February 6, 2023
Marathi Gazal Programm in Ratnagiri
Home » रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा
काय चाललयं अवतीभवती

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा

गझल मंथन साहित्य संस्था, शाखा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरीत पहिलाच गझल मुशायरा घेण्यात आला. जुन्या जाणत्या गझलकारांबरोबर नवोदित गझलकरांच्या एकापेक्षा एक गझलांनी रसिकांना अक्षरशः वेडे केले.

चेहरा हासरा खरा नाही
भाव खोटा असा बरा नाही
कोणता भाग दाखवू सांगा
काळजाला जिथे चरा नाही

सुनेत्रा जोशी

एकदा मी बंड केले मारले त्यांनी मला
घालुनी उंची कफन शृंगारले त्यांनी मला

अजीज मुकरी

हळू हळू नव्या युगास पाखरे सरावली
गहाण पंख टाकले नि पिंजऱ्यात धावली
तिच्या अलिंगनास मी दिशाच बाहु बनविल्या
किती अथांग ती!… कुठे कवेत माय मावली

संजय कुळये

पिंजऱ्याबाहेरची स्वप्ने बघत बसलो
रात्रभर खिडकीतुनी तारे बघत बसलो
अक्षता हातातल्या संपल्यानंतर
मंडपाच्या आतले पंखे बघत बसलो

शुभम कदम

खूण दिसेना सन्मार्गावर काय करावे
वाट संपली अर्ध्यानंतर काय करावे
शिवबा माझा पुन्हा यायला आतुर आहे
नको जिजाऊ इथे कुणा तर काय करावे

आशिष सावंत

यांसारख्या काही गझलांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विशेष म्हणजे मुशायऱ्यातील गझलकरांना साक्षात गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्यासमोर गझल सादर करण्याची संधी मिळाली. भीमरावांनीही अनेकांना दाद देऊन प्रोत्साहन दिले.

मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, तर प्रसिद्ध गझलकारा स्नेहल कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. त्यांनी त्यांच्या भाषणातून गझलचे अंतरंग उलगडले. आणि माहिती दिली. तसेच गझल मंथन साहित्य संस्थेविषयी माहिती देऊन ही संस्था गझल प्रचार आणि प्रसार यासाठी कशी कार्यरत आहे हे देखील सांगितले. कैलास गायकवाडी त्यांची अप्रतिम गझल रसिकांना ऐकवून मंत्रमुग्ध केले. दोघांही अतिथिंनी गझल विधा आणि गझल मंथन संस्थेच्या कार्याबाबत रसिक आणि गझल प्रेमीना माहिती दिली.

प्रास्ताविक गझल मंथनच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्षा पूर्णिमा पवार यांनी केल., अतिथिंचा परिचय जिल्हा उपाध्यक्ष संजय कुळये यांनी केले.तर स्नेहल यांचे स्वागत आणि सत्कार सुनेत्रा जोशी यांनी केला. या मुशायऱ्याचे बहारदार सूत्रसंचालन मकसूद सय्यद यांनी केले. मुशायऱ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गझल मंथनच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष पौर्णिमा पवार.. उपाध्यक्ष संजय कुळ्ये आणि सचिव सुनेत्रा विजय जोशी यांना सर्व रसिक गझल प्रेमींनी धन्यवाद दिले.

हा रत्नागिरी जिल्ह्य़ातील पहिलाच मराठी गझल मुशायरा होता. त्यावेळी विजयानंद जोशी.सौ. सुनेत्रा विजय जोशी, मकसूद सय्यद, अश्रफ मुक्री, निळकंठ पावसकर, पुर्णिमा पवार, संजय कुळ्ये, मुग्धा कुळ्ये, संजय तांबे, शुभम कदम, रुपाली पाटील, आशिष सावंत, माधुरी खांडेकर, राजु सुर्वे, देविदास पाटील यांनी आपली गझल सादर केली.

Related posts

अश्वमेध ग्रंथालय पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

मनुष्य अन् त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेणारा चित्रपट सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स)

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठवण्याचे आवाहन

Leave a Comment