलीही एक झोपडी उभी करतो. मात्र एकदा रात्री भर पावसात साड्यांच्या झोपड्या वाहून जातात. पोटात भुकेने कुत्रे लागल्यामुळे नाईलाजाने शेवटी सकाळी ऊठून बायका भिक मागायला जातात. एका मोठया इमारतीमध्ये एक गोरीपान मुलगी आपल्या कुत्र्याला बिस्किटे देत होती.मोलमजुरी करून सन्मानानं जगू पाहणारी आमची आंधळी स्वप्ने या लोकशाहीत रात्री वाहून गेली की काय? या विचारांनी नामदेवचे डोके चक्रावून जाते. अशी ही वाचकाच्या मनाला स्पर्शून जाणारी कथा डॉ. अनंता सूर यांनी लिहिलेली आहे. भटके जीवन जगणाऱ्या जमातीला जो गुन्हेगारीचा शिक्का बसला आहे.तो गुन्हा त्यांनी न करताही त्यांना संशयित म्हणून पकडले जाते. विनाकारण जनावरांसारखा त्रास दिला जातो.त्यांच्या बायका-पोरींवर वाईट नजर ठेवली जाते.ते या राक्षसी व्यवस्थेत गुमान भरडले जातात. ही अगतिकता या कथेतून लेखकाने दाखवून दिली आहे.

‘वनवास’ या स्वकथनपर कथेमध्ये चंदा नावाच्या बी.ए.झालेल्या लेखकाचा मित्र अनिलच्या बहिणीची ही कथा आहे. चंदाचे वडील राजुऱ्याला पोस्ट मास्तर होते. त्यांची वीस-पंचवीस एकर शेती. घर राजुराला होते. चंदाला चंद्रपूरजवळील कवठी या गावात दिले होते. तिचा नवरा मिलिटरीत होता. तिचा संसार सुखाचा चाललेला असतो.पुढे तिला दोन मुली होतात.पंधरा-सोळा वर्षानंतर लेखक जेव्हा अनिलच्या घरी जातो तेव्हा चंदा वेडीपिशी झालेली त्याला घरी दिसते. जावई शंकेखोर असल्याने तसेच त्याला तिच्या सासू-सासर्‍याचीही साथ असल्याने तिला खूप मारहाण केली जाते. नवऱ्याकडून काहीही कारण नसतांना त्रास दिला जातो. पुढे दोन्ही मुली कंपनीत पुण्याला नोकरीला लागतात.कालांतराने जावई रिटायर होतो आणि पुण्यात घर घेतो. त्याला त्याची चूक कळते आणि तो पुन्हा चंदाला पुण्याला घेऊन जातो.अशाप्रकारे तिचा वनवास संपतो. अशी ही चंदाच्या आयुष्याची झालेली परवड डॉ. अनंता सूर यांनी ‘वनवास’ या कथेतून मांडलेली आहे. माणसाच्या सुखी संसाराला संशयाने पछाडल्यामुळे आयुष्याचे वाळवण होते. संशय म्हणजे मृत्यू. तो काही केल्या जात नाही. संशय जरी जात नसला तरी नंतर मुली मात्र नोकरीला लागल्यामुळे आणि नवऱ्याची सेवानिवृत्ती झाल्यामुळे चंदा आपल्या घरी जाते ही वास्तवता अनंता सूर यांनी आपल्या कथेतून विशद केली आहे.

‘ भूक’ या स्वकथनपर कथेत लेखकाचा थोरला भाऊ प्रकाशने शिक्षणासाठी केलेली मदत, नागपुरातील वसतिगृहात राहून शिक्षण घेताना अडचणीच्या दिवसात आलेले अनुभव या कथेत आहे. भूक माणसाला मजबूर करते. पोटासाठी माणूस काहीही करायला तयार असतो. लेखकाने वस्तीगृहातील उपासमारीचे जीवन दाखविले आहे. कुठे एखादे लग्न आहे असे कळले की मित्रांसोबत तिथे लेखक जेवायला जायचे. एकदा ते आपल्या खोलीतील सुधाकर नावाच्या मित्रासह पकडले जातात.मुलामुलीच्या आईवडीलाकडून जेवणाचे ताट हातात घेताच अपमान सहन करावा लागतो. तो कसा ते ‘भूक’ या कथेमधून लेखकाने अतिशय संवेदनशील मनाने व्यक्त केले आहे.

‘ वनवा’ या कथेत लेखक एम .ए. केल्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात प्रकाशभाऊकडून साठ हजार व्याजाने घेऊन नोकरीला लागतात. तेथील अनुभव व कॉलेजच्या एन.एस.एस. कॅम्पमधील अनुभव या कथेमध्ये आलेले आहेत. नोकरी सोडून पैसे परत मिळविणे, त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षाने पैसे परत देण्यासाठी दिलेला मानसिक ताणतणाव या कथेत आलेला आहे. संस्था चालकाला दिलेले पैसे अनेक मार्गाने मागे लागून शेवटी मिळालेच याचे समाधान लेखकाला वाटते.आणि खऱ्या अर्थाने त्यांचा वनवास संपतो. असा हा वनवास लेखकाने कथेतून व्यक्त केला आहे.

डॉ.अनंता सूर यांच्या कथा या वास्तववादी आहेत. समाजात जे जे घडते त्या सूक्ष्मातीसूक्ष्म निरीक्षणातून या कथा आलेल्या आहेत. या कथांमध्ये जिवंत अनुभव असल्यामुळे या कथा वाचताना प्रत्येक वाचक या घटनेत स्वतःला पाहतो. त्यामुळे या कथा आपल्या जीवनाशी मिळत्याजुळत्या आहेत असे वाटते. इतका जिवंतपणा लेखकाने या कथांमध्ये आणलेला आहे. ‘भोगवटा’ या कथासंग्रहामध्ये एकूण तेरा कथा आहेत. यामधील चार कथा या भटक्या विमुक्त जातीजमातीच्या लोकांच्या जगण्यावरील आहे. त्यात भोगवटा, नियती, लॉकडाऊन,आंधळी स्वप्ने या कथांचा समावेश होतो. सहा कथा या लेखकाच्या स्वकथनावर आधारित आहेत.त्यामध्ये माय, कष्टाचं चिज, मरणकळा,भूक, वनवा, वेदनेपल्याडचं नातं या कथांचा समावेश होतो तर भानगड, कापूसकोंडी आणि वनवास या तीन कथा समाजातील निरीक्षणावर आधारित आहेत.

कथाकारांच्या प्रत्येक कथेमध्ये कथा नायकाच्या जीवनात आलेले घटना, प्रसंग हे समस्यानुरूप धारण करून आलेले आहेत.जीवनात प्रश्न पडला तरच त्याचे उत्तर सापडते. त्याप्रमाणे त्या प्रत्येक समस्येची उकल करीत करीत या कथा पुढे जातात.त्या कथा वाचताना कधी संपल्या हेही कळत नाही इतकी सहजता या कथांमध्ये आलेली आहे. या कथा वाचकाने मुळातूनच वाचाव्या तरच त्यातील सहजता कळूनन येईल. साधी भाषा, ओघवते कथानक, संयम, विद्रोह या कथांमधून आलेला आहे. त्यामुळे या कथा वाचनीय आणि संवेदनशील अशा झालेल्या आहेत. या कथांमध्ये कुठेही अतिशयोयुक्ती,आक्रस्ताळेपणा, उरबडवेपणा जाणवत नाही. यातील प्रत्येक कथा ही घटना आणि प्रसंगांचे सहजतेने वर्णन करीत पुढे जाते.

वर्णनात्मक शैली, कुठेही न अडखडता सहज सोपा जिवंत विषय घेऊन वास्तव कथानक लेखकाने या कथांमधून मांडल्यामुळे कथेला वेगळेपणा प्राप्त झाला आहे. या कथांमध्ये प्रसंगांनुरूप म्हणी व वाक्प्रचार वापरल्यामुळे कथेला रंजकता आली आहे.जवळजवळ साठ ते सत्तर म्हणी या कथांमधून आलेल्या दिसून येतात. हेही अनंता सूर यांच्या कथांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

या कथासंग्रहाला ग्रामीण कथाकार तथा कादंबरीकार योगीराज वाघमारे यांची आशययुक्त व प्रभावी मूल्यात्मक प्रस्तावना लाभली आहे तर ‘बाजार’ या गाजलेल्या कथासंग्रहाचे कथाकार श्री.विलास सिंदगीकर यांनी मनःपृष्ठावरील मजकूर दिला आहे. त्यामुळे कथामूल्ये समजण्यात बरीच मदत होते. डॉ. अनंता सूर यांनी आपल्या कथांमधून ग्रामीण जीवनातील सामान्य माणसाच्या जगण्यातील ताणतणाव, समस्या, संघर्ष हे आपल्या ओघवत्या शैलीत मांडले आहे. पारंपारिकतेच्या भोगवट्यातून बाहेर पडून नवीन नैतिक मूल्यांची कास धरली पाहिजे हे ब्रीद या कथांमधून ऊद्घृत होते.

परिवर्तनीय मूल्यांच्या दिशेने जाणारी अनंता सूर यांची कथा ही समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही लोकशाही मूल्ये सांगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत रुजली पाहिजेत यासाठीचा संयंत विद्रोह करते.ती मानवी जगण्याला नवीन बळ देऊन नवोन्मेषक जाणीव निर्माण करून देते. हे नव्याने कथानिर्मिती करू पाहणाऱ्या कथाकारांसाठी खूप आशादायी अशी बाब आहे.

पुस्तकाचे नाव – भोगवाटा
लेखक – अनंता सूर (भ्र.९४२१७७५४८८) गणेशपूर, ता – वणी, जि – यवतमाळ पिन-४४५३०४
प्रकाशक: समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर

Related posts

“वुई….द रीडर्स’…आगळावेगळा व्हाॅट्सअप ग्रुप

शेतीचा शोध स्त्रीने लावला ! – सुनिताराजे पवार

पुस्तकांचे गाव म्हणून राज्यातल्या या गावांची निवड

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406