December 3, 2024
Book review of Manisha Patil Mativishwa
Home » भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’
काय चाललयं अवतीभवती

भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,
‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं,
सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’
भिंतींशिवाय दुसरे कोणी ऐकून घेणार नाही म्हणून हे शब्दांचे थवे कवितेत अवतरतात. अशी जगरहाटी बदलण्यासाठी लेकीने फुलून यावे, मन, मती, मातीला जुळवून घ्यावे, बाकी दुःख कवडीमोल मानावे असे त्यांना वाटते.

दयासागर बन्ने

dayasagarbanne@gmail.com

प्रथितयश कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘मातीविश्व’ या कवितासंग्रहातून स्त्रीया आणि गावगाड्यातल्या माणसांसह मातीचे संवेदन शब्दाशब्दांतून उगवून आले आहे. घर, परिसर, गाव, निसर्ग, मातीतली माणसं यांच्यासह भोवतालच्या परीप्रेक्षात स्त्रियांचं जगणं उत्कटतेने मांडणाऱ्या कविता या कविता संग्रहात आहेत. प्रस्तावनेत डॉ रणधीर शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे “मनीषा पाटील यांच्या कविता आत्मजाणिवेचा स्वर मांडत आहेत. स्त्री अस्मितेचे नवे धुमारे त्यांच्या कवितेला फुटताहेत. गतस्मरण आणि आत्मसन्मानाची जाणीव हे जाणीव केंद्र असणारी त्यांची कविता बाईच्या ‘सलण्या’विरुद्ध आलेली प्रतिक्रिया आहे.”

‘अग्रणी’ च्या काठावरील, ‘दंडोबा’च्या पायथ्याशी असलेल्या‌ देशिंग – हरोली, ता. कवठेमहांकाळ सारख्या दुष्काळी भागातील या कवयित्री दोन दशकाहून अधिक काळ काव्यलेखन करीत आहेत. त्यांचे पायवाटेवरील दिवे, आणि मातीविश्व हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘विचारमंथन’ हे पुस्तक बालकुमारांसाठी महत्त्वाचे आहे. अनेक विद्यार्थिनींना लिहिते करून पुढच्या पिढीतही लेखनाचे बीज त्यानी रुजवले आहे. अग्रणी प्रतिष्ठान, चारुता सागर प्रतिष्ठान आणि अभिव्यक्ती बालकुमार प्रतिष्ठानच्या अनेक संमेलनांच्या माध्यमातून त्यांनी आपला साहित्यविश्‍वात वेगळा ठसा उमटवला आहे.

‘पायवाटेवरचे दिवे’ पाहता-पाहता कवयित्रीचे शब्दविश्व विशाल ‘मातीविश्व’ कधी झाले कळले नाही. हृदयापासून जपलेल्या भावविश्वाला; संस्कार, परंपरेच्या संस्कृतीतून उमटणाऱ्या तरंगांना त्यांनी स्वशैलीतून, गवसलेल्या शब्दकळेतून काव्यबद्ध करण्याचा यशश्वी प्रयत्न या संग्रहातून केला आहे. लोक परंपरेतील जात्यावरच्या ओव्यापासून ते आजपर्यंत स्त्रियांनी आपले भाव कधी मौखिक, कधी लिखित स्वरूपात व्यक्त केले, हे व्यक्त होणे म्हणजे स्त्रियांचे काळीज उलगडणेच होय. परंपरेच्या आणि संस्कृतीरक्षणाच्या भ्रामक जोखडात असणारी सोशिक स्त्री जेव्हा व्यक्त होते तेव्हा तिचे खरे ‘जगणे’ वाहते होते. हे जगणे स्त्रीविश्वाला आपली ‘ स्व ‘ची जाणीव करून देते आणि व्यवस्थेविरुद्ध विद्रोही भूमिका घ्यावयास लावते. त्या अर्थाने मनिषा पाटील यांना सापडलेली शब्दकळा ही केवळ आत्मानुभूती न राहता व्यवस्थेला दिलेले जबर उत्तर आहे.

या संग्रहात कवयित्रीने
‘जगण्याचा उत्सव ल्यावा,
आयुष्याची गावी गाणी,
वाटावे सुख सदैव ,
लपवूनी डोळ्यातील पाणी’

ही भूमिका घेतली आहे. घराघरातल्या ज्ञानेश्वरासाठी मुक्ताई जन्मावी, तिने विश्वाचे श्वास व्हावे‌. केवळ आयुष्याची कथा रचून काही साध्य होणार नाही. तर सकल मानवजातीची प्रार्थना स्त्रियांनी करावी, पुढच्या पिढीनेही करावी, हे सांगताना त्या लिहितात,
‘सदैव सजव तू, विश्वासवे तारांगण,
परी नकोस विसरू कधी,
घरासवे अंगण.’

म्हणजेच स्त्रीमुक्तीच्या वेगळ्या संकल्पनांसह त्या कवितेतून व्यक्त होतात. मुक्तीतत्या स्वैराचाराला झुगारत घर,अंगण जपण्याच्या आत्मस्वातंत्र्याचा उद्घोष करतात व आकाशी कितीही झेप घेतली तरी मातीला विसरू नये असा संदेश देतात.

एकूणच स्त्रीविश्व साकारत असता अनादिकाळापासूनचे शेष दुःख त्या उजागर करतात.
‘मन बनते अंधारगर्भ, यत्न करूनही नाहीत जुळत, जगण्याचे संदर्भ..’ असे त्यांना म्हणूनच वाटते’ अशा फसल्या फुलांनी, कुणासाठी फुलावे?’ असे कैकदा वाटते. स्वप्नांच्या बाहुल्यांची आता बांध ‘समाधी’ असे वाटते, आयुष्य वाळवंट आहे असे जाणवते. आजचा अंधार कसा दूर होईल असे वाटत राहते. हा अंधार झाडावर, घरट्यात, अंगणात आणि माझ्या मनात पसरत राहतो असे ती व्यक्त होते .स्त्री-जगत हे दावणीला बांधलेल्या गायीप्रमाणे आहे असे वाटत राहते. या शापित आयुष्याला प्रेमाची उब कधी मिळेल असे सतावत राहते. आणि तरीही
‘तणावांचे विचार काढून सांगावे मनाला… स्वर्ग सुखाची भेटेल रास ..’
असा विश्वास त्याच वेळी प्रगट होतात. अनंतातून उतरणारी एखादी रेषा माझ्या कोर्‍या कॅनव्हासवर उतरेल, त्या दिवसाचे वाट पाहीन ,हा विश्वास कवियत्रीला निश्चितच आहे.त्यांच्याच भाषेत
‘वाट पहावी क्षणिक, अंधार भेदत येतो सूर्य ,सज्ज राहावे झटकून सारे ,होईल सुरू नूतन पर्व …’
अशा नवपर्वासाठी ती उत्सुक आहे. हे आश्वासक चित्र जे अभावानेच आढळते ते या संग्रहाने दिल्याने एक नवा विश्वास निर्माण होतो.

मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,
‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं, सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’
भिंतींशिवाय दुसरे कोणी ऐकून घेणार नाही म्हणून हे शब्दांचे थवे कवितेत अवतरतात. अशी जगरहाटी बदलण्यासाठी लेकीने फुलून यावे, मन, मती, मातीला जुळवून घ्यावे, बाकी दुःख कवडीमोल मानावे असे त्यांना वाटते. पोरींचा आकांत समजून ती निरांजनातील वात आहे हा विश्वास समाजाने बाळगावा. भौतिक सुधारणांनी झगमगाट झालेल्या इमारती व दार बंद संस्कृतीलाही तो समजावा असे त्या व्यक्त होतात. त्यासाठी आईच्या राबणाऱ्या हातांना त्या सलाम करतात. तिच्या मुखात माझी ज्ञानेश्वरी आहे, त्यासाठी उमलणाऱ्या कळीचे स्वागत करावे, काळजाचा झोका करून त्यांना जपावे, असे त्या म्हणतात.

जन्माचं ‘तुणतुणं’ झालं तरी आणि रोजच्या हजार नजरांचे दंश पेलले तरी दुःखाचं गाठोडे पाठीशी बांधून नवं जगणं शोधत राहिले पाहिजे असे त्यांना वाटते. सावित्रीच्या लेकींनी तेजाळलेल्या प्रकाशवाटेवर एक पणती बनावे आणि स्नेहाची, माणुसकीची गुढी उभारावी असा संदेश देणारी ‘मातीविश्व’मधील कविता म्हणूनच नवे भान व्यक्त करणारी आहे.

या संग्रहात शेतीमातीचे, दुष्काळाचे प्रश्न तसेच गावाच्या आणि परिसरातल्या दुःखाची झुरणी आली आहे. कलाकारांच्या आयुष्याच्या फाटलेल्या नक्षत्रांची जाणीव व्यक्त झाली आहे. सुकलेल्या डोळ्यांना विसाव्याचे घर मिळावे, बालपणीच्या गाव आताही भेटावा ,गावातील ओळखीचे संदर्भ व सौंदर्य अनोळखी होवू नये. स्व ची, आप्त व दुसऱ्यांच्या जगण्याची उमेद वेगळी कुणी मानू नये असा आशावाद कवयित्रीने कवितांतून प्रस्तुत केला आहे.

आशयाशी एकजीव झालेल्या काही प्रतिमा आपले लक्ष वेधून घेतात. पापणीआडचा गाव, जगण्याचा उत्सव, माणुसकीचा रेशीमधागा, आयुष्य सुखदुःखाचा सारीपाट, मायेचा गाभारा, काजळाच्या कोरीवाणी माती, कावडीचा शाप, काळजाचा झोका, नक्षत्री लावण्य, आयुष्य लक्तर, मनाचे वारुळ, पोरका पक्षी, मनाचा बोनसाय, किनाऱ्याचे रितेपण अशा अनेक प्रतिमांनी सजलेली या संग्रहातील कविता पाहता मनीषा पाटील यांची यापुढची कविता निश्चित त्यांना या प्रांतात वेगळी ओळख निर्माण करुन देईल.

एकूणच स्त्री-मतीचे आशयविश्व समृद्ध करणारी,रान- मातीचे भावविश्व उजळणारी, गाववैभव जपणारी कवयित्री मनीषा पाटील यांची कविता समकाल कवेत घेऊन निसर्ग नि मानवतावादी दृष्टीसंदर्भात सजग अनुभूती व्यक्त करणारी कविता आहे, असे म्हणावेसे वाटते. मातीविश्वबद्दल कवितेतून त्यांना एवढेच म्हणायचे आहे-
“तिच्या मातीचा सुवास
जणू मोगरा दारात
पावसाच्या सरीसंगे
भरे कस्तुरी उरात…”

चांगल्या कवितेला आणि रसिक मायबापाला यापेक्षा काय हवे असते ?

कवितासंग्रह : मातीविश्व
कवयित्री :मनीषा पाटील
प्रकाशक : प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे
पृष्ठे : 96 मूल्य :110 रुपये

पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
श्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading