इंगोले यांनी स्वातंत्र्यानंतर शेतीमध्ये झालेल्या चुकांचा समाचारही घेतला आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे पारंपारिक शेतीचा विकास होता. पण स्वातंत्र्यांनंतर चित्र बदलले. शेतीची जुनी मूल्यं बदलली. ती स्वार्थ केंद्रित झाली. गांधीजींच्या खेड्याकडे चला हा नारा हेतुपुरस्सर विसरला गेला आणि शहरकेंद्री नवी प्रणाली रुढ झाली. स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्वीकारल्यामुळे खेडोपाडी सत्तेचे राजकारण शिरले आणि या राजकारणापासूनही स्त्रीला जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून अनेक मुद्दे समोर आले आहेत. शेतीचे उत्पन्न हाच यातील मुख्य मुद्दा राहीला आहे. उत्पन्न न मिळाल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सर्वाधिक आहेत. ९० च्या दशकात शिवसेना व भाजप युतीचे सरकार होते. तेंव्हा त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जाण नाही. त्यामुळे या युती सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपेक्षाच ठेवणे चुकीचे असल्याचे सांगत काँग्रेसने शेतकरी आत्महत्या हा प्रश्न लावून धरला होता. याच प्रश्नाचे भांडवल करत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आली. पण सत्तेत आल्यानंतर या प्रश्नावर केवळ पॅकेज जाहीर करून मलमपट्टी करण्याशिवाय राजकिय पक्ष काहीच करू शकले नाही. १९९८ ते २००८ या कालावधीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक झाल्या. दहा वर्षे हा प्रश्न चर्चेत राहीला. पण तोडगा काहीच निघाला नाही. हे सर्वच राजकिय पक्षांचे अपयश आहे, अशी मते तज्ज्ञांसह साहित्य, अभ्यासकांनीही त्यावेळी व्यक्त केली होती. या प्रश्नावर पॅकेज जाहीर करून मलमपट्टी केली जाते. त्यामुळे हा प्रश्न तसाच आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही हा खरं तर लोकशाहीचाच पराभव म्हणावा लागेल. या प्रश्नाचा खोलवर अभ्यास करून शेतकरी बचाव समितीच्या संस्थापिका प्रतिमा इंगोले यांनी आत्मघाताचे दशक हे पुस्तक लिहीले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर साहित्यिकांनीही हा प्रश्न मांडून वारंवार सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. साहित्यिकांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून सरकारसमोर या समस्येवर उपायही सुचविण्याचे प्रयत्न केले आहेत. २००९ मध्ये ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांचे सत्यघटनांवर आधारित आत्मघाताचे दशक हे पुस्तक या प्रश्नाची दाहकता दर्शिवणारे आहे.
वदनी कवळ घेता, नाम घ्या शेतकऱ्याचे
सहज स्मरण होते, त्याग, कष्ट, ऋणाचे
धन्यवाद देणे तया, हाच खरा मानवधर्म
हा ग्रंथ वाचुनी करा, किमान कर्तव्यकर्म
अशी हाक देत या प्रश्नाबाबत त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आवाज उठवला. या प्रश्नाच्या मुळाशी जात त्यांनी त्याची कारणे शोधली. हा प्रश्न सोडवण्यासाठी इंगोले यांनी सरकार दोषी आहे का ? जनता कारणीभूत आहे का ? शेतकरी कारणीभूत आहे का ? या तीन प्रश्नांची उत्तरे प्रथम शोधावी लागतील असे मत मांडले आहे. कारण प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने कोणतेही ठोस उपाय योजले नाहीत तर हा प्रश्न कधीच सुटणार नाही. विदर्भात कापूस पिकतो. पण त्याला भाव नसेल तर शेतकरी काय करणार ? निसर्गाने साथ दिली नाही तर उत्पादनही योग्य प्रमाणात येणार नाही. यावर सरकारने काय केले. केवळ नुकसान भरपाई आणि पॅकेजची मलमपट्टी देऊन हा प्रश्न सुटणार आहे का ? आणि नेमके असेच झाले आहे. अशामुळे आजही हा प्रश्न आता आहे तसाच आहे.
डॉ. इंगोले यांनी या प्रश्नांबाबत लोकचळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे मत आत्मघाताचे दशक या पुस्तकात मांडले आहे. हे तितकेच खरे आहे. ग्रामीण भागात असणारा जोडधंद्याचा अभाव, अपुरी पतपुरवठा व्यवस्था, एकच पीक दरवर्षी घेणे, कमी धारणा क्षेत्र, सततचे शेतीचे विभाजन, दिवसेंदिवस खोल जाणारी पाण्याची पातळी, वाढलेला उत्पादन खर्च, कारखानदारीचा अभाव, प्रक्रिया उद्योगांचा अभाव, साठवणूक क्षमतेचा अभाव, विभक्त कुटूंब पद्धती, मजुरांचे वाढलेले दर, मजुरांची कमतरता, बोगस बियाणे व फवारण्यावरील वाढता खर्च, नव्या पिढीची शेती प्रती अनास्था, वारंवार नैसर्गिक आपत्ती, पूर, गारपीट, अवर्षण, मोठ्या प्रमाणावरच साथीचे रोग, शेतीतील उभ्या पिकाची होणारी चोरी, बियाणे-खते यांच्या वाढलेल्या किंमती, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नसणे, पीक विमा न काढणे, शासकिय योजनांमधील भ्रष्टाचार, घटते पशुधन, संघटित पतपुरवठ्याचा अपुरेपणा अशा समस्येवर मात करण्यासाठी गावोगावी लोकचळवळ उभी राहाणे गरजेचे आहे. तरच या आत्महत्येच्या प्रश्नाची दाहकता कमी होईल. यावर ठोस उपाय निघू शकेल. सरकारने याकडे लक्ष देऊन केवळ मलमपट्टीचे पॅकेज जाहीर न करता यावर खोलवर जाऊन लोकचळवळ उभी केल्यास हा प्रश्न निश्चितच मार्गी लागू शकेल.
शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी निर्यातीची मर्यादा शिथिल करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळाला नाही तर शेती तोट्याची ठरणार कर्जबाजारी शेतकरी कधीच कर्ज फेडू शकणार नाही आणि आत्महत्यांचे सत्र हे असेच सुरु राहाणार. आत्महत्येमध्ये शेतकरी एकटा मरत नाही तर त्याचे अख्खे कुटूंब यात भरडले जाते. याचा विचार करून या प्रश्नाचे गांभीर्य विचारात घेण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त कुटूंबातील स्त्रिला मानसिक आधार देण्यासाठी लोकचळवळीची, गटशेतीची खरी गरज आहे. कृषि संस्कृतीचा शोध स्त्रीनेच लावला. हा व्यवसाय स्त्रियांनीच उभा केला. आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात मातृसत्ताक पद्धत होती. त्यावेळी हा व्यवसाय स्त्रियाच करत होत्या असा विश्वास त्यांच्यात निर्माण करून त्यांना प्रोत्साहित केले तर खऱ्या अर्थाने या प्रश्नावर ठोस उपाययोजना होऊ शकेल, असे उपायही इंगोले यांनी सुचविले आहेत.
इंगोले यांनी स्वातंत्र्यानंतर शेतीमध्ये झालेल्या चुकांचा समाचारही घेतला आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे पारंपारिक शेतीचा विकास होता. पण स्वातंत्र्यांनंतर चित्र बदलले. शेतीची जुनी मूल्यं बदलली. ती स्वार्थ केंद्रित झाली. गांधीजींच्या खेड्याकडे चला हा नारा हेतुपुरस्सर विसरला गेला आणि शहरकेंद्री नवी प्रणाली रुढ झाली. स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्वीकारल्यामुळे खेडोपाडी सत्तेचे राजकारण शिरले आणि या राजकारणापासूनही स्त्रीला जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले. तेंव्हासर्वच क्षेत्रात पुरुषांचा मनमानी कारभार सुरु झाला. पुरुषांच्या कृतघ्नपणाचा फटका स्त्रीलाही बसला. त्यामुळे शेतीचे पूर्ण पुरुषीकरण झाले. एखादी स्त्री शेतीतज्ज्ञ, कृषीमंत्री झाली आहे हे दृश्य जसे दुर्मिळ झाले तसेच शेतकऱ्याला सन्मान देणेही दुर्मिळ झाले आणि जगाचा पोशिंदा लाचार झाला. यातच शेतीचे अवमूल्यन झाले आहे. अशा विचारही त्यांनी मांडला आहे.
वास्तविक शेतीचा शोध स्त्रीने लावला. पण काळाच्या ओघात स्त्रीयाकडून शेती हिसकावून घेतली गेली. पुरुषसत्ताक पद्धती रुजवली गेली. शेतकरी स्त्री दिसणे दुर्मिळ झाले पण शेतीसाठीचे सगळे कष्ट तिच्याकडून करवून घेतले जाऊ लागले. तिचे कष्ट कवितेत मांडले आहेत.
शेतकऱ्याची बाई
तिला मुलखाची घाई हे कर ते कर
सगळे कष्टाचे डोंगर
भले मोठे गोल कुंकू तिच्या कपाळावर
चिरेच चिरे तिच्या खडबडीत हातावर
अशी कष्टाची व्यथा मांडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर स्त्रीयांच्या पदरी आलेल्या दुःखाच्या व्यथाही इंगोले यांनी मांडल्या आहेत.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी आत्महत्याच्या सत्य घटनावर आधारित आहे. विदर्भात ९ जानेवारी १९९८ ला रंगराव भटकर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनेपासून २००८ पर्यंत झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आढावा या पुस्तकात लेखिकेने घेतला आहे. या आत्महत्यामागची कारणे शोधली आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठिक आहे पण शेतकरी स्त्रीच्या आत्महत्यांचीही नोंद लेखिकेने घेतली आहे. कळंब तालुक्यातील मसोला या गावात कविता भिसे या शेतकरी महिलेने आत्महत्या केली. एका खासगी व्यापाऱ्याचे अन् नातेवाईकांचे लाखाचे कर्ज तिच्यावर होते. कुटुंबाची जबाबदारी अन् कर्जाचे हप्ते फेडणे तिला शक्य नसल्याने तिने आत्महत्या केली. शासनदरबारी शेतकरी स्त्रीने आत्महत्या केली तर काय करायचे याची काहीच योजना नसल्याने तिची आत्महत्या, आत्महत्या म्हणून गणली न जाता तो आत्मघातच ठरवला गेला. यामुळे शासकिय मदतही मिळू शकली नाही अशा स्त्री शेतकऱ्यांच्या व्यथाही इंगोले यांनी मांडल्या आहेत.
आम्ही शेतकऱ्याच्या नारी हो
आम्ही अन्यायाच्या कैवारी हो
आम्ही राबतो शेतवरी हो
पण भाव नाही बाजारी हो
आमची लूट आता कुठंवरही हो
आम्ही शेतकऱ्याच्या नारा हो !
शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर पुढे कर्जबाजारीपणातरही शेतकरी महिलांची सुरु असणारी झुंजही त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे. हे पुस्तक सत्य घटनांवर आधारित असल्याने प्रश्नाची दाहकता तितकीच तीव्र आहे याची जाणीव वाचकाला होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. ते सुरु राहाणे हा लोकशाहीचा पराभव आहे अन् अपमानही आहे. पण याचे गांभिर्य कोणालाही वाटत नाही. किमान हे पुस्तक वाचून तरी याची गांभीर्य कळावे यासाठी लेखिकेचा या प्रयत्न आहे. समाजातील वास्तवावर लिखाण होणे अन् त्याची जाणीव समाजाला करून देणे हे गरजेचे आहे. म्हणून हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक असे आहे. लेखिकेने सत्य घटना मांडताना कोठेही मोडतोड केली नाही.
सरकारच्या पॅकेजचाही लेखिकेने खरपूस समाचार घेतला आहे. यावर लेखिका म्हणते, लोककथा आठवल्या की त्यात असं वर्णन आढळतं. पाऊस येईल, नदीला पाणी येईल, कणसात दाणा भरेल, दाण्याची भाकरी होईल. पोटाला गरमी येईल. पॅकेज आलं, नदीला पाणी आलं नाही. शेतीला पाणी लाभलं नाही, कणसात दाणा भरला नाही, टोपलीत भाकरी आली नाही, धोतराच्या गाठी सुटल्या नाहीत, म्हणजेच पॅकेजमुळे शेतकऱ्याच्या दाराला तोरण लागलंच नाही. त्याचं मरण चुकलंच नाही. जे काही पॅकेजच्या पोतडीत आलं ते मधल्या चोरांनीच लुटलं. मूठ दाबल्याशिवाय हाती काही पडतं नव्हतं. मूठ दाबायचं तंत्र शेतकरी शिकले नव्हते. पॅकेजमुळे मरण टळलं नव्हतं. शेवटी पॅकेज मलमपट्टीत होती. त्यामुळे गेलेला जीव तर परत येणारच नव्हता. शेवटी पॅकेज आलं, वाया गेलं.
अशा या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. लोकचळवळीतूनच आता या आत्महत्या थांबू शकतात. आशा आहे ही चळवळ उभी राहण्याची आणि या शेतकरी आत्महत्या थांबण्याची.
पुस्तकाचे नावः आत्मघाताचे दशक
लेखिकाः प्रतिमा इंगोले
प्रकाशकः सोनल प्रकाशन, अमरावती
पृष्ठेः २०५, किंमतः २५० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.