July 22, 2024
Sunitaraje Pawar speech in Mangalwedha Sahitya Sangeet sammhelan
Home » शेतीचा शोध स्त्रीने लावला ! – सुनिताराजे पवार
काय चाललयं अवतीभवती

शेतीचा शोध स्त्रीने लावला ! – सुनिताराजे पवार

जमीनीत गाडलं तर उगवून आलं पाहिजे पाण्यात फेकलं तर पोहता आलं पाहिजे वादळात धरलं तर झाडासारखं तरलं पाहिजे काट्यात फेकलं तर फुल होता आलं पाहिजे.

मंगळवेढा येथे आयोजित तृतीय राज्यस्तरीय साहित्य-संगीत ऑनलाईन संमेलनामध्ये लेखिका सुनिताराजे पवार यांनी केलेले अध्यक्षीय भाषण

आज कोरोना महामारीच्या काळात आपण ऑनलाईन भेटत आहोत. काळ कठीण आहे. संपूर्ण जग या महामारीचा सामना करीत आहे. आपला महाराष्ट्र तर महापूर, भूस्खलन अशा नैसर्गिक संकटाचा सामना करीत आहे. यात आत्मिक बळ वाढवणं एवढंच आपल्या हातात आहे. गेल्यावर्षी कोरोनाची साथ सुरू झाली, तेव्हा रतन टाटा म्हणाले होते, ‘हे साल फक्त जिवंत राहायचे. नफा-नुकसानीबद्दल अजिबात विचार करू नका. स्वप्न आणि योजनांविषयी चकार शब्द काढू नका. जिवंत राहणे महत्त्वाचे. तोच सर्वांत मोठा नफा आहे.’ या कोरोना महामारीत आपण जवळची माणसं गमावलीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करू या.

मंगळवेढ्यासारख्या ऐतिहासिक, भक्तिरसात भिजलेल्या, संत दामाजी, संत कान्होपात्रा, चोखोबा, बसवेश्वर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीत हे संमेलन होत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. इथे असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची दामाजीनगर शाखा उद्घाटनापासूनच अत्यंत टेक्नोसॅव्ही आहे. शाखेचे सगळे उत्साही पदाधिकारी अनेक उपक्रम घेत असतात. आज अत्यंत महत्त्वाच्या अशा राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलनाचे अध्यक्षपद आपण मला दिले, त्याबद्दल प्रथम मी आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार मानते. या आधी संमेलनाच्या उद्घाटनाला मी दोन वर्षांपूर्वी आले होते. त्यावेळचा भव्य मंडप, श्रोत्यांची तुडुंब गर्दी आजही आठवतेय. ऑनलाईन संमेलनाच्या नियोजनात नेहमीप्रमाणेच कुठेही कमतरता नाही.

दामाजीनगर शाखेने संमेलनाची परंपरा सुरू करून ग्रामीण भागातील साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. ग्रामीण भागात सांस्कृतिक भूक भागवणारी साधने कमी आहेत. साहित्य परिषदेच्या जवळपास १०० शाखांनी ही व्यासपीठं उपलब्ध करून दिली आहेत. ग्रामीण भागातील अनेक लेखक, कवी चांगले लिहीत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सगळ्यांनाच व्यासपीठ देऊ शकत नाही. त्यासाठी अशा संस्थांनी पुढे येणं काळाची गरज असते. महाराष्ट्रातील अनेक संस्था अशी संमेलनं भरवत असतात. आपल्या भाषेचे सौंदर्य, वाङ्मयीन समृद्धी, तिचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवणे यासाठी अशा संस्थांची गरज आहे.

अपेक्षा हे दुःखाचं मूळ असते, तर जिज्ञासा हे शोधाचे मूळ असते. जिज्ञासेने अनेक शोध लागले. भौतिक सुखाची साधनं आली. पण अपेक्षा इतक्या वाढल्या की, सगळीच सुखं आता अपुरी पडत आहेत. सुखाचा शोध कशात आहे ? सुख म्हणजे नेमके काय ? हेच आम्ही विसरत चाललोय. निसर्ग, प्राणिमात्रा, समाज, नातीगोती या सगळ्यांशी असलेलं सुखद नातं म्हणजे सुख ! हेच सगळं विस्कटताना दिसतंय. ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी पसायदान मागितले. आपल्या संतांनी सांगितलेला मार्ग आम्ही कधीच कालबाह्य ठरवलाय. साहित्यसुद्धा जगण्याचे पसायदान मागत असते. माणसांप्रमाणे समाजही कधी कधी आजारी पडत असतो. अंधश्रद्धा, अमानुष रूढी, व्यसनं, हपापलेपण हे सुद्धा आजारच आहेत. हा समाज निरोगी करायचा असेल तर संमेलने, साहित्यिक संस्था याच डॉक्टरचे काम करतात. 

कोणताही समाज फक्त भूगोलावर ओळखला जात नाही. भाषा, संस्कृती, साहित्य यावर समाजाचा दर्जा ठरत असतो. संस्कृती म्हणजे समाजाची समग्र जीवनरीती. व्यक्तींनी आपल्या समुहाकडून घेतलेला सामाजिक वारसा. संस्कृतीत ज्ञान, श्रद्धा, कला, मनोरंजनाची साधने, भाषा, तत्त्वज्ञान, धर्म, नीतिमूल्ये, कायदा, विचारप्रणाली, रूढी, चालीरिती, सवयी, विधी, संस्कार, विवेक, वर्तन इ. अनेक गोष्टींचा पट असतो. 

संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. प्रतीकात्मक चिन्हांच्या आधारे एक पिढी आपले अनुभव दुसऱ्या पिढीकडे सोपवते. अनुभव व्यक्त करणे, जुने ज्ञान नव्या पिढीला देणे, नवे ज्ञान शोधून काढणे, त्याचा संचय करणे. समाजजीवन प्रगमनशील बनविण्याची जबाबदारी भाषेकडे असते. म्हणून आपली संस्कृती समजून घेण्यासाठी आपली भाषा उत्तम अवगत होणे महत्त्वाचे असते. भाषेतच माणसाचे तत्त्वज्ञान आणि काव्य व्यक्त होत असते. भाषा ही समाजाची संस्कृतीकडे जाण्याची वाट असते. 

भारतीय समाज बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक, बहुभाषिक आहे. यात विविधता आहे. भारतीय समाज नेहमी परंपरेचा आधार घेत आधुनिकतेला सामोरा जातो. म्हणून आपण कितीही पुढे गेलो तरी पूर्वसुरींना विसरू शकत नाही. क्षितिजावर कोरलेल्या त्यांच्या पाऊलखुणांवर पावले टाकत, त्यांनी प्रकाशमान केलेल्या अवकाशात आपण वाटचाल करीत असतो. 

प्रत्येक व्यक्ती ही समाजात जन्माला येते. समाजातच लहानाची मोठी होते. तिचे वागणे, वाढणे समाजातच घडते. व्यक्तीला कळतेपण येण्यापूर्वी तिच्यावर नकळत होणारे संस्कार, हे समाजाकडून घडतात. मातृभाषा, धर्म, संस्कृती, भवताल याचा परिणाम व्यक्तीवर होत असतो. समाज उन्नत, प्रगत बनत जातो प्रघातांनी… हे प्रघात कोणाच्या तरी पावलांनी येतात… काही पाऊलखुणा या अभिमानाचा विषय ठरतात. आजही संत ज्ञानेश्वरमाऊली, नामदेव, चोखोबा, गोरोबा, जनाई, मुक्ताई, कान्होपात्रा, तुकोबा, एकनाथ महाराज इत्यादी संतांच्या सखोल अभ्यासाशिवाय साहित्यक्षेत्र परिपूर्ण होऊ शकत नाही. संत, पंत, तंत कवींनी घालून दिलेली फार मोठी परंपरा मराठी साहित्यविश्वाला व्यापून राहिली आहे. 

महाराष्ट्र ही संतांची, वीरांची भूमी आहे. वीरत्व आणि वैराग्याच्या परंपरा येथे एकत्र नांदल्या. मराठी साहित्यगंगा प्रवृत्ती आणि विरक्तीच्या काठाकाठाने बहरली. कर्मकांडाविरुद्ध बंड, जनसामान्याविषयी कळवळा, भाषेचा स्वतंत्र अभिमान यातून अविस्मरणीय साहित्यकृती निर्माण होत गेल्या. उपमा, भाषासौंदर्य, तत्त्वज्ञान, साक्षात्कार, भक्ती व अद्वैत यांची सांगड, अलौकिक निरीक्षणशक्ती, कवित्वशैली, अलोट वाङ्मयमाधुर्य या गुणांच्या संमिश्रणाने संतवाङ्मयाने वाङ्मयाचा इतिहास घडवला. 

आपली संस्कृती कृषिसंस्कृती आहे. शेतीचा शोध सिंधुसंस्कृतीत आद्य राणी निऋती नावाच्या स्त्रीने लावला असं मानलं जातं. शेतीचा शोध ही मानवजातीच्या इतिहासातील सर्वात युगप्रवर्तक घटना होती. तशीच सृष्टीचक्रात जेव्हा केव्हा पहिल्यांदा गोष्ट सांगितली गेली असेल तेव्हा ती स्त्रीनंच सांगितली असेल. आपल्या बाळाला जेवन भरवताना, खेळवताना तिनेच ती सुरुवात केली असेल. म्हणून ‘आई’ ही मानवजातीची आद्य कथनकर्ता आहे. व्यक्त होणं मानवी मनाचा नैसर्गिक धर्म आहे. अनादि कालापासून आजतागायत समाजसंस्कृतीची स्थित्यंतरे याच उर्मीतून विकसित झाली. नित्यनव्याचा ध्यास माणसाला प्रगती आणि परिवर्तनाची दिशा देत राहिला. मानवी संस्कृतीच्या विकासयात्रेत अनेक जीवनावश्यक शोध लागले. अग्निच्या निमित्ताने उर्जेचा, चक्राच्या निमित्ताने गतीचा, शेतीच्या निमित्ताने अन्ननिर्मितीचा, विज्ञानयुगात लेखनाचा यामुळे सांस्कृतिक पर्यावरणाला चालना मिळाली. लेखन, वाचन, दूरसंचार यातून नवी संस्कृती उदयाला आली. मानसाच्या सर्वंकष उन्नतीमध्ये सकारात्मक व विधायक परिवर्तनाची पहाट झाली. माणसाचे जीवन अंर्तबाह्य बदलले. 

मनुष्यप्राणी इतर सजीवांहून वेगळा आहे. त्याचा मेंदू इतर सजीवांपेक्षा जास्त विकसित आहे. त्याला बुद्धीची देणगी आहे. त्याच्याजवळ मन आणि कल्पनाशक्ती आहे. मनाच्या आनंदासाठी तो कलांचा आधार घेतो. एखादा अनुभव शब्दांना जन्म देतो. शब्द जिथे संपतात तिथे चित्र आकाराला येते. चित्रात त्रिमिती आली की शिल्पाचा जन्म होतो, शिल्पात लय संचारली की नृत्य आकाराला येते, नृत्यात शब्द आले की संगीताचा जन्म होतो. शब्दापासून सुरू झालेला प्रवास शब्दांजवळच येऊन थांबतो. म्हणूनच शब्द फार महत्त्वाचे आहेत. शब्द हे साहित्यकलेचे माध्यम आहे. साहित्यिक शब्दांच्या माध्यमातून लय, ताल, सूर निर्माण करतो. वर्णनातून नवरत्न झिरपतो. वाचकांना गंध, स्वाद, स्पर्श, दर्शन, श्रवणाचा अनुभव देतो. म्हणून कलांमध्ये साहित्याचे महत्त्व सर्वांत जास्त आहे. वास्तव आणि कल्पना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे साहित्य. वास्तव आणि कल्पनेच्या समन्वयातून साहित्यनिर्मिती होत असते. 

साहित्यातून वर्तमानकालीन समाजदर्शन घडत असते. पुढील पिढीसाठी तो इतिहास ठरत असतो. साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे. मानवाचे व्यक्तिमत्त्व या समाजातच विकसित होत असते. साहित्यातून समाजाला वेगळे भान येत असते. साहित्याचा विषयच असतो समग्र आणि बहुविध असे मानवी जीवन. लोक, राष्ट्र, संस्कृती, भवताल, निसर्ग, रूढी, मिथक, इतिहास याद्वारे लोकांच्या जगण्याचे सगळे आविष्कार साहित्यात येतात.

लेखक प्रथम स्वान्तःसुखाय लिहितो. तो स्वत:शी आणि विशिष्ट शैलीत समाजाशी संवाद साधत असतो. जणू तो ते नव्याने अनुभवत असतो. त्याच्या स्वसंवादातून जीवनप्रवाहाचा अन्वयार्थ लावत असतो. दूर खुणावणाऱ्या क्षितिजापर्यंतचा प्रवास तो कलाकृतीच्या माध्यमातून करत असतो. त्याची कलाकृती जेव्हा वाचकांसमोर येते. तेव्हा शब्दांच्या माध्यमातून क्षितिजापर्यंतचा त्याचा प्रवास सर्वांचा होऊन जातो. वाचकही त्याच्याबरोबर हातात हात घालून तो प्रवास अनुभवत असतात. ते साहित्य त्याचे एकट्याचे राहात नाही. तत्त्वज्ञानातून जे मांडता येत नाही ते कलेच्या, साहित्याच्या माध्यमातून थेट हृदयाला भिडते. निसर्गाच्या क्रियेत निर्मितीत जे अबोध राहतं, ते कलावंताच्या सर्जनात बोधपूर्ण होते. 

सौंदर्यपूर्ण भाषा जगण्याचे आकलन, प्रतिभा आणि कल्पनाशक्ती, कारुण्य आणि तटस्थ वृत्ती यातून उत्तम साहित्यनिर्मिती होते. कोणतेही साहित्य हे केवळ मनोरंजन करीत नाही, मानवी जीवनाचे अनोखे दर्शन घडवून आपले अनुभवविश्व समृद्ध करीत असते. आपले जीवनविषयक आकलन अधिक व्यापक व परिपूर्ण होण्यास मदत करते. मानवाचा चिरस्थायी, सर्वस्पर्शी अभ्युदय करण्याची ताकद फक्त साहित्यात असते. खरे साहित्य जगण्याच्या अनिवार असोशीतून निर्माण होत असते. मानवी भावभावनांच्या तळाशी जाण्याची तिची धडपड असते. खरे साहित्य जगण्याच्या भट्टीत तापून वाफसा आलेल्या मातीतून उमलते. म्हणून तिच्या प्रत्येक पाकळीला जगण्याचा गंध असतो. जीवनाच्या मुलगामी प्रश्नांचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्य करीत असते. 

लेखकाची उत्स्फूर्त अभिव्यक्ती मानवी जगण्याला उंची प्राप्त करून देत असते. जात्यावरील ओव्यांपासून आधुनिक कवितेपर्यंत आणि लोककथापासून…कथा कादंबरी, नाटक, चित्रपट ते आताच्या वेबसीरिज या अभिव्यक्तीच्या प्रवासाने मानवी जगणे समृद्ध केले आहे. साहित्यनिर्मिती आपल्या संवेदना तजेलदार ठेवते. कोणतेही साहित्य आपल्याला सुखदु:खाकडे माणूसपणाच्या नजरेने पाहायला शिकवते. संवेदनाची क्षितिजे अधिकाधिक विस्तीर्ण करण्याचे महत्त्वाचे कार्य साहित्य करते. ज्यांना कोणत्याच कलेचा स्पर्श झाला नाही ते खरंच अभागी जीव ! 

ग्रामीण साहित्याचा केंद्रबिंदू भूमी आणि निसर्ग आहे. कृषिनिष्ठ संवेदनेतून निर्माण झालेले साहित्य दाहक वास्तवता, कृषिजीवनाला व्यापून राहिलेले प्रश्न ग्रामीण भागात खेड्यापाड्यात पसरलेल्या माझ्या लेखक बंधूभगिनी मोठ्या असोशीने मांडत आहेत. ज्याचे अनुभवविश्व संपन्न आहे त्याची अभिव्यक्तीही सकस असते. आपल्या कृषिसंस्कृतीत नित्य नवे अनुभव येत असतात. अवकाळी पाऊस, विजेचा प्रश्न, पाणीप्रश्न, तुकड्यात वाटली गेलेली जमीन, बांधावरची भांडणं, वृद्धांचे प्रश्न, निवडणुका असे कितीतरी विषय साहित्याचे विषय होऊ शकले.

जात्यावर दळताना आपलं मन मोकळं करणाऱ्या स्त्रिया किंवा अभंगातून आपल्या व्यथा विठ्ठलाजवळ मांडणाऱ्या संत कवयित्री जनाई, मुक्ताई, बहिणाई, सोयरा, निर्मळा, कान्होपात्रा यांच्या मुखातून जे प्रसवलं ते अनुपम लोकसाहित्य! यांचं व्यक्त होणं म्हणजे मानवी भावभावनांचा गुंतागुंतीचा अत्युच्च नमुना! स्त्रियांना आत्मकथनाचं दार खुलं झालं आणि आपल्या मनीचे सल, अन्याय व्यक्त करण्यासाठी त्यांना आत्मचरित्राचा आकृतिबंध स्वीकारावा वाटला. समर्थन, कैफियत, दुःखाची कहाणी हे सगळं आत्मचरित्रात येत राहीलं. बदलत्या परिस्थितीत स्पष्टपणे, स्वतःच्या जीवनातील अनुभवांचे चित्रण करण्याचा धीटपणा स्त्रियांमध्ये आला. या लेखनाने बंद दाराआड, माजघरातच अडकून असणाऱ्या स्त्रीचं वास्तव आपल्यापुढं आलं. माझ्या लिहित्या भगिनी माझं आदरस्थान आहेत. अनेक लिहणारे हात मला विठ्ठलाच्या पावलाइतकेच पवित्र वाटतात. त्यातून सर्जन घडत असते.

वाङ्मयाच्या इतिहासाचा एक भाग म्हणजे प्रकाशनक्षेत्र. मी एक प्रकाशक आहे. लेखक लिहितो, मुद्रक छापतो आणि ग्रंथ विक्रेता पुस्तक विकतो. या तिघांची सांगड घालून हस्तलिखितावर योग्य संस्कार, कलात्मकतेने करणारा घटक म्हणजे प्रकाशक! पुस्तकव्यवहार, वाचनसंस्कृती हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत. सध्या वाचनसंस्कृतीवर होणारा परिणाम चिंतेचा भाग आहे. खरं पाहता हजारो वर्षांची साहित्यनिर्मिती, त्याचबरोबर बदलत गेलेल्या ग्रंथाचा प्रवास अचंबित करणारा आहे. हा समजून घेतला तर साहित्य, भाषा, वाचन किती महत्त्वाचे घटक आहेत. हे लक्षात येईल शिवाय यातील आपली जबाबदारी काय तेही समजून घेता येईल. 

हजारो वर्षांपासून ग्रंथनिर्मिती होत आहे. सुरुवातीला तिचं स्वरूप मौखिक होतं. लिपीचा शोध लागला आणि साहित्यक्षेत्रात मोठी क्रांती घडली. सुरुवातीला विटेवर, शिलालेखांवर, भुर्जपत्रावर लिखित परंपरा सुरू झाली. ग्रंथाची एखादीच प्रत तयार व्हायची. ती अभ्यासताना त्यांच्या घरी राहून अभ्यास करावा लागे किंवा ग्रंथ नकलून घ्यावा लागे. उत्तम अक्षर असणारे ग्रंथ नकलण्याचे काम करीत. संपूर्ण ग्रंथ जसाच्या तसा पुन्हा लिहिणे हे काम महागडे असे. सर्वसामान्यांना ते परवडत नसे. त्याकाळी ज्ञानेश्वरीची प्रत ३६१ रुपयांना होती. राजेरजवाडेच ती घेऊ शकत. नकलाकारांना नोकरीवर ठेवून, ग्रंथ नकलून, ते पेटाऱ्यात भरून श्रीमंताघरी ते विकले जात. ज्ञानकोशकार केतकरांचे आजोबा अशा ग्रंथांची विक्री करीत असत, असे खुद्द त्यांनी लिहून ठेवलंय.

पंधराव्या शतकात मुद्रणकलेचा शोध जर्मनीत जोहान गुटेनबर्ग याने लावला. साहित्याचे जग बदलले. आपला विचार एकाच वेळी हजारो माणसांपर्यंत पोहचता येऊ लागला. प. बंगालमधील श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने ‘मराठी व्याकरण’ हे पहिले मराठी पुस्तक १८०५ मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर ख्रिस्ती मिशनरी मराठी पुस्तके छापत. पण त्या शाईमध्ये जनावरांची चरबी वापरतात असा समज होता. म्हणून त्या पुस्तकांना कुणी हात लावत नसत. १८३१ मध्ये गणपत कृष्णाजी यांनी शाईत तुपाचा वापर करून पहिले मराठी पंचांग छापले. त्यानंतर मात्र पुस्तकांची छपाई सुरू झाली. मुद्रणालयेच प्रकाशक झाली आणि प्रकाशन व्यवसाय या नव्या व्यवसायाचा जन्म झाला. आजही हा बौद्धिक व्यवसाय करणे धाडसाचे समजले जाते. 

लेखनाचा आरंभ, पुस्तकांचा जन्म होऊन खूप काळ लोटलाय. मुद्रणकलेत अनेक बदल झाले. वाचनप्रक्रियेत बदल झाले. आता व्यक्त होण्याचे मार्गही बदललेत. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशी नवी माध्यमे तयार झालीत. स्टोरीटेलसारखी श्राव्य पुस्तके तयार होत आहेत. किंडल, ई-बुकसारख्या माध्यमातून कॉम्प्युटरवर पुस्तके वाचता येतात. माध्यम बदलले तरी वाचनाचे महत्त्व कमी होत नाही.

मंगेश पाडगावकर आपल्या कवितेत म्हणतात,  वाचन आहे प्रवास सुंदर, नव्या नव्या ज्ञानाचा । इतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञानाचा । नव्या जगाचे, नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती । ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती ।

यशवंतराव चव्हाण म्हणत, ‘शब्दांच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे. नवनिर्मितीचे सर्जनशील कार्य जसे शब्द करतात तसेच साम्राज्ये धुळीला मिळवण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दात आहे. कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणीसंगम ही मानवी इतिहासातील जबरदस्त शक्ती आहे. शब्द हे साहित्यिकांचे प्रमुख शस्त्र आहे.’ 

भौगोलिकदृष्ट्या जग जवळ येत असताना वाढत जाणारे एकटेपण, असह्य भावनिक पोकळीत गुदमरणारे आधुनिक जगणे यावर मात करायची असेल तर साहित्याला पर्याय नाही. एकांत पेलण्यासाठी, जमिनीवर ठामपणे पावलं रोवण्यासाठी मन सक्षम असायला हवं. 

जमिनीत गाडलं तर उगवून आलं पाहिजे पाण्यात फेकलं तर पोहता आलं पाहिजे वादळात धरलं तर झाडासारखं तरलं पाहिजे काट्यात फेकलं तर फुल होता आलं पाहिजे.

आपण यंत्रमानव नाही. हाडामांसाची माणसं आहोत. आपल्याला दुसऱ्याचे दुःख जाणणारी, स्वतःच्या दुःखावर मात करता येणारी सशक्त माणसं घडवायची आहेत. विकासाला दोन डोळे असतात. एक भौतिक सुविधांचा, दुसरा सांस्कृतिक सुविधांचा. जो देश या दोन्ही डोळ्यांना समान न्याय देईल. तो विकसित देश. 

जागतिकीकरण, माहिती, तंत्रज्ञान विकास या बदलाचा मोठा परिणाम वाचनप्रक्रियेवर झाला आहे. दृकश्राव्य माध्यमांनी वाचनाचा अवकाश काबीज केला आहे. भौतिक साधनात सुकाळात बौद्धिक दुष्काळ ही काळजीची बाब आहे. एकेकाळी ग्रंथालये संस्कारपीठे होती, ती ओस पडताना दिसत आहेत. ग्रंथालये ही स्वयंशिक्षणाची लोकविद्यापीठे मानली जात. भारतात पूर्वी नालंदा, तक्षशिला विश्वविद्यालयाचे अतिसमृद्ध ग्रंथालये होती. 

चारशेच्यावर प्रकाशनसंस्थांमधून जवळपास दोन हजाराच्यावर नवीन पुस्तके दरवर्षी छापली जातात. कोट्यावधी मराठी जनता पण एक हजार पुस्तकांची आवृत्ती संपायला पाच वर्षे जातात. परिसरातील ग्रंथालये ओस पडतात. त्याकडे कुणाचं लक्ष नसतं, वाचनाबद्दल प्रचंड अनास्था! आपण फक्त भौतिक सुखाचाच विचार करणार आहोत का? आपल्याकडे अध्यात्माची देदीप्यमान परंपरा आहे. अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. जीवन नीतिमान आणि विवेकी करणं, स्वत:मध्ये आवश्यक मूल्ये रुजवणं म्हणजे अध्यात्म! 

कलेची मूक भाषा असते. ती संवादाशिवाय कळू शकते. आजच्या काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून क्षणभरात जगभरात पोहोचता येते. संगीत, नृत्य कळण्यासाठी भाषा यावी लागत नाही. साहित्य, चित्र, शिल्प, नृत्य, स्वर यांची एक नवी वैश्विक भाषा निर्माण झाली आहे. जागतिकीकरण, नवे तंत्रज्ञान यामुळे आलेल्या संपन्नतेला साचलेपण न येता ती प्रवाही होऊन सर्वदूर पसरण्यासाठी हीच भाषा उपयोगी ठरणार आहे. नव्या जगातील भौतिक, भावनिक अंतर कमी करून नात्याचे नवे पूल उभारण्याची क्षमता या भाषेमध्ये आहे. 

कोणतीच भाषा बलवान किंवा कमजोर नसते. तिला तसे बनवणारे, ती भाषा बोलणारे भाषक असतात. इंग्रज भारतात आले तेव्हा भारताला ही भाषा माहीतही नव्हती. त्यांनी ती रुजवली. जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी त्यांची भाषा, खानपान, संस्कृती रुजवली. त्यांनी जगावर राज्य केले. कालांतराने त्यांचे राज्य गेलेही. पण त्यांनी रुजवलेली भाषा आज आपण ज्ञानभाषा म्हणून स्वीकारली आहे. त्यांनी भाषेला बलवान बनवले. आम्ही आमची भाषा कमजोर केली. स्वतःच तिला बोल लावत! मराठी भाषा आमची मातृभाषा आहे. आपल्याला स्वप्ने ज्या भाषेत पडतात तीच भाषा आपल्या अभिव्यक्तीसाठी योग्य असतो. राहता राहिला प्रश्न संधीचा. त्या आहेतच पाहण्यासाठी सजगता हवी.

परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे माणूस त्याने सर्जनाची शक्तीही आपल्याला बहाल करून टाकली. आपणही ती फुलवली, जोपासली. माणूस नेहमीच केंद्रस्थानी होता, आहे. 

बाबुराव बागुल म्हणतात, वेदाआधी तू होतास वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास सर्व ईश्वरांचे जन्मसोहळे तूच साजरे केलेस सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस तू सूर्याला सूर्य म्हटलेस म्हणून सूर्य सूर्य झाला तू चंद्राला चंद्र म्हटलेस म्हणून चंद्र चंद्र झाला हे प्रतिभावान मानवा तूच आहेस सर्व काही तुझ्यामुळे सजीव सुंदर झाली ही मही साहित्य, संगीत, नृत्य या सगळ्याच कलांशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. या पृथ्वीवरचा आपला प्रवास काही काळापुरता आहे. आपण प्रवासी आहोत. या जगात फेरफटका मारताना आपला प्रवास वाया जाणार नाही, त्याचबरोबर आपण या ठिकाणचा विध्वंस करणार नाही. याची काळजी घेऊ या. हे जग आहे त्यापेक्षा सुंदर करू. या पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत. या वसुंधरेचा आदर करूया. ‘माणूस’ म्हणून जगू या. साहित्य तेच शिकवतं. 

हा हजारो वर्षांचा साहित्यप्रवास असाच चालू राहणार. या संमेलनाच्या माध्यमातून ही साहित्यवारी दरवर्षी फुलणार, बहरणार.

धन्यवाद! जय महाराष्ट्र ! जय मराठी ! 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

निरोगी करडांसाठी अशी घ्या शेळ्यांची काळजी

मुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव

Neettu Talks : आत्मविश्वास कसा वाढवायचा…

1 comment

संदीप महादू खाडे August 7, 2021 at 2:52 PM

मॅडम आपल्या संपूर्ण अध्यक्षीय भाषणात साहित्य, जीवन आणि व्यवहार या तीन भागांवर विशेष भर दिला आहे, हे साहित्यव्यावहारात अत्यंत महत्त्वाचे आहे. या भाषणातील मला आवडलेले ठळक मुद्दे :-

१. अपेक्षा हे दुःखाचं मूळ असते, तर जिज्ञासा हे शोधाचे मूळ असते.
२. कोणताही समाज फक्त भूगोलावर ओळखला जात नाही. भाषा, संस्कृती, साहित्य यावर समाजाचा दर्जा ठरत असतो. 
३. भाषा ही समाजाची संस्कृतीकडे जाण्याची वाट असते. 
४. आपली संस्कृती कृषिसंस्कृती आहे. शेतीचा शोध सिंधुसंस्कृतीत आद्य राणी निऋती नावाच्या स्त्रीने लावला असं मानलं जातं.

संपूर्ण भाषण खूप छान झाले आहे.

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading