September 8, 2024
A global view is needed for a vision of the universe
Home » विश्वाच्या दर्शनासाठी हवा विश्वव्यापक विचार
विश्वाचे आर्त

विश्वाच्या दर्शनासाठी हवा विश्वव्यापक विचार

आता देईजो अवधान । तुम्ही बोलविल्या मी बोलेन ।
जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १ ला

ओवीचा अर्थ – आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीता आहां म्हणून मी बोलतो. गीतेचे व्याख्यान करतो. ज्याप्रमाणे लाकडी कळसुत्री बाहुली सूत्रधाराची दोरी नाचवील तशी नाचते.

आपल्या मनात येणारे विचार हे कोठून उत्पन्न होतात ? आपणास सुचते कसे ? हे सुचविणारा, बोध देणारा कोणीतरी वेगळा आहे का ? याची अनुभुती येणे म्हणजेच सद्गुरुंना जाणणे आहे. आपले खरे स्वरूप त्यामुळेच स्पष्ट होते. मी कोण आहे ? याचा बोधही यातूनच होतो. यातूनच ज्ञानी होण्याची आपली वाटचाल सुरू होते. यासाठीच अवधान हे महत्त्वाचे आहे. सावध राहणे, साधनते सजग राहाणे हे यासाठीच महत्त्वाचे आहे. ही सावधानता, सजगता एका योद्याप्रमाणे आपणामध्ये असायला हवी.

साधना करणारा शिष्य सुद्धा एक योद्धाच असतो. सीमेवर लढणारा सैनिक नेहमी सावध, सजग असतो. दूरचे ऐकण्याची क्षमताही त्याच्यात विकसित झालेली असते. आवाजाचे सर्व स्वर तो सहज ओळखून सावध होत असतो. साधनेत सुद्धा शिष्याने असेच सावध असावे लागते. सोहमचे स्वर स्पष्टपणे ऐकण्याची सवय विकसित व्हायला हवी. सोहमचा हा स्वर ओळखून तो आत्मसात करता यायला हवा. याबाबत त्याची सावधनता महत्त्वाची आहे. अवधान हे यासाठीच हवे.

साधना हे सुद्धा एक युद्धच आहे. शिष्याला स्वतःला जाणण्याचे हे युद्ध स्वतःशीच करावे लागते. मी कोण आहे याची अनुभुती शिष्याला नित्य होत असते. पण त्याचे त्याकडे अवधान नसल्याने तो बोधच होत नाही. मनाला तो बोध भेटतच नाही. मनात तो बोध विकसित होण्यासाठीच ही साधना आहे. मीपणाचा अहंकार गेल्याशिवाय हा बोध होत नाही. मनाला हा बोध कोण देते ? यातील मीपणाचा अहंकार हा नष्ट व्हायला हवा. मी आत्मा आहे याचा बोध तेंव्हाच होईल. हे सर्व जग त्यानेच भरलेले आहे हा विचारही तेंव्हाच विकसित होईल. तेंव्हाच सर्वत्र त्याचा साक्षात्कार होईल.

आपण जे विचार मांडत आहोत हे विचार आपल्या मनात कोणीतरी भरत आहे. कोणाकडून तरी हे कार्य होत आहे. आपण फक्त यामध्ये निमित्तमात्र आहोत. आपल्याकडून केले गेलेले हे कार्य प्रत्यक्षात आपले वाटत असले तरी त्याचा सुत्रधार अन्य आहे. हा बोध होणे महत्त्वाचे आहे. यासाठीच विश्वरूपदर्शन आहे. विज्ञानाच्या युगात विश्वरूपदर्शनाचा बोध सहज होतो. फक्त त्याकडे पाहाण्याची दृष्टी योग्य असायला हवी. या विश्वात आपण कोण आहोत हे जाणणेच खरे विश्वरुप दर्शन आहे.

अमर्याद, अनंत पोकळीच्या या विश्वात आपण एखाद्या जीवाणूप्रमाणे क्षुल्लक आहोत. रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपले हे अस्तित्वच आपण गमावून बसलो आहोत. हे माझे, हे माझे या अहंकाराने आपण अंध झालेले आहोत. आपली ओळखच आपण विसरलेले आहोत. विश्वात आपण कोण आहोत हे जाणणे हेच विश्वरुप दर्शन आहे. यासाठीच या विश्वाच्या संवर्धनाचा वसाही आपण जोपासायला हवा. तेंव्हाच आपण या विश्वात श्वास घेत राहू अन् आपली ओळख कायम राखू शकू.

विश्वव्यापक विचार आपण करायला लागू तेव्हांच आपणाला या विश्वाचे दर्शन घडेल. यातूनच आपण निमित्तमात्र असल्याचा बोध होईल. कळसुत्री बाहूल्याप्रमाणे आपला सुत्रधार कोण अन्य आहे याची अनुभुती जेंव्हा होईल. तेंव्हाच आपली आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरु होईल. आपल्यातला मीपणा गेल्याशिवाय आपले विचार विश्वव्यापक होणार नाहीत. विचार करण्याची वृत्ती बदलेल तेंव्हाच सर्व शांतीचे मार्ग अवगत होतील. जगण्याची खरी दृष्टी आपणास प्राप्त होईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गणपतराव पाटील यांचे काम देशाला दिशादर्शक: डॉ. लॉरी वॉकर

गीतारुपी गंगेत स्नान करून व्हावे पवित्र

संक्रात

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading