November 22, 2024
Book Review of Ek sakhi Anjali Rasal poem Collection
Home » स्वशोधाची जाणीव करून देणारी कविता – ऐक सखी
मुक्त संवाद

स्वशोधाची जाणीव करून देणारी कविता – ऐक सखी

कवयित्री आपल्या सख्यांना जपून राहण्याचा संदेश देते. बाईच बाईची शत्रू असते हे कटु सत्य ही उघड करते. नको त्या गोष्टींचा विचार सोडून देवून नियतीवर विश्वास ठेवून कर्म करीत राहण्याचे मर्म ती सख्यांना ऐकवते.

डॉ. श्रीकांत श्री. पाटील

आपल्या मनातील भावभावना, व्यथा वेदना, सुख दुःखाचा आविष्कार वास्तवाच्या आणि कल्पनाशक्तीच्या आधाराने कवी लेखक आपल्या साहित्यातून करीत असतो. कमीत कमी शब्दात सशक्त आशयाची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य कवितेत असते. साध्याही विषयात खूप मोठा आशय असतो. तो नेमकेपणाने हेरून कवी शब्दांची बांधणी कवितेत करतो. आपल्या मनातील सल तो बोलून दाखवितो. कविता ही तर उत्स्फुर्त भावनांचा सहजाविष्कार असते.डॉ. सौ. अंजली रसाळ यांची ऐक सखी काव्यमालेतील कविता ही स्रीला स्वशोधाची जाणीव करून देणारी कविता आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत ज्ञानात्मक आणि गुणात्मक प्रगती करुनही स्रीला नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले. मुकपणे वर्षानुवर्षे तिने हे अन्याय, अत्याचार, अपमान आणि अवहेलना सहन केली. आता तिल्या या बंधनातून मुक्त हायचे आहे. त्यामुळेच कवयित्री आपल्या मैत्रिनींना ऐक म्हणून साद घालते आहे.

‘सखी म्हणावसं वाटतं मला
सांग एकदा सगळं
तोड मनावरच्या बेड्या
मग आकाश तुला मोकळं
आकाश तुला मोकळं,

परंपरेच्या बेड्या जखडून पडलेल्या तिच्या पदरी फसवणूक, वेदना आणि अश्रुच आले आहेत. तिच्या प्रगतीचा आलेख गिधाडांना खुपतो आहे. तिने नमावे म्हणून खोट्या अफवा पसरविल्या जाताना अशा मर्कटांना भिऊ नकोस असे आवाहन त्या करतात.

भारतीय समाजात स्रीला वेलीची उपमा दिली जाते. वेल उभी राहते ती वृक्षाच्या सहाय्याने. बालपणी पित्याचा, तारुण्यात पतीचा आणि वार्धक्यात पुत्राचा आधार घेऊन तिला जगावे लागते. पण याचे दुःख न करता तू उभी रहा. स्त्रिये या कवितेत पराधिनतेचे दुख न करण्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. आपलं हृदय डस्टबीन कधी आणि कसं झालं हे कळलं नाही याची कबुली देतानाच आता हे डस्टबीन बाहेर ठेवून त्याच कोपऱ्यात फ्लाॅवरपॉट ठेवण्याचा सल्ला त्या सखीला देतात.

स्त्री ही वर्षानुवर्षे अन्याय अत्याचाराची शिकार झाली आहे. आक्रोश, जखमा, माझ्याच, कावा, ददा या कविता स्री समस्यांचा आविष्कार करतात. कवयित्री आपल्या सख्यांना जपून राहण्याचा संदेश देते. बाईच बाईची शत्रू असते हे कटु सत्य ही उघड करते. नको त्या गोष्टींचा विचार सोडून देवून नियतीवर विश्वास ठेवून कर्म करीत राहण्याचे मर्म ती सख्यांना ऐकवते. आपल्या मनाला आवरण्याचे सावरण्याचे आवाहन त्यांनी “सावर रे” या कवितेत केलेले आहे.

“सावर रे मना
नको हिंडू रानावना
जाशील तर बेसावध
टोचतील काटे
कोवळ्या मना”
असा सावधगिरीचा इशाराही देतात.

आज स्री शिकली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करते आहे. तिचे आत्मभान जागृत झाले आहे. तिचा स्वशोधाचा प्रवास सुरु आहे. त्यामुळेच आपण स्वच्छंदी जगावे, मिळकतीवर आपलाही अधिकार असावा असे तिला वाटणे स्वाभाविक आहे. तिच्या माफक इच्छा पूर्ण व्हाव्यात एवढीच तिची इच्छा आहे. मी कशी आहे ते मी अशी मध्ये त्यांनी मांडले आहे.

“मी टाईमपास नाही तुझा
मनोरंजन तर मुळीच नाही
फावला वेळ म्हणशील तर
आय थिंक, तेही नाही”

अशी परखड भाषा करून स्रित्वाचा एक प्रकारे त्यांनी जागरच मांडला आहे.

जीवन हे न सुटणारे कोडे आहे. कधी स्वतःशी, कधी कुटुंबाशी तर कधी व्यवस्थेशी तिला दोन हात करावे लागतात. पण त्यात ती कुठेच कमी पडत नाही. पद, पैसा आणि प्रतिष्ठा या अशाश्वत गोष्टींवरही त्या ‘रे साहेबा’ या कवितेतून भाष्य करतात. साहेबी वृत्ती प्रवृत्तीवर, त्यांच्यातील वर्मावर हलकेच बोट ठेवतात.शाळा, शिक्षण, अध्ययन, अध्यापनाचा कवयीत्रीने वसा घेतला असल्याने गुरुजी, बाई, बालक, पालक त्यांच्या कविवेचे अविभाज्य घटक आहेत. ‘बाई मला काही सांगायचयं’ या कवितेतून त्या शिक्षण प्रणाली विषयी अभिव्यक्त होतात.जात, निलाजरी, रिकाम्या खिशाने, प्रचिती या कविता विविध सामाजिक अडचणीच्या विषयांची मांडणी करून सामाजिक वास्तव वाचकांसमोर मांडतात तर वस्तुपाठ, मी मशीन, नाती, बाबा ऐका, रे शहाण्या मुला, रे बा या कविता मायेच्या नातेसंबंधाची वीण उलघडून दाखवितात. माया, ममता, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा यावर नाती वृद्धिंगत होतात. अन्यथा त्यांची माती होते.ही परखड सलही त्या मांडतात. नातं, मौन या कवितांतून कवयित्रीच्या चिंतनशीलतेची प्रचिती येते.

‘ऐक सखी’ काव्यसंग्रहातील कविता या कुटुंब, समाज, शिक्षण, स्त्री या चौकोनात स्त्री जाणीवांचा स्वशोधाचा, स्री समस्यांचा आविष्कार करणार्‍या कविता आहेत. येथे चिंतन आहे. परखडपणे भाष्य करण्याची धमक आहे. यातील भाषा शालीन आणि कुलीन आहे. मुक्तछंदात रचना करताना कवयित्रीने उत्तम शब्दांची उत्तम रचना केली आहे. ऐक सखी मधील कविता सहज सुंदर शैलीने नटलेल्या असून अर्थसौंदर्याबरोबर भानसौंदर्याने सुशोभित आहे. वर्तमानातील स्री जीवनावर भाष्य करताना स्त्रिला तिच्या अस्तित्वाचा शोध घेण्याबरोचर प्रबोधनही अतिशय रसाळ भाषेत कवयित्रीने केले आहे. स्री या विषयाच्या परिघातील घटकांना काव्यविषय करून त्यावर सुंदर सुंदर काव्यकृतींची निर्मिती केल्याबद्दल कवयित्रीचे मनःपूर्वक अभिनंदन.

कविता संग्रह – ऐक सखी
कवयित्री – डॉ. सौ. अंजली रसाळ
प्रकाशक – अक्षरदीप प्रकाशन
मुल्य – १००/- रू.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading