कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाने यावर्षीपासून संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रंथकाराला किंवा ग्रंथासाठी ‘सद्गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे अध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार’ सुरू केला आहे.
सोलापूर येथील डॉ. गौरी कहाते यांच्याकडून त्यांचे वडील स्व. सद्गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यापीठास दिलेल्या देणगीमधून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यंदा हा पुरस्कार प्रा. समीर चव्हाण (आय.आय.टी, कानपूर, उत्तरप्रदेश) यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख रु ५१,०००/-, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे असल्याची माहिती कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांनी दिली.
प्रा. समीर चव्हाण हे आय. आय. टी. कानपूर, उत्तरप्रेदश येथे गणित विषयाचे प्राध्यापक आहेत. चव्हाण यांनी अखईं ते जाले (तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात ) हा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ तुकोबांच्या कवितेचा भारतीय परिप्रेक्ष्यात नव्या पद्धतीने घेतलेला शोध आहे. हा ग्रंथ तुकारामांच्याकडे आणि अभंगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा आहे. तसेच तुकारामांच्या लेखनामागे असणाऱ्या भारतीय पातळीवरील दार्शनिक प्रेरणांचा शोध आणि भारतीय परिप्रेक्षात तुकारामांच्या गाथेचे स्थान या ग्रंथात चर्चिले गेल्याने या ग्रंथाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. याबरोबरच त्यांच्या नावावर हौस, काळाची सामंती निगरण, रात्रिची प्रतिबिंबे इत्यादी कवितासंग्रह तर समकालीन गझलः एक व्यासपीठ, समकालीन गझलः एक अवलोकन हे समीक्षाग्रंथही प्रसिद्ध आहेत. समकालीन गझल हे मराठी नियतकालिकाचे संपादक म्हणूनही ते काम पाहतात.
या पुरस्कार निवड समितीचे सचिव म्हणून संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले तर या निवड समितीमध्ये सदस्य म्हणून डॉ. एकनाथ पगार (देवळा), डॉ. रमेश वरखेडे (नाशिक), प्रा. प्रविण बांदेकर (सावंतवाडी) यांनी काम पाहिले. या पुरस्काराचे वितरण लवकरच केले जाणार आहे, असे कुलगुरू प्रा. शिर्के यांनी सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.