September 26, 2023
Gar Gar Bhovara Book Review
Home » बालविश्व उलगडणारी कविता : गर गर भोवरा
काय चाललयं अवतीभवती

बालविश्व उलगडणारी कविता : गर गर भोवरा

झाडे लावण्याचा आणि पाणी घालून त्याला वाढवण्याचा अट्टहास ही लहान बालके कशी करतात. त्या रोपट्यांचा वाढदिवस साजरा करु पाहतात. त्याच्यासाठी वरुण मेघ सावळा येईल आणि वारा त्याच्या भोवती पिंगा घालत गाणे म्हणतील अशी कल्पना ही मुलं करतात.
प्रा. रामदास केदार

मो. ९८५०३६७१८५

चंद्रपूर येथे कोळसा खाणीत क्रेन मेकॅनिक कामगार म्हणून कार्यरत असलेले प्रतिभावंत कवी प्रदीप देशमुख यांची कविता म्हणजे बालकांचे बालविश्व उलगडून दाखवणारी आहे. गर गर भोवरा हा त्यांचा पहिलाच बालकविता संग्रह प्रकाशित आहे.

कवी बालकांच्या बालमनातले अंतरंग ओळखून त्यांच्या मनाशी एकरुप होऊन जातो. कल्पकतेने नटलेले, सजलेले हे बालमन कल्पनेच्या बळावर संपूर्ण विश्वात आपली सफर घडवून आणतो. बालकांना प्रत्येक गोष्ट नवलाईची वाटत असते. त्यातच ते आनंद शोधतात. मुलांच्या या आनंदाला उधाण कसे येते ते कवी बारकाईने टिपतो. मुलांना अनेक खेळ आवडतात. गरगर फिरणारा हा भोवरा खेळ मुलं खेळत असतात. गरगर गिरक्या घेणाऱ्या भोवऱ्याला गती कमी होईल तोपर्यंत न थांबता तो फिरतो. बालकांचे बालमनही असेच भोवऱ्यासारखे अवतीभोवती गरगर फिरणारे आहे. भोवऱ्यासारखेच बालकांचे मन कसे फिरत असते. हा मन भोवरा रिकामा फिरत नाही तर अवती भोवतीचा शोध घेत कसा फिरतो आहे हे कवीला वाटत असावे. मुलं भोवरा खेळतांना खूप त्या भोवऱ्याची मजा घेतात. हसतात, आनंदून जातात. माणसांसारखी भोवळ भोवऱ्यालाही येत असावी असे कवीला वाटते.

माझा भोवरा मातीमध्ये
पहा काढतो सुंदरनक्षी
अंगणामध्ये जणू उतरला
आकाशातील उडता पक्षी

फिरता फिरता मध्येच थांबतो
पायामधले सरले की बळ
कधी कधी अशी अचानक
भोवऱ्यालाही येते भोवळ

गावजत्रा ही मुलांना आनंद देणारी असते. जत्रा म्हणल की मज्जाच मज्जा. आकाशपाळणा आकाशाला कसा गवसणी घालत गोल गोल कसा फिरतो .याचे वर्णन कवी करतो आहे. तर मुलांना आपण पंख लावून आकाशात भरारी घ्यावीशी वाटते. फळझाडांवर जाऊन फळे खावावीत. शाळेला सुट्टी घेऊन खूप मजा लुटावी. बाल असेलेलं हे चंचल मन खूप मोठ्या अपेक्षा करत असते.

पंख मलाही दोन फुटावे
पक्षी होऊन उंच उडावे

उंच उंच मी ढगात जाईन
गिरकी घेऊन खाली येईन
तरु शिखरावर मध्येच थांबून
फांदीवरती झोका घेईन

जरी आईने म्हटले हट्टी
चिऊताईशी करीन गट्टी
दप्तराचे ते नसेल ओझे
अन् शाळेला मिळेल सुट्टी

पाऊस सगळ्यांच्या आवडीचा विषय. पावसात भिजायला कोणाला नाही आवडत ? बालकांना खूप आवडतो. नदीला पूर यावा वाटतो, शेती हिरवीगार व्हावी वाटते, म्हणून पावसाला पडण्याची विनंती करतात. पाऊस जसा हसरा तसा रागीटही असतो. कधी वेळेवर येतो तर कधी ढगातच रुसून बसतो. बेधुंद होऊन मोरांसारखा नाचतही येतो आणि सगळ्यांची धम्माल उडवून निघून जातो.

पड रे पाण्या वनात
हसतील झाडे मनात

पड रे पाण्या शेतात
ज्वारी, बाजरी जोमात
तूर, कपाशी पिकू दे
शेतकरी दादा हसू दे

मातीत एक बी रुजलं की, त्याचे झाड होऊन त्या झाडापासून अनेक बी तयार होतात. छोट्या या बीयात मोठे झाड कसे दडलेले असते याचे मुलांना खूप नवल वाटत असते. या छोट्या बी मध्ये फळे, फुले, पाने, सावली आणि शुद्ध ऑक्सीजन दडलेले असते. कवी सुंदर असे वर्णन करतो.

एक बी मातीत पडले
हात जोडून वर आले
मातीमध्ये होती ओल
मुळे गेली खोल खोल

हळूहळू मग झाली वाढ
आकाराला आले झाड
झाडाचे खोड गोल गोल
त्या खोडावर फांद्यांचा डोल

फांद्यावरती हिरवी पाने
तिथे पाखरे गातात गाणे
कुणी बनवला सुंदर खोपा
कुणी नुसताच काढतो झोपा

पानांसोबत उमलले फूल
झाडांच्या कानात सुंदर डूल
फुलांची झाली गोड फळे
मिळून खाऊ या रे सगळे

सुंदर शब्दांच्या छटा पांघरून कवी प्रदीप देशमुख यांची कविता साकारलेली आहे. मुलांना झाड कसे झाले सुंदर रचनेतून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती कशी असावी हे महात्मा गांधी यांच्या विचारातून आणि वागण्यातून शिकावी. सत्य, अहिंसा आणि समानतेची शिकवण देत उघड्या अंगानं फिरणारा हा जगाच्या ओठातली ओळख होऊन बसला हा महात्मा या देशाचा सन्मान आहे.

मीठ मूठभर घेऊन हाती
चेतविली कण कण माती
एक शक्तीचे दर्शन घडले
विशाल दर्याकाठी

दिली शिकवण मानवतेची
सत्य, अहिंसा समानतेची
राहील निरंतर त्याचे
नाव जगाच्या ओठी

झाडे लावण्याचा आणि पाणी घालून त्याला वाढवण्याचा अट्टहास ही लहान बालके कशी करतात. त्या रोपट्यांचा वाढदिवस साजरा करु पाहतात. त्याच्यासाठी वरुन मेघ सावळा येईल आणि वारा त्याच्या भोवती पिंगा घालत गाणे म्हणतील अशी कल्पना ही मुलं करतात.

जमिनीत लावू रोप लहाने
करुया सिंचन परिश्रमाने
मातीच्या कुशीत ओल्या
हसेल रोपटे गोजिरवाणे

मेघ सावळा शिंपित पाणी
भास्कर करतो हा निगराणी
झाडाभोवती घालून पिंगा
रोजच वारा म्हणतो गाणी

कवी तळपत्या सूर्याचे आणि उन्हांचे वर्णन करुन तळपती दुपार उन्हाची कशी असते ते कवी मुलांना सांगतो आहे.

किती तापतो सूर्य दुपारी
आकाशाची लाही लाही
निळ्या को-या पाटीवरती
ढगांचे एकही अक्षर नाही

मुलांना कवी ताडोबा अरण्यांचीही ओळख करून देतो आहे. थंडगार येळूच्या बनात घनदाट सावलीत थोडा विसावा घेऊन वाघ, सिंह, हत्ती ची धम्माल पाहूया.

ताड मिरवती अपुला ताठा
ऐना, बाभूळ अर्जुन फताडा

बघा वानरे हूपहूप हुय्या
झाडांमध्ये भूलभुलैया
कोकिळ गाई सुरेल गाणे
मोर नाचे ता ता थैया

शांत तळे हे सुंदर पाहून
नका घाईने जाऊ हरखून
दुरुन दर्शन करा तळ्याचे
बसल्या मगरी जबडा वासून

जंगल सुंदर ताडोबाचे
हे तर भूषण चंद्रपुराचे
जागृत हिरवे निसर्गमंदिर
दर्शन येथे वाघोबाचे

अशा सुंदर सुंदर कविता प्रदीप देशमुख यांनी बालकांसाठी लिहिलेली आहे. झाडे, वेली ,पाने ,फुले ,नदी ,नाले,डोंगर,दरी,पक्षी,प्राणी,पाऊसपाणी,शेतीमाती,आजी,आजोबा जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन ,राष्ट्रभक्ती, देशभक्ती याची ओळख करून देत कवी मुलांच्या मनात मूल्य रुजविण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रदीप देशमुख यांच्या कवितेत गेयता आणि गोडवा आहे. कवीकडे शब्बांचा भांडार आहे. कवीतेत सहजता आहे. ओढून ताणून रचलेली कविता नाही. अनेकदा वाचाव अशी कविता प्रदीप देशमुख यांची आहे. ना. गो. थुटे यांची पाठराखण आहे. सुंदर असे मुखपृष्ठ सुदर्शन बारापात्रे यांनी रेखाटले आहे. कलींचा हा कवितासंग्रह बालसाहित्यात मैलाचा दगड नक्कीच ठरेल.

पुस्तकाचे नाव – गर गर भोवरा (बालकविता)
कवी – प्रदीप देशमुख
प्रकाशन – यशोदीप पब्लिकेशन्स
पृष्ठे – ४७, मूल्य – १२५

Related posts

युवकांना सक्षम करण्यासाठी भगवान बुद्धांची शिकवण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा

संत ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

1 comment

Adv. Sarita Patil June 23, 2021 at 4:13 PM

कवीवर्य प्रदीप देशमुख यांनी खूप सोप्या आणि सहज,सुंदर बालमनाचा वेध घेणार्या कविता आहेत. त्यांच्या प्रतिभासंपन्न बुद्धीला मानाचा मुजरा

Reply

Leave a Comment