आपणास दिसणाऱ्या प्रत्येक रंगाचा आपल्या चेतन व अचेतन मनावर परिणाम होत असतो. निसर्गात तसे बरेच रंग आपणास पहावयास मिळतो. जांभळा रंग तसा कमी प्रमाणात दिसतो. तो कसा तयार होतो व त्याचा शोध कसा लागला याबद्दल थोडस.
डॉ. विनोद शिंपले, वनस्पतीशास्त्र विभाग, न्यू कॉलेज, कोल्हापूर
कवी वा. न. सरदेसाई यांच्या कवितेच्या ओळींनुसार’ निळ्या नदीत बुडवा ढग तांबडेलाल फिक्की जांभळं बघून नाचायला लागाल.’ म्हणजेच निळा व तांबडा रंग मिळून जांभळा रंग तयार होतो. जांभळा रंग मनाची उमेद वाढवणारा, उदात्त आणि राजसवृत्ती निर्माण करणारा अस म्हटलं जातं.
या नैसर्गिक रंगाचा शोध पण खूप आश्चर्यकारक लागला आहे. एकदा सायरस नावाचा पर्शियन राजा आपल्या पाळीव कुत्राबरोबर व प्रेयसीसमवेत समुद्र किनारी फिरत होता. फिरत असताना त्यांनी पाहिले की आपल्या कुत्राचे तोंड जांभळे झाले आहे. या रंगाच्या मोहात पडून त्याच्या मैत्रिणीने त्या रंगाचा आग्रह धरला. साहाजिकच राजाने आज्ञा केली व शोध घेण्यासाठी आपले सैनिक पाठवले. चौकशीअंती असे निदर्शनास आले की कुत्र्याने समुद्रकिनारी असणारे काही शंख-शिंपले खाल्ले होते. त्या शंखाचे शास्त्रीय नाव Bolinus brandaris. या शंखापासून जांभळा रंग खूप कमी प्रमाणात निघत असे. साधारणतः अडीच लाख शंख गोळा केल्यानंतर एक औशं जांभळा रंग निघत असे. त्यामुळे साहजिकच हा रंग महागडा व फक्त राजघराण्यातील लोकच खरेदी करू शकत, त्यामुळे याचा रंग हा राजघराण्याचा आहे असे समजले जाई.
परंतु या प्रकारच्या शंखाच्या अतिवापरामुळे जांभळा रंग देणारी ही प्रजाती ही आज जगातून नाहीशी झाली आहे. आज फक्त आपण त्याचे जीवाष्मच बघू शकतो. एखाद्या गोष्टीचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे ती नष्ट होते याचे हे ज्वलंत उदाहरण देता येईल. त्यामुळे कुठल्याही नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आपण योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.