इतिहास घडवायचा असेल तर मातीचा इतिहास मशागत करून नव्या पराक्रमाची रोपे उगवायची ताकत डॉ. हरिश्चंद्र बोरकर नव्या पिढीत भरत आहेत. पण भाषिक आतांकवादाला बळी पडलेली विद्वान मंडळी बोलीला न्यूनगंडाच्या सावलीत ढकलून अंकुराची वाढ खुंटवत असले, तरी डॉ.बोरकरांचा सुर्यतेज त्याला वटवृक्षात वाढवायला सज्ज झाला आहे.
लक्ष्मण खोब्रागडे
जुनसुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१
मानवी जीवनात भाषेला अनन्य साधारण महत्व असले तरी प्रमाणाच्या अतिरेकी अट्टाहासापायी , तिला जन्म देणाऱ्या बोलीला कुचकामी आणि गावंढळ समजून दुर्लक्षित करणाऱ्यांना आज नवा अध्याय मिळाला. त्यासाठी पार्श्वभूमी आहे हरिश्चंद्राची मेहनत आज फळाला आली. ‘राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार जाहीर झाला आणि झाडीबोलीच्या उत्थानासाठी जीवाचे रान करणाऱ्या शोधमहर्षिला करावी लागणारी तपश्चर्या धन्य झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून बोलीचा गड राखण्यासाठी एकाकी झुंज देताना डॉ. बोरकरांना कित्येक टिकेला तोंड द्यावे लागले असेल, याची कल्पना न केलेली बरी. याचा अनुभव आजही येत आहे त्याची प्रचिती मला तरी कित्येकदा आली. काय भाषा आहे ? किती गावठिपणे लिहितो ? प्रमाणभाषेची बरोबरी करू शकते का ? इतकेच नव्हे तर टर उडवणाऱ्या शेकडो टिपण्या क्षणोक्षणी वाट्याला आल्या. पण या बोलीच्या संस्कृतीला अनन्य साधारण आहे आणि राहील हे पुन्हा एकदा डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
संपूर्ण भारत देशभरातून झाडीबोलीत लिहिणाऱ्या आणि झाडीबोलीच्या संस्कृतीला उजागर करणाऱ्या डॉ. बोरकरांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार हेच टिकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे. भाषा हे व्यक्त होण्याचे माध्यम असले तरी त्यात उच्च निच्च असा दुवा नसते. प्रत्येक भाषेचे स्वतंत्र विज्ञान असते, तसेच तिला जन्म देणाऱ्या बोलीची स्वतःची अस्मिता असते. ती अस्मिता जपली तरच भारताचा खरा सांस्कृतिक वारसा जगापुढे येईल. याची जाण असल्याने राष्ट्रीय स्तरावर हरिश्चंद्राची फॅक्टरी आपला पेटंट बावनकशी ठरवून गेली. पण या मायेच्या कुशीत जे लहानाचे मोठे झाले, त्यांनाच आपल्या दुधाचे सुतक व्हावे यापेक्षा जगातील मोठी शोकांतिका कोणती ?
इतिहास घडवायचा असेल तर मातीचा इतिहास मशागत करून नव्या पराक्रमाची रोपे उगवायची ताकत डॉ. हरिश्चंद्र बोरकर नव्या पिढीत भरत आहेत. पण भाषिक आतांकवादाला बळी पडलेली विद्वान मंडळी बोलीला न्यूनगंडाच्या सावलीत ढकलून अंकुराची वाढ खुंटवत असले, तरी डॉ.बोरकरांचा सुर्यतेज त्याला वटवृक्षात वाढवायला सज्ज झाला आहे. झाडीबोलीच्या वटवृक्षाची मातीत रुजलेली मूळे गर्भात दडलेला रस घेऊन भाषेला संजीवन प्राणवायू बहाल करेल, हेच चिरकाल सत्य आहे. म्हणून आज बोलीचा नाद – डंके की चोट पे , म्हणायला आज मला अभिमान वाटतो आहे. झाडीचा झेंडा असाच चिरंतर यशोशिखरावर डौलाने फडकत राहणार आहे. त्यासाठी आपणा सर्वांची साथ हवी.
झाडीबोली शोधमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी फेलोशिप घोषित झाल्यामुळे आम्हाला नवा ऊर्जा व स्फूर्ती प्राप्त झाली असून , डॉ. बोरकरांचे आयुष्य अशा अनेक पुरस्कार रत्नांनी उजळून निघावेत या प्रांजळ वंदनेसह हार्दिक शुभेच्छा देऊन, त्यांना दीर्घायुष्य लाभून झाडीचा मेवा भारतवर्षाला अखंड चाखायला मिळो, अशी निर्मिकाकडे मनीषा व्यक्त करतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.